बंडगार्डनला आणि येरवड्याला जोडणारा मुळामुठेवरचा पूल ब्रिटीशकाळात 1867 साली बांधण्यात आला. त्याचे आयुष्य 100 वर्षांचे होते. प्रत्यक्षात तो 140 वर्षे वापरात होता.
आजही तो भक्कमच आहे. फक्त सुरक्षिततेसाठी सध्या तो रहदारीला बंद करण्यात आलाय. तिथे पुणे महानगर पालिकेच्या हेरिटेज विभागाने एक भव्य आर्ट प्लाझा उभारला आहे. त्याला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव पुण्याचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी मंजूर करवून घेतला आहे.
हा पूल बांधण्याचे काम ज्या Pune commercial & contracting Company ने केले तिचे महात्मा जोतीराव फुले हे कार्यकारी संचालक होते.
सामाजिक कार्यकर्ता, नेता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच असतो. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि व्यापारी म्हणून महात्मा जोतीराव फुले यांचा राज्यभर नावलौकिक होता.
ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी' Pune commercial & contracting Company चे कार्यकारी संचालक होते. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली.
जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. त्यातून मिळविलेला नफा सामाजिक कामांसाठी त्यांनी मुक्तहस्ते खर्चून टाकला. ही स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून जोतीरावांनी सगळं समाजकार्य केलं. ते स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते, लोकवर्गणीवर समाजकार्य करणारे नव्हते. ते आयुष्यभर झोकून देऊन विनावेतन आणि विनामानधन सामाजिक कार्य करीत राहिले.
जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, शेअर मार्केटविषयक लेखन करणारे अर्थतज्ज्ञ या पैलूंकडे अभ्यासकांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.
‘बिल्डर’ हा शब्द सध्या वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना भिती वाटते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते.
त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत.
मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे या सत्यशोधकांनी केलेली आहेत.
राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या.
हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे आधी भागीदार होते. त्यांनी नंतर आपल्या स्वत:च्या कंपन्या स्थापन केल्या. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे.
जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.
सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची संपुर्ण मुंबई प्रांताची होलसेल एजन्सी जोतीरावांकडे होती.
ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.
कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.
-प्रा.हरी नरके
......................
No comments:
Post a Comment