27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन, त्यानिमित्ताने- प्रा.हरी नरके
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यात साजरा केला जातो. या पार्श्वभुमीवर अभिजात मराठीच्या दृष्टीनं एक ऎतिहासिक घटना या महिन्यात घडलेली आहे.
लोकसभेत बोलताना केंद्रीय संस्कृती मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी खालील गोष्टी अधिकृतपणे प्रथमच मान्य केल्या.
मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जो अहवाल आम्ही, पठारे समितीने 4 वर्षांपुर्वी महाराष्ट्र शासनामार्फत भारत सरकारला सादर केलेला होता त्याची योग्य त्या भाषातज्ञांमार्फत सर्व तपासणी झालेली आहे.
भाषातज्ञांनी पठारे समितीच्या अहवालाला संपुर्ण मान्यता दिलेली आहे.
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालायाने भाषातज्ञांची ही शिफारस स्विकारलेली आहे.
मराठीला अभिजात दर्जा देण्याची बाब केंद्र सरकारने सक्रीय विचारार्थ घेतलेली आहे.
हे फार मोठे यश आहे.
आता केवळ पंतप्रधानांच्या संमतीने हा विषय कॅबिनेटसमोर ठेऊन त्याला कॅबिनेटची मंजुरी घेऊन घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे.
त्यासाठी मराठी भाषकांनी सर्वपक्षीय राजकारण्यांवर दबाव निर्माण करायला हवा. सर्व मराठी नेत्यांनी दिल्लीत आपापले पक्षभेद बाजूला ठेऊन मराठीचे लॉबिंग करायला हवे.
15 वर्षांपुर्वी केंद्र सरकारने सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. पुढे संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांनीही हा दर्जा मिळवला.
"उच्च कुलीन" या अर्थाने प्रचलित असलेल्या अभिजात या शब्दाला पुढे प्रबोधनकाळात "श्रेष्ठ दर्जाचा" असा अर्थ येत गेला. केंद्र सरकारने कोणत्याही भाषेला हा दर्जा देण्यासाठी प्रामुख्याने श्रेष्ठता हाच निकष लावलेला आहे. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता हे या दर्जासाठीचे 4 निकष आहेत. मराठी ते सर्व पुर्ण करते हे आम्ही आमच्या 436 पृष्ठांच्या अहवालात सिद्ध केलेले आहे.
बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी, याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्या या सर्व बोली महत्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, भुजंग मेश्राम, सदानंद देशमुख, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, राम नगरकर, आनंद विंगकर, राजन गवस, मच्चिंद्र कांबळी, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ या सार्यांमुळेच मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्याने मराठीला सामाजिक दस्तऎवज देऊन तिला श्रीमंत केले.
अभिजातपणासंबंधी केंद्र सरकारच्या निकषातील साहित्याची आणि भाषेची श्रेष्ठता विचारात घेता, गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारूडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे, हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे. फुले-आंबेडकर, टिळक - आगरकर, राजवाडे-केतकर, राजारामशास्त्री भागवत, प्रबोधनकार ठाकरे यांचे वैचारिक लेखन श्रेष्ठ प्रतीचे आहे.
राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे.
गाथा सप्तसतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले, हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावतामहाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरी, ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडशे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरूजी, बेडेकर, भाऊ पाध्ये, नेमाडॆ, ढसाळ, कोलटकर, चित्रे, यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे "जैविक नाते" महत्वाचे आहे.
अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. "इथे कुलेजातीवर्ण हे अवघेचि गा अकारण!"
अनेक जाती धर्माचे लोक मराठी बोलतात. अनेक पंथ, धर्म, प्रांत, संस्कृती यांना मराठीने पोटात सामावून घेतलेले आहे. त्यामुळे खांद्यावर मायमराठीची पताका घेतलेल्या साडेबारा कोटींची ती "भाषांमाजी भाषा साजिरी आहे." संत एकनाथ म्हणतात, ती चोरांपासून जन्मलेली नाही. ती कष्टकर्यांची-ज्ञानवंतांची भाषा आहे. ही श्रमाची-घामाची, निर्मितीची भाषा आहे. मराठी ज्ञानभाषा आहे. धर्मभाषा आहे. अक्षरभाषा आहे. अजरामर भाषा आहे. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या दहा जगल्या तरी मराठी जगणार आहे हे लक्षात ठेवा. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीतले कोश वांड्मय जगात दुसर्या क्रमांकाचे आहे.
माणूस हा विचारशील प्राणी आहे. प्रत्येक माणुस आपल्या भाषेतून विचार करतो. त्यामुळे मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते. माणसाने भाषेच्या माध्यमातूनच आजवर कला, साहित्य, ज्ञान यांची निर्मिती केलीय. साहित्य, विचार, तत्वज्ञान यांच्याद्वारे संस्कृतीची जनुकं भाषेच्याच माध्यमातून एका पिढीकडून दुसरीकडे वाहून नेली जातात.
कोणतीही भाषा ही स्थीर नसते. ती सतत प्रवाही असते. बदलती असते.
कोणतीही भाषा बालवयातच "ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र आणि विवेकसिंधू" यांसारखे जागतिक दर्जाचे ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपुर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती, तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती.
ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्वज्ञान आणि संस्कृतीची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती.
मग मराठीतला आद्यग्रंथ कोणता? आणि मराठीचं नेमकं वय किती?
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, " गाहा सत्तसई " { गाथा सप्तसती} गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या.
सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे जिथे राज्य होते, तिथे तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपुर्ण भारतावर तर राज्य होतेच परंतु पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.
मुळात महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगळ्या भाषा नाहीतच. ही एकाच भाषेची तीन वेगवेगळी नावं आहेत. हे सत्य सर्वप्रथम १९३२ साली ल.रा. पांगारकर यांनी उजेडात आणले.
मराठीची ही तीन नावं मराठीच्या आद्यकाळ, मध्यकाळ आणि अर्वाचीन काळात प्रचलित होती. वेगवेगळ्या काळात रूढ असलेली मराठीची ही नावं पुढे "देशी" भाषा आणि "नागर" भाषा म्हणूनही वापरात असल्याचे दिसते.
जुन्या काळात धर्मग्रंथांची भाषा होती संस्कृत. पण तिचा जन्म झाला वैदीक भाषेपासून आणि वैदीकची आई होती वैदीकपुर्व बोली भाषा. हार्वर्ड विद्यापिठाचे डॉ. मायकेल विट्झेल यांनी आपल्या "ट्रेसिंग दि वैदीक डायलेक्ट्स" या ग्रंथात हे दाखवून दिले आहे. तेव्हा संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा होती ही माहिती खरी नाही. पाणिनीने जेव्हा या भाषेचे व्याकरण लिहिले तेव्हा तो तिला "छंद" भाषा म्हणतो. महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपुर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत, विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा, यांनी १८८५ सालीच दाखवून दिले होते. त्यांचा "मराठ्यासंबंधी चार उद्गार" हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा "मराठीची विचिकित्सा" हाही ग्रंथ महत्वाचा आहे. १९२७ साली ज्ञानकोशकार डा. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडात लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.
"एक होता कावळा नी एक होती चिमणी..." ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली ८०० वर्षांपुर्वी. लिळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.
तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात "संगम साहित्याचा" मोठा वाटा आहे. हे साहित्य २३०० वर्षे जुने आहे. कावेरी नदीवर धरण बांधले जात असल्याचा प्रसंग त्यात आला आहे. या धरणाच्या कामासाठी जगभरातून तज्ञ मागवण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मराठी गवंडी मोठे कुशल असल्याचे वर्णन त्यात आले आहे.
शिवनेरी किल्ल्याजवळ सह्याद्रीच्या कुशीत एका लेण्यात एक शिलालेख आहे. तो ब्राम्ही लिपीत आहे. त्यात "महारठीनो" असा मराठी बोलणार्या लोकांचा उल्लेख आढळतो. अलिकडेच इतिहासकार डॉ. शोभना गोखले यांनी या शिलालेखावर नव्याने संशोधन करून त्याचे वय दोन हजार वर्षांपेक्षा अधिक असल्याचे प्रमाणित केलेले आहे.
"विनयपिटक" हा पाली भाषेतील पवित्र धर्मग्रंथ आहे. तो बिहारमध्ये राजगृहला सव्वादोन हजार वर्षांपुर्वी लिहिला गेला. त्यात "महारठ्ठ" चा उल्लेख आलेला आहे. श्रीलंकेतील "दिपवंश" आणि "महावंश" या सिंहली लिपीतील दीडहजार वर्षांहून जुन्या ग्रंथांमध्येही तो मिळतो.
इसवी सनाच्या २ र्या शतकात वररूचीने "प्राकृतप्रकाश " हा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची व महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध केले. आधीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटचा नियम सांगताना तो म्हणतो, " शेषं महाराष्ट्रीवत." यावरून देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेल्या सगळ्या भाषांना मराठीचे नियम लागू पडत होते. यातून मराठीची प्रतिष्ठा, मान्यता आणि श्रेष्ठता स्पष्ट होते.
संस्कृत महाकवी कालिदास आणि शूद्रक यांच्या "शाकुंतल" आणि "मृच्छकटिक" या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत. महाभारत या जगप्रसिद्ध महाकाव्यात अनेक मराठी शब्द आलेले आहेत. यज्ञाच्या वेळी पंडीतांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवत यांनी दाखवून दिलेली आहे. संस्कृत ही धर्मभाषा असली तरी हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत हे यातून उघड होते. संत एकनाथांनी "संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?" असे संतप्त उद्गार काढले होते. "विंचू चावला..." ही एकनाथांची भारूडांची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला प्राकृत म्हणतात कारण महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी आहे. रघुनाथराव गोडबोले यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाला "महाराष्ट्रीय भाषेचा" कोश म्हटले आहे, ते यामुळेच.
मराठीवर संस्कृतचा जरुर प्रभाव आहे. मात्र मराठीने संस्कृतकडून जेव्हढे घेतले त्याच्या दामदुप्पट परतही केले. मराठीवर इतर प्राकृत भाषा, सगळ्या द्राविडी भाषा, आणि पर्शियन यांचाही प्रभाव आहे. मराठीचे स्वत:चे जे अस्सल आहे, ते जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही. जगातल्या अनेक भाषांमध्ये राष्ट्रगिते आहेत. विश्वगित, पसायदान मात्र एकट्या मराठीकडे आहे.
उद्योतनसुरीने इ.स.७७८ मध्ये कुवलयमालेत मराठी माणूस लढवय्या, काटक, शूर, काळासावळा, धट्टाकट्टा आणि भांडकुदळ असल्याचे नमूद केलेले आहे. हरिभद्राचे आठव्या शतकातील "समरादित्याची कथा" हे मराठी महाकाव्य अभिजात असल्याचे डॉ. ए. एम. घाटगे यांनी प्राकृत शब्दकोशात दाखवून दिले आहे.
मराठी अभिजात आहे हे आता तज्ञांनीच मान्य केलेय.
तिला हा दर्जा अधिकृतपणे मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 500 कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ, वाचन संस्कृती वाढणे, ग्रंथालये संवर्धित केली जाणे, मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे, मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे यासाठी या दर्जामुळे खुप मदत होईल.
मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल.
......................
प्रा. हरी नरके, समन्वयक- अभिजात मराठी भाषा समिती, महाराष्ट्र शासन.
harinarke@gmail.com