Thursday, February 27, 2020

चला ३६४ दिवस मराठीला गाडूयात- प्रा.हरी नरके

प्रत्येक मराठी माणसाबद्दल मला आदर वाटतो. म मा अतिशय बुद्धीमान आणि मुत्सद्दी असतो. २७ फेब्रुवारीला तो मन:पुर्वक मराठीचा जयजयकार करतो. लाभले आम्हास भाग्य वगैरे गाणी चढ्या आवाजात म्हणतो. २८ फेब्रुवारी ते पुढची २६ फेब्रुवारी आम्ही पुन्हा मराठीकडे ढुंकूनही बघत नाही. कामच पडत नाही. आम्ही खाजगीतसुद्धा इंग्रजीत किंवा हिंदीत बोलतो. असं म्हणतात की माणूस मातृभाषेतून विचर करतो.मराठीत अतिशय समृद्ध वैचारिक साहित्य असल्यानं सध्या नव्यानं विचार करायचं कामच पडत नाही. वैचारिक पुस्तकं वाचायचीही आम्हाला गरज नाय कारण विचार आमच्या रक्तातच असल्यानं तो वाचायची आवश्यकता निदान आम्हाला तरी नाही. साहित्य संमेलानात दहा कोटी रूपयांची ग्रंथविक्री होते असे आम्ही छापतो. कारण कोणत्याही, कसल्याही नोंदीच नसल्यानं दहा कोटीच काय एकदोन हजार कोटी रुपयांचे आकडे फेकले तरी कोण तपासणाराय? आमच्या राज्यातल्या ३५० पैकी ३२५ तालुक्यांमध्ये, ७५ टक्के महानगरपालिकांमध्ये ललित, वैचारिक पुस्तकांची दुकानंच नसतात. गरजच काय?

आम्ही बौद्धिक कार्यक्रम बघत नसल्यानं वाहिन्यासुद्धा निर्बुद्ध करमणुकीला प्राधान्य देतात. सुमार, सवंग, उथळ तेव्हढेच प्रतिष्ठीत.

आम्ही मराठी पुस्तकं विकत घेण्याच्या फंदातच पडत नाही. करायचंय काय ते भर्ताड विकत घेऊन? मराठीतील आघाडीच्या वर्तमानपत्राचे एक विचारवंत संपादक जाहीरपणे सांगायचे की ते कधीच मराठी ललित साहित्य वाचत नाहीत. ते भिकारच असते असा त्यांचा न वाचताच दावा असायचा.

आम्ही सारे मातृभाषेचे लाभार्थी आमच्या मुलांना इंग्रजी, डून कॉन्वेंट, इंटरनॅशनल वगैरे स्कूल्समध्ये शिकवतो. कारण मराठी शाळांचा दर्जा निकृष्ठ असतो अशी आमची ठाम धारणा आहे. सदैव प्रकाशझोतात असणारी, वलायांकित मराठी व्यक्तीमत्वं जेव्हा वाहिन्यांवर बोलतात तेव्हा वाक्यात जर दहा शब्द असतील तर ते किमान एकतरी शब्द [ शक्यतो क्रियापद ] मराठीतच बोलतात. बिकॉज ते मराठी लॅंग्वेजला लव्हतात.

मराठी सोडून इतर भाषांमध्ये बोललेले, लिहिलेले जास्त खपते, चालते, प्रतिष्ठा मिळवून देणारे असते असा अनुभव असताना त्याने मुळात मराठीत बोलावेच का? मराठी माणसाला जागतिक नेतृत्व करायचे असल्याने त्याला इतर भाषांमध्ये पटाईत असणें आवश्यक वाटते. हिंदी वा इंग्रजीत बोलताना जर एखाद्या मराठी माणसाची काही चूक झाली तर आम्ही मराठी लोक त्याची एथेच्छ टवाळी करतो. इतर भाषक लोक महाराष्ट्रात आयुष्यभर राहतात,पोट भरतात, मानसन्मान मिळवतात पण त्यांना धड दोन शब्द मराठीत बोलता - लिहिता येत नाहीत तरी आम्हाला त्यांचे कोण कौतुक! कारण आम्ही मुत्सद्दी असल्यामुळे कोणत्या भाषेत बोलल्यानं प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती मिळते याचे अचुक भान आम्हाला असते.

मराठी ही डाऊनमार्केट भाषा आहे, ती मरू घातलेली भाषा आहे, ती ज्ञानभाषा नाही, ती रोजगार मिळवून देणारी भाषा नाही याची मराठी माणसाला खात्री पटलेली असते. महाराष्ट्रात संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषांची विद्यापीठे आहेत, फक्त मराठी विद्यापीठ नाही. मराठी विकासाचे धोरण नाही. कालपर्यंत राज्यातील शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य नव्हते.

मराठीला अभिजात दर्जा मिळावा  ही मागणी आम्हाला हास्यास्पद वाटते. हवा कशाला अभिजात दर्जा? मुळात हवी कशाला मराठी भाषा? मराठी भाषा मरणार असेल तर खुशाल मरू द्या, असं मराठी वाहिन्यांवाले आणि मराठी पत्रकारच जेव्हा म्हणतात तेव्हा आम्ही भरून पावतो.

जर एका दिवसापुर्ता जल्लोश केल्याने आमचे मराठीप्रेम शाबीत होत असेल तर मराठी शिकण्याची, वाचण्याची, मराठीत [देवनागरीत] स्वाक्षरी करण्याची, मराठी टिकवण्याची मुळात गरजच काय?

मराठी माणूस मुत्सद्दी असल्यानं त्याचा मला अभिमान वाटतो.

जय मराठी. जय मराठी माणूस. जय मराठी द्वेष्टे. चला ३६४ दिवस मराठीला गाडूयात.

-प्रा.हरी नरके, २७ फेब्रुवारी २०२०

No comments:

Post a Comment