Wednesday, September 27, 2017

आहसर म्हणजे अविरत उर्जास्रोत --
आजचे आघाडीचे प्रबोधनकार, महापंडीत डॉ. आ. ह. साळुंखेसर यांच्यासमवेत ईशान्य भारत दौरा करताना लक्षात आले की सरांची एक अफलातून सवय आहे. ते देशाच्या ज्या प्रांतात जातात तिथली माती सोबत घेतात. त्यांनी आपल्या घराच्या बागेत ही माती टाकलेली असून आजवर त्यांच्या बागेत 29 राज्ये आणि 7 केंद्रशाषित प्रदेशातील माती जमवलेली आहे. भारताचे प्रत्येक राज्य आणि सर्व केंद्रशाषित प्रदेश सरांनी पाहिलेले आहेत. देशातले एकही स्थळ असे नाही की जे सरांनी पाहिलेले नाही.
सर अतिशय हळवे, आर्जवी, विनयी आणि प्रकांडपंडीत आहेत. ते जिथे जातात तिथल्या सामान्य माणसांमध्ये रमतात. त्यांच्याशी अगत्यपुर्वक संवाद साधतात. निसर्गाचा आत्यंतिक
उत्कटतेनं आस्वाद घेतात. ते पानाफुलात हरवून जातात. अनेक ज्ञानी माणसं इगोईष्ट असतात. आपला मोठापणा सोबत्यांना जतवत असतात. सरांचं नेमकं उलटं आहे. अतिशय संवेदनशील आणि सतत आधी दुसर्‍यांचा विचार करणारे मन सरांनी जपलेले आहे. सर कवीमनाचे आहेत. काव्य आणि विद्वत्ता यांचा अनोखा संगम म्हणजे सर.
त्यांच्यासोबतचा प्रवास म्हणजे अफाट ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि निर्मितीशील आनंदाचा अनुभव.
आज वयाच्या पंच्याहत्तरीतही सरांचा उत्साह सोबतच्या तरूणांना लाजवेल असा असतो. पहाटे सर्वात आधी उठणार. 2 कप चहा घेतला की 15 ते 20 मिनिटांत सर तयार होतात. ठरलेल्या वेळी ते सर्वात आधी आणि मिनिटभरही उशीर न करता गाडीत येऊन बसणार. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सकाळी/पहाटे ठरलेल्या वेळी सर तयार असणारच.
शेकडो किलोमीटर प्रवासातही ते थकत नाहीत.
सतत नवनवी भौगोलिक माहिती आणि स्थानिक संदर्भ यांचा आपल्या सोबत्यांना सर पुरवठा करीत असतात. कोणालाही दुखवायचे नाही मात्र आपला मुद्दा आर्जवीपणे लावून धरायची त्यांची हातोटी.
सहकार्‍यांच्या चुकांबद्दल कधीही चिडचिड नाही की कूरकूर नाही. स्वत:च्या तब्बेतीचं रडगाणं ते कधीही ऎकवणार नाहीत.
एक अविरत उर्जास्रोत म्हणजे आहसर.
स्वत:च्याच भाग्याचा मला हेवा वाटतो की सरांसोबत अनेक दौरे करता आले. खूपखूप शिकता आलं. धमाल जगता आलं. अनेक अनमोल क्षण चिमटीत पकडता आले.
आहसर, आम्ही कृतज्ञ आहोत!
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment