Saturday, February 1, 2020

महान योद्धा सुभेदार मेजर रामजी सकपाळ








निमित्त- स्मृतीदिन, महान योद्धा सुभेदार मेजर रामजी सकपाळ -प्रा.हरी नरके

आज सुभेदार मेजर रामजी सकपाळ यांचा १०७ वा स्मृतीदिन. ते एक महान योद्धा होते. त्यांनी अफगाणिस्तानच्या युद्धात प्रत्यक्ष लढाई केलेली होती. त्यांच्यातील कुशल शिक्षकाचे गुण ओळखून ब्रिटीश सरकारने त्यांना पुण्याला पाठवून टिचर्स ट्रेनिंग दिले. त्याकाळात त्यांचा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई यांच्याशी परिचय झाला. पुढे त्याचे रूपांतर घनिष्ट मैत्रीत झाले. [ पाहा- धनंजय कीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, २०१४, पृ. १३ ]  शूद्र अतिशूद्रांमधून कोणी तरी महापुरूष जन्माला येईल आणि तो या घटकांची गुलामी संपवील असे फुले म्हणत असत. तसे त्यांनी आपल्या पुस्तकात भाकीतही वर्तवलेले आहे. आपल्या १४ व्या अपत्याकडे,भीमाकडे, सु.मे.रामजी त्यादृष्टीने पाहात असत. त्यांना प्रथम पत्नी भीमाबाईंपासून झालेल्या १४ मुलांमधली अवघी ६ जगली. बाळाराम, गंगा, तुळसा, मंजुळा, आनंद आणि शेंडेफळ भीमराव.

सु.मे. रामजी इंदूरजवळच्या लष्कराच्या छावणीत शिक्षक होते. पुढे ते मुख्याध्यापक झाले. याच " मिल्ट्री हेडक्वार्टर ऑफ वॉर " MHOW म्हणजेच महू मध्ये भिमरावांचा १४ एप्रिल १८९१ ला जन्म झाला.
भिवा ३ वर्षांचा असताना ते लष्करातून निवृत्त झाले. काही काळ दापोलीला राहिल्यावर नोकरीच्या शोधात ते सातार्‍याला गेले. भिवाचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यातच झाले.

सु.मे.रामजी हे रामानंदी पंथाचे असल्याने त्यांच्यावर संत कबीर, संत तुकाराम आणि अन्य संतांच्या विचारांचा खोलवरचा प्रभाव होता. " आपले वडील गुणी शिक्षक होते. त्यांनी बालपणी आपल्यावर उत्तम संस्कार केले. धार्मिक बाबतीत ते रोमन हुकुमशहासारखे वागत असत, " असे बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या पुस्तकाच्या [बुद्ध आणि त्यांचा धम्म] प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ ला स्वत: बौद्ध धम्माची दिक्षा घेताना व लक्षावधी बांधवांना दिक्षा देताना बाबासाहेबांनी नागपूरच्या दिक्षाभुमीवर सर्वप्रथम सु.मे.रामजींना आदरांजली अर्पण केलेली होती.

त्यांनी आपल्या मुलींना घरीच इतके उत्तम शिक्षण दिलेले होते की, त्या सगळ्याजणी ग्रंथवाचन करीत आणि प्रसंगी धर्मग्रंथावर उत्तम प्रवचनंही देत असत असेही बाबासाहेबांनी नमूद केलेले आहे.
संगीतप्रेमी बाळाराम फारसे शिकले नसले तरी त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. आनंदरावला कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून नोकरी धरावी लागली. भिमरावला मात्र खूप शिकवायचे अशी सु.मे.रामजीबाबांची महत्वाकांक्षा होती. भिवा १९०७ साली मॅट्रीक झाल्यानंतर त्याला त्यांनी पुढे २ वर्षे महाविद्यालयीन शिक्षण दिले. आपल्या तुटपुंज्या पेन्शनमधून भागत नसतानाही त्यांनी त्यासाठी खूप हालअपेष्टा भोगल्या. भीमरावांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सु.मे.रामजी दापोली आणि सातारा येथे काही वर्षे काढल्यानंतर मुंबईला आले.

चाळीच्या एका खोलीत भिवाचा अभ्यास होत नसल्याने स्वत: रामजीबाबा रात्री २ वाजेपर्यंत जागे राहायचे, २ वाजता भिवाला झोपेतून ऊठवून अभ्यासाला बसवायचे आणि मगच झोपायचे. पुन्हा दिवसभर ते नानाविध नोकर्‍या किंवा अन्य काबाडकष्ट करायचे. केवळ भिवाच्या अभ्यासासाठी परवडत नसतानाही त्यांनी चाळीतली समोरची खोली घेतली. भिवामध्ये त्यांनी अभ्यासाची व वाचण्याची आवड निर्माण केली. भिवाने मागितलेले प्रत्येक पुस्तक ते त्याला आणून देत असत. स्वत:जवळ पैसे नसले तर आपल्या विवाहीत मुलींकडून त्यांचे दागिने उसने आणून ते गहाण ठेऊन त्यावर ते कर्ज काढीत पण पुस्तक आणून देतच.

प्रख्यात सत्यशोधक लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर आणि दा. सा. यंदे यांच्या प्रयत्नातून भीमरावला सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशीप मिळाली आणि ते पदवीधर झाले. शिष्यवृत्तीच्या अटी आणि शर्तींनुसार बडोद्यात काही वर्षे नोकरी करणे आवश्यक होते.

त्यानुसार भीमराव नोकरीवर जायले निघाले तेव्हा सु.मे. रामजींनी त्यांना बडोद्याला जायला विरोध केला. सनातन्यांच्या गुजरातेत भीषण जातियता असल्याने आपल्या मुलाचा छळ होईल अशी साधार भिती त्यांना वाटत होती. ती पुढे खरीही ठरली. बडोद्यात भीमरावांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांना राहायला घरही मिळाले नाही. कार्यालयातही त्यांचा पदोपदी अपमान करण्यात आला.

भीमरावांनी बडोद्याला जाण्यासाठी घर सोडले त्याच दिवशी मुलाच्या काळजीने हा योद्धा पुरूष आजारी पडला आणि पंधरवड्याभरात त्यांचे २ फेब्रुवारी १९१३ ला दु:खद निधन झाले. वडील आजारी  असल्याची तार मिळताच भीमराव मुंबईला यायला निघाले. वडीलांची आवडती मिठाई घेण्यासाठी ते सुरत रेल्वे स्टेशनवर उतरले आणि त्यांची ट्रेन सुटली. पुन्हा गाडी २४ तासांनीच होती. भीमराव घरी पोचले तेव्हा माझा भिवा आला म्हणून सु.मे.रामजींनी २ आनंदाश्रू ढाळले आणि त्यांचे तात्काळ निधन झाले. जणू फक्त भिवाला पाहायला, भेटायलाच ते थांबले होते.

असे होते रामजी म्हणून घडले ग्रंथप्रेमी भीमजी हे आपण कधीही विसरता कामा नये.

प्रा.हरी नरके, २ फेब्रुवारी २०२०

No comments:

Post a Comment