Sunday, February 18, 2018

छ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-

शिवरायांच्या पत्रव्यवहारातून तत्कालीन समाज जीवनावर प्रखर प्रकाशझोत पडतो.
प्रजाहितदक्ष राजा ह्या त्यांच्या प्रतिमेचे अनेक पैलू समोर येतात.
भारत हा 4635 जातींनी बनलेला आणि त्यांनीच आरपार जखडलेला देश आहे.
प्रत्येक जातीत सज्जन आणि भली माणसं असतात तशीच वाईट माणसंही असतात हे या पत्रांमधून स्पष्ट होते.
एका पत्रात महाराज प्रभावळीच्या गद्दार जिवाजी विनायक सुभेदाराला, तुमचा ब्राह्मण म्हणून कोणताही मुलाहिजा केला जाणार नाही असे बजावतात. तुम्हाला ठिकेठाक केले जाईल असेही सुनावतात. तुम्ही हरामखोर आहात, तुम्ही हबश्यांकडून लाच घेतलेली असून त्यासाठी स्वराज्याशी बेईमानी केलेली आहे. शत्रूचे चाकर आमचे शत्रूच होत. याचा नतिजा तुम्हाला भोगावा लागेल असेही महाराज त्याला फटकारतात.
या पत्राचा मतितार्थ म्हणजे ब्राह्मण समाजाला शिवकाळात काही सवलती मिळत होत्या. म्हणून तर महाराज म्हणतात, "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही."

महाराज गद्दारांप्रति किती सक्त होते तेच यातून स्पष्ट होते. शिस्त कशाला म्हणतात ते महाराजांच्या पत्रांमधून दिसते.
कर्नाटक स्वारीवर असताना आपला एक मराठा सरदार शत्रूच्या पत्नीशी गैर वागला तर महाराजांनी त्याला कठोर शिक्षा केली.
शत्रूशी हातमिळवणी करणार्‍या केदार नाईक खोपडे या देशमुखांना "हे अक्कल तुम्हासं कोणी दिधली?" असे महाराज विचारतात.
गुंजण मावळच्या हेमंतराव देशमुखांना त्यांचे तीनतीन गुन्हे असतानाही, प्रसंगी महाराज आणखी संधी देतात. "तुम्ही शकजादे आहात. तुम्हास साहेब घरच्या लेकरासारिखे जाणिती...तुमचे हजार गुन्हे माफ आहेती...आमच्या इमानावरी आपली मान ठेऊनु आम्हापासी येणे" असे महाराज कळवतात.

लोकभावना आणि धार्मिक श्रद्धेला हात घालीत "हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे," असे रोहिड खोर्‍यातील दादाजी नरस प्रभु देशपांडे आणि कुलकर्णी यांना शिवराय लिहितात.
तगारा नायकवाडी याने "मराठा होऊनु ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतिजा तोच पावला...अखेर आपलेच पोटांत सुरी मारून घेऊन जीव दिल्हा."
इथे दोन प्रश्न निर्माण होतात,
1. मराठा हा शब्द जर मराठा जातवाचक नसेल तर मग त्यात ब्राह्मण येत नव्हते का? त्यांचा उल्लेख वेगळा का?
2. महाराज अनेकदा मराठा हा शब्द जात म्हणुनही वापरत होते काय?

हाली बापुजी नलावडा व कोंडाजी चांदरा व संताजी जमादार हरबकसा करून सबनिसास दटावितात..त्याची खबर घेणे जरूरी आहे....कोण्ही बेढंग न वर्ते. तुम्ही ऎसे बेकैद लोकांस होऊ न देणे."
सैनिकांनी शिस्त पाळली नाही तर " मराठियांची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा?"
" भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास्त व दुरूस्त वर्तणे....कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येती करून ..तरी साहेबा कबूल असतील."
महाराजांची लढाई हिंदू विरूद्ध मुस्लीम अशी धार्मिक नाही तर ती उत्तर [पठाण=मोगल] विरूद्ध दक्षिण भारतातले सर्व हिंदु व मुस्लीम अशी असल्याचं ते मालोजीराजे घोरपडे यांना स्पष्ट कळवतात. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा हे सर्व आपले मित्र असल्याचं महाराज म्हणतात. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून मोगलांशी लढण्याचा तह आम्ही केलाय असे ते म्हणतात. "दक्षणची पादशाही आम्हां दक्षणियांच्या हाती राहें ते करावें."
याच पत्रात ते पुढे लिहितात, "आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावें, हे आपणांस उचित आहे." आपले परंपरागत वैर विसरून आपण सर्व मराठ्यांनी एकत्र आले पाहिजे असेही ते घोरपड्यांना लिहितात. "घोरपडे आपण कुलीन मराठे आहोत याची तुम्हाला आण आहे. तुम्ही मराठे लोक आपले आहात. तुमचे गोमटे व्हावे म्हणून तुम्हांस पस्टच लिहिले आहे."
आम्ही व तमाम दखणी मिळून मोगलांना बुडवणार असा संकल्पही ते करतात.

[संदर्भासाठी पाहा, छत्रपति शिवाजी महाराज, दिनकर विनायक काळे, बहि:शाल शिक्षण ग्रंथमाला, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती, 16 मार्च 1960, तिसरी आवृत्ती, एप्रिल, 1971, मूल्य: सहा रूपये, पृष्ठे 252 ते 272 ]
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment