स्टार प्रवाह वाहिनीचे सर्व अधिकारी, दशमी क्रिएशन या निर्मितीसंस्थेचे संचालक व कर्मचारी, मालिकेत विविध भुमिका साकार करणारे कलावंत, सर्व तंत्रज्ञ, पडद्यामागचे सर्व श्रमिक या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो.
ही मालिका सुरू झाली तेव्हा जी वाहिनी टि.आर.पी मध्ये अग्रभागी नव्हती ती आज रोजी मनोरंजन वाहिन्यांमध्ये मराठीत नंबर एकवर आलेली आहे याचा आनंद वाटतो. स्टार प्रवाह वाहिनीला एक नवा प्रेक्षकवर्ग या मालिकेने मिळवून दिला याचेही मला समाधान वाटते. टि.आर.पी मध्ये मालिकेची लोकप्रियता सलग काही महिने चढती होती. काही क्षण तर असेही होते की चारपाच कोटी लोक ही मालिका बघत होते. लॉकडाऊननंतर अनेक कारणांनी सर्वच मालिकांचे प्रेक्षक दुसरीकडे वळले. त्यात या मालिकेची रात्री ९ ची वेळही बदलण्यात आली. आज मालिका संपताना टि.आर.पी.मध्ये जिथून मालिकेने सुरूवात केली होती त्या टी.आर.पी.वर ती पुन्हा आलीय.
आज मराठीत सर्व मनोरंजन वाहिन्यांवर प्रचंड स्पर्धा आहे. सगळ्या मिळून दररोज किमान ४० ते ५० मालिका दाखवल्या जातात. याचवेळी रा. १०.३० ते ११ वाजताही किमान पाच मराठी मालिका चालू असतात. त्यात आवर्जून हीच मालिका बघणारेही काही कोटी प्रेक्षक असणं ही कामगिरीही मला मोलाची वाटते. आमच्या सगळ्या टिमची अपार मेहनत आणि प्रामाणिकपणा याला तुम्ही किती मार्क द्याल ते जाणून घ्यायला मला आवडेल.
मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, असलेच तर काही दोष वेळोवेळी निदर्शनाला आणून देणारांचेही मी आभार मानतो.
मालिकेकडून आपल्या अनेक अपेक्षा असू शकतात पण तुमची अपेक्षापुर्ती न करणे यालाच मालिकेतले ठळक दोष मानण्याची पद्धत योग्य नव्हे. प्रगल्भ आणि सुजाण प्रेक्षक माझ्याशी सहमत होतील अशी अपेक्षा आहे. शेवटी ही एक एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, तिचे एक अर्थकारण असते. निखळ समाजप्रबोधन, शिक्षण, समाजकार्य या वेगळ्या गोष्टी आहेत. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची सारी गणितं जुळवून आपल्यापरीने मनोरंजनाच्या माध्यमातून जमेल तेव्हढे समाजप्रबोधन, शिक्षण, समाजकार्य करण्याचा आमचा हा प्रयत्न कितपत सफल झाला की फसला यावर तुम्ही द्याल तो निकाल आम्हाला मान्य असेल. शेवटी कोणत्याही उद्योगात प्रेक्षक ( ग्राहक) हाच पहिला आणि शेवटचा सार्वभौम आधार असतो.
-प्रा. हरी नरके
१७/१०/२०२०
No comments:
Post a Comment