Sunday, February 18, 2018

इतिहासकार, कवी, कादंबरीकार आणि दंतकथा -


साहित्य, कला, चित्रपट, नाटक यांचा समाजावर परिणाम होतो की नाही आणि असल्यास कितपत होतो हा विषय बहुचर्चित आणि वादग्रस्त राहिलेला आहे.

कल्याणच्या सुभेदाराची सून-

एखादा उत्तरकाळातील कवी सदहेतूनं शिवरायांवर कविता करतो. "अशीच आमुची आई असती, वदले छत्रपती " असं कवितेत लिहितो आणि चक्क ती खरीच घटना असल्याच्या कथा तयार होतात. वर्षानुवर्षे त्या इतिहास म्हणून सांगितल्या जातात. पुन्हापुन्हा सांगितल्या जातात.
महाराज परस्त्रियांचा कसा गौरव करायचे हे सांगण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कथेतले कच्चे दुवे पुढीलप्रमाणे-

1. महाराजांनी भर दरबारात त्या अनोळखी महिलेचा गौरव करण्यासाठी आमची आई, "जिजाऊ" सुंदर नाहीत असं अप्रत्यक्षपणे म्हटलं हे खरं असेल का? बाई, तुम्ही खुप देखण्या आहात हे सांगण्यासाठी माता जिजाऊ दिसायला चांगल्या नाहीत असं महाराज खोटं का सांगतील?
2. महाराजांना ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं, जे महाराजांना आरपार ओळखतात असे ज्येष्ठ सरदार महाराजांचा महिलांचा आदर करण्याचा नियम मोडून एका परक्या स्त्रीला पळवून आणतील का? तिला महाराजांसमोर पेश करतील का? जो वरिष्ठ अधिकारी पैसे खात नसतो याची खात्रीलायक माहिती असताना, जसे त्याला त्याच्या हाताखालचे लोक पैसे द्यायची हिंमत करणार नाहीत, तसेच महाराजांना लहानपणापासून ओळखणारे सरदार एक विवाहीत महिला पळवून आणून ती महाराजांना पेश करणं शक्य तरी आहे का?
3. जो कल्याणचा सुभेदार तीन वर्षे कल्याणला न गेल्यानंच कल्याणची लूट शिवाजी राजांनी केल्याचा ठपका ठेऊन त्याला विजापूर दरबारने बडतर्फ केले असा इतिहास आहे तर मग त्या मुस्लीम सरदाराची बुरख्यातली तरूण सून एकटीच कल्याणला कशाला जाईल?
ती मॉर्निंग वॉकला 400 किलोमीटरवर नक्कीच गेली नसणार, नाही का?

गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड-

हरी नारायण आपटे यांची ’गड आला पण सिंह गेला’ ही मस्त कादंबरी आहे. ती महाराजांच्या निधनानंतर सुमारे 200 वर्षांनी लिहिली गेलीय.
नरवीर तानाजीनं कोंढाणा जिंकल्यानं त्याला महाराजांनी नंतर सिंहगड हे नाव दिलं अशी कथा सांगितली जाते. मात्र ही निव्वळ दंतकथा असणार. कोंढाण्याच्या या युद्धापुर्वीही या किल्ल्याचे सिंहगड असे नाव असल्याचे अनेक ऎतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत.
आपट्यांच्या या कादंबरीनं ही काल्पनिक कथा मात्र भलतीच लोकप्रिय झाली.

जेम्स कनिंगहॅम ग्रॅंड डफ आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधनं-

ब्रिटीश अधिकारी, योद्धा आणि इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रॅंड डफ याचा जन्म 8 जुलै 1789 रोजी झाला.
तो सातारा गादीचा प्रशासक असताना त्याने कार्यालयीन कामांव्यतिरिक्त व्यक्तीगत आवड म्हणून घरोघरी फिरून ऎतिहासिक कागदपत्रं जमा केली.
तब्बेत बिघडल्यानं तो स्कॉटलंडला परत गेला.
त्यानं 2 हजार रूपये कर्ज काढून 1826 साली "ए हिस्टरी ऑफ द मराठाज" हा इतिहासग्रंथ 3 खंडांमध्ये प्रकाशित केला. त्याकाळात ह्या पुस्तकांचे महत्व मराठी अभ्यासकांना फारसे जाणवले नाही.
परिणामी पुस्तकांच्या या कर्जातच त्याला 23 सप्टेंबर 1858 ला मरण आले. मृत्यूसमयी तो 69 वर्षांचा होता.
मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखन-प्रकाशनार्थ एक इंग्रज कर्जात मेला याची आज कुणाला आठवण किमान जाणीव तरी असेल काय?
-प्रा.हरी नरके
.....................

No comments:

Post a Comment