Wednesday, February 26, 2020

‘भाषा शिकून पोट भरतां येणार का’ - होय

कौस्तुभ दिवेगावकर- उद्या मराठी भाषा दिन आहे. माझे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मराठी साहित्य या विषयात झाले. यू॰पी॰एस॰सी॰ची परीक्षा उत्तीर्ण होताना मराठी वाड्.मय या वैकल्पिक विषयातील गुणांमुळे माझा गुणवत्तायादीतील क्रमांक उंचावला. किंबहुना ‘भाषा शिकून पोट भरतां येणार का’ या प्रश्नाचे माझ्यासाठीचे उत्तर होय असेच आहे. स्पर्धा परीक्षेची पुस्तकें मी मूळ इंग्लिश वाचून मराठीत नोटस् काढत असे. उत्तरे लिहिण्याचे माध्यम मराठी होते. मी काही दिवसांपूर्वी यशदात प्रारुप मुलाखती घेताना काही विद्यार्थी कौशल्य प्रदर्शनाच्या नादात उत्फुर्तता गमावताना दिसले. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. मी मुलाखत इंग्लिशमध्ये देत असताना मुलाखत मंडळाची परवानगी घेऊन हिंदीतही उत्तरे दिली होती. त्याचा गुणांवर कोणताही परिणाम झाला नव्हता. उलट एक प्रश्न विचारला गेला होता. “ साहित्याने माणसे घडत असती तर माणसांमाणसातील द्वेषभाव कधीच संपला असता. धार्मिक जातीय हिंसेऐवजी कबीराच्या दोह्यातील एकतेचा, प्रेमाचा संदेश सर्वांनी घेतला असतां. मग साहित्याचा उपयोग काय?”

इंग्लिशमध्ये काही सुचले नाही, मी हिंदीत सांगितले की “ माझ्या एका आवडत्या कवीच्या अरूण काळ्यांच्या एका कवितेचे सूत्र होते, हस्ताक्षर सुधारावे म्हणून कोणी लिहीत नाही. माणसे भंगारात जाऊ नये म्हणून कवी लिहितो.” भाषा समाजाशी एकरूप होण्याचे माध्यम आहे. त्यातील विविधता आपल्या बहुसांस्कृतिक विश्वाला समजून घेण्याचे माध्यम आहे. आज उत्तम मसुदा लिहिणे दुर्मिळ होत आहे. स्पर्धा परिक्षा तर आहेतच पण भाषांतरे, पत्रकारिता, जाहिराती अशा कितीतरी क्षेत्रांत बहुभाषिकांना संधी आहेत. त्यामुळे अहंकार आणि न्यूनगंड यांच्या पलिकडे जाऊन भाषेकडे पाहूयात. कुवलयमाला या प्राचीन ग्रंथात मराठी लोकांचा स्वभाव ‘शूर, अभिमानी, भांडखोर, सरळ, दिल्हे घेतले करणारा’ असा सांगीतलाय. असशील शहाणा तुझ्या घरी असे म्हणणारे पण तितकेच प्रेमळ लोक आहोत आपण! असो. बहुभाषिक बहुसांस्कृतिक आपलेपण जपुयात. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (ता.क. शुध्दलेखनाच्या चुकांसाठी क्षमस्व! प्रमाण आणि बोलीभाषा- शुध्द अशुध्दतेच्या कल्पना, स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या भाषिक प्रयोगांबद्दल नंतर कधीतरी!) 🙂-Kaustubh Diwegaonkar

No comments:

Post a Comment