Wednesday, September 27, 2017

ईशान्य भारतात फिरताना-




इम्फाळहून नागालॅंडची राजधानी कोहिमाला जात असताना एका खेड्यात चहाला थांबलो होतो. धोधो पाऊस पडत होता. चुलीवरचा मस्त स्पेशल चहा अवघ्या पाच रूपयाला मिळाला.
इम्फाळच्या क्लासिक हॉटेलात मचूळ चहा 59 रुपयांना मिळाला होता. [चहा 50 रुपयांचा आणि जीएसटी 9 रुपये] चुलीवरच्या चहाची चव काही औरच होती.
शेजारच्या टपरीवर रासायनिक खते न वापरता पिकवलेला लसूण विकायला ठेवलेला होता. 100 रुपये किलो. आ.ह. साळुंखेसरांनी एक कांडी घेतली. त्याचे किती पैसे द्यायचे असे विक्रेत्याला विचारले.
तो म्हणाला, "एकाचे कुठे पैसे घेत असतात काय? अहो, आमची आठवण म्हणून आणखी एक कांडी ठेवा." असं म्हणत त्यानं दुसरी कांडी सरांच्या हातात दिली. त्यानं पैसे घ्यावेत म्हणून सरांनी खूप आग्रह केला पण त्यानं पैसे घेतले नाहीत. पुढं कोहिमाच्या बाजारात आम्ही एक किलो लसूण घेतला. पण तो लसूण नसून बारका पांढरा चिंगळी कांदा असल्याचं भाषेच्या अडचणीमुळे कळलंच नाही.

मिझोरामची राजधानी ऎजवालच्या फ्लोरिया ग्लॅमर हॉटेलमधला बेचव चहा 71 रुपयांना मिळाला. [ चहाचे रुपये साठ आणि जीएसटीचे अकरा रूपये ]
आगरताळाला जाताना संध्याकाळी एका चहाच्या टपरीवर थांबलो. बाईंनी झकास ताजा स्पेशल चहा बनवून दिला. पाच रूपयाला ग्लासभरून कडक चहा.
संभाजी भगतांना तिकडची सोनकेळी आवडली म्हणुन त्यांनी खायला घेतली. चहाचे पैसे देताना केळीचेही पैसे घ्या असा आग्रह केल्यावर बाई म्हणाल्या, " एका फळाचे पैसे घेणं मला पटत नाही."

रस्त्यांवर गस्त घालणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान सतत भेटत. चौकशी केली की एखादा तरी मराठी जवान भेटायचाच. आम्हाला भेटून त्याला इतका आनंद व्हायचा की भान हरपून तो जवान आमच्याशी किती बोलू नी किती नको असं करायचा. मराठी बोलायला आणि ऎकायला कान आणि जीभ आतुर असल्याचं प्रत्येकजण सांगायचा.
भारत बांगलादेश सीमेवर आसामच्या भांगाजवळ होशियारा नदी आहे. नदीच्या एका बाजूला भारत आणि दुसर्‍या बाजूला बांगला देश.
बांगला देशाची सीमा अगदी जवळून पाहता यावी म्हणून आम्ही बीएसएफचे अधिकारी आर.के.यादव यांची रितसर परवानगी घेतली. त्यांनी आपुलकीनं आमची विचारपूस केली, चहा दिला आणि होशियारा नदीतून भारतीय हद्दीतून बोटीची सफरही घडवली. नदीच्या दुसर्‍या बाजूला बांगला देशचे कोळी मासे पकडत होते. लहान मुलं शेतात काम करीत होती. त्यातले कित्येक अंगावर सदराही नसलेले गरिब होते, ते अतिशय प्रेमाने आम्हाला हात हलवून टाटा करीत होते.
प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment