Saturday, February 17, 2018

शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शिवराय-


दोन हजार वर्षांपुर्वीच्या गाथा सप्तशती या हाल राजाच्या काव्यग्रंथात शेतकर्‍याला पेरणीसाठी बियाणे घ्यायला पैसे नसल्याने आपले जुने धोतर बाजारात विकून त्याचे बियाणे विकत घेणारा मराठी शेतकरी दिसतो. आजही लक्षावधी शेतकरी आत्महत्त्या करतात. सरकार नावाचे निव्वळ बोलबच्चन बुजगावणे. मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया!

शिवराय हे रयतेचे राजे होते. स्वराज्य, कृषी, आरमार, युद्धशास्त्र, स्त्रीसन्मान, गडकोट, जलदुर्ग या  अशा अनेक बाबींवरचे त्यांचे विचार आणि कार्य अभिमानास्पद होते.
त्यांचा द्रष्टेपणा स्तिमित करून जातो.
शेती आणि शेतकरी हा विषय महाराजांच्या काळजातला विषय.
पेरणीच्या वेळी शेतकर्‍याला पेरणी करायला काही अडचणी असतील तर त्या स्वत: पुढाकार घेऊन तात्काळ दूर करण्याचे आदेश सरदारांना देणारे महाराजांचे पत्र फार फार बोलके आहे.
"गावोगाव फिरा. शेतकर्‍यांच्या बैठका घ्या. त्यांची मायेनं विचारपूस करा. पेरणीला आवश्यक बियाणे, मणुष्यबळ नसेल, औतकाठी नसेल, बैलबारदाणा नसेल तर तो सर्व त्याला पुरवा. त्याच्या सगळ्या अडचणींचे जातीने निराकरण करा. त्याला जगायलाही धान्य पुरवा.

तो पिकवील तर स्वराज्य टिकेल.
नवे पिक आले की त्याच्याकडून कर्जाची रक्कम त्याच्या कलाकलाने [हप्त्याहप्त्याने] वसूल करा. फक्त मुद्दल तेव्हढे घ्या.
व्याज माफ करा.

कर्जफेडीसाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नका.

तो खुष राहील, आनंदी असेल याची काळजी घ्या. शेतकरी जगला तर स्वराज्य जगेल."

किती हा कळवळा. किती अपार माया आणि जिव्हाळा.
......................
--प्रा.हरी नरके
.....................
[संदर्भ-पाहा, शिवचरित्राची साधने, खंड क्र. 9, लेखांक 55, शके 1598, भाद्रपद शुद्ध अष्टमी, दि. 5 सप्टेंबर, 1676]


No comments:

Post a Comment