Sunday, October 18, 2020

मालिका संपते आणि इतिहास सुरू होतो....

 Shilpa Kamble- मालिका संपते आणि इतिहास सुरू होतो....

डाँ.भीमराव आंबेडकर --एक गौरवगाथा या मालिकेचा आज शेवटचा एपिसोड पाहिला.डोळ्यात अश्रू तराळले. श्वेत रंगाची उधळण होत धम्मक्रांतीची सुरूवात झाली.तो सोहळा या प्रत्यक्ष अनुभवला.धम्मरसात न्हावून निघाले.

या  प्रकारची मालिका इडियट बाँक्सवर आली ही एका क्रांतीची सुरूवात झालीय.. दशमी प्राँडक्शन व स्टार टीवी यांना आंबेडकरी जनतेचे लाखो करोडो धन्यवाद. आजपर्यंत कोणत्याही चँनलने जो विषय हातळला नव्हता, त्या विषयावर मालिका करण्याचे धाडस स्टार टीवीने दाखवले. दशमीच्या पदाधिकाऱ्यांना सलाम. त्यांचा इतक्या वर्षाचा टीवी इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव पणाला लावून त्यांनी ही सिरीयल बनवली. 

   सुरूवातीपासून या कामाचा भाग होते, अपार कष्ट केले. थकले,थांबले,... परत लिहीत राहिले. अपर्णा पाडगावकर यांनी या लेखनप्रवासात दिलेली साथ लक्षात राहीन. हरि नरके सर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.पण त्यांचा व्यासंग,त्यांची आंबेडकरी विचांरावरची निष्ठा आणि त्यांची कामाबद्दलची लवचिकता या सर्व गोष्टींचा जवळून परिचय झाला. अभिजीत खाडे हा स्टारचा क्रिएटीव ड्रायरेक्टर ,एरवी त्यांच्याशी कधी भेट झाली असती की नाही माहीत नाही.पण या निमित्ताने सख्य जुळले. अभिजीतने या प्रोजेक्टला यशस्वी करण्यासाठी जी जिद्द दाखवली आहे ,त्याला तोड नाही. अक्षय पाटील या गोड हसणाऱ्या मुलाला विसरणे शक्य नाही. त्याने माझ्या लेखनावर सुरूवातीपासून शेवटपर्यंत विश्वास दाखवला.

        या मालिकेतील संवाद लेखक चिन्मय ,हितेश यांनी ऐतिहासिक ,माहीतीपर भाषा योग्य प्रकारे योजली. अमित हा चुणचुणीत मुलगा ,पटकन ऐतिहासिक सामग्री पुरवायचा....अनेक लोकांची मोलाची मदत या मालिकेसाठी झालीय.

  मालिकेमधील सगळे कलाकार कसलेले होते, लेखक लिहतो पण कलाकार त्या निर्जीव मुर्तीत जीव ओततो. रामजी,मीरा, केळुस्कर गुरूजी, भीमराव, रमा,मीरा,शंकर मामा,यशंवत ,नामा,मुकुंदा,बाजी ,शिवतरकर,दामू,देवकर, बाळादादा, लक्ष्मी....किती नावे घ्यावीत सगळ्यांनी भूमिकेला न्याय दिला.

    बाबासाहेबांची भूमिका करणारे सागर देशमुख यांनी तर कमाल केली . तरूण भीमराव ते वयस्क बाबासाहेब या साऱ्या छटा त्यांनी लीलया पेलल्या आहेत. त्यांनी या भूमिकेत अक्षरश जीव ओतला आहे. छोटीशी आठवण सांगते. एका प्रसंगात बाबासाहेब लंडनला आहेत आणि चंद्राकडे पाहतात, असा सीन होता. सागर यांनी थंडी वाजण्याची जबरदस्त अदाकारी करून तो सीन केलाय. त्यांचे बोलणे,देहबोली, मुद्राभिनय...सगळेच बाबासाहेबांशी तंतोतत जुळणारे...तुफान एनर्जीचे. त्यांनी शेवटी शेवटी तर अक्षरशः एकट्याच्या खांद्यावर ही मालिका तोलली होती.त्यांचे शतशः आभार.

    पाच वर्षापूर्वी मी कम्युनिटी मिडीया असा कोर्स केला होता. अँडमिशन घ्यायला पैसे नव्हते. मैत्रीणीकडून उधारी करून ,अनेक अडचणी सोसून हा कोर्स केला होता. मी हा  कोर्स का करतेय ,असे प्रश्न  मला इंटरव्यूह घेतांना विचारले होते. मी उत्तर दिले होते.मला आमचा कंटेट घेवून मिडीयात जायचे आहे.... तेव्हां माझे स्वप्न पुर्ण होईन असे मला वाटले नव्हते.पण ते स्वप्न पुर्ण झाले.

     स्क्रीनवर बुद्ध शरमं गच्छामी ऐकतांना....डोळ्यात पाणी तराळले. माझ्या मुलाने संपूर्ण सिरीयल रात्री जागरणे करून पाहिलय.ही जगातील अशी एकमेव सिरीयल असेन की जी पाहण्यासाठी आई वडिल त्यांच्या लहानग्यांना झोपेतून उठवत असतील...

  ही मालिका...   भारतीय समाजाला जागे करण्यासाठी निर्माण झाली होती. मालिका संपली पण आपण आता जागे व्हायचे आहे. डाँ.भीमराव आंबेडकर यांनी दाखविलेल्या रस्त्यावरून  भारताला चालायचे आहे. इतिहासातून प्रेरणा घेवून इतिहास रचायचा आहे.

जयभीम..                                

                                                             शिल्पा कांबळे

No comments:

Post a Comment