Friday, October 30, 2020

पुरूषोत्तम बेर्डे यांचे "क्लोज एनकाउंटर्स"- कामाठीपुर्‍याचे भन्नाट आत्मचरित्र


टूरटूर, हमाल दे धमाल या गाजलेल्या नाटक-सिनेमांमुळे पुरूषोत्तम बेर्डे सर्वांना परिचित आहेत. मराठीत अनेक व्यक्तींची दर्जेदार आत्मकथनं आजवर आलेली आहेत. परंतु बेर्डे यांनी लिहिलेले "क्लोज एनकाउंटर्स" हे मुंबईतील बदनाम वस्ती म्हणुन ओळखल्या जाणार्‍या कामाठीपुर्‍याचे आत्मचरित्र आहे. विशेष म्हणजे ते अतिशय खिळवून ठेवणारे आहे. त्यांनी या परिसरातील गल्ल्या, चाळी, घरं, माणसं यांची इतकी रसरशीत, चटकदार पोर्ट्रेट्स चित्रित केलीयत की सामान्य वाचक ते जाणते समीक्षक असे सारेच या पुस्तकावर लट्टू होतील. बेर्डे कमर्शियल आर्टीस्ट आहेत. गाजलेले कॉपीरायटर आहेत. एकाच वेळी तुफान वाचनीयता, वेधकता, विषयाच्या थेट गाभ्याला भिडणं आणि त्या त्या माणसांचे रसायन मुळासकट उलगडून दाखवणं हे काम खुप आव्हानकारी असतं. ते बेर्डेंनी लिलया पेललेलं आहे. प्रसिद्ध कथाकार आणि नाटककार जयंत पवार यांची या पुस्तकाला लाभलेली "सांगोपांग कामाठीपुरा" ही प्रस्तावना म्हणजे एक श्रेष्ठ कलाकृतीच आहे.

वासुनाका, माहिमची खाडी, चक्र ते मुंबई दिनांक अशा अनेक पुस्तकांनी मुंबईचे उत्तम चित्रण आपल्यासमोर ठेवलेले आहेत. नामदेव ढसाळांच्या कवितांमधली मुंबई जोरदार आहे. पण बेर्डॆंची ही कहाणी केवळ भन्नाट म्हणावी अशी दर्जेदार आहे. 

अलेक्झांड्रा, श्यामू, कासीम बिल्डींग, अन्ना, तात्या अमोणकर आणि अपने बालाका डायरेक्शन, बबलू, येंचू, वच्छा, लोखंडेसर, मनजी, शेट्टी लोक, पेंटर अबूभाई, नूर महम्मद, अंजनीसुत व्यायामशाळा, याद्या, राजम्मा, गवजीबुवा, शूटींग गिटींग आणि ओमाचा मामा, बाळू मिरगी, खेळवाले,  पुंजाताई, रामकिशन तेली, सोनीबाई, षांत, अशा २४ व्यक्तीचित्रांमधून आपल्या काळजाला भिडणारी ही गोष्ट म्हणजे पुलंचे "व्यक्ती आणि वल्ली" ते जयवंत दळवींची "सारे प्रवाशी घडीचे" ही बिगरी ते मॅट्रीक इयत्तेतली पुस्तकं असतील तर "क्लोज एनकाउंटर्स" पोस्ट डॉक्टरल काम आहे. केवळ अफलातून.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. कोरोनातला गैबानेपणा घालवून माईंड एकदम फ्रेश करणारी तुफान कलाकृती. व्हॉट्सॅप या आजाराबद्दल मला तिरस्कारच वाटतो. पण हे पुस्तक व्हॉट्सॅपवर जन्माला आलेय हे कळल्यामुळे मी व्हॉट्सॅप या आजाराला सगळे गुन्हे माफ केलेले आहेत.

अपने राजहंस की बेश्ट निर्मिती. 

"क्लोज एनकाउंटर्स",  पुरूषोत्तम बेर्डे, राक्जहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती- डिसेंबर २०१९, पृष्ठे-२४०, किंमत रूपये ३००/- 

-प्रा. हरी नरके, ३०/१०/२०२०

No comments:

Post a Comment