नॅशनल हायवे हा पायवाटेएव्हढाच कसा असतो हे अनुभवायचं असेल तर सिल्चर [आसाम] ते [एजवल] मिझोराम हा प्रवास करायला हवा. दोन नॅशनल हायवे आहेत. एक संपुर्ण उखडलेला किंवा नाहीसा झालेला आणि दुसरा पायवाटेएव्हढाच.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो फूट खोल हिरव्याकंच दर्या. बांबूची खाली टेकू लावलेली छोटीछोटी घरं. स्वच्छ आणि टुमटुमीत गावं.
निसर्गाच्या सहवासानं माणसं प्रेमळ आणि विनयी बनलेली असणार. हजारो लोक पाहिले. अनेकांशी बोललो. अतिशय नम्र आणि जिव्हाळ्यानं बोलणारे. मुली, महिला आधुनिक ड्रेस घातलेल्या. लिपस्टीक लावलेल्या. सगळ्याजणींनी केस मोकळे सोडलेले. शाळांमध्ये जाणारी गणवेशातील गोड बच्चेकंपनी. सगळीकडं झकास कॉन्वेंट शाळा. नागालॅंड, मिझोराम, मेघालय ही ख्रिश्चनबहुल राज्यं. आदीवासींची असूनही सर्वाधिक साक्षरता असलेली राज्यं. देशातल्या अन्य आदीवासी बांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण सर्वात कमी असते. मिशनर्यांमुळे हे प्रदेश शिकू शकले. विविध प्रवाहांमधली चर्चेस सगळीकडे. तरूण मुलंमुली मात्र चर्चला जायला नाखुश असतात.
बायका अत्यंत बोल्ड आणि डेरिंगबाज. पुरूष काहीसे लाजरेबुजरे, घुमे आणि आत्ममग्न. चिमुकल्या नागालॅंड राज्यात सोळा भाषा बोलणारे आदीवासी राहतात. कोहिमा आकाशवाणी केंद्रावरून दररोज 14 स्थानिक भाषांमधून बातम्या दिल्या जातात.
यातल्या अनेक टोळ्या स्त्रीप्रधान. मातृसत्ताक. दुसर्या टोळीतल्या पुरूषांची मुंडकी कापून आणणार्या पुरूषांशी सुंदर स्त्रिया लग्न करीत. हेडहंटींगची ही प्रथा आता कायद्यानं बंद करण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणी त्याचा गौरवपुर्ण उल्लेख केलेला आढळतो. अगदी भारतीय सैन्याच्या मुख्यालयांवरही.
आज मात्र अपवादालाही अरेरावी करणारा, भांडकुदळ, दरडावणारा माणूस इकडे सापडत नाही. अतिरेकी संघटना मात्र हाताचा मळ झटकावा इतक्या सहजपणानं हत्त्यासत्रं घडवतात. अजब रसायन. गजब दुनिया.
प्रत्येक बाई, अगदी लहान मुलीही पानं खातातच. रुपयाला एक पान. रंगानं सारे गव्हाळ, किंचित सावळे किंवा लख्ख गोरे. मात्र मोजून सारे बुटके. पोट सुटलेला, धिप्पाड,गोल गरगरीत असा एकही स्त्री-पुरूष माणूस बघायला मिळाला नाही.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी नाही. खाजगी बारक्या गाड्यांमधून वाहतूक चालते. शेकडो किलोमीटर गेलं तरी पेट्रोलपंप दिसत नाहीत. सगळीकडं बाटल्यांमधून पेट्रोल,डिझेल विक्री चालू असते. खेडेगावं, तालुका, जिल्ह्यांची प्रमुख ठिकाणं सोडा, अनेक राज्यांच्या राजधान्यांना जोडणारी साधी रेल्वेही आम्ही त्यांना देऊ शकलेलो नाहीयोत. मी त्यांना म्हणलो, नसेना रेल्वे पण लेको बुलेट ट्रेनचा महोत्सव करायला काय हरकताय? ते आता थेट बुलेट फेस्टीव्हलच करतील!
शक्यतो कोरा चहा किंवा पावडरचे दूध.
भाकरी, रोटी, पराठा दुर्मिळ. भातच भात चोहीकडे.
भात भारतात सर्वत्र मिळतो. खर्या अर्थानं राष्ट्रीय अन्न.
सलग 100 कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर लांबीच्या डोंगरदर्या. वनराई. घनगर्द झाडी. उंचच उंच घनदाट वृक्षराजी. जैवविविधतेनं संपन्न, श्रीमंत प्रदेश.
या सातही राज्यांचं वर्णन करायचं तर एकाच शब्दात करता येईल "ग्रीनलॅंड." अमाप नेत्रसुखाचा नितांत सोहळा!
- प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment