महात्मा फुले यांनी शिवरायांचा पोवाडा लिहिला, पुण्यात शिवजयंती केली, रायगडवरची शिवसमाधी शोधली याला आधार काय असे प्रश्न विचारले जातात.
खरंतर याबद्दलचे अनेक लेखी, अव्वल दर्जाचे, अस्सल पुरावे उपलब्ध आहेत.
1. पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, 1927,
2. संपा. माधवराव बागल, सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ,कोल्हापूर,1933,
3. संपा. प्रा. हरी नरके, आम्ही पाहिलेले फुले, महाराष्ट्र शासन,मुंबई, 1993,
4. संपा. प्रा. हरी नरके-प्रा.य.दि.फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन,मुंबई, 1993,
5. संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन,मुंबई, 2013,
6. दिनबंधू मधील बातम्या
या ग्रंथांमध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवरायांचा पोवाडा, रायगडवरची शिवसमाधी शोधली, पुण्यात शिवजयंती केली, याबाबतचे अनेक अस्सल पुरावे दिलेले आहेत.
ते जिज्ञासूंनी वाचावेत.
भारतात 1806 मध्ये ग्रंथछपाई सुरू झाल्यानंतर मराठी भाषेतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र 1869 ला लिहिणारे आणि ते स्वखर्चाने छापून प्रकाशित करणारे लेखक कोण? तर महात्मा जोतीराव फुले. जून 1869.
पण ही माहिती मुद्दामहून दडवली जाते.
लोकमान्य टिळक, गोपाळराव आगरकर यांना कोल्हापूरचे शिवाजी महाराज आणि दिवाण रा.ब.बर्वे प्रकरणी लेखन केल्याबद्दल जेव्हा तुरूंगवास भोगावा लागला तेव्हा त्यांना त्याकाळात रूपये दहा हजार [ म्हणजे आजचे रूपये सुमारे दहा कोटी ] चा जामीन देण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष रामशेट बापूशेट उरवणे यांना पाठवले असे दि. 3 आक्टोबर 1882 च्या केसरीत कोणी लिहिले आहे?
तर खुद्द लोकमान्य टिळक यांनी.
पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी लिहिलेले फुलेचरित्र अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे. ते 1927 सालचे आहे.
आजवर प्रा. गं. बा. सरदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, धनंजय कीर, प्रा. स. गं.मालशे, प्रा. य. दि. फडके यांच्यासह सर्व अभ्यासक ते चरित्र प्रमाण मानतात.
माधवराव बागल यांचे वडील हंटरचे संपादक, सत्यशोधक खंडेराव बागल हे महात्मा फुले यांचे घनिष्ट मित्र होते.
भास्करराव जाधव यांनी महात्मा फुल्यांशी अनेकदा गप्पा मारलेल्या होत्या.
इतिहासकार कृ.अ.केळुस्कर हे फुल्यांचे सहकारी होते. त्यांनी 1906 साली लिहिलेले शिवचरित्र 1906 सालचे आहे. त्यांनी महात्मा फुल्यांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत.
या सर्वांशी माधवराव बागलांचे घनिष्ठ संबंध होते.
वि.द.घाटे, महर्षि वि.रा.शिंदे आदींनी बागलांच्या लेखनाला मान्यता दिलेली आहे.
महात्मा फुले यांचे पहिले बृहद चरित्र 1927 साली लिहिणारे सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील,
सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ 1933 साली काढणारे सत्यशोधक माधवराव बागल यांनी फुले आणि शिवराय यांच्याबाबत दिलेली सर्व माहिती विश्वासार्ह आहे. मौलिक आहे.
महात्मा फुले यांच्या आप्त, स्वकीय, सहकारी, कार्यकर्ते, समकालीन यांनी लिहिलेल्या "आम्ही पाहिलेले फुले " या इतिहास ग्रंथातील आठवणी हा महात्मा फुले विषयक इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे.
महात्मा फुले समग्र वांड्मयात महात्मा फुले यांनी लिहिलेला हा पोवाडा पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठासह [1869ची] छापलेला आहे.
त्याच्या प्रस्तावने त संपादकीयात आणि कालपटात हे विषय आलेले आहेत.
ज्यांना महात्मा फुले लिखित शिवछत्रपतींचा पोवाडा दिसत नाही, शेकडो समकालीन सत्यशोधकांच्या अस्सल आठवणी जे बघतही नाहीत, प्रमाणभूत असलेली फुलेचरित्रे ज्यांनी नजरेखालून घातलेली नाहीत ते दुषित पुर्वग्रहांनी बाधित आहेत.
गेली 40 वर्षे मी सत्यशोधक चळवळ आणि महात्मा फुले यांच्यावर वाचन, संशोधन, लेखन करतोय.
माझे याबाबतचे पहिले पुस्तक प्रकाशित होऊन आता 30 वर्षे झालीत.
माझे आजवर पन्नासेक ग्रंथ प्रकाशित झालेत आणि अद्यापही माझे शोधकार्य चालूच आहे. सतत काम करूनही हे काम संपत नाही. संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया असते.
ज्यांना अस्सल ऎतिहासिक पुरावे मान्यच करायचे नसतात, ज्यांना बनावट आणि खोटाच इतिहास प्रचलित करायचा असतो अशा हितसंबंधियाने जर शंका उपस्थित केल्या तर त्या गंभीरपणे घेण्याची गरज नाही. ते इतिहास अभ्यासक नव्हेत. प्रचारक आहेत. त्यांना पढवून पाठवलेले असते. अभ्यसकांनी पुढे आणलेले अस्सल ऎतिहासिक पुरावे न पाहताच नाकारायचे, या त्यांच्या हिनकस मानसिकतेमुळेच समाजात ज्ञानाचे व इतिहासाचे राजकारण माजले आहे.
जे सदैव काल्पनिक शिखंडी उभे करून त्यांच्या काठीने परस्पर वार करण्यात वाकबगार आहेत अशांना आपण अदखलपात्र मानले पाहिजे.
असत्यकथन व सत्यापलाप करणार्या या प्रसिद्धीलोलुप प्रवृत्तीला गंभीरपणे का घ्यायचे? जे लोक संशोधनाची शिस्त आणि नैतिकता पाळता नाहीत त्यांचे आक्षेप बाजारूच असतात.
अफवांचे मळे पिकवणारे आणि द्वेषाच्या जळाऊ लाकडांच्या वखारी चालवणारे हे सांस्कृतिक माफिया कोण असतील ते सुज्ञांना सांगणे न लगे.
- प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment