Wednesday, September 27, 2017

आणि गायब सरकारचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागलं-





2 तास उशीराला ते उशीर मानत नसणार! "समयपर रहना हमारी प्रतिबद्धता है. आमची विमानं कायम वेळेवरच सुटतात." विमानातील हवाईसुंदरी पाठ केलेली वाक्यं कृत्रिमपणे म्हणत होती. तरी बरं विमानाला 2 तास उशीर झालेला होता.
इम्फाळला पोचलो तेव्हा जोरदार पाऊस पडत होता. आता भिजावं लागणार असं वाटत होतं. मात्र चक्क विमान कंपनीचे कर्मचारी प्रत्येक प्रवाशाला छत्री देत होते. इतकं मस्त वाटलं.
आम्ही इम्फाळचा कांगला किल्ला बघायला गेलो होतो. किल्ल्यासमोर ग्रुप फोटो काढावा म्हणून एका युवकाला आमचा फोटो काढतोस का? अशी विनंती केली. तो चक्क लाजला आणि दूर पळाला. मुलींच्या घोळक्यातली एक युवती धीटपणे पुढे आली आणि म्हणाली मी काढते. तिने वेगवेगळ्या अ‍ॅंगलमधून आमचे फोटो काढून दिले. इकडच्या बाजारात विक्रेत्या बहुधा महिलाच असतात. दुकानं, हॉटेल्सही महिलाच चालवतात. महिला निर्भय आणि कष्टाळू आहेत.

ईशान्य भारतात पहाटे 5 वाजताच सुर्य उगवतो. मात्र संध्याकाळी 5 वाजता अंधार पडतो. 6 वाजता सर्व दुकाने, हॉटेल्स अगदी ए.टी.एम.सुद्धा बंद होतात.
मनीपूर, नागालॅंड, मिझोराम ही राज्यं अशांत राज्यं मानली जातात. पावलापावलांवर सीमा सुरक्षा दलाचे जवान हातात मशिनगन्स घेऊन पहारा देताना दिसतात.
हायवेवर तर फारच कडक सुरक्षा असते. हायवे लॅंडस्लाईडिंग, पावसाळ्यामुळं पडलेले दहाबारा फूट आकाराचे प्रचंड खड्डे आणि कापले गेलेले रस्ते यामुळे केवळ पायवाटा बनलेले.
निसर्ग हिरवाकंच आणि शेकडो किलोमीटर सलग साथीला.
सरकार तुमच्या साथीला, अशा पदोपदी केवळ जाहीराती दिसतात. अर्थात सरकारचं अस्तित्व खड्ड्यांमधून जाणवत राहतं. विकासाचे वादे कापले गेलेले रस्ते बोंबलून सांगत असतात.
दर पंचवीस किलोमीटरला हायवेवरील सीमा सुरक्षा दलाच्या चेकपोस्टवर वाहनांची व प्रवाश्यांची नोंदणी करावी लागते. एक मराठी जवान भेटला. म्हणाला, वाहतुक बहुधा बंद आहे. तिकडून गेले तीन दिवस एकही वाहन आलेले नाही. काहीतरी गडबड असावी. आम्हाला परत जाणेही शक्य नव्हते. आमच्या विनंतीवरून त्यानं दहावीस ठिकाणी फोन करून चौकशी केली. कुठे फोन उचलला जात नव्हता तर कुठे माहित नसल्याचं सांगितलं जात होतं.
आम्ही पुढे जायचं ठरवलं. जसं गाव जवळ आलं तसं सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलीस सगळे गायब झालेले. प्रशासन, पोलीस, तमाम सरकार गायब. पाचसहा किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या.
चौकशी केली तर गडबड आहे, रस्ता अडवलेला आहे, एव्हढंच उत्तर मिळे. प्रत्येक वाहनचालकाच्या चेहर्‍यावर मुर्तीमंत भिती.
आमचा ड्रायव्हर आसामी होता. गोड आणि कर्तव्यदक्ष युवक. तो म्हणाला, तुम्ही टुरिस्ट असल्यानं तुम्हाला सोडतील.
त्यानं आमची गाडी पुढं काढली आणि गावकर्‍यांनी जिथे रस्ता रोको केलेला होता तिथवर नेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांना एक दोरखंड बांधून रस्ता अडवलेला होता. पलिकडं खाटा टाकून महिला बसलेल्या होत्या. " आम्हांला शांतता हवी, निष्पाप महिलांच्या हत्त्या थांबवा" असे फलक त्यांच्या हातात होते. बहुतेक सगळ्या मनीपूरी भाषेत बोलत होत्या. एकदोघांना इंग्रजी, हिंदी येत होतं.
आम्ही त्यांच्याशी बोललो. सीमा सुरक्षा दलानं चकमकीत 3 गावकर्‍यांच्या हत्त्या केल्याचा त्यांचा आरोप होता. त्यात एक गरोदर महिलाही मारली गेलेली असल्यानं गावकरी चिडले होते. त्यांच्याशी बोलणी करायला कोणीही सरकारी अधिकारी 3 दिवस झाले तरी फिरकलेला नव्हता. सरकार नावाची गोष्टच तिथं शिल्लक नव्हती.
"अब तुम्हारे हवाले वतन साथियों," असं सरकार रस्ता बंद करणारांना म्हणत असणार. परिसरातले सरकारी अधिकारी, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान पळून गेलेले. कोणीही वाली नाही अशी अवस्था. अगतिक रस्ता. असहाय्य प्रवाशी.
आम्ही महाराष्ट्रातून आलोय असं सांगून आम्हाला सोडावं अशी विनंती केली. ते म्हणाले, जोवर पोलीस मारले गेलेल्यांची प्रेतं आमच्या ताब्यात देत नाहीत तोवर आम्ही कोणालाही सोडणार नाही. विशेषत: महिला अत्यंत संतप्त होत्या. किती वेळ लागेल काहीच सांगता येत नव्हतं.
मागं जाणं शक्यच नव्हतं.
आम्ही त्यांच्याशी बोलत राहिलो. त्यांना प्रेतावर अंथरायला दुरवरच्या बाजारातून शाली आणायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी आमची गाडी मागितली. गाडी द्यावी तरी धोका आणि नाही द्यावी तरी संकट होतं.
आम्ही गाडी दिली. ड्रायव्हर आणि संभाजीदादा त्यांच्या सोबत गेले.
आम्हाला बसायला युवकांनी खुर्च्या आणून दिल्या. महिला तावातावानं बोलत होत्या. पोलीस प्रशासनाला बहुधा शिव्या घालत असाव्यात. हजारो ट्रक डायव्हर्स चिडीचूप बसलेले होते. वातावरण अत्यंत तणावग्रस्त आणि स्फोटक वाटत होतं.
संभाजीदादानं त्या तरूणांना चहा, तंबाखू दिला. गप्पा मारतामारता आमची सगळी माहिती सांगितली. आम्ही केवळ गरिब मराठी लेखक आहोत याची त्यांना खात्री पटवून दिली. त्यांनी शाली घेतल्या. तासाभरात आमची गाडी परत आली. त्या गावकर्‍यांनी आमची गाडी पलीकडेच दूर थांबवली. आम्हाला चालतचालत नेऊन गाडीत बसवले आणि तुमच्याशी आमचं भांडण नाही, तुम्ही सुखरूप जा असा आम्हाला निरोप दिला.
आणि आमची सुखरूप सुटका झाली.
मिजोराम, नागालॅंड, अरूणाचल प्रदेशला जाण्यासाठी रितसर इनर लाईन परमिटस काढावी लागतात. आम्ही ती काढून ठेवलेली होती. पोलीसांनी आमची सगळी कागदपत्रे तपासली. परमिट तपासले. सगळे ठीक आहे, मात्र पैसे [लाच] घेतल्याशिवाय आम्ही कोणालाही राज्यात प्रवेश देत नाही असं आम्हाला दरडावलं.
आणि सरकारचं अस्तित्व आम्हाला ठळकपणे जाणवू लागले. याला म्हणतात 66 इंची सरकार.
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment