Saturday, February 3, 2018

मराठी माणूस आणि मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम--




मराठी माणसांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमातून शिकवावे की इंग्रजी हा विषय अतिशय ज्वलंत, बहुचर्चित नी वादग्रस्त आहे.
जागतिक किर्तीचे भाषातज्ञ, साहित्यिक, विचारवंत, अनेक पालक आणि सामान्य जनता यांचा कौल मराठी माध्यमाला आहे.
काही बुद्धीजिवी, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय तसेच अनुकरणशील गरीब पालक यांना वाटते आपल्या पालकांना इंग्रजी माध्यमातच घालायला हवे.
मराठी माध्यमाच्या बहुसंख्य शाळांचा दर्जा चांगला नाही, मराठी माध्यम चांगला रोजगार देऊ शकत नाही, इंग्रजी जागतिक भाषा असल्यानं मुलांच्या भल्यासाठी इंग्रजीच अत्यावश्यक आहे असे मुद्दे पुढे केले जातात.
याउलट मातृभाषेतूनच शिकवावे, मात्र लहान वयापासून इंग्रजीची गोडी लावावी किंवा उलटे, इंग्रजी माध्यमातच शिकवावे मात्र लहान वयापासून मराठीची गोडी लावावी, पहिलीपासून इंग्रजी आवश्यक अशीही भुमिका असलेले पालक आहेत.
माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही केवळ भाषा नसते तर ती स्वकीय मुळं असलेली आपली देशी संस्कृती असते. ती भलीबुरी असेल पण आपली असते. तिच्यापासून नाळ तोडून मुलांना आपण अधांतरी लटकणारे, उपरे, उपटसुंभ बनवतो. हे नुकसान कधीही भरून येत नाही.
इंग्रजी ही नुसती भाषा नाही, ती जेत्यांची, वर्चस्ववाद्यांची सबगोलंकारी मानसिकता पेरणारी संस्कृतीही आहे. तिला ग्लोबल वगैरे गोंडस नाव देऊन तिचे आक्रमक मार्केटिंग केले जाते. त्यामुळे जे जे देशी, भारतीय ते ते हिनकस, हलके, टाकाऊ, हास्यास्पद अशी न्यूनगंडाची धारणा मानगुटीवर बसते. त्यातून आलेला अभिजात न्यूनगंड हा मराठीचा खरा शत्रू आहे.
जगातल्या कोणत्याही भाषेबद्दल अनादर, आकस किंवा द्वेष नको. मातृभाषेचा अभिमान, अस्मिता, अहंकार यातून जरा मोकळे होऊन विचार करूया.
1. जी भाषा रोजगार देते तीच जगते, बाकीच्या मरतात असं 1907 साली भारतीय भाषांचा सर्व्हे करून त्याचे 50 खंड प्रसिद्ध करणारे ग्रियरसन म्हणतात.
2. मराठी ही जगातली 10 व्या क्रमांकाची भाषा आहे.
3. जगातल्या सर्व भाषांचा विचार करता सर्वाधिक समृद्ध कोश वाडमय असलेली ती दुसर्‍या क्रमांकाची जागतिक भाषा आहे.
4. ती ज्ञानभाषा, धर्मभाषा, जागतिक भाषा आहेच.
5. ती अभिजात भाषा आहे असं आम्ही आमच्या 436 पृष्ठांच्या इंग्रजी अहवालात सिद्ध केलेलं असून जगभरच्या भाषा शास्त्रज्ञांनी या अहवालाला मान्यता दिलेली आहे.
6. इंग्रजीच्या तुलनेत मराठीची रोजगार देण्याची क्षमता कमी आहे हे मात्र मान्यच करायला हवे.
7. सगळे काही शॉर्टकटने तात्काळ हवे असलेले पालक इंग्रजीकडे वळले तर त्यात त्यांची चुक नाही.
8. मराठीची रोजगार क्षमता वाढवल्याशिवाय पालक मराठीकडे वळणार नाहीत.
9. मराठी शाळा, शिक्षक, अभ्यासक्रम, यांचा दर्जा वाढवलाच पाहिजे. या शाळांचा दर्जा चांगला नाही म्हणून चांगल्या आर्थिक स्तरातली मुलं, जागृत पालकांची मुलं, राज्यकर्त्यांची आणि उद्योगपतींची मुलं या शाळांमध्ये येत नाहीत. ती येत नाहीत म्हणून हा दर्जा सुधारण्याबद्दल संस्थाचालक, शासन आणि समाज उदासीन आहे, हेही तितकंच खरं. हे एक दुष्टचक्र बनलेले आहे. दर्जा अधिक सुधारून आपण पहिलं पाऊल टाकूयात. दर्जा सुधारण्याबाबतचे आपापले संकल्पचित्र मांडूयात. कृतीही करूयात. आपण सुरूवात करू. इतर मागे येतीलही.
10. मात्र अनेक इंग्रजी शाळा सुमार दर्ज्याच्या असतात तरीही चर्चा फक्त मराठी शाळांच्या वाईट दर्जाची होते. यामागचे भाषक राजकारण समजून घेतले पाहिजे.
11. सामान्य माणसाचा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी, राजकारण्यांनी, सेलीब्रेटींनी जे केले ते करण्याकडे कल असतो.
12. फारसे खोलात न जाता, चिकित्सा वगैरेच्या भानगडीत न पडता धोपटमार्ग ते निवडत असतात, त्यात त्यांची चूक नाही.
13. मराठी शाळा बंद पाडायच्या, इंग्रजी शाळांचे कारखाने काढून बख्खळ नफा मिळवायचा या विनोद अंबानी, देवेंद्र अदाणी मार्गाने सरकारही चालले आहे.
14. फाडफाड इंग्रजी बोलता आले की जग जिंकता येते असे पालकांना वाटते. त्या बोलण्यात भरीव मुद्दे असतात का? ते बोलणे अस्सल असते का? असला फालतू विचार करण्यासाठीचा वेळ आमच्याकडे नाहीये. याचा अर्थ प्रत्येक मातृभाषावाल्याचे/वालीचे बोलणे थोरच असते असा विपर्यास करून वाद घालू नये.
15. ज्या दिवशी मराठी बुद्धीजिवींनी सागरा प्राण तळमळला, ने मजशी ने अमेरिकेला असा टाहो फोडीत मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचे कुपोषण सुरू झाले.
16. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठीची रोजगार देण्याची क्षमता वाढेल.
17. आज राज्य सरकार मराठी भाषेच्या सर्व संस्थांसाठी अवघे 10 कोटी रूपये खर्च करते. अभिजातमुळे त्यात केंद्राच्या रुपये 500 कोटी अनुदानाची दरवर्षी भर पडेल.
देशातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. तेव्हढ्या प्राध्यापक-शिक्षकांच्या जागा तयार होतील.
18. भारताच्या मोबाईल क्रांतीचे जनक सत्यनारायण [सॅम] पित्रोदा, सुपर कंप्युटरचे जनक विजय भटकर, नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, जागतिक किर्तीचे वैज्ञानिक रघूनाथ मासेलकर, जयंत नारळीकर, वसंतराव गोवारीकर आदींचे शिक्षण मातृभाषेतूनच झाले होते.
क्रमश:-
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment