Sunday, February 26, 2017

मराठी भाषा गौरव दिन


27 फेब्रुवारी, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.
यानिमित्ताने मराठी भाषेबद्दल साधक बाधक चर्चा होतेय याचा आनंद वाटतो.
आमच्या काही मित्रांनी अभिजात दर्जा नसला तरी मराठी अभिजातच आहे, दर्जाला महत्व नाही ते थेट अभिजात भाषेचा दर्जा नाही मिळाला तरी बेहत्तर इथपर्यंत लिहायला सुरूवात केलीय. मागे तर आमचे एरवी प्रसन्न असलेले एक पत्रकार मित्र मराठीवर एव्हढे भडकले की मराठी मेली तर काय हरकत आहे अशी विचारणा त्यांनी केली.
या मित्रांना एक नम्र प्रश्न विचारावासा वाटतो. एखाद्या विद्वानाला पदव्या असल्या काय आणि नसल्या काय फारसा फरक पडत नाही, मात्र हेच सत्य पदव्या असलेल्याने मांडले तर त्याला वेगळी झळाळी असते आणि नसलेल्याने मांडले तर त्याच्याकडे लोक कुत्सितपणे बघतात.
मराठी मरते आहे असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणाले, तेव्हा त्यामागे आर्त कळकळ होती, जिद्द होती मराठी जगवण्याची. तशीच भुमिका असूनही जर केवळ एक रणनिती म्हणून मराठी मेली तर काय हरकत आहे असे धक्कातंत्र विधान केले तर त्यामागची भावना वेगळी बनते,पण मराठी मरायलाच हवी, अशा धारणेतून केलेले हे चिंतन असेल तर मी त्यावर काहीही म्हणु इच्छित नाही.
दर्जा मिळविण्यासाठी एका जिद्दीने गेली अनेक वर्षे झटणार्‍यांना मदत करता येत नसेल तर नका करू पण मराठीला हा दर्जाच नको ही भावना मला तरी अनाकलनीय वाटते. जे आपल्या आईच्या मरणासाठी अतिव उत्सुक असतील त्यांना माझ्या शुभेच्छा. मात्र सगळेच असे आहेत असे नाही. आमचे मित्र डॉ. पृथ्वीराज तौर म्हणतात,
"भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जातात, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद भासतात...
भाषा कशासाठी? या प्रश्नाचं खूप साधं उत्तर आहे- भाषा असते, ती संवाद साधण्यासाठी. भाषा होती म्हणूनच मानवाला आपल्या भावना, आपले विचार यांची देवाणघेवाण शक्य झाली. भाषेला घडवता घडवता माणूस स्वतःलाही घडवत गेला. किंबहुना मानवाचा सगळा विकास भाषेमुळेच शक्य झाला.
भाषेमुळेच मानवाला संस्कृती मिळाली, भाषेमुळेच सभ्यता निर्माण झाली, भाषेमुळेच विज्ञान अवतरले, भाषेमुळेच तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे जतन शक्य झाले. भाषा नसती तर काहीच घडले नसते. शक्य नव्हते. जगभरच्या विविध मानवी समूहांनी विविध भाषा जन्माला घातल्या, जोपासल्या. भारतासारख्या देशात काही हजार भाषा आणि बोली बोलल्या जातात. भाषा केवळ भावना, विचार व्यक्त करण्याचे साधन अथवा माध्यम नाही. भाषेचे अस्तित्व एका मानवी संस्कृतीचे अस्तित्व असते. उत्क्रांतीचा एक मोठा अवकाश भाषेमध्ये नांदत असतो. त्यामुळे भाषा मग ती कोणतीही असो, ती टिकवणे महत्त्वाचे आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यात सगळ्या जगाला बाजारपेठ करण्याच्या ईर्षेने भाषिक सपाटीकरणाची प्रक्रिया मागच्या दोन-अडीच दशकापासून खूप गतिमान होत आहे. पाठोपाठ छोट्या-छोट्या समूहांच्या भाषाही नष्ट होत आहेत. त्या त्या भाषांसमवेत त्या-त्या भाषेतील ज्ञानाचाही अस्त होत आहे. भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जात आहेत, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद आहेत. आत्यंतिक स्वभाषाप्रेमातून अन्य भाषांप्रती विद्वेशाची निर्मितीसुद्धा संवादाला घातक आहे. महत्त्वाचा आहे तो मानवी संवाद आणि म्हणून गरजेचे आहे जगातील प्रत्येक भाषेचे संवर्धन आणि तिची जोपासना करणे. या कविता आपणास भाषिक संवादाच्या सेतूवर घेऊन जातील अशा आहेत."
आज जगात 6 ते 7 हजार भाषा असाव्यात. त्यातल्या दोन हजार मरू लागल्यात.
मुळात भाषा हे संवाद व अभिव्यक्तीचे चलन होय. लोक आपले दैनंदिन व्यवहार भाषेच्या माध्यमातून करतात. ज्ञान, संस्कृती, कला, जगाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन हे भाषानिहाय वेगवेगळे असू शकतात. भाषा संस्कृतीची जणुकं वाहून नेतात. भाषांना स्वत:चे सार्वभौमत्व असते.
हे विश्व सामान्यपणे 1400 कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी 450 कोटी वर्षांपुर्वी जन्माला आली असे मानले जाते.
माणसाचा पुर्वज 1 कोटी वर्षांपुर्वी जन्मला. पाच लख वर्षांपुर्वीचे आपले पुर्वज व आपण यात महत्वाचा फरक म्हणजे आपण भाषा बोलू शकतो. त्यांना भाषा माहित नव्हती. हावभाव, संगीत, स्वर ही अभिव्यक्तीची माध्यमे टप्प्याटप्प्याने विकसित झाली. भाषांची निर्मिती 70 हजार वर्षांपुर्वी झाली. आपली मराठी भाषा सुमारे 2500 वर्षांपुर्वी जन्माला आली. मुद्रण कलेने मराठी भाषा आणि देवनागरी लिपी टिकण्याची प्रक्रिया गतिमान झाली.
मात्र स्थलांतर, जागतिकीकरण, मराठी भाषकांची उदासिनता आणि पराभूत मानसिकता, जागतिक व भारतीय बाजाराचा मराठीकडे उपेक्षेने बघण्याचा दृष्टीकोन, इंग्रजीचे आक्रमण, परधार्जिणे राज्यकर्ते, केवळ आर्थिक संपन्नतेसाठी आणि दिखाऊ प्रतिष्ठेसाठी इंग्रजीला शरण जाण्यासाठी उत्सुक उच्च मध्यमवर्ग आणि बुद्धीजिवी, नवे तंत्रज्ञान अशा अनेक कारणांनी मराठीवरचे आक्रमण वाढत आहे. मराठी जगेल की मरेल ते मराठी शाळा टिकणार की बंद होणार यावर अवलंबून आहे. ज्या दिवशी मध्यमवर्गाने आणि उच्च मध्यमवर्गाने मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
इतर भाषांचा द्वेष नको पण मराठीचा आग्रह हवा. इंग्रजी किंवा हिंदीत बोलणे हे प्रतिष्ठेचे आणि मराठीत बोलणे मागासलेपणाचे असे ज्यांना वाटते त्यांना आम्ही सांगू "माफ करा मराठी अमृतातेही पैजा जिंकणारी आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, चक्रधर, शेख महंमद,फादर स्टीफनसन,कित्येकांनी मराठीचा जयजयकार केला तो फुकाचा नाही.तो सार्थ आहे.जगातल्या सर्व देशांना राष्ट्रगितं आहेत पण विश्वगीत "पसायदान" फक्त मराठीतच आहे. धनाढ्यलोक जगभर असतील त्र गुणाढ्य मात्र एकट्या मराठीकडे आहे. तेव्हा जगात अवघ्या 10 भाषा टिकल्या तरी मराठी टिकेल.
आज संत एकनाथ असते तर ते सात्विक संतापाने म्हणाले असते, " आंग्लवाणी बाजारे केली मग मराठी काय चोरांपासून झाली?"
तर ज्यांच्या आजी - आजोबांची मातृभाषा मराठीच होती, पण ज्यांचे पालक आणि जे स्वत: इंग्रजी माध्यामातून शिकलेत आणि तरिही ज्यांना मराठीचे प्रेम आहे त्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.
मात्र आंग्लाळलेल्या ज्यांना इंग्रजीच्या गुलामीचा विशेष अभिमान वाटतो, मराठीची अतिच लाज वाटते, ज्यांना मराठी ही हलकी भाषा आहे, ती ज्ञानभाषा आणि रोजगार देणारी भाषा नाही असे वाटते त्या "कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ" असणार्‍यांना वगळून इतर सर्व मराठीप्रेमींना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

Friday, February 24, 2017

या झाडाला मुळं काही फुटतच नाहीयेत

नेहमीप्रमाणे एक मराठी आजोबा असतात. ते सिनियर सिटीझन वगैरे असतात. त्यांना एक स्मार्ट नातू असतो. तो रितीप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या ज्युनियर केजीमध्ये शिकत असतो.
गोष्टीतल्याप्रमाणे आजोबा नातवाला आंबे खायला मिळावेत म्हणून आंब्याचं झाड लावतात.
नातवाला जवळ बोलवून मायेनं शिकवतात, माती कशी खोदायची, तिचं आळं कसं बनवायचं, त्यात खत कसं घालायचं आणि झाड लावून त्याला पाणी कसं घालायचं असं सगळं काही.
त्याला आजोबा बजावतात, "हे बघ आजपासून या झाडाची निगुतीनं काळजी घ्यायची जबाबदारी तुझी. त्याला दररोज पाणी वगैरे घालायचं. एकदा का त्याला मुळं फुटली की मग काळजी मिटली. पुढे त्याला आंबेच आंबे येतील. मग काय तुझी मज्जाच मज्जा!"
काही दिवसांनी आजोबांनी पाहिलं तर झाड सुकून चाललेलं.
नातवाला ते ओरडले, "तू नीट काळजी घेतली नाहीस म्हणूनच असं झालं असणार."
नातू म्हणाला, "मी दररोज तुम्ही सांगितलेली सगळी काळजी नीटच घेतोय वगैरे. तुमच्या या झाडातच काहीतरी गडबड असणार.
इतकं सारं नीटच करूनही या झाडाला मुळं काही फुटतच नाहीयेत."
आजोबा आचंबित झाले, म्हणाले, "पण तुला कसं कळलं? मुळं तर जमिनीत असतात."
नातू म्हणाला, " मग काय झालं, मी दररोज सकाळी आधी झाड उपटून बघतो, मुळं फुटलीत की नाही!"
....................

आजच्या दिवसापुरता गणप्याचा गणपतराव

मताधिकार म्हणजे आपण या महान देशाचे मालक असल्याची जाणीव. मतदार यादीत नाव म्हणजे देशाच्या मालकीहक्काच्या 7/12 मध्ये नाव असल्याचा अभिमान.
1952 -- मालक म्हणायचे "काय गणप्या कसं?"
"मालक तुम्ही म्हणतान तसं", गणप्या म्हणायचा.
....................
2017-- मालक म्हणतात, " गणपतराव, आम्ही निवडणुकीला उभे आहोत, आमच्याकडं लक्ष असू द्या."
त्यावर गणप्या, ताठ मानेनं म्हणतय, "मालक इचार करावा लागंन. मिटींग घेताव आन मग ठरवताव आम्ही."
......................
आज आपली लोकशाही सिनिअर सिटीझन झाली. 1952 साली जानेवारीत पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या 65 वर्षात किती मोठा पल्ला गाठला या लोकशाहीने.
माझे आजोबा सांगायचे, पहिल्या निवडणुकीच्या वेळी निवडणुका कशा होतात, मताधिकार काय असतो, सार्‍याच गोष्टींचे अप्रुप होते. त्यापुर्वी ब्रिटीश भारतात फक्त राजे, महाराजे, सरदार, नबाब, आयकर भरणारे सावकार आणि पदवीधर यांनाच मताधिकार असल्याने त्या सर्वांची संख्या 1 टक्क्यापेक्षाही कमी असायची.
1952 ला मोठमोठे मालक लोक निवडणुकीला उभे होते. त्यांनी किल्ल्यांवरून, वाड्यांवरून,हवेल्या किंवा बंगल्यांवरून आदेश दिले की सारे गोरगरिब मतदार हात जोडून मालकांपुढे हजर व्हायचे. मालक म्हणायचे "काय गणप्या कसं?"
"मालक तुम्ही म्हणतान तसं", गणप्या म्हणायचा.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीनं सामान्य माणसाला काय दिलं?
आजही मालक आणि मालकीन उभे असतात. फरक इतकाच की त्यांच्या जोडीला, पालावरचे, शेतावरचे, पाड्यावरचे, फूटपाथवरचे असेही उभे असतात, आताशा ते गणप्याला बोलवून घेत नाहीत, तर ते किंवा त्या वस्तीत जातात, झोपडपट्टीत जातात, फाटक्या मतदारासमोर दोन्ही हात जोडून उभे राहतात आणि चेहर्‍यावर कृतक हासू आणून म्हणतात, " गणपतराव, आम्ही निवडणुकीला उभे आहोत, आमच्याकडं लक्ष असू द्या."
गणप्या, ताठ मानेनं म्हणतय, "मालक इचार करावा लागंन. मिटींग घेताव आन मग ठरवताव आम्ही."
...................
या लोकशाहीत अनेक त्रुटी, दोष, दांभिक गोष्टी आहेत, पण तरिही ज्या देशात एकाच देशात अनेक देश नांदतात, एकाच वेळेला 5000 वर्षांपुर्वीचा भारत, 1000 वर्षांपुर्वीचा भारत, आजचा भारत आणि 100 वर्षे पुढचा भारत असे भारत राहत असतात त्या देशात 130 कोटी लोकांना मणके असल्याचा प्रत्यय देणारा हाच एक दिवस असतो.
मताधिकार म्हणजे आपण या महान देशाचे मालक असल्याची जाणीव. मतदार यादीत नाव म्हणजे देशाच्या मालकीहक्काच्या 7/12 मध्ये नाव असल्याचा अभिमान.
संविधानाच्या कलम 326 अन्वये सर्व भारतीयांना सार्वत्रिक मताधिकार देणार्‍या डा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आदींना वंदन.......
..........................

"सिंगल मिंगल"

"सिंगल मिंगल" - आजच्या तरूणाईचे भोवंडून टाकणारे चित्रण
"सिंगल मिंगल", ही प्रा. श्रीरंजन आवटे यांची पहिलीच पण कलदार मुद्रा असलेली कादंबरी. 208 पृष्ठांच्या दर्जेदार निर्मितीमुल्ये असलेल्या कादंबरीचे प्रकाशक आहेत मराठीतले आघाडीचे राजहंस प्रकाशन.
नायक कैवल्य हा दुसर्‍या वर्षात शिकणारा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याचे समकालीन युवा भावविश्व चित्रशैलीत ही कादंबरी टिपत जाते.
त्याचे प्रेम जिच्यावर आहे ती महाविद्यालयीन तरूणी रेवा, तिचे अनेक प्रियकर, या सर्वांच्या मित्रपरिवारातील विविध जिंदादिल व्यक्ती आणि वल्ली, त्यांचे प्रेमविश्व असा फार मोठा पट ही कादंबरी कवेत घ्यायचा प्रयत्न करते आणि चांगल्यापैकी निभावतेही. आजच्या नव्या जनरेशनची स्पंदनं किती खोलवर पकडत जाते सिंगल मिंगल.
सध्याच्या अत्याधुनिक जगातील महानगरी तरूणाई, सोशल मिडीया, महाविद्यालयीन जगत, त्यांचे वादविवाद, त्यांचा प्राधान्यक्रम, सामाजिक प्रश्नांबद्दलचे भान आणि खळाळते तारूण्य, विकार, व्यसनं असं सगळं जगणं खोलवर चित्रित करणारी ही ठसठसीत कलाकृती. आजच्या महाविद्यालयीन तरूणांची चिडचिड, त्यांचे टोकदार स्वभाव, कारेपणा, कामजिज्ञासा, त्यांची भन्नाट,बेछूट भाषा यांचे अनेकपदरी जग ही कादंबरी वाचकाच्या पुढ्यात आणून खुले करते.
नवखेपणाच्या काही मोजक्या खुणा सोडल्या तर अतिशय प्रवाही, वाचनीय, अनेकदा भिडणारा आणि काहीवेळा भोवंडून टाकणारा घटनाक्रम हे या कादंबरीचे वैशिष्ट्य.
तरूणाईच्या जगाचे अतिशय धीट आणि टोकदार वास्तव यात असल्याने त्यात येणारे लैंगिक जीवनाचे संदर्भ अटळच होत.
मात्र कादंबरीची सुरूवात आणि शेवट अकारणच जास्त गडद झालाय असे वाटते. त्यातून या कादंबरीबद्दल एक सनसनाटी कादंबरी असा ग्रह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तरूण पिढी कदाचित या कादंबरीकडे पटकन वळेलही पण त्यामुळे लेखकावर काहीसे भडक लेखन करणारा असा शिक्का मारला जाण्याची भिती मला वाटते. प्रत्यक्ष कादंबरीत येणारी सखोलता आणि समग्र जीवनदृष्टी वरवरची नसून ती आरपार अस्वस्थता निर्माण करणारी आहे.
या कादंबरीचा बुद्धीमान नायक कैवल्य याची तगमग, प्रेमातली तडफड, दोस्तान्यातली भंकस, युवा अशोषी, प्रेमातील गुरूत्वाकर्षण, देहगंध हे सगळे लेखकाने अस्सलपणे चिमटीत पकडले आहे. हा साराच भाग अतिशय थेट भिडणारा असून तो मुळातूनच वाचायला हवा.या पहिल्याच लेखनात आवटेंनी त्यांची गुणवत्ता दाखवली असून त्यांच्याकडून आगामी काळात महत्वाचे लेखन होऊ शकेल अशी आश्वासकता या कृतीतून प्रगट होते. हे सारे रसायन अवश्य अनुभवावे इतके दमदार आहे.
आजच्या तरूणाईचे अलवार जग टिपणारी ही कलाकृती अस्वस्थ करून सोडते.
प्रा. श्रीरंजन आवटे यांनी या पहिल्याच कादंबरीद्वारे फार मोठ्या अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत.

पारदर्शक खोटे

सालाबादप्रमाणे पारदर्शक वधुवर परिचय मेळावा चालू होता.
वर, : " मी उच्चशिक्षित आहे. मी पारदर्शक श्रीमंत कुटुंबातील आहे. मला अतिउच्च पगाराची मल्टीनॅशनलमधली पारदर्शक नोकरी आहे. माझे मुंबई, पुणे,ठाणे,नाशिकमध्ये 4 बेडरूमचे पारदर्शक फ्लॅट आहेत. मी एकुलता एक आहे. मी पारदर्शक निर्व्यसनी आहे. मी कष्टाळू, बुद्धीमान आहे. मला भाऊबहीण नसल्याने वडीलोपार्जित संपत्तीचा मी एकमेव पारदर्शक वारसदार आहे. मी निरोगी असून दिसायला पारदर्शक....."
वधु : "तुमच्यात एव्हढी पारदर्शक भारी गुणवत्ता असेल तर तुमचे स्थळ नाकारण्याचे मला काही कारणच दिसत नाही. फक्त एक सांगा,
तुम्ही पारदर्शक सर्वगुणसंपन्न आहात पण तुमच्यात एकतरी दुर्गुण असेलच ना?"
वर :- "दुर्गुण म्हणाल तर एकही नाही. फक्त किरकोळ उणीव म्हणाल तर एव्हढीच आहे की मला पारदर्शक खोटे बोलायची सवय आहे."

प्रमोद महाजन..खरा साहेब

प्रमोद महाजन हे एक अफलातून वक्ते होते.
एका भाषणात त्यांनी सांगितलेला किस्सा -
एक शाळेत शाळा तपासनीस आलेले असतात. ते एका मुलाला एक प्रश्न विचारतात, मुलाला नीट उत्तर देता येत नाही. ते वैतागतात, त्याला म्हणतात, अरे, तुला इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, वर्षभर वर्गात काय झोपा काढतोस?
तो मुलगा म्हणतो, सर चुक माझी नाही.मुळात मी या वर्गातला विद्यार्थीच नाहीये. मला दुसर्‍या वर्गातून इकडे आणून बसवलय. मला कसं माहित असणार इकडचं?
साहेब शिक्षकाला झापतात, काय हो असा उद्योग करता काय? इकडची उपस्थिती वाढवण्यासाठी दुसर्‍या वर्गातली मुलं आणून बसवता?
शिक्षक गयावया करीत सांगतात, साहेब विश्वास ठेवा, मी हे केलेले नाही. आज इकडचे शिक्षक रजेवर असल्याने ऎनवेळी मला या वर्गावर पाठवलेय. मला हे काहीही माहित नव्हते.
साहेब भडकतात, मुख्याध्यापकाला बोलवून धारेवर धरतात.
असले धंदे करता?
मुख्याध्यापक म्हणतात, साहेब त्याचं असं झालं, इथल्या मुख्याध्यापकांच्या मुलीचा आज बाहेरगावी साखरपुडा आहे. ते नसल्याने संस्थेने मला आजचा दिवस दुसर्‍या शाळेतून इकडं पाठवलय. माझी काय चुक?
साहेबांचा पारा चढतो. ते संतापून म्हणतात, अरे चाललय काय या शाळेत? मुलं नकली, शिक्षक बदली, मुख्याध्यापक बाहेरचे, अरे मुर्खांनो, आज जर खरा साहेब आला तर असता तर काय शोभा झाली असती कळतय तुम्हाला?

कोंबडी विक्रेत्यांची पारदर्शक लोकशाही


आचार्य दादा धर्माधिकारी एका अस्सल लोकशाहीवादी पारदर्शक कोंबडी विक्रेत्यांची गोष्ट नेहमी सांगायचे.
तर हा कोंबडी विक्रेता कोंबड्यांचा पारदर्शक विकास करणारा हाडाचा लोकशाहीवादी व्यापारी असतो.
तो एकदा सर्व कोंबड्यांची सभा घेतो.
त्यांना तो सांगतो, बघा मी पारदर्शक लोकशाहीवादी असल्याने आणि हुकुमशाहीचा मी कट्टर विरोधक असल्याने मी तुम्हाला निर्णयाचा पारदर्शक सर्वाधिकार देणार आहे. मला सांगा, तुम्हाला मी मान सुर्‍याने कापून मारू, हलाल करून मारू, की उकळत्या पाण्यात बुडवून मारू, की तुमची मान मोडून मारू, की....? तुमचा जो काही पारदर्शक निर्णय असेल तो मला मोकळेपणाने सांगा.
एक कोंबडी घाबरत घाबरत म्हणाली, पण मालक, आम्हाला जगायचेय, आम्हाला मारू नका.
लोकशाहीवादी विक्रेता म्हणाला, मला माफ करा पण तुम्हाला मारायचा पारदर्शक निर्णय आधीच झालेला आहे. मारण्याची पारदर्शक पद्धत कोणती हवी एव्हढेच तुम्हाला विचारलेय. त्यावर पटपट बोला.

घटनेच्या आधी कसं सांगणार?


गोष्टीत असतो तसा एक राजा होता. त्याने 50 वर्षात अनेक लढाया जिंकलेल्या होत्या.
त्याला अनेक चतुर सल्लागारांचे बळ होते. प्रत्येक शत्रूच्या छावणीत राजाचे पेरलेले हेर असायचे. तिकडेही या राजाला मानणारा मोठा वर्ग असायचा. तेही देश हेच महाराज चालवतात असे भाट म्हणायचे. लढाई मग ती कोणतीही असो, आपले महाराज इतके पोचलेले आहेत, मुरलेले आहेत, की ते ऎनवेळी अशी काही क्लुप्ती लढवतील की तेच जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ होय अशी भाबड्या जनतेची अतिव श्रद्धा होती. तसा अनुभवही होता.
आणि असे 50 वर्षे होतही होते.
एकदा मात्र राजा एक लढाई हरला. महाराज मुद्दामच हरले असणार, अन्यथा त्यांचा पराभव मुळी शक्यच नाही अशी प्रजेची धारणा होती.
राजाने बुद्धीमान सल्लागारांची परिषद आयोजित केली. पराभवावर मंथन करण्यासाठी आत्मपरिक्षण सुरू झाले.
एक जुणेजांणते सल्लागार म्हणाले, महाराज तुमची यावेळची सैन्य रचना चुकल्याने तुम्हे हरलात. तुम्ही घोडदळ पुढे ठेवले पण त्यामागे लगेच हत्तींचं दळ नको होतं.
राजानं नोंद घेतली.
पुढच्या लढाईत राजानं सैन्याची फेररचना केली. राजा जिंकणार असं चित्र असताना शेवटच्या क्षणी राजाची दाणादाण उडाली. राजा चक्क परत पराभूत झाला.
पुन्हा आत्मपरिक्षण.पुन्हा मंथन की काय असतं ते सुरू झालं.
तो सल्लागार म्हणाला, महाराज यावेळची परिस्थिती अगदीच वेगळी होती. तुम्ही परत माती खाल्ली. अहो, अशावेळेला हत्तीचं दळ पुढे हवे होतं.
राजानं पुन्हा पुन्हा नोंद घेतली.
तिसर्‍या लढाईवर जाताना मात्र राजाने आधीच सल्लागारांची बैठक बोलावली.
म्हणाला, मला सांगा, माझा 50 वर्षांचा अनुभव का फोल ठरतोय? माझी अफाट पुण्याई, अपार जादू का चालत नाहीये? आता मला सांगा, मी असं काय केलं म्हणजे या लढाईत मीच विजयी होईन? तुम्ही जसं सांगाल अगदी तसं मी तंतोतंत करतो.
सल्लागार म्हणाला, राजा तू चुकतोयस. घटना घडून गेल्यानंतर त्यात कायकाय चुका झाल्या याचे विश्लेषण करणारा मी तज्ञ आहे. असं घटनेच्या आधी कसं सांगणार?
.................

पारदर्शक राज्यात.. वाघ

एकदा जंगलातला वाघ चवताळला. शिकार्‍याच्या अंगावर धावला. दोघेही सज्ज होते. झेप घेण्याच्या तयारीत. अगदी दक्ष.
सामना असा अनिर्णित राहणं उचित नव्हतं.
शिकारी म्हणाला, आपली गेल्या 25 वर्षांची दोस्ती आहे. मी या जंगलातल्या इतर प्राण्यांना भले मारले असेल पण तुला कधी हात लावला का? तु का माझ्यावर चिडतोयस? असं बघ, हे जंगल तुझंच आहे, फक्त इथले बाकी प्राणी मला मारता यावेत, इतकेच. तसेही कधीही झालं तरी शिकारी हाच भारी असतो. हे सारं विश्व माझं आहे. मीच राजा जगाचा.
उदाहरणार्थ समोरचे गुहेतले कोरलेले शिल्प बघ. त्यात दाखवलेय ते खरेच आहे. वाघाला मारून जिंकलेला शिकारी कसा मिशीला पिळ देतोय बघितलस. आतातरी मान्य कर, वाघ आणि शिकारी यात शिकारीच श्रेष्ठ असतो.
वाघ गुरगुरत म्हणाला, मालक तुम्ही एक विसरताय, ह्या शिल्पात असं दाखवलय पण त्याचं खरं कारण शिकारी श्रेष्ठ असतो हे नसून हे शिल्प शिकार्‍याने कोरलेय. तेच जर वाघानं कोरलं असतं तर?
........ मध्यंतर ...............
मध्यंतरानंतर....
शिकारी म्हणाला, मी आपल्याशी सहमत नाही अध्यक्षमहाराज. महत्वाचा मुद्दा हे शिल्प कोणी कोरलेय हा नसून ते कोणत्या राज्यात कोरलंय हा आहे.
आमच्या पारदर्शक राज्यात हे माणसानं कोरलय म्हणून ते असं आहे, असच काही नाही.
आमच्या पारदर्शक राज्यातल्या अगदी वाघानं जरी ते कोरलं असतं तरिही ते असच आलं असतं.
हा मात्र तुमच्या अपारदर्शक राज्यातल्या वाघानं किंवा माणसानं, कोणीही कोरलं असतं तर मात्र शिल्प वेगळं राहिलं असतं हे अंशत: खरय मालक!

Tuesday, February 21, 2017

संवाद व अभिव्यक्तीचे चलन

आज जागतिक मातृभाषा दिन.
भाषा हे संवाद व अभिव्यक्तीचे चलन होय. लोक आपले दैनंदिन व्यवहार भाषेच्या माध्यमातून करतात. ज्ञान, संस्कृती, कला, जगाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन हे भाषानिहाय वेगवेगळे असू शकतात. भाषा संस्कृतीची जणुकं वाहून नेतात. भाषांना स्वत:चे सार्वभौमत्व असते.
हे विश्व सामान्यपणे 1400 कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी 450 कोटी वर्षांपुर्वी जन्माला आली असे मानले जाते.
माणसाचा पुर्वज 1 कोटी वर्षांपुर्वी जन्मला. पाच लख वर्षांपुर्वीचे आपले पुर्वज व आपण यात महत्वाचा फरक म्हणजे आपण भाषा बोलू शकतो. त्यांना भाषा माहित नव्हती. हावभाव, संगीत, स्वर ही अभिव्यक्तीची माध्यमे टप्प्याटप्प्याने विकसित झाली. भाषांची निर्मिती 70 हजार वर्षांपुर्वी झाली. आपली मराठी भाषा सुमारे 2500 वर्षांपुर्वी जन्माला आली. मुद्रण कलेने मराठी भाषा आणि देवनागरी लिपी टिकण्याची प्रक्रिया गतिमान झाली.
मात्र स्थलांतर, जागतिकीकरण, मराठी भाषकांची उदासिनता आणि पराभूत मानसिकता, जागतिक व भारतीय बाजाराचा मराठीकडे उपेक्षेने बघण्याचा दृष्टीकोन, इंग्रजीचे आक्रमण, परधार्जिणे राज्यकर्ते, केवळ आर्थिक संपन्नतेसाठी आणि दिखाऊ प्रतिष्ठेसाठी इंग्रजीला शरण जाण्यासाठी उत्सुक उच्च मध्यमवर्ग आणि बुद्धीजिवी, नवे तंत्रज्ञान अशा अनेक कारणांनी मराठीवरचे आक्रमण वाढत आहे. मराठी जगेल की मरेल ते मराठी शाळा टिकणार की बंद होणार यावर अवलंबून आहे. ज्या दिवशी मध्यमवर्गाने आणि उच्च मध्यमवर्गाने मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.

आज जगात 6 ते 7 हजार भाषा असाव्यात. त्यातल्या दोन हजार मरू लागल्यात. मात्र जगात अवघ्या 10 भाषा टिकल्या तरी मराठी टिकेल.
आज संत एकनाथ असते तर ते सात्विक संतापाने म्हणाले असते, " आंग्लवाणी बाजारे केली मग मराठी काय चोरांपासून झाली?"
तर ज्यांच्या आजी - आजोबांची मातृभाषा मराठीच होती, पण ज्यांचे पालक आणि जे स्वत: इंग्रजी माध्यामातून शिकलेत आणि तरिही ज्यांना मराठीचे प्रेम आहे त्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.
मात्र आंग्लाळलेल्या ज्यांना इंग्रजीच्या गुलामीचा विशेष अभिमान वाटतो, मराठीची अतिच लाज वाटते, ज्यांना मराठी ही हलकी भाषा आहे, ती ज्ञानभाषा आणि रोजगार देणारी भाषा नाही असे वाटते त्या "कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ" असणार्‍यांना वगळून इतर सर्व मराठीप्रेमींना जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!
[विशेष आभार : डा.गणेश देवी सर]

Thursday, February 16, 2017

वाचक, लेखक, गुणवत्ता आणि लोकप्रियता

जे केवळ रंजक, लोकप्रिय, वाचनीय, सोपे ते सगळे टाकाऊ असते किंवा उलटे तेच थोर असते असे नव्हे
तसेच जे केवळ दुर्बोध असते जड असते म्हणूनच ते श्रेष्ठ वगैरे असते हेही खरे नव्हे. मात्र साहित्य अगर समीक्षा उत्तम किंवा श्रेष्ठ तीच असू शकेल जी निदान वाचनीय, प्रवाही, नेमकी आणि वाचकांना समजेल अशी असेल. ह्या किमान अपेक्शाही जे लेखन पुर्ण करीत नाही ते लेखन थोर वगैरे असेल असे मला वाटत नाही. गुंतागुंतीचा जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी क्लिष्टच लिहावे लागते हे खरे नाही. उलट सोपे लिहिणेच अधिक अवघड असते. तुकाराम हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण होय. ..................... प्रवेश पहिला:- पुण्यात पुर्वी मॅजेस्टीक गप्पा होत असत. कोठावळे मोठमोठ्या साहित्यिक,विचारवंत, संपादकांना बोलवित. पंधरा दिवस धमाल असे. एकदा म.टा.चे संपादक गोविंदराव तळवळकर यांची मुलाखत झाली. गोविंदरावांचा व्यासंग दांडगा होता. त्यांचा चक्क दरारा किंवा वचक असे. त्यांना मुलाखतकार प्रा. ग.प्र.प्रधान सरांनी नवाकाळचे संपादक निळकंठ खाडीलकर यांच्या प्रॅक्टिकल समाजवाद या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया विचारली. गोविंदरावांनी मोठा विराम घेतला आणि मग म्हणाले, "माफ करा, मी बालवाड्मय वाचत नाही." प्रवेश दुसरा:- आपले माजी राष्ट्रपती डा. के.आर.नारायणन हे 1950 च्या दशकातले इंग्रजी साहित्याचे केरळ विद्यापिठाचे सुवर्णपदक विजेते.त्यांचे पुढील शिक्षण लंडन स्कूल of Economics या जगप्रसिद्ध विद्यापिठात झालेले होते आणि ते तिथले गुणवत्ताधारक होते. एकदा आम्ही काही मित्र, अरूण खोरे, रामनाथ चव्हाण आदी त्यांना दिल्लीला भेटायला गेलो होतो. तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते. त्यांनी आम्हाला मराठीतील बेस्टसेलर असलेल्या मृत्यूंजयवर 45 मिनिटे व्याख्यान दिले. शिवाजी सावंत यांचे हे पुस्तक माझेही बालपणातले आवडते पुस्तक असल्याने आम्ही सारे ऎकताना अतिशय आनंदात होतो. त्यांनी बाबूराव बागूल यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मी जेव्हापण मराठीतील नामवंत समिक्षकांना हे सांगतो, तेव्हा ते नाकं मुरडतात. मुदलात ते शिवाजी सावंतांना चांगला लेखकच मानायला तयार नसतात. प्रवेश तिसरा:- समजा अमूकतमूकराव हे मराठीतील अव्वल दर्जाचे लेखक/समीक्षक आहेत. मी त्यांना म्हणालो की, सर, तुमचे अमूकतमूक पुस्तक वाचले. फारच आवडले. तर ते हसतात, माझ्याकडे आस्थेवाईकपणे बघतात. बरं वाटलं तुमचं मत ऎकून असं म्हणतात किंवा निदान सुचवतात.[ अर्थात हे माधुरी पुरंदरे यांना लागू नाही. आपण त्यांना तुमचं पुस्तक आवडलं अस म्हटलं, की त्या आंत्यतिक तुच्छतेने आपल्याकडे बघतात आणि मग कटा आता असं डायरेक्ट सांगतात किमान सुचवतात. तर त्यांचा अपवाद वगळून] प्रवेश चौथा :- समजा अमूकतमूकराव हे मराठीतील अव्वल दर्जाचे लेखक/समीक्षक आहेत. मी त्यांना म्हणालो की, सर, तुमचे अमूकतमूक पुस्तक वाचले. फारसे नाही आवडले. तर ते माझ्याकडे संतप्त होऊन बघतात. 1. तुमचा वकुब काय? 2. तुम्ही माझं सगळं वाचलय का? 3. तुमचं शिक्षण काय? 4. तुमची यत्ता काय?तुमची अभिरूची मुळात थर्डरेट कशावरून नाही? 5. तुम्हाला साहित्यातला काही कळतं का अशी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करतात. मानवी मन मोठं गमतीदार आहे. तुमचं पुस्तक आवडलं म्हटलं की मग कुणालाही हे सांगणाराची पात्रता काय असा प्रश्न पडतच नाही. यांचं शिक्षण काय? अभिरूचीचा दर्जा काय ? हे विचारलं जात नाही पण पुस्तक आवडलं नाही म्हटलं की माणसं एव्हढं का चिडतात? थेट अंगावरच येतात. याला भल्याभल्यांचाही अपवाद का असू नये? प्रवेश पाचवा:- डा.य.दि.फडके भारतीय ज्ञानपिठावर मराठीचे निमंत्रक असतानाची गोष्ट. प्रत्येक भाषेचा प्रतिनिधी आपल्याच भाषेतील साहित्यिकाची सोदाहरण शिफारस करीत असतो. आधीच्या नऊ भाषांच्या निमंत्रकांनी आपापल्या जोरदार शिफारशी केल्यानंतर दहाव्या क्रमांकावर फडके सर उभे राहिले. ते म्हणाले, मी मराठीतील लेखक वि.स. खांडेकर यांचे नाव या पुरस्कारासाठी सुचवतो. अचानक आधीचे नऊजण उभे राहिले आणि म्हणाले, आमची नावे आम्ही मागे घेतो आणि वि.स.खांडेकर यांच्या नावाला पाठींबा देतो. सर पुढे बोलणार तोच उरलेले लोक उभे राहिले आणि म्हणाले आम्हीही याच नावाला पाठींबा देतो. असेच काहीसे डा.भालचंद्र नेमाडे यांच्या बाबतीतही झाले. लेखकांचे नाना प्रकार तसे वाचकांचेही नाना प्रकार. 1. साधारणपणे बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर, व.पु.काळे, वसंत कानेटकर, आदी असे आवडते लेखक असलेला एक मोठा वर्ग असतो. 2. वि.द.घाटे, विनोबा, र.वा.दिघे, पु.शि.रेगे, दि.बा.मोकाशी, अरविंद गोखले, अत्रे, खांडेकर, गंगाधर गाडगीळ, गो.पु. देशपांडे, शिवाजी सावंत, पु.ल., अण्णाभाऊ साठे, रणजित देसाई, जयवंत दळवी, श्रीं. ना. पेंडसे, बाबासाहेब पुरंदरे, गौरी देशपांडे, पंकज कुरूलकर, कविता महाजन, सानिया, मेघना पेठे, विश्वास पाटील, सुरेश भट, वीणा गवाणकर, आशा बगे, राजन गवस, आनंद यादव, अनिल अवचट, रत्नाकर मतकरी, गो.नि.दांडेकर, ह.मो.मराठे, राजन खान, संजय सोनवणी, सतिष तांबे आदींचा चाहता असलेला एक वर्ग असतो. 3. जयंत पवार, आसाराम लोमटे, मिलिंद बोकील, भारत सासणे, अरूण साधू, संजय भास्कर जोशी, रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे, विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, केशवसुत, ग्रेस, चित्रे, कोलटकर, भाऊ पाध्ये, सुर्वे, मर्ढेकर, साने गुरूजी, नरहर कुरूंदकर, दुर्गाबाई, कसबे, ढसाळ, कोलटकर, शहाणे, बागूल, दया पवार, उद्धव शेळके, मालतीबाई व विश्राम बेडेकर, त्रिं.ना.अत्रे, वरसईकर गोडसे भटजी, य.दि.फडके, रेगे, तर्कतीर्थ, भा. ल. भोळे, व्यंकटेश माडगूळकर, विंदा, कुसुमाग्रज, इंदिरा संत, शाम मनोहर आदींना मानणारा एक वर्ग असतो. आता वाचकांचे असेच वर्ग असतात असे नाही. 1 ते 3 यातले काहीजण घेऊन केलेले वेगळे मिश्रण आवडणारेही असतातच. [वि.सु. ही यादी केवळ नमुन्यादाखल आहे. अशी किमान आणखी 500 नावे यात घ्यायला हवीत, याची नम्र जाणीव प्रस्तुत लेखकाला आहे.] तर मुद्दा असा की थेट हाल, हरीभद्र, प्रवरसेन, उद्योतन सुरी, चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, ते विंदा, नेमाडे, चित्रे, कोलटकर, लक्ष्मीबाई टिळक, भाऊ पाध्ये, जी.ए. यांचे साहित्य आपल्याला सहज समजते आणि आवडतेही असे म्हणणारे असंख्य असतात. अच्युत गोडबोले, नरहर कुरूंदकर, रावसाहेब कसबे, आ.ह.साळुंखे, वसंत पळशीकर, गो.पु. देशपांडे,म वा धोंड  आपल्याला समजतात पण हरिश्चंद्र थोरात, ग्रेस, चिं.त्र्यं. खानोलकर, शरद पाटील असे लोक फार जड वाटतात, दुर्बोध वाटतात असे म्हणणाराही वर्ग आहे.
याचा अर्थ जे केवळ रंजक, लोकप्रिय, वाचनीय, सोपे ते सारेच टाकाऊ असते किंवा उलटे तेच थोर असते असे नव्हे तसेच जे केवळ दुर्बोध असते जड असते म्हणूनच ते श्रेष्ठ वगैरे असते हेही खरे नाही. मात्र साहित्य अगर समीक्षा उत्तम किंवा श्रेष्ठ तीच असू शकेल जी निदान वाचनीय, प्रवाही, सोपी, नेमकी आणि वाचकांना समजेल अशी असेल. ह्या किमान अपेक्शाही जे लेखन पुर्ण करीत नाही ते लेखन थोर वगैरे असेल असे मला वाटत नाही. गुंतागुंतीचा जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी क्लिष्टच लिहावे लागते असे नाही. किंबहुना सोपे लिहिणेच अधिक अवघड असते. तुकाराम हे श्रेष्ठ तरिही सुबोध लेखनाचे सर्वोत्तम उदाहरण होय. आताशा एक नवीन वर्ग तयार होतोय. काहीसे भाषक दहशतवादी असे या विद्वानांचे वर्तन असते. चारदोन परदेशी विचारवंत तोंडी लावायला घ्यायचे, जाणीवपुर्वक दुर्बोध पारिभाषिक शब्द वापरायचे, व्यामिश्र अनुभव देण्याच्या नावाखाली कमालीचे रटाळ, पल्लेदार, निरर्थक आणि गुंतागुंतीचे असे अजब मिश्रण करून लिहायचे, ते ज्यांना समजते, आवडते तेव्हढाच श्रेष्ठ अभिरूचीचा वर्ग. बाकी सगळे अडाणी, गावठी, देशीवादी, तिसर्‍या दर्जाचे वगैरे, विशेष म्हणजे वकुब नसलेले! असे ते मानतात. बरे असे मानणारे हे भले लोक कंपूनिशी सगळी विद्यापीठीय अभ्यास मंडळे, पाठयपुस्तक निर्मिती मंडळं, सर्व पुरस्कार समित्या अशा पदांवर प्रमुख ठिकाणी असल्याने त्यांची टेरिफिक दहशत असते. त्यांच्याविरूद्ध "ब्र" उच्चाराल तर साहित्य विश्वातून बहिष्कृत केले जाल. त्यामुळे या दुर्बोध आणि पोझ घेऊन लिहिणारांना दुखवायला सहसा कोणीही तयार नसते. ती साहित्यिक आत्महत्त्याच व्हायची ना! प्रवेश शेवटचा :- मराठीला चार ज्ञानपिठ पुरस्कार आणि एक मुर्तीदेवी पुरस्कार मिळाला. दिवंगतांपैकी किमान जी.ए., दुर्गाबाई, तर्कतीर्थ, भाऊ पाध्ये, व्यंकटेश माडगूळकर, तेंडूलकर, चित्रे, ढसाळ, रा.चिं.ढेरे, इंदिराबाई, य.दि.फडके, गंगाधर गाडगीळ, गो.पु. देशपांडे यांना ज्ञानपिठ पुरस्कार मिळायला हवे होते. पण नाही मिळाले. का? तेंडूलकरांच्या नावाचा ज्ञानपिठ पुरस्कारासाठी विचार चालू असताना, त्यावेळचे मराठीचे जे निमंत्रक होते त्यांनीच या नावाला तीव्र विरोध केल्याचे समजते. त्या निमंत्रकांची एकदा भेट झाल्यावर मी त्यांना म्हटलं, काहो तुम्ही तेंडूलकरांच्या नावाला विरोध केला हे खरे आहे का? ते हसले. म्हटलं मग तुमचं स्वत:चं तरी नाव सुचवायचं होतं तुम्ही. ते म्हणाले, स्वत:चं नाव सुचवायची नियमात तरतूद नाही. मी म्हटलं, मग तुम्ही तुमचं नाव सुचविल अशा तुमच्या चेल्याला तिथे नेमायचं. परत ते हसले आणि म्हणाले, काय सांगावं, इथे हो म्हणाला बेटा आणि नाहीच सुचवलं माझं नाव तर काय घ्या? मी म्हटलं, म्हणजे जोवर तुम्ही तिथे आहात तोवर इतर मराठी माणसाला तो पुरस्कार तुम्ही मिळू देणार नाही आणि दुसरी व्यक्ती तिथे निमंत्रक झाल्याशिवाय मराठीला तो मिळणार नाही. सबब तुम्ही ** गेल्याशिवाय मराठीला हा पुरस्कार मिळणार नाही. ...........................

Wednesday, February 15, 2017

पुढच्या वेळी आलास की नक्की घरी ये!


टेल्को होस्टेलचे दिवस हा एक अविस्मरणीय काळ होता. मंतरलेले दिवसच.
1979 ते 1981 अशी दोन वर्षे अगदी धमाल गेली.
सिनियर मंडळी अगदीच फालतू कारणं सांगून त्रास द्यायची. रॅगिंग करायची. मी डायरेक्ट रेक्टरकडे तक्रार केली. इनामदार नावाचे कडक रेक्टर होते. त्यांनी सगळ्यांना रात्री एकत्र केलं आणि म्हणाले, हा म्हणतोय, सिनियर रॅगिंग करतात. काय रे खरच असं करता तुम्ही?
मला म्हणाले दाखव कोण कोण रॅगिंग करतो ते. प्रसंग फारच कठीण होता. पण आता माघार घेऊन चालणार नव्हतं.मी ती मुलं दाखवली. सरांनी त्यांना मुंबई-पुणे साफसफाईची पनिशमेंट लावली. मी टरकलो होतो.
ते आता माझा बदला घेतील म्हणुन.
तर दुसर्‍या दिवशी ते जवळ आले नी म्हणाले, काय यार तू पण. अशी तक्रार करतात व्हयरे! चल तुला आत्ता शिक्षा. दररोज सगळे पेपर वाचून काढायचे.
त्यांना काय माहित माझ्यासाठी मुळी ही शिक्षा नव्हतीच. मात्र महिनाभरात सारे एकमेकांशी गोळ्यामेळ्याने वागू लागले.
मला व्यायाम फारसा आवडायचा नाही. आमच्याकडे शिस्त अतिशय कडक .शिट्टी वाजली की धावतच मैदानावर जमलं पाहिजे. सकपाळ नावाचे मिल्ट्रीमॅन पिटीटीचर होते. माणूस करड्या शिस्तीचा. जाम तंगवायचे.
एकदा त्यांना मनपाला एक पत्र लिहायचं होतं. मी ते त्यांना लिहून दिलं. तेव्हापासून मला जमेल तशी सूट ते द्यायचे. मी त्यांची कार्यालयीन कामं सांभाळायचो. त्यानिमित्ताने रजिस्टरमध्ये घालून कथा कादंबर्‍यांची पुस्तकं वाचायचो.
माझा एक रूम पार्टनर मुंबईचा होता. खूप मनस्वी आणि बुद्धीमान होता. आईवडीलांचा एकुलता एक. त्याचे आईवडील पण खूपच मायाळू. भेटायला यायचे तेव्हा सर्व रूमपार्टनरसाठी मिठाई आणायचे.
माझं पुस्तकप्रेम बघून त्यानं एकदा मला त्याला प्रेमपत्र लिहून द्यायची गळ घातली. मी लिहून दिलं. मग काय माझ्याकडे ते नियमित कामच लागलं. तो फार हळवा होता.भाबडा होता.खूप जिव होता त्याचा तिच्यावर.
पण त्यांची जात वेगळी होती म्हणुन तिच्या आईवडीलांनी तिचं दुसर्‍याशी लग्न करून दिलं. तो खूप रडला. मीपण...
खुप लागलं त्याला ते. पुढच्या गुरूवारी तो मुंबईला घरी गेला.आईवडीलांना भेटला आणि त्याने त्यादिवशी लोकलखाली आत्महत्त्या केली. गिरिष कायमचा चटका लावून गेला.
माझा रूम पार्टनर कडूलकर चांगला कवी होता. त्याला आख्खे सुरेश भट पाठ होते. एकदा भटांची पुण्यात मैफिल असल्याची जाहीरात आम्ही वाचली. रेक्टरना भेटून परवानगी मागितली तर ते म्हणाले, अधिकृतपणे उत्तर म्हणाल तर नाही, पण तुम्ही असं करा गुरूवारी पुण्यात कंपनी बसने गेलात की परतताना बस चुकली असं फोनवरून कळवा. कार्यक्रम करून दहाच्या आत रूमवर या. मात्र त्यापेक्षा उशीर करू नका. आणि मुख्य म्हणजे बाहेरची काही तक्रार येता कामा नये. काही गडबड झाली तर मी परवानगी दिलेली नाही हे लक्षात ठेवा.
आमचा एक वयाने मोठा एफ.टी.ए. [सिनियर] म्हणाला, काळजी करू नका, रात्री माझ्या रूमवर राहा. सकाळी कंपनी बसने सुममध्ये हजर.
आम्ही चौघे कार्यक्रमाला गेलो. भटांनी त्या दिवशी बहार आणली. कार्यक्रम इतका रंगला की बस्स. संपायला रात्रीचा एक वाजला. आमचं वेळेकडं लक्षच नव्हतं.
कार्यक्रम संपल्यावरच भानावर आलो. ज्याच्या घरी मुक्कामी जायचं होतं, तो ऎनवेळी म्हणला, एक अडचण आहे यार. आमच्या घरी रंगकाम काढलय. त्यामुळं तुम्ही आता दुसरीकडे व्यवस्था बघा. आम्ही हादरलो. आता रात्रीचं 1 वाजता कुठे जाणार?
कडल्या म्हणला, चला चालत शिवाजीनगरला जाऊ. जी मिळेल ती गाडी घेऊ अन सरळ होस्टेलला जाऊ.
शिवाजीनगरला गेलो तर शेवटची गाडी गेली असून आता तीनसाडेतीनतास गाडीच नसल्याचं समजलं. मग काय आम्ही रेल्वेच्या प्लॅटफार्मवरच मैफिल जमवली. कडल्यानं आख्खी रात्र सुरेश भट, बा.भ.बोरकर, ग्रेस, आरती प्रभू असे सारे कवी साक्षात आमच्या भेटीला आणले. पहिली लोकल घेऊन आम्ही पिंपरीला आणि तिथून होस्टेलला विनोबा भावे एक्सप्रेसने पोचलो तर गेटवरच सकपाळ सर! काय रे एव्हढ्या पहाटे कुठे फिरताय?
आम्ही टरकलो.
मी म्हणलं, सर ते सुरेश भट आलेते ना तर त्यांना भेटायला गेल्तो. तेही भटांचे फॅन होते. म्हणाले, तिकिटं दाखवा. आम्ही तिकिटं दाखवली. म्हणाले,पळा आणि कुठे वाच्यता करू नका. आणि हो, पुन्हा कार्यक्रम असेल तर मला पण सांगा. मी पण येतो.
पुढे तोच तो आमचा सिनियर मला नेहमी म्हणायचा, अरे यार घरी ये एकदा तुझं ते बी.ए.चं सुवर्णपदक घेऊन. माझी मुलगी भारी हुशार आहे. तिला मी तुझ्या सुवर्णपदकाबद्दल बोललो तर म्हणाली, मला बघायचय.
तो पुन्हा पुन्हा आग्रह करीत होता, पण जाणं काही झालं नाही.
एकदा गुरूवारी आप्पा बळवंत चौकात मी पुस्तकं घेताना त्यानं मला पाहिलं. आम्ही बोलतबोलत शनिवारवाड्यापर्यंत चालत आलो.
मी म्हटलं, अरे पण तू इकडे कसा?
म्हणाला, वर बघ, ती तिसर्‍या मजल्यावरची कपडे वाळत घातलेली खिडकी दिसतेय ना ते माझं घर. त्यानंतर सुमारे तासभर तो माझ्याशी उन्हात गप्पा मारत उभा होता. उन्हाचा चटका फारच जाणवायला लागला, तसं मी म्हटलं, चल मी निघतो आता. तर तो म्हणाला, असं म्हणतोस, बराय मग. पुढच्या वेळी आलास की नक्की घरी ये!!
............................

यदिसरांसोबत..


ख्यातनाम संशोधक डा.य.दि.फडके सर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना मंडळाच्या वतीने देण्यात येणार्‍या जीवन गौरव पुरस्कारासाठी जुन्या जमान्यातील एक लेखिका आणि राम नगरकर यांची निवड करण्यात आली. सर म्हणाले, आपण या मान्यवरांच्या घरी जाऊन त्यांची रितसर संमती विचारू. ती मिळाल्यावरच पुरस्काराची घोषणा करू.
लेखिकाबाई पुण्यातल्या मंडईजवळ राहायच्या. त्यांचं घर शोधण्यात खूप वेळ गेला. रस्ता इतका अरूंद की सरांची अ‍ॅंबॅसिडर अडकून पडली.
एका सायकल दुकानदाराने मदत केली. दुपारची वेळ. उन्हाळ्याचे दिवस. अचानक मोठा आवाज झाला. रस्त्यावरून जाणार्‍या एकाच्या सायकलचे टायर बर्स्ट झालेय असे वाटले.. दुकानातला नोकर खोखो हसायला लागला. त्या सायकलस्वाराचा चेहरा पडला. काही क्षणानंतर त्याच्या लक्षात आले की आपण वरमायचे काही कारण नाही. आपला टायर व्यवस्थित आहे. मात्र आता आधी जो हसत होता त्याचा चेहरा पडला. कारण तो ज्या सायकलमध्ये हातपंपाने हवा भरीत होता तोच टायर फुटला होता. सर, म्हणाले, बघितलस, दुसर्‍यावर हसणं किती सोपं असतं, अशी स्वत:ची फजिती झाल्यावर कोणी हसेल का यापुढे?
आम्ही लेखिकाबाईंच्या घरी गेलो. यदिसरांची आणि बाईंची जुनी ओळख होती. सरांनी त्यांना मंडळाने त्यांची निवड केल्याचे सांगितले. पुरस्काराची रक्कम,पुरस्कारात कायकाय देतो हे सगळं सांगितलं. बाई म्हणाल्या, पुरस्कार स्विकारायचा की नाही याचा मला विचार करावा लागेल. सर म्हणाले, काहीच हरकत नाही. तुम्ही विचार करा, आठवड्याभराने आमचा मंडळाचा माणूस येईल त्याच्याकडे निरोप/निर्णय सांगा.
आम्ही रामभाऊंकडे निघालो.
सर म्हणाले, बघितलस, बाईंना पुर्वसुचना देऊन भेटलो, तरी बाईंनी कसे आढेवेढे घेतले. या पुणेकरांचं एक विशेष वाटतं, उन्हातान्हात घरी आलेल्याला साधं पाणीसुद्धा विचारत नाहीत. मला तहान लागली होती,पण असं पाणी कसं मागणार ना?
राम नगरकर लोकमान्यनगरमध्ये राहायचे.राधाबाईंनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. पाणी दिलं. "चहा घेणार, सरबत चालेल की कोल्ड्रींक मागवू?" असं सरांना विचारलं. एव्हाना संध्याकाळची चहाची वेळ झालेलीच होती. सर म्हणाले, "कशाला त्रास घेता? असू द्या." राधाबाई म्हणाल्या, "साहेब मी यातलं काय चालेल ते विचारलंय, काहीतरी तर घ्यावंच लागेल."
आम्ही चहा चालेल असं सांगितलं. राधाबाईंनी केलेला चहा फक्कड होता. मी यदि सरांची राधाबाईंना ओळख करून दिली. रामभाऊंची चौकशी केली तर ते शूटींगसाठी कोल्हापूरला गेल्याचं राधाबाईंनी सांगितलं.
मला म्हणाल्या, "काय काम काढलस बाबा आज?"
सरांनी पुरस्काराची माहिती दिली. संमती विचारली. राधाबाई मला म्हणाल्या," हे साहेब काय विचारत्यात बाबा?"
मी म्हणलं, "सर विचारतात संमती म्हणजे पुरस्कार घेणार की नाय ते रामभाऊंना विचारून कळवा."
राधाबाई म्हणाल्या, "या बया, आन हे काय, असं बक्षिसाला कुणी नाय म्हणत असतं व्हय?"
"काय विचारायचीबिचारायची गरज नाय. म्या सांगते ते व्हय म्हणत्याल. कायतरी सोंगं आपली."
सर मला म्हणाले, " हे असं असतं नितळ मन. आपण आधी ज्यांच्याकडे गेलो होतो, त्याही होच म्हणणार, पण मानभावीपणानं आधी विचार करून सांगते वगैरे म्हणणार."
आम्ही निघालो तेव्हढयात रामभाऊ कोल्हापूरहून आले. आम्हाला त्यांनी थांबवलं. आता जेवूनच जा म्हणाले. आमच्या गप्पा चालू होत्या, तोवर राधाबाईंनी पोहे केले.
सरांनी विषय काढायच्या आत राधाबाईच म्हणाल्या, "आयकलं काहो? तुम्हाला बक्षिस देणारेत हे साहेब.आणि विचारत्यात घेणार का नाय ते? आता बक्षिसाला कोन नाय म्हणतं काय? काय तरी खूळ आपलं."
रामभाऊ म्हणाले, "सर, माझी संमती राधाबाईंनी दिलेलीच आहे. एकच विनंतीय. माझा सत्कार कराल तव्हा राधाबाईला पण एक पुष्पगुच्छ द्या."
सर म्हणाले, "ते सांगायची गरजच नाय. आम्ही त्यांनाही साडीचोळी देणारच आहोत."
राधाबई हरखल्या. म्हणाल्या, "अहो, आमच्या या येड्याचं करताय नव्हं, माझं आणि वेगळं कशाला?"
....................................

शांताबाई...



मला शांताबाईंचं लेखन खूप आवडायचं. त्यांनी केलेला अनुवाद "चौघीजणी" तर मला खूपच आवडलेला.

कमलताई आणि शांताबाई सख्ख्या मैतरणी.

एकदा कमलताईंनी मला शांताबाईंच्या पेन्शनचं काम अडलेलं सांगितलं. मी शांताबाईंना भेटून माहिती घेतली तर त्या मुंबईच्या एम.डी. महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. निवृत्त होऊन दहाबारा वर्षे होऊनही त्यांना पेन्शन मिळत नव्हती. त्या म्हणाल्या, "मी हेलपाटे मारून वैतागलेय. ते लोक परतपरत पैसे मागतात. माझी केस सरळ असून मी परत पैसे का द्यावेत?"

मी म्हटलं, "काय सांगताय? तुमच्या सारख्या प्रसिद्ध लेखिकेकडे ते लोक पैसे मागतायत? परत मागतायेत म्हणजे एकदा पैसे देऊन झालेत?"

त्या म्हणल्या, "अरे होना. माझे एक सहकारी म्हणाले, बाई सगळ्याच पेन्शनधारकांना पैसे हे द्यावेच लागतात. नाहीतर कामच होणार नाही."

"माझे हे सहकारी मोठे लेखक, मी म्हटलं तुम्हीच हे पैसे घ्या आणि द्या त्यांना काय ते एकदाचे करा. मी त्यांना पैसे दिले. पण तरीही माझं काम काही झालंच नाही."

त्यावेळी कुमुद बन्सल या शिक्षण सचिव होत्या. मी त्यांना भेटून शांताबाईंची केस सांगितली. कागदपत्रे दाखवली.

कुमुदताईंनी स्वत: ए.जीं.शी बोलल्या. त्या म्हणाल्या राज्यातल्या एव्हढ्या मोठ्या व्यक्तीचं काम तुम्ही लोकांनी करू नये हे फारच खेदजनक आहे." त्यांनी तांत्रिक अडचणी सोडवल्या.

शांताबाईंना पेन्शन मिळू लागली. त्यांना नियमित उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते.

त्या जाम खूष झाल्या. मला त्यांनी मी नको नको म्हणत असताना स्वत: भजी करून खायला घातली.

त्या काळात मे महिन्यात पुण्यात मॅजेस्टीक गप्पांचा कार्यक्रम जोरदार व्हायचा.
शेवटच्या दिवशी निवडक लोकांना आमरस पुरीचं जेवन असायचं.

त्या दिवशी पुण्यात रिक्षावाल्यांचा संप होता.

शांताबाईंना एका लेखिकेने सोडलं मॅजेस्टीकवर. पण पुढे त्या लग्नाला गेल्या. आता परत कसं जायचं याची शांताबाईंना काळजी लागलेली. मी म्हणलो, मी सोडतो माझ्या स्कूटरवरून." त्या म्हणल्या " नको रे बाबा. मला स्कूटरची फार भिती वाटते. एकदा मी स्कूटरवरून पडले. तेव्हापासून मी स्कूटरचा धसका घेतलाय. मी बसत नाही."

मी म्हणलं, "तुम्ही काळजी करू नका. मी खूप जपून आणि हळूहळू नेतो."
त्या काही तयार होईनात. मग मी काही मागे हटेना.

शेवटी त्या कशाबशा तयार झाल्या.त्यांनी सतरा अटी घातल्या. मी आपला प्रत्येक अटीला हो म्हणत होतो.

त्यांचा स्कूटरवर बसण्याचा एक कार्यक्रमच झाला. त्या बसताना खूप घाबरत होत्या. कितीतरी वेळ त्या उभ्याच होत्या. मी स्कूटर स्टॅंडवर लावली. त्यांना बसवलं. मग स्कूटर स्टार्ट केली तर त्या ओरडायला लागल्या. रस्त्यातले आजुबाजूचे लोक बघायला लागले. त्यांना वाटलं, मी कोणातरी अनोळखी वृद्ध बाईला पळवूनच नेतोय. प्रसंग अनावस्था होता. मी म्हणलं, "शांताबाई, अशानं लोक मला मारतील ना!"

मग त्या हसायला लागल्या. लोकांना म्हणाल्या, "काय बघताय? तमाशा आहे काय? चला निघा. माझा मुलगाय हा!"

मी शून्याच्या स्पीडनं स्कूटर चालवत होतो. शांताबाई मला घट्ट धरून बसल्या होत्या. त्यांची भिती काही जाईना.

मी म्हणलं, "शांताबाई, नविन काय वाचताय?" ही जादू लागू पडली. त्या बोलायला लागल्या की रसवंती बाहेर पडायची. त्या सांगत राहिल्या आणि त्यांची भिती केव्हा आणि कुठे पळाली ते त्यांनाही कळलं नाही.

मला म्हणाल्या, "शनिपारावर थांबव गाडी. मी दुकानातून काही नवी पुस्तकं घेते. मला त्यांनी नवं कायकाय वाचलस म्हणून विचारलं. मी त्यांना एक होता कार्व्हर भन्नाट असल्याचं बोललो. आणखीही काही नावं सांगितली. आम्ही पुस्तक दुकानात गेलो. त्या कादंबर्‍या, कथासंग्रह, कवितासंग्रहाची नावं सांगू लागल्या. मी त्यांना कार्व्हरचा परत परत आग्रह धरत होतो, पण त्या काही बधेनात. मला राग आला. त्या म्हणाल्या, " आता माझं वय झालं. अरे या वयात आता लाईट वाचते मी. वैचारिक अगदी नको वाटतं."

मी म्हणालो, " अहो ते छानय. अजिबात जड नाही. नक्की आवडेल तुम्हाला." मग केवळ मला बरं वाटावं म्हणून त्यांनी कार्व्हर घेतलं.

आम्ही शून्याच्या स्पीडनं निघालो. सुमारे तासाभराने आम्ही त्यांच्या सातारा रोडच्या घरी पोचलो.
त्यांचा भाऊ दारातच त्यांची वाट बघत होता. तो धावतच आला.

शांताबाईंना माझ्या स्कूटरवरून उतरताना बघून ते जाम भडकले. "तुला काही अक्कल आहे की नाही, पडलीबिडली असतीस म्हणजे?" ते ओरडू लागले. शांताबाई आपल्या गालातल्या गालात हसत होत्या. म्हणाल्या, "पण नाही पडले ना? यानं अगदी जपून आणलं." तरिही त्यांच्या भावाची सरबत्ती काही थांबेना.

मला म्हणाले, कुठे राहता तुम्ही?

मी म्हणालो, पिंपरीला.

म्हणाले, किती उलटं यावं लागलं यांना, सातारा रोडला. शांता, तुला काय कळतं की नाही.

चला आता जेवन करूनच जा.

आमचं जेवन झालेलं होतं.

त्यांचा राग गेलेला बघून मी सटकलो.

पुढच्या आठवड्यात त्यांची भेट झाली तेव्हा आवर्जून म्हणाल्या, अरे ते कार्व्हर फारच गोड आहे. काय मस्त लिहिलय तिनं. मला खूप म्हणजे खूपच आवडलं बघ."

म्हणाल्या, "मी तुझ्या स्कूटरवर बसले होते हे माझ्या ओळखीतल्या कोण्णाकोण्णाला खरं म्हणून वाटतच नाही. मी श्रीपुंना सांगितलं तर त्यांना वाटतं मी फेकतेय. आता तूच मला सांग मी बसले होते की नाही तुझ्या स्कूटरवर? मी आता तुझीच साक्ष काढणार आहे. आणि खरंखरं सांग, मी कुठे घाबरले होते? उगीचच मला नावं ठेवतात. भित्री म्हणून!"

Tuesday, February 14, 2017

उठ लगा, पुण्याचं पाव्हणं बोलत्याती.


5 मार्च 1989 ला माझं पहिलं पुस्तक पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशित झालं. म.टा.च्या रविवार पुरवणीत गोविंद तळवलकर यांनी पुस्तकाचं कौतुक करणारं अर्धापान परीक्षण लिहिलं. टाइम्समध्ये दिलीप पाडगावकर, लोकमतमध्ये बाबा दळवी यांनी पुस्तक उचलून धरलं. भाषणाची खूप निमंत्रणं यायला लागली.
माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता. पत्राने/तारेने निमंत्रणं यायची. अकलूजच्या एका मंडळानं खूप आग्रह केला. लागोपाठ तीन पत्रं आली. त्यांनी कळवलं की माझ्या भाषणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री नामदार विजयसिंह मोहिते पाटील असतील. त्यांची तारिख मिळाली की संयोजक मला तार करतील.
मी एका कार्यक्रमाहून रात्री 11 वाजता घरी पोचलो तर घरी अकलूजकरांची तार आलेली, उद्या कार्यक्रम आहे. संयोजकांनी तारेत वेळ मात्र लिहिली नव्हती. मंत्र्यांचे काय ते कदाचित सकाळची पण वेळ देतील म्हणुन मी पहाटेच उठलो. स्वारगेटला गेलो. माळशिरस मार्गे अकलूज गाडी मिळाली. तो रूट दूरचा निघाला. जवळचा / दूरचा मार्ग अशी काही माहितीच नव्हती. दुपारी उशीरा अकलूजला पोचलो. एस.टी. स्टॅंडच्या जवळच डा. राजेंद्र व्होरा सरांचा भला मोठा वाडा दिसला. ते गावीच होते. त्यांनी प्रेमानं विचारपूस केली. चहापाणी दिलं. त्यांना संयोजक माहित होते. त्यांनी संयोजकांना फोन केला. तर कार्यक्रम संध्याकाळी असल्याचं समजलं. संयोजक म्हणाले, कार्यक्रमाची तयारी झाली की आम्ही घ्यायला येतो. तुम्ही तिकडॆच थांबा.
मी सरांशी गप्पा मारत बसलो. संध्याकाळचे सहा वाजले तरी आयोजकांचा पत्ता नव्हता. मी स्वत:च कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. बघतो तर काय, दोघेतिघेजण सतरंज्या टाकत होते. मी म्हटलं, मंत्री येणार आणि तयारी कशी नाही?
ते म्हणाले, अचानक मंत्र्यांना अर्जंट मुंबईला जावं लागलय. ते येऊ शकत नाहीत. पण तुमचा कार्यक्रम होणारेय. तुम्ही बसा. लाऊडस्पीकर लावला गेला. अंधार पडला तरी लोक काही जमेनात. माझी आजची रजा झालेली होती. मला किमान दुसर्‍या दिवशी तरी नोकरीच्या ठिकाणी [टेल्कोत] हजर होणं आवश्यक होतं.
संयोजक मात्र अगदी निवांत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागात असच असतं. लोकं शेतातून कामावरून आल्यानंतर गाईम्हशींचं दुध काढतात, चहापाणी करून मगच कार्यक्रमाला येतात. आठ साडेआठला आपण नक्की सुरू करू.
मी अजिजीनं त्यांना परतीच्या प्रवासाची व्यवस्था करायची विनंती केली. ते म्हणाले, काही काळजी करू नका. आम्ही दोन मोटारसायकली तयारच ठेवतो. तुमचं भाषण झालं की 2 घास खा. टेंभुर्णी इकडनं अगदी जवळच आहे. तुम्हाला तिकडून हायवेवरून पाचपाच मिनिटांनी पुण्याला जाणार्‍या गाड्या मिळतील.
मी निर्धास्त झालो. एकदाचे लोक जमले. दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला.
पंचक्रोशीतील पुढारी, स्थानिक वक्ते असे बोलताबोलता अकरा वाजले. मी सारखा चुळबूळ करीत होतो.
अध्यक्ष मला म्हणाले, आज गावात आमचे जावई आलेत. त्यांना बोलायला दिले नाही तर ते रुसतील. शेवटी मुलीचा प्रश्न आहे.
जावई शिवाजी विद्यापिठात प्राध्यापक होते. ते दीड तास झाला तरी भाषण काही थांबवितच नव्हते.  चिठ्ठ्या देऊदेऊ अध्यक्ष कंटाळले. जावई फुल फार्मात होते. शेवटी एक वाजता माझा धीरच सुटला. मी उठलो आणि जावयांमागे जाऊन उभा राहिलो. ते चिडले. म्हणले, पुणेकर वक्ते लईच आघाव असतात, त्यांना दम म्हणून निघत नाही. वगैरे.... मला निमुटपणं सारं ऎकून घ्यावं लागलं.
शेवटी एकदाचा माझा नंबर लागला आणि माईक हातात आला तेव्हा रात्रीचा सव्वाएक वाजला होता. सकाळपासून मी फक्त चहावर होतो. जाम अ‍ॅसिड उसळलेलं होतं. एव्हाना मैदानातली निम्मी गर्दी कमीच झालेली होती. तोवर बरेच श्रोते डुलक्याही मारू लागले होते. संयोजकांनी काय करावं?
त्यांनी बादलीभर पाणी आणलं, आणि झोपलेल्यांच्या तोंडावर ते पाणी मारू लागले. "ए, सट्व्या, उठ लगा. पुण्याचं पाव्हणं बोलत्याती. उठ! आपल्या गावची अशानं काय इज्जत राहील." दहावीस जण उठून बसले.
सगळेमिळून साठ सत्तर लोक असतील.
मी अवघ्या अर्ध्या तासात उभ्या महाराष्ट्राचं प्रबोधन वगैरे करून खाली बसलो.
अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन यानंतर सभा संपली.
मोटरसायकलवाले कुठेयत म्हणून मी चौकशी केली.
संयोजक म्हणले, त्याचं कायय की एक मोठा प्राब्लेम झालाय. एकजण पिऊन टाईट आहे. दुसरा एकटा यायला घाबरतोय. इकडे रस्त्याच्या कडेला सगळीकडे उस अस्तोय. दरोडेखोरांनी लई हैदोश मांडलाय. नुसतं लुटून सोडत नाहीत. जिवं मारूनच टाकतात. तुमच्या गॅरंटीवर जात असाल तर ठिकय. आम्ही काय तुमचा जीव धोक्यात घालावा असं म्हणणार नाय. उद्या सकाळी मात्र आम्ही तुम्हाला नक्की सोडतो. शब्द म्हणजे शब्द.
सरपंच म्हणाले, तसं कशाला, मी पहाटेच माझ्या जीपनं पुण्याला निघतोय. सरांना पाक पुण्यातच नेऊन सोडतो.
तोडगा छानच होता.
आम्ही सरपंचांच्या फार्म हाऊसवर पोचलो. सरपंच म्हणाले, पडा वाईच. एक डुलका काढा. पहाटे पाचला निघूच आपण. मला अंगणात उघड्यावर मस्त चांदण्यात कधी डोळा लागला कळलंच नाही.
विशेष म्हणजे बरोबर पाचला जाग आली. मी सरपंचांना उठवलं. ते म्हणले, निघूच. एव्हढी काय घाई करताय. मला ड्युटीवर पोचायचं होतं. मी टक्क जागा. शेवटी सरपंच ऊठले. त्यांनी घरातल्या मंडळींना उठवलं. पाणी तापवून सगळ्यांच्या आंघोळी सुरू झाल्या.
माझी चुळबूळ बघून सरपंच म्हणाले, त्याचं कायय की, मुलगी बघायला पुण्याला जायचा कारेक्रम हाये. बाया मान्सांचं उरकलं की निघूच.
मी चडफडत होतो. शेवटी बायकापोरांचं उरकून सकाळी सात वाजता जीप एकदाची पुण्याला निघाली.
इंदापूरच्या जवळ आली आणि डिझेल संपले. जवळ एक पंप होता. डिझेल भरून गाडी पुढं निघाली.
हायवेला येताच मागचा टायर पंक्चर झाला.
जवळपास पंक्चर काढायची सोय नव्हती. ड्रायव्हर चाक काढून घेऊन इंदापूरला गेला. बर्‍याच वेळाने पंक्चर काढून घेऊन आला. एव्हाना अकरा वाजले होते. आता मला हाफ डे सुद्धा मिळणार नव्हता.
भिगवणला रस्त्यात दुपारच्या जेवणात तासभर गेला. संध्याकाळी पाच वाजता आम्ही स्वारगेटला पोचलो.
सरपंच म्हणाले, सर, असातसाही तुमचा दिवस गेलाच आहे, आल्यासरशी चला आमच्या बरोबर मुलगी बघायला.
मी त्यांचा इतका धसका घेतला होता, की धूम पळालो आणि दिसली ती बस पकडली. पिंपरीला पोचायला.
अशारितीने उभ्या आडव्या महाराष्ट्राचं आणि माझं स्वत:चंही प्रबोधन करण्याचं काम सुरू झालं!

........................

ओळखीचा कारेक्रम..


अनुभव पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा --
1990 साली कोपरगावच्या सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आग्रहाने भाषणाला बोलावलेलं, तेव्हा मी टेल्कोत नोकरी करायचो. फर्स्ट शिफ्ट करून दुपारी 4 वाजताची एस.टी. पकडली. ती रात्री 12 वाजता कोपरगावला पोचली.
प्राचार्य म्हणाले होते, "रात्री स्टॅंडवर तुम्हाला घ्यायला 4 मुलं पाठवतो. जेवायलाच घरी या. मी थांबतो जेवायचं."
कोपरगावच्या स्टॅंडवर शुकशुकाट होता. डिसेंबर महिन्यातली चावरी थंडी पडलेली.
प्राचार्यांचा बंगला कुठेय हे विचारायचं तरी कुणाला? फोन करावा तर कुठून करावा? दुकानं, हाटॆलं सगळं बंद झालेलं. रात्रीचं पेट्रोलिंग करणारे 2 पोलीस दिसले. ते म्हणाले," नदीच्या पलिकडे आहे प्राचार्यांचा बंगला, कालेजशेजारीच. नदीतून जपून जा. अंधारात पाणी दिसायचं नाय. वाहून गेले तर प्रेतही मिळायचं नाय. लांबून जायचं तर लई मोठा हेलपाटा पडंल आन कुत्री लई तरास देतील. सांभाळून जावा."
रस्त्याच्या कडेची एक फांदी मोडून घेतली हातात, काठी म्हणून.
कुत्री म्हणावीत का पिसाळलेले लांडगे?
अंगावर धावूधावू येऊ लागलेली.
एका चौकातल्या कुत्र्यांना बहुधा मी काळे गटाचा वाटलो असणार, तर पुढच्या चौकातल्या कुत्र्यांना कोल्हे गटाचा! केव्हा लचका तोडतील नेम नाय.
जीव मुठीत की काय असतो, तसा घेऊन नदीत उतरलो. पाण्याचा अंदाज येत नव्हता. पोहता येत होतं एव्हढाच आधार.
कुत्री काय मागे हटत नव्हती. इतक्यात पाण्यातल्या शेवाळावरून पाय घसरला. पाणी मरणाचं थंडगार होतं. चिंब भिजलो. कसाबसा सावरत बंगल्यावर पोचलो तर तिथली कुत्री अंगावर धावली.
प्राचार्य गेटवर आले. म्हणाले, "हे काय, आमच्या मुलांना कुठं सोडलत?"
"अहो सर, मुलं आलीच नाहीत स्टॅंडवर."
प्राचार्यांच्या घरचे गावी गेलेले. त्यांनी अन्न गरम केलं.मी कपडे बदलले. आमची जेवनं झाली.
इतक्यात कालेजची चार मुलं आली. म्हणाली, "सर,तुमचे ते पुण्याचे पाहुणे काय आलेच नायत. दोनतीन गाड्या बघितल्या. काळंकुत्रंपण नाय आलं. एका गाडीतनं एक पोरगा तेव्हढा उतरला. पाव्हणं मातर काय आलं नायत."
प्राचार्य वैतागले, म्हणाले, तुम्ही मुळात होता कुठं? पाहुणे म्हणतात स्टॅंडवर तर कुणीच नव्हतं.
सर, मरणाची थंडी पडल्याली. तव्हा आम्ही स्टॅंडच्या समोरच्या कोपर्‍यातल्या गणप्याला उठवलं. च्या बनवायला लावला. पण आमचं स्टॅंडकडं चांगलं लक्ष होतं.
एक पोरगा सोडला तर गाडीतून कोणपण उतरल नाय.
मला बघताच पोरांचे चेहरे उतरले. ते म्हणाले, सर, तुम्ही म्हणला पुण्याचा पाव्हणा, आमाला काय माहित असा पोरगुलासा असणार. आम्ही म्हणलं लईकरून साठ सत्तरीचा तरी बाप्या असल. आम्ही 2 तास स्टॅंडवर होतो बघा."
दुसर्‍या दिवशी कार्यक्रमाच्या स्टेजवर प्राचार्य कानात म्हणाले, "सर, तुमची ओळख मला करून द्यायचीय, तुमचा जन्म कधीचा?"
मी म्हणालो, "63 चा."
ते म्हणले, "असं? पण वाटत नाय."
आता त्यात काय वाटायचय
प्राचार्य ओळख करून द्यायला उभे राहिले. म्हणाले "मित्रांनो,काही लोकांना चिरतारूण्याचं वरदान असतं. आता हेच बघा, आपले हे पाहुणे वाटतात पंचविशीचे. पण मी आत्ताच त्यांना विचारले तर ते म्हणाले, त्यांचं वय 63 वर्षे आहे."
मी म्हटलं, सर माझं वय 63 नाही, माझा जन्म 63 सालचा आहे.
त्यावर प्राचार्य म्हणाले, "ऎकलंत? पाहुणे कन्फर्म करतायत की ते 63 वर्षांचे आहेत."
तेव्हापासून मी लेखी परिचय जवळ बाळगू लागलो.
पहिलीपासून इंग्रजीच्या मोहिमेत मी झंजावाती दौरे केले होते. यवतमाळ जिल्ह्यात माझ्यासोबत एक उपशिक्षण अधिकारी असायचे. ते दिवसभर प्रत्येक सभेत माझा परिचय करून द्यायचे. दिवसभरात सकाळी 7 ते रात्री 10 माझ्या 12 सभा झाल्या.
पहिल्या सभेत उपशिक्षण अधिकारी म्हणाले, आजचे आपले पाहुणे नरी हरके यांची मी ओळख करून देतो. खरं म्हणजे त्यांची खरी ओळख त्यांच्या भाषणातूनच होणार आहे तरी मी त्यांना भाषणाची विनंती करतो.
दुसर्‍या सभेत ते म्हणाले, आजचे आपले पाहुणे हरी नडके,
तिसरीत ते म्हणाले, आजचे आपले पाहुणे हरी फरके,
नरी फडके, फरी हारके, हरी नरूटे, नरी नरके,....
पठ्ठयाचं माझ्याशी काय वैर होतं ते कळलं नाय पण दरवेळी तो माझं नवच नाव घ्यायचा...
शेवटच्या सभेत मी म्हटलं, सर ओळखीचं राहू द्या. मीच करून देतो, माझी ओळख, तर ते म्हणाले, असं कसं? मला शिक्षण अधिकार्‍यांनी बजावलय, आजचे आपले पाहुणे थेट शिक्षण मंत्र्याच्या श्यामकृष्ण मोरे यांच्या अगदी जवळचे आहेत, तुम्ही त्यांची बडदास्त नीट ठेवा. मी ओळख करून देणारच..
" शिक्षकांनो, आजचे आपले पाहुणे रामकृष्ण नटके ......"
मी हसावं का रडावं ते न सुचुन सुमडीत बसलो.
गेल्या वर्षी तेच अधिकारी नांदेडच्या सीईओ नी घेतलेल्या कार्यक्रमात भेटले. म्हणाले, "काय नरी हरकेसाहेब मला ओळखलं की नाय? आमच्या सायबांना सांगा तुमची माझी किती जवळची ओळख आहे ती. आणि भाषणात माझ्या नावाच्या स्पेशल उल्लेख करा. जेवताना साहेबांना सांगा मला प्रमोशन द्यायला."
असे एकेक प्रेमळ अधिकारी!
...........................

प्रवास -- लोकं जब्राट प्रेम करतात


वीसेक वर्षांपुर्वीची गोष्ट.
एप्रिल महिन्यातला व्याख्यान दौरा होता. त्यावेळी मोबाईल नव्हते. गावात फोनसुद्धा फार मोजक्या लोकांकडे असायचे.
पत्रानं मराठवाड्यातली तीन निमंत्रणं स्विकारली होती. अंतरं विचारली तर, "विशेष काय नाय, जवळजवळच आहेत गावं" अशी उत्तरं.
"किती किलोमीटर?" या प्रश्नाला , "ते नाही सांगता यायचं,पण विशेष दूर नाहीत" असं उत्तर.
आधल्या दिवशी परभणीहून संयोजकांनी दिलेल्या नंबरवर फोन केला तर उत्तर मिळालं, "तुम्ही दुपारी 2 वाजता निघा, 6 वाजता पोचा, आधी पोचून तरी काय करणार?"
"मार्ग कोणता?"
"या लातूरमार्गे."
दुपारी 2 वाजता एस.टी. स्टॅंडवर गेलो तर लातूर बस लागलेली होती.
घेतली.
पण ती निघाली, जनता बस. हात दाखवा, एस.टी. थांबवा. ती रेणापूरमार्गे होती. तिने लातूरला पोचायला 6 वाजवले.
परांड्याच्या बसची चौकशी केली तर, "डायरेक्ट बस नाही,पण येडशीला जा, तिथून मिळेल परांडा बस." असं सांगितलं चौकशी खिडकीनं.
लातुर - मुंबई येडसीमार्गे बस लागलेलीच होती. तुफान गर्दी. झुंबडच उडालेली.
कसाबसा घुसलो.
रात्री पावणेआठला ती येडशीला पोचली.
चौकशी खिडकी बंद करून साहेब घरी निघाले होते. म्हटलं, "परांडा बस कधीय साहेब?"
"आहे की आठला."
छान वाटलं. चला पंधरा मिनिटात बस मिळणार.
"तुम्ही बंद करून निघाले काय?"
ते म्हणाले, "हो. शेवटची गाडी गेली, आजचं काम संपलं, निघालो आता घरी."
"आठची बस आहे ना?"
"हो आहेना, उद्या सकाळी आठला".
बापरे! रात्रीची वेळ. अनोळखी गाव.पोचायचं ते गाव अजून 40 किलोमीटरवर.
शेजारच्या पब्लिक फोन बुथवरून फोन केला. उत्तर मिळाले, "आरामात या, लोकं जमायलीत. टाइम लागंल. काय काळजीचं कारण नाय!"
"पण वाहनाचं काय?" म्हणताच ते म्हणाले, "येडशीत, चौकशी करा. टॅक्शी घ्या आणि या."
विचारलं, तर पब्लिक फोन बुथवाला म्हणाला,"हे पुणं मुंबई थोडंच आहे, टॅक्सी मिळायला? इथं कसली टॅक्शीनफॅक्शी?"
मग आता?
"तुम्ही असं करा, इथं थांबू नका. एक किलोमीटरवर धाबा आहे, तिकडं जा. रातच्याला इथं चोराचिल्टाचं लई भ्याव असतंय. दारूडे, जेबकतरे अड्डा टाकत्यात."
पुन्हा फोन केला. मी चिडलो होतो, "निदान मोटरसायकल तरी पाठवा राव घ्यायला!"
तर पलिकडून शांत उत्तर, "बघ्तो, पण लईकरून तुम्हीच या जसं जमल तसं"
पब्लिक फोन बुथवाल्यानं त्याच्या मोटर सायकलवरून धाब्यावर सोडलं, सांगितलं, "हैद्राबादहून येणारी बस घ्या, ती तुम्हाला परांड्याला सोडील."
धाबेवाला म्हणाला, "हैद्राबादहून येणारी बस दिवसाआड येते. आज येईल की नाही नाय सांगता येणार! रात्री बाराच्या पुढं येते ती. आरामात बसा जेवन करा. दोन अडीच तास आहेत."
...रात्री बारा वाजता हैद्राबाद बस आली. तुंबळ गर्दी. कंडक्टर म्हणाला, " जगा नय. उपर बैठना पडेगा. आभी इदर सब लोग खानावाना खायेगा. आराम करेगा. हमको शिर्डी सुबा पहुंचना हैं."
एस.टी.च्या टपावर बसून रात्री अडीच वाजता परांड्याला पोचलो.
एस.टी.स्टॅंडवर 50 ते 60 जण घ्यायला थांबलेले.
मी खूप चिडलो होतो.
घोळ असा होता की गावात फोन होता तो विरोधी गटाकडं. त्यांनी मुद्दामच मला चुकीचा सल्ला दिलेला. तो मला एक सांगत होता, अन संयोजकांना त्याच्या उलटं.
मला येरमाळामार्गे येण्याऎवजी मुद्दामच लांबचा मार्ग घ्यायला लावला होता पठठ्यानं.
मुलं म्हणाली, "सर, वांधा नाय, आपण आत्ताच कार्यक्रम करूया."
आत्ता? रात्री/पहाटे तीन वाजता?
" कायबी प्राब्लम नाय. 300 लोकं वाट बघायलेत तुमची."
आता पाणी माझ्या डोळ्यात होतं!
असे प्रेमाचे श्रोते अन्यत्र कुठे मिळतील?
..............................

Friday, February 10, 2017

यमुना पर्यटन ते उजव्या सोंडेच्या बाहुल्या

फे.बु. वर अनेकदा गदारोळच चालत असला तरी अभिरूचीच्या दृष्टीने चांगलेही काही घडत असते.
काल मी मराठीतील गेल्या 100 वर्षातील गुणवत्ता आणि वाचकमान्यता [विद्वतमान्यता आणि लोकमान्यता] यांच्या आधारे 10 कादंबर्‍यांची माझी निवड यादी विचारार्थ फे.बु.वर टाकली. [ 1. कोसला, भालचंद्र नेमाडे, 2. बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, भाऊ पाध्ये, 3. रणांगण, विश्राम बेडेकर, 4. धग, उद्धव शेळके, 5. मुंबई दिनांक, अरूण साधू, 6. ताम्रपट, रंगनाथ पठारे, 7. सात सकम त्रेचाळीस, किरण नगरकर, 8. शामची आई, साने गुरूजी, 9. ययाती, वि.स.खांडेकर, 10. मृत्यूंजय, शिवाजी सावंत ] आणि त्यांच्या आवडीनिवडीनुसार नावे सुचवण्याचे मित्रांना आवाहन केले. कितीतरी उत्तम प्रतिसाद मिळाला.

विशेषत: Sanjay Bhaskar Joshi, Nishikant Mirajkar, Manik Balaji Mundhe, Yogesh Ulemale,Sanjay Chaudhari,राजेंद्र बाणाईत,Prabhakar Bhatlekar,Prakash Naik,Sudhir Jagdhani,Girish Pathak, Akshay Ghorpade,Mukund Gondhalekar,Asmita Mohite,Shrikant Sonawane, Chandrakant Funde, Somnath Patil आणि इतर मान्यवरांच्या निवडी खुपच महत्वाच्या आहेत. सर्वांचे हार्दीक आभार. त्यातून खालील नावे पु्ढे आली.

1. बळी,मालतीबाई बेडेकर, 2. काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई, कमल देसाई, 3. ब्राह्मणकन्या, श्री.व्यं. केतकर, 4. फकीरा, अण्णाभाऊ साठे, 5. सूड, बाबुराव बागुल,
6. बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर, 7. हिंदू, भालचंद्र नेमाडे, 8. बलूतं, दया पवार, 9. दु:खाचे श्वापद,रंगनाथ पठारे, 10.रारंगढांग, प्रभाकर पेंढारकर, 11.'मुखवटा', सिंहासन,शोधयात्रा,अरूण साधू, 12. स्वामी, रणजित देसाई, 13. दुर्दम्य,गंगाधर गाडगीळ, 14. एक होता कार्व्हर,वीणा गवाणकर, 15. गारंबीचा बापू, रथचक्र, श्री.ना. पेंडसे,
16. झोंबी, आनंद यादव, 17. कळ, श्याम मनोहर, 18. रामनगरी, राम नगरकर,19. उपरा-लक्ष्मण माने, 20. 'ब्र', कविता महाजन, 21.ब- बळीचा, राजन गवस, 22.चाळेगत, प्रवीण बांदेकर,
.................................
खरं तर यमुना पर्यटन, बाबा पदमनजी, 1857, यांच्यापासून [160 वर्षांपुर्वी] सुरू झालेल्या मराठी कादंबरीच्या प्रवासात, पण लक्षात कोण घेतो, हरी नारायण आपटे, इंदू काळे सरला भोळे, वा. म. जोशी ते थेट उजव्या सोंडेच्या बाहुल्या, प्रवीण बांदेकर [2016] पर्यंत किती मोठा पल्ला गाठला गेलाय.

Thursday, February 9, 2017

ओबीसी आयोगाचा अध्यक्ष ओबीसीच हवा!

ओबीसी आयोगाचा अध्यक्ष ओबीसीच हवा!
 प्रा. हरी नरके यांची मागणी; 
मोदी सरकारवरही फसवणुकीचा आरोप

राज्यमागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी इतर मागासवर्गीय (अाेबीसी) व्यक्तीचीच नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी प्रा. हरी नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
गेल्याच महिन्यात राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संभाजी म्हसे यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांच्या नियुक्तीवरून ओबीसी संघटनांमध्ये नाराजी आहे. म्हसे हे खुल्या प्रवर्गातील असल्याने त्यांच्याकडून न्याय्य भूमिका घेतली जाईल की नाही, याबद्दल ओबीसी संघटना साशंक आहेत.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हसे यांच्या नियुक्तीचा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा ओबीसी संघटनांचा प्रयत्न आहे. याच विषयावर ओबीसी नेते चंद्रकांत बावकर, जनार्दन तांडेल, प्रभाकर तोडणकर, कमलाकर दरवडे, मृणाल ढोले पाटील आदींनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या वेळी प्रा. नरके म्हणाले, की 'देशात राज्यातील प्रथेनुसार अनुसूचित जाती जमाती तसेच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्या समाज घटकातील असतात, तसेच ओबीसी आयोगाचा अध्यक्षही ओबीसी वर्गातलाच नेमला जावा. 'किमान ज्या जातींचे विषय आयोगापुढे विचारार्थ आहेत अशा हितसंबंधीय जातीतली व्यक्ती अध्यक्षपदी नसावी,' अशी मागणी त्यांनी केली.
प्रा. नरके म्हणाले, 'केंद्र सरकारने ओबीसींची फसवणूक केली आहे. मोदी स्वत: ओबीसी असताना त्यांनी अर्थसंकल्पात ओबीसीची चेष्टा केलेली दिसते. सत्तर कोटी ओबीसी जनतेला अवघे हजार ९५ कोटी रुपये शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगारासाठी देण्यात आले आहेत. ही रक्कम तुटपुंजी असून यातून दरडोई, दररोज अवघे पाच पैसे ओबीसींच्या वाट्याला येतात,' याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
........................


मुख्यमंत्री ओबीसीद्वेष्टे
'देवेंद्रफडणवीस सरकारने स्वतंत्र ओबीसी खाते निर्माण केले. त्यानंतर ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदासंदर्भातला पहिलाच निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावरून मुख्यमंत्री ओबीसीद्वेष्टे असल्याचे सिद्ध झाले आहे. ते ओबीसींचे शत्रू असून या निवडणुकांमध्ये ओबीसी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत', असे प्रा. हरी नरके म्हणाले.
.........................

शेवटी कोणीही असो, पण विसर्जन हे ठरलेले


माझे ज्येष्ठ स्नेही दिवंगत वरूणराज भिडे नेहमी आपल्या मानवी स्वभावावर प्रकाश टाकणारा एक किस्सा सांगायचे. ते म्हणायचे, माध्यमे आणि नवमध्यमवर्ग या सगळ्यांना नेहमी पुजायला एक गणपती हवा असतो. अगदी वाजतगाजत त्याला डोक्यावरून मिरवत ते घरी आणतात. दहा दिवस मनोभावे पुजतात...आणि त्यानंतर त्याचे सांग्रसंगित विसर्जन करतात!
शेवटी कोणीही असो, पण विसर्जन हे ठरलेले.
मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना आणि पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा ते या माध्यमे आणि नवमध्यम वर्गाचे किती डार्लिंग होते. त्यांच्या धोरणांचा खरा लाभार्थी वर्ग हाच. पण लवकरच त्यांना मनमोहन सिंग खुपायला लागले. अर्थात मनमोहन सिंग यांच्या राजकारणाची, त्यांच्या सार्वजनिक जीवनाची चिकित्सा करण्याचा,प्रसंगी त्यावर प्रखर टिका करण्याचा अधिकार सर्वांना आहेच. पण सूर चिकित्सेऎवजी जेव्हा हेटाळाणीचा लागतो, तेव्हा सवाल निर्माण होतो.
नरेंद्रभाई मोदी आले तेव्हा ते नवमध्यमवर्गाचे आणि मिडीयाचे किती सोयरे होते! पण आता त्यांची घसरण सुरू झालीय का? ही शेवटाची सुरूवात आहे का? नमोंचे चाहते एका कल्पनादारिद्र्य, एको [ प्रतिध्वनी ] आणि Copy च्या सापळ्यात अडकलेत का?
"नरेंद्र मोदींवर लोक जेव्हा टिका करीत होते, तेव्हा तुम्ही का गप्प होतात," असा प्रश्न सर्वच मोदीसमर्थक एका आवाजात विचारित आहेत. मला गंमत वाटते ती याची की हे सगळेच एका तालासुरात, अगदी कानामात्रावेलांटीही वेगळी नाही इतके एकच पालुपद का लावतात? यांच्या प्रश्नांमध्ये विविधता का नाही? यांचे सगळ्यांचे मेंदू एकच एक शब्द किंवा प्रश्न कसे प्रसवतो? या सगळ्यांचे प्रश्न/मुद्दे एकच पेपरसेटरकडून आल्यासारखे का वाटतात? यांना सर्वांना ही नवनीतची झेराक्स कोण वाटत असेल बरे?
हे कल्पनादारिद्र्य आहे का? सगळेच एकमेकांचे एको [ प्रतिध्वनी ] किंवा Copy मारणारे कसे?
ही नक्की माणसेच आहेत की रोबो?
अफाट मानवी बुद्धीची उंची अशी सपाट करू नका मित्रांनो... साच्यांमधून घडवल्या जाणार्‍या मुर्ती कितीही देखण्या असल्या तरी त्यांना अजिंठा वेरूळच्या शिल्पांची सर येऊ शकत नाही. का अवमुल्यन करताय स्वत:चे आणि आपल्या प्रतिभेचे?
विविधता जपा.
ही फार मोलाची देणगी आहे निसर्गाकडून माणसाला मिळालेली..

" रेणकोट घालून आंघोळ करणे" ही टिका निरर्गल


मी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष किंवा गांधी घराणे यांचा चाहता नाही.
तथापि मी नियोजन आयोगात सल्लागार गटात काम करताना डा. मनमोहन सिंग यांची ऋजुता, व्यासंग आणि विनयशीलता जवळून अनुभवलेली आहे. ते रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर असताना मी त्यांना शेजारच्या पुस्तकांच्या दुकानात दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत पायर्‍यांवर बसून ग्रंथवाचन करताना पाहिलेले आहे.
या माणसाने रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री व दोन वेळा पंतप्रधान म्हणुन भारतीय अर्थकारणाला जबरदस्त वळण दिलेले आहे.
त्यांच्या कार्यावर टिका करतानाही हे लक्षात ठेवायला हवे की त्यांच्या पदव्या जागतिक विद्यापिठांमधल्या आहेत. त्यांच्याबद्दल यांच्यासारखे वाद उद्भवलेले नाहीत. अशा जागतिक किर्तीच्या अर्थशास्त्रज्ञाला त्यांचे आर्थिक विषयावरील भाषण दुसर्‍यांनी लिहून दिलेले असेल असा हीनकस आरोप करणारे सद्गृहस्थ हे माझ्या देशाचे पंतप्रधान असावेत याचा एक जबाबदार भारतीय म्हणून मला खेद वाटतो.
मनमोहनजी, आम्हाला क्षमा करा. या सामान्य वकुबाच्या गर्दीत, अतिसुमारांच्या सद्दीत, असल्या वाचाळांमुळे भारतीय संस्कृतीची घसरण होते आहे.
" रेणकोट घालून आंघोळ करणे" ही केवळ निरर्गल टिका नसून ती स्वत:ची हीनकस अभिरूची दर्शवणारी कृती आहे.
मतस्वातंत्र्य / मतभेद हा लोकशाहीचा गाभा आहे, पण ते व्यक्त करण्याची पातळी आज सुटली हेच खरे!

Thursday, February 2, 2017

उदार मोदींची मेहरबानी, ओबीसीला दिले 5 पैसे ---

ओबीसी पं. प्र. न. मो. यांची ओबीसीवर खास मेहरनजर..
उदार मोदींची मेहरबानी, ओबीसीला दिले 5 पैसे ---
देशाचे पं.प्र. सर्वांचेच असतात. तरिही ते स्वत:च निवडणुक सभांमध्ये जाहीरपणे सांगतात ते ओबीसी आहेत.ओबीसी जाती म्हणजे बलुतेदार आणि अलुतेदार. सगळे कष्टकरी. घाम गाळणारे. हातात कौशल्यांची जादू असलेले.
देशाच्या 21 लाख 46 हजार 735 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पात न.मो. यांनी ओबीसीवर खास मेहरनजर केल्याचे आढळून आले आहे...
त्यांनी देशातील 68 कोटी 12 लक्ष लोकसंख्येच्या ओबीसींसाठी अत्यंत भरिव तरतूद केलेली आहे. उदार मोदींची मेहरबानी, ओबीसीला दिले 5 पैसे ---
त्यांच्या सरकारने काल रूपये 1193 कोटी ओबीसींच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा आदींसाठी दिलेत.
त्यामुळे देशातले ओबीसी मालामाल होणार आहेत.
कारण ही तरतूद म्हणजे वर्षाला दरडोई 17 रूपये 54 पैसे मिळणार.
म्हणजे महिन्याला प्रत्येकाला 1 रुपया 46 पैसे दिलेत.
तर दरडोई दररोज वाट्याला येतील 5 पैसे. आहे ना ओबीसीची मज्जा!
हे सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याची टिका विरोधक करतात. तरीही न. मो. यांनी ओबीसींच्या 1/3 लोकसंख्येला त्यांना दिलेत 4 हजार 195 कोटी रूपये.
त्यांची लोकसंख्या 1/3 आणि रक्कम तिप्पट म्हणजे एकुण रक्कम होते 9 पट. अर्थात ही रक्कमही त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कमीच आहे.
पण नमोंनी विरोधी समाज घटकाला 9 पट जास्त द्यावेत आणि ओबीसीला मात्र त्याच्या 9 पट कमी मिळावेत यावरून ओबीसी मोदींची ओबीसींवरील मेहरनजर ठळकपणे दिसून येते.
....ओबीसीका साथ! ओबीसीका विकास..

शेड्यूल्ड कास्ट और शेड्यूल्ड ट्राइब्स के साथ धोख़ाधड़ी


अलग अलग खातों के प्रावधान को जोड़कर आंकडों के गुब्बारे फुलाने का खेल सरकारें खेलती रहती है- पर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी को  इस खेल के उस्ताद मानना होगा.

बड़े आश्चर्य की बात है, के दलित नेता, बुद्धिजीवी और पत्रकारों को  मोदीजी ने भारतीय योजना आयोग बर्ख़ास्त करके दलित तथा आदिवासियों के लिए मौजूद कल्याणकारी योजनाओंपर जो कैंची चलायी है, वह अभी तक दिखायी नहीं पड़ी है.

शेड्यूल्ड कास्ट और  शेड्यूल्ड ट्राइब्स उपघटक योजना के माध्यम से आजतक  योजना बजेट से 22.5% रकम  इन दुर्बल घटकों के विकास के लिए मिला करती थी. मोदी सररकारने अपने पहले ही वर्ष इस योजना में 20,000 की कैंची लगायी और पिछले वर्ष यह कमी 40000 कोरोड की थी. बताया जा रहा है, के इस वर्ष इस प्रावधान में  35% वृद्धि की गयी है. मतलब 38,833 करोड़ से बढ़कर इस वर्ष  यह प्रावधान  52,393 करोड़ बताया गया  है.  वास्तव में यह सीधी सीधी धोख़ाधड़ी है.

इस वर्ष अल्पसंख्यकों के लिए किया गया प्रावधान भी इसी 52,393 करोड़ में शामिल है, जो पिछले वर्ष तक अलग से किया जाता था.  यह प्रावधान 4195 करोड़ रूपये का है.  मतलब अगर यह रकम अलग करें और पिछले दो वर्षों में घटाया गया प्रावधान देखें , तो इस धोखाधड़ी का पता चलता है.

प्रावधान का यह तरिका 1975 से चला आ रहा था.
मनमोहन सिंग सरकारका आखिरी बजट 17 लाख करोड़  रूपये का था और उसमे योजना का बजट  बजेट  तकरीबन 7 लाख करोड़. इसमें से 22.5% हिस्सा याने डेढ़ लाख करोड़ रूपये SC और ST इन घटकों के विकासपर खर्च हुवे थे. पिछले तीन वर्षों में कुल बजट  21 लाख करोड़ रूपये तक पहुँच गया-  इसका मतलब है योजना बजट अगर होता तो वह 9 लाख करोड़ का  होता , और SC/ ST  घटकों पर 2 लक्ष करोड का प्रावधान होता, आज यह रकम सिर्फ 48,198 करोड है.

इस रकम की भरपाई राज्य सरकारों से करने का छलावा दिया जा रहा है, पर जहाँ केंद्र सरकारसे आया पैसा भी  राज्य सरकारें नही खर्चती, वहाँ अपने  हिस्से से  वह रक्कम खर्च करेंगे यह दूर की बात हो गयी.

हिंदी अनुवाद:- किरण पाटील