Saturday, October 31, 2020

अनुसुचित जातीजमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्या अधिकारात येतच नाही. सबब हा मुद्दा या बैठकीत आणता येणार नाही." तरिही उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या पटेलांनी डॉ. आंबेडकरांचा हा मुद्दा फेटाळून लावला. जवाहरलाल नेहरूंनी मात्र या बैठकीत मौन धारण केले. 

पटेलांनी देशभर या मागणीसाठी सनातन्यांची आंदोलने घडवून आणली. पटेलांनी हीच शिफारस घटनासभेत मांडली असता डॉ. आंबेडकरांनी घटना सभेच्या बैठकीतून सभात्याग केला व पुढील ४ दिवस ते कामकाजाला अनुपस्थित राहिले. त्यांनी घटना समितीचा राजीनामा द्यायचे ठरवले. अनु. जातीजमातींना राज्यघटना संरक्षण देणार नसेल तर अशा घटना परिषदेत मी राहणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

त्यामुळे नाईलाजाने पटेलांनी माघार घेतली  व त्यामुळे अनु. जातीजमातींचे आरक्षण टिकले.


- प्रा. हरी नरके, 

३१/१०/२०२०


संदर्भासाठी पाहा-

१. डॉ. राजा शेखर वुंद्रू, (आय.ए.एस.) " आंबेडकर, गांधी आणि पटेल," ब्लूम्सबेरी प्रकाशन, नवी दिल्ली, २०२०, पृ. २३१ ते २३९


२. Constituent Assembly Debates, vol.5, pp. 259-70, vol. 8, pp. 269-72,   

३. कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, खंड ७७ वा, पृ.२५,

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड, १३, पृ.९२, पृ. १२७

५. बी. शिवा राव, द फ्रेमिंग ऑफ कॉन्स्टीट्यूशन, खंड ४ था, पृ. ५९९, पृ.७७२-७३, खंड २ रा, पृ. २४७,


Friday, October 30, 2020

पुरूषोत्तम बेर्डे यांचे "क्लोज एनकाउंटर्स"- कामाठीपुर्‍याचे भन्नाट आत्मचरित्र


टूरटूर, हमाल दे धमाल या गाजलेल्या नाटक-सिनेमांमुळे पुरूषोत्तम बेर्डे सर्वांना परिचित आहेत. मराठीत अनेक व्यक्तींची दर्जेदार आत्मकथनं आजवर आलेली आहेत. परंतु बेर्डे यांनी लिहिलेले "क्लोज एनकाउंटर्स" हे मुंबईतील बदनाम वस्ती म्हणुन ओळखल्या जाणार्‍या कामाठीपुर्‍याचे आत्मचरित्र आहे. विशेष म्हणजे ते अतिशय खिळवून ठेवणारे आहे. त्यांनी या परिसरातील गल्ल्या, चाळी, घरं, माणसं यांची इतकी रसरशीत, चटकदार पोर्ट्रेट्स चित्रित केलीयत की सामान्य वाचक ते जाणते समीक्षक असे सारेच या पुस्तकावर लट्टू होतील. बेर्डे कमर्शियल आर्टीस्ट आहेत. गाजलेले कॉपीरायटर आहेत. एकाच वेळी तुफान वाचनीयता, वेधकता, विषयाच्या थेट गाभ्याला भिडणं आणि त्या त्या माणसांचे रसायन मुळासकट उलगडून दाखवणं हे काम खुप आव्हानकारी असतं. ते बेर्डेंनी लिलया पेललेलं आहे. प्रसिद्ध कथाकार आणि नाटककार जयंत पवार यांची या पुस्तकाला लाभलेली "सांगोपांग कामाठीपुरा" ही प्रस्तावना म्हणजे एक श्रेष्ठ कलाकृतीच आहे.

वासुनाका, माहिमची खाडी, चक्र ते मुंबई दिनांक अशा अनेक पुस्तकांनी मुंबईचे उत्तम चित्रण आपल्यासमोर ठेवलेले आहेत. नामदेव ढसाळांच्या कवितांमधली मुंबई जोरदार आहे. पण बेर्डॆंची ही कहाणी केवळ भन्नाट म्हणावी अशी दर्जेदार आहे. 

अलेक्झांड्रा, श्यामू, कासीम बिल्डींग, अन्ना, तात्या अमोणकर आणि अपने बालाका डायरेक्शन, बबलू, येंचू, वच्छा, लोखंडेसर, मनजी, शेट्टी लोक, पेंटर अबूभाई, नूर महम्मद, अंजनीसुत व्यायामशाळा, याद्या, राजम्मा, गवजीबुवा, शूटींग गिटींग आणि ओमाचा मामा, बाळू मिरगी, खेळवाले,  पुंजाताई, रामकिशन तेली, सोनीबाई, षांत, अशा २४ व्यक्तीचित्रांमधून आपल्या काळजाला भिडणारी ही गोष्ट म्हणजे पुलंचे "व्यक्ती आणि वल्ली" ते जयवंत दळवींची "सारे प्रवाशी घडीचे" ही बिगरी ते मॅट्रीक इयत्तेतली पुस्तकं असतील तर "क्लोज एनकाउंटर्स" पोस्ट डॉक्टरल काम आहे. केवळ अफलातून.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. कोरोनातला गैबानेपणा घालवून माईंड एकदम फ्रेश करणारी तुफान कलाकृती. व्हॉट्सॅप या आजाराबद्दल मला तिरस्कारच वाटतो. पण हे पुस्तक व्हॉट्सॅपवर जन्माला आलेय हे कळल्यामुळे मी व्हॉट्सॅप या आजाराला सगळे गुन्हे माफ केलेले आहेत.

अपने राजहंस की बेश्ट निर्मिती. 

"क्लोज एनकाउंटर्स",  पुरूषोत्तम बेर्डे, राक्जहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती- डिसेंबर २०१९, पृष्ठे-२४०, किंमत रूपये ३००/- 

-प्रा. हरी नरके, ३०/१०/२०२०

Sunday, October 25, 2020

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी

संगिता नरके-

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी- लक्ष्मण गायकवाड

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि भटक्याविमुक्तांचे ख्यातनाम नेते लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या "




उचल्यानंतर" या आत्मकथनात रेणके आयोगाचे वाभाडे काढलेले आहेत. " या आयोगाचा अहवाल चेयरमन बाळकृष्ण रेणके यांनी मुद्दामहून उशीरा दिल्याने व तो घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने केंद्र सरकारने तो कचर्‍याच्या डब्यात टाकल्याचा " घणाघाती आरोप त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. या खळबळजनक पुस्तकात गायकवाड पुढे म्हणतात, " गुळाला मुंगळे चिकटावेत तसे रेणके अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिकटून राहिले आणि त्यांनी वेळोवेळी फक्त आपला कार्यकाल तेव्हढा वाढवून घेतला. त्यांच्याकडे शासनाने सोपवलेले काम न करता रेणके लाल दिव्याच्या गाडीतून सहली करीत फिरत राहिले. आपणच या आयोगाचे मालक आहोत अशा हटवादी भुमिकेतून रेणकेंनी समाजाची फसवणूक केली. रेणके प्रतिष्ठीत जातीचे असल्याने त्यांना विमुक्तभटक्यांचे प्रश्नच कळले नाहीत. दुराग्रही रेणके आपल्या व्हीआयपीच्या लाल दिव्याच्या गाडीत मजा करीत राहिले आणि त्यांनी मसणजोगी, नंदीबैलवाले अशा वंचितांची फसवणूक केली. आयोगाच्या अध्यक्षपदी रेणकेंऎवजी दुसरी कुणीही व्यक्ती असती तर विमुक्तभटक्यांची अशी फसवणूक झालीच नसती. पंतप्रधान मनमोहन सिंग विमुक्त भटक्यांचे कल्याण करू इच्छित होते, परंतू उशीरा आलेला रेणके अहवाल घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने तेही नाराज झाले. आधीच अनुसुचित जाती व अनु. जमातीचे आरक्षण असलेल्यांना तिथून बाहेर काढा ही रेणकेंची शिफारस देशभर फेटाळली गेली. यापुढे रेणकेंनी चळवळीतून निवृत्ती घ्यावी आणि विमुक्त भटक्यांच्या चळवळीपासून दूर राहावे" असा सल्लाही गायकवाड यांनी रेणकेंना दिलेला आहे. गायकवाड यांच्या या टिकेचे स्वागत केले जात असून या भुमिकेला विमुक्तभटक्यांचा फार मोठा पाठींबा मिळत आहे. या पुस्तकाद्वारे रेणकेंच्या आजवरच्या वाटचालीचा बुरखा फाडण्याचे धाडस गायकवाड यांनी केल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. या टिकेबद्द्ल आजवर मौन धारण केलेल्या रेणकेंच्या प्रत्युत्तराकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. 

-  संगिता नरके

पाहा - ( उचल्यानंतर, लक्ष्मण गायकवाड, ( पृष्ठे २७ ते ३० ) संधीकाल प्रकाशन, भाईंदर, ( पुर्व )  ४०१ ११५, प्रथमावृत्ती -आक्टोबर २०२०, पृष्ठे १९२, किंमत रूपये २५०/- )

..................................

पुस्तकासाठी संपर्क- फोन- ९८२०५ ९५२८२, 

लक्ष्मण गायकवाड यांच फोन-९८७०४ ५२४१०


Saturday, October 24, 2020

मनोरंजनाच्या आडपडद्यात संस्कृतीचं राजकारण - प्रा.हरी नरके

 

आज सुमारे ८० कोटी भारतीय लोक टेलिव्हीजन बघतात. त्यातला बहुसंख्य प्रेक्षक हा मनोरंजनाच्या वाहिन्या बघतो. एकट्या मराठीत दररोज विविध वाहिन्यांद्वारे ४० ते ५० मालिका दाखवल्या जातात. सर्वोत्तम टीआरपी मिळवणे हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेऊन या मालिका तयार केल्या जातात. या टीआरपीवरून वाहिनीला कमी किंवा जास्त जाहीराती मिळतात. या मिळणार्‍या जाहीरातींद्वारे वाहिनीला रेव्हुन्यू (महसूल- पैसा) मिळत असतो. कोणीही केवळ लोकहितार्थ वाहिनी चालवतो नसतो. या उद्योगातून दोन पैसे मिळवण्यासाठीच ही सारी धडपड केली जात असते. त्यात काहीच वावगे नाही. परंतु यामागे केवळ अर्थकारण, व्यापारी दृष्टीकोन एव्हढाच मर्यादित हेतू असतो का? तुम्हाला काय वाटते?

या उद्योगाद्वारे मनोरंजनाच्या आडपडद्यात संस्कृतीचं राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? हे फक्त अर्थकारण नसतं. तर मनोरंजन, माहिती, इतिहास, निखळ करमणुक, गोष्टी सांगणं यांच्याद्वारे जे संस्कार रुजवले जातात ते कोणते असतात? कोणती भाषा, कोणती मुल्यव्यवस्था सातत्याने तुमच्या माथ्यावर मारली जाते? कथा कुठलीही असो जी कटकारस्थानं खेळली जातात, जो चोरटा वा उघड व्याभिचार दाखवला जातो, जो लखलखाट आणि श्रीमंती थाट यांचा मारा केला जातो ते सारे अकारण, हेतूशुन्य असते असे तुम्हाला वाटते काय?

  

 प्रत्येक माणसाला हलक्याफुलक्या, प्रसन्न, बौद्धिक मनोरंजनाची गरज असते. ओढही असते. पण हे सोपे काम नसते. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. त्याने भाषा,संस्कृती, विचार,तत्वज्ञान,कलांची निर्मिती करून मानवी आयुष्याला सार्थकता दिलेली आहे. पण विविध मनोरंजन वाहिन्यांद्वारे दररोज जो काही रतीब घातला जातो त्याचा भर निर्बुद्ध करमणूकीवर असतो का? असल्यास तो तसा का असतो? प्रेक्षकांना फक्त बघे बनवणं, निष्क्रीय बनवणं, फारसा विचार करु नका, चंगळवादावर भर द्या, जगण्याकडे गम्भीरपणे बघु नका, फक्त मजा करा, मानवी दु:खं, सामाजिक समस्या, संवेदनशीलता, बौद्धिकता यांना फाट्यावर मारा अशी शिकवण या करमणुकीच्या माध्यमातून चलाखीने पेरली जाते का? माणसाच्या अबोध मनाचा कब्जा विशिष्ट्य राजकीय विचारसरणीच्या सुगीसाठी केला जातोय का?

 सुबुद्ध प्रेक्षकांना काय वाटते?

-प्रा. हरी नरके, २४/१०/२०२०

Thursday, October 22, 2020

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-



सुप्रसिद्ध लेखक, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आय.ए.एस. अधिकारी (निवृत्त) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-

हरी नरके जी, ही मालिका मी पूर्ण एकही भाग न चुकवता पाहिली.. कारण ती जवळपास परिपूर्ण- near perfect होती. बाबासाहेबांचे वैयक्तिक जीवन खूपच भावस्पर्शी पद्धतीने दाखवले, पण मला महत्वाचे वाटले ते या मालिकेने डॉ आंबेडकरांचे वैचारिक व्यक्तीमत्व, सामाजिक, राजकीय व संसदीय कार्य, त्यांचा संघर्ष आणि अखंड अभ्यास हे पैलू फारच सामर्थ्याने दाखवले आहेत. मुख्य म्हणजे या अलौकिक महापुरुषांची मालिका कुठेही प्रचारकी होत नाही,तरिही रंजक राहते .बाबाबासाहेबांचे व रमाई चे काम सागर देशमुख व शिवानी रांगोळे यांनी जणू परकाय प्रवेश करून काम केले व त्यांना पडद्यावर जिवंत केले. त्यांच्यापर्यंत माझे अभिनंदन कळवा. तुम्ही मालिकेचे संशोधक- सल्लागार असल्यामुळे कोणतीही ऐतिहासिक चूक हुडकली तरी सापडणार नाही, हे फार मोठे अवघड काम हरी जी तुम्ही समर्थपणे पार पाडले,त्याबद्दल तुमचे अभिनंदन!

आता मालिका संपली, काय नवीन एवढेच सुंदर पहायचे हा प्रश्न आहे. आणि या प्रशनातच मालिकेचे यश दडलेले आहे!

- Laxmikant Deshmukh लक्ष्मीकांत देशामुख

Wednesday, October 21, 2020

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले

 







स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दशमी क्रियेशनची आपली मालिका फार लवकर संपली, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली. काही कृतक मालिका इतक्या बोअर मारतात की प्रेक्षक आता यांना आवरा, यांच्यापासून आम्हाला वाचवा असा धावा बोलतात. अशा पार्श्वभुमीवर ही मालिका आणखी हवी असे वाटत असतानाच ती संपलीसुद्धा.

हजारो चाहत्यांनी मालिकेबद्दल समाधान व्यक्त केले. एकदोघांनी अ, ब, क यांना तुम्ही मालिकेत का दाखवले नाही? अशा विचारणाही केल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एव्हरेस्टच्या उंचीचे व्यक्तीमत्व. त्यांच्या अवतीभोवती उत्तम काम करणारे हजारो नेतेलोक होते. त्यातल्या सगळ्यांना मालिकेत आणणे केवळ अशक्य होते. मी पहिल्या एपिसोडपासून ३४३ व्या एपिसोडपर्यंत सहज मोजदाद केली तेव्हा लक्षात आले की ( मालिकेतल्या सभेत/गर्दीत उपस्थित असलेले एक्स्ट्रालोक सोडून ) ज्यांना मालिकेत कोणतेतरी छोटेमोठे व्यक्तीमत्व साकारायचे होते, किंवा संवाद बोलायचे होते, अशी एकुण १२०० पेक्षा अधिक कॅरेक्टर्स आम्ही दाखवली. तरीही काही नेते राहिले हे खरेय. आम्हाला त्यांनाही मालिकेत दाखवायचे होते. पण नाही जमले ही खंत आहेच... 

एका मित्रांने अशा भावना व्यक्त केल्या की "बाबासाहेबांच्या मालिकेला न्याय देण्यासाठी रिचर्ड अ‍ॅटनबरोच हवे होते." रिचर्ड अ‍ॅटनबरो महानच होते! पण त्यांनी " गांधी " चित्रपटात बाबासाहेबांना किती स्थान दिलेले होते याचा एकदा शोध घ्या. आम्हीही घेतो.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.    

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले. तुम्हाला ती आवडली याचा आम्हाला जरूर आनंद आहे. खरंतर आम्हाला अशा आणि एव्हढ्या कौतुकाची खरंच अपेक्षा नव्हती. टिकेला सामोरं जाण्याचीच आम्ही तयारी ठेवलेली होती. पण एकही वादंग न होता ही मालिका सुरळीतपणे पार पडली. आता हे सामाजिक दस्तावेजीकरण/चित्रीकरण पुढची किमान शंभर वर्षे नव्या पिढ्यांना बघायला हॉटस्टारवर उपलब्ध असेल. तुमच्या नानाविध अपेक्षा, तुम्ही केलेली सकारात्मक किंवा नकारात्मक टिका, तुमच्या अगदी प्रत्येक प्रतिक्रियेची आम्ही विधायक नोंद घेतलेली आहे. तुम्ही हजारोंनी मालिकेचे तोंड भरून कौतुक केलेत, एकदोघांनी मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, दोष दाखवलेत आणि मालिकेची दखल घेतलीत याचाच आम्हाला आनंद आहे. या प्रतिक्रियांचा उपयोग आम्हाला यापुढचे काम करताना नक्कीच होईल. या अनुभवाच्या प्रकाशात नव्या प्रकल्पांमध्ये आपण भेटतच राहणार आहोत. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो अशी गावाकडे म्हण आहे. एका मालिकेने थांबून आपल्याला कसे चालेल? ही बाबासाहेबांवरची पहिली मालिका आहे, शेवटची नाही.

असाच लोभ कायम असावा.

स्नेहांकित,

हरी नरके

Tuesday, October 20, 2020

आपली "सावित्री-जोती" मालिका आता नव्या वळणावर- प्रा. हरी नरके





"सावित्री-जोती, आभाळाएव्हढी माणसं होती", ही मालिका सोनी मराठीवर सोम. ते शनि. सायं. ७.३० वाजता दाखवली जाते. या आठवड्यात या मालिकेचे १५० एपिसोड पुर्ण होतील. सावित्री-जोतींचा शिक्षणक्रांतीचा संघर्ष आता वेगवान झालेला आहे. आधुनिक भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया घालणार्‍या या जोडप्याचा जीवनप्रवास अतिशय प्रभावी पद्धतीने या मालिकेत चित्रित करण्यात आलाय. जानेवारीत सुरू झालेली ही मालिका लॉकडाऊनचे काही महिने वगळता दमदार आणि जोरकस प्रवास करतेय. आम्हाला जाणत्या प्रेक्षकांची उत्तम साथ मिळतेय. सावित्रीबाई-जोतीरावांच्या जीवनातील आजवर कुठेही प्रकाशित न झालेले, लोकांना फारसे माहित नसलेले असंख्य नवे पैलू आम्ही या मालिकेद्वारे प्रथमच प्रकाशझोतात आणीत आहोत. या विषयावरचा ३५ वर्षांचा माझा सगळा रिसर्च आम्ही या मालिकेद्वारे तुमच्यापुढे प्रथमच उलगडत असल्याने ही मालिका चुकवू नका. 

दशमी क्रियेशनची दर्जेदार निर्मिती, सोबत दशमीची तगडी टिम, अभिजीत शेंडे, प्रसाद ठोसर यांच्यासारखे लेखनसहकारी, ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, पुजा नायक, मनोज कोल्हटकर  यांच्यासारखे नामवंत कलावंत, उमेश नामजोशींचे दिग्दर्शन आणि सोनी मराठीची सर्व ताकद या मालिकेमागे असल्याने सर्वच थरातील आणखी प्रेक्षकांनी ही मालिका बघायला हवी. अशा मालिका वारंवार तयार होत नसतात. एका जबरदस्त अनुभवाला मुकायचे नसेल तर ही मालिका नक्की बघा. आपले अभिप्राय आम्हाला कळवा. त्रुटी, उणीवा, दोष सांगा. आवडलेले एपिसोड लोकांना बघायला सांगा. आपल्या विधायक टिकेचे आम्ही स्वागतच करू.

लॉकडाऊननंतर सर्व भाषिक भारतीय टिव्ही इंडस्ट्री मोठ्या अडचणींमधून मार्ग काढीत पुढे जातेय. अशावेळी प्रेक्षकांचे भरिव पाठबळ लाभणार नसेल तर मग अशा ऎतिहासिक, समाजप्रबोधनपर, शिक्षण आणि मनोरंजन यांचा सुमेळ असलेल्या मालिकांचे भवितव्य टांगणीला लागेल. जोतीसावित्रीने तुमच्यासाठी आयुष्य पणाला लावले, समर्पित केले, तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबासहीतचा अर्धा तास त्यांना देऊ शकणार नाही का? 

आजच्या विपरीत सामाजिक-राजकीय परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आज क्षीण झालेल्या पुरोगामी चळवळी आणि फक्त व्हर्च्युअल बोलभांडगिरी करणारे, फ्रस्टॆटेड निष्क्रीय कार्यकर्ते यांनी अशा प्रयत्नांना साथ द्यायला हवी. तुमची सक्रीय साथ आम्हाला हवी आहे. आज सनातनी शक्ती शिरजोर झालेल्या आहेत, त्यांच्याशी लढण्याचे मनोबल हरवत चाललेय. अशा वळणावर आमचे तगडे, थेट स्टॆटमेंट आम्ही या मालिकेद्वारे समाजापुढे आणीत आहोत. तुमची सकारात्मक साथ या प्रयत्नांना मिळणार की नाही? की फक्त विक्षिप्त आणि निष्क्रिय जगण्यालाच तुमचे प्राधान्य आहे? जोती-सावित्रीसारखे जे लोक सगळ्यांचे असतात, सगळ्यांसाठीच लढलेले असतात, त्यांच्यामागे तुम्ही आहात की नाही हे तुमच्या कृतीतून दाखवून देण्याची वेळ आत्ता आलेली आहे....

जय जोती-जय सावित्री!

- प्रा. हरी नरके,

२०/१०/२०