Friday, July 23, 2021

दोन अनुभव


१)गेले २ महिने मी "ओबीसीचे पंचायत राज्यातील आरक्षण" या विषयावर दररोज बोलतोय, लिहितोय, तरीही हा काय विषय आहे जरा थोडक्यात सांगा असे आजकाल काही अनोळखी पत्रकारांचे फोन येतात. एव्हढा गदारोळ आजूबाजूला चाललेला असताना ह्या विषयाची प्राथमिक माहितीही नसलेले हे नवोदित पत्रकार खरंच धन्य होत. आपल्याला या विषयाची किंचितही माहिती नसल्याची तिळमात्रही खन्त त्यांना नसते. मला एक प्रसंग आठवला, पुलंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला इंग्रजी वर्तमानपत्राच्या एक विदुषी आलेल्या होत्या. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, मि. देशपांडे, मी असं ऐकलंय की तुम्ही काही पुस्तकं सुद्धा लिहिलीयत तर मला जरा त्यातल्या काहींची नावं सांगता?
२) मी ज्या विषयावर लिहितोय,बोलतोय त्याच्याशी काडीमात्र देणेघेणे नसलेले अनेकजण तुम्ही यावर का लिहित नाही? त्यावर का नाही बोलत? असं विचारीत असतात. जगात अनेक प्रश्न आहेत.तुमचा प्रश्न हेच एकमेव जग आहे असे वाटण्याचा तुम्हाला हक्क आहे. पण मी सर्वज्ञ नाही. मी फार छोटा माणूस आहे. जगातल्या सगळ्या विषयांचं मला ज्ञानही नाही, नी एकना धड भाराभर चिंध्या करून मला माझ्या विषयाचा फोकस/मोसम कट करायचा नाही. या बाबतीत एकेक विषय घेऊन काम करणारे डॉ नरेंद्र दाभोलकर, मेधा पाटकर हे माझे आदर्श आहेत. तेव्हा सतत नवे आणि माझ्या मिशनशी संबंधित नसलेले विषय हाताळता येणार नाहीत, याबद्दल दिलगीर आहे.- प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment