प्रा. पुष्पा सरकार- भावे यांचे निधन म्हणजे केवळ एका विचारवंताने जगाचा निरोप घेणे नाही, तर मुल्यभान जपणार्या, भुमिका घेणार्या, पडेल ती किंमत मोजून त्या पेलणार्या आणि संधीसाधूपणाला नकार देणार्या दुर्मिळ प्रजातीचं अनंतात विलीन होणं होय. त्या प्रकांड विदुषी, प्रखर वक्ता आणि सामाजिक चळवळीच्या प्रमुख मार्गदर्शक होत्या. त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झालेले आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्याशी मारलेल्या आत्मपर-मौलिक गप्पांचे मेधा कुलकर्णी यांनी केलेले शब्दांकन आहे. बाईंचा व्यासंग किती दणकट होता त्याचे प्रत्यंतर या पुस्तकात बघायला मिळते.
शिकवणे, फिरणे, चळवळींना मदत करणे या व्यापात पुष्पाबाईंनी लिहिण्याचा कंटाळा केला. त्यादृष्टीने प्रा. राम बापट, विनायकराव कुलकर्णी आणि पुष्पाबाईंची जातकुळी एकच होती. त्यांच्या भावे आडनावामुळे त्यांना ओळखण्यात लोकांची फसगत होई. आजही होते. या पुस्तकात आपल्या एका ब्राह्मण मैत्रिणीच्या घरी आपण " पुष्पा सरकार" असल्याने आपल्याला कशी वेगळी वागणूक मिळे याबद्दलचा निशेध त्यांनी सुचक शब्दात नोंदवलेला आहे. अर्थात त्या कोणत्याही जातीय शिडीचा वापर करण्याच्या विरोधात असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहावर त्या फारसं बोललेल्या नसाव्यात.
शाळकरी वयात परकर घातलेल्या ह्या चिमुरड्या पोरीला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाला भाषण करायला उभे केले असताना तिनं अस्सखलित भाषण केलेलं होतं. घरातला वाडवडीलांचा प्रार्थना समाजाच्या विचारांचा वारसा असल्याने पुष्पाताई सामाजिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या समाजघटकांच्या बाजूने आयुष्यभर उभ्या राहिल्या. आंबेडकरी चळवळीत आपल्याला कायम हक्कानं भाषणांसाठी बोलावलं जायचं, मात्र पुढेपुढे माझ्या भावे आडनावाची त्यांना अडचण होत असल्याने आपल्याला बोलावणं कमी झाल्याची खंत त्यांनी या पुस्तकात नोंदवलेली आहे. आपल्या देशात सारे काही जन्मावर ठरते. जन्माने धड इकडे नाही आणि धड तिकडेही नाही अशांच्या वाट्याला विचाराने ते कितीही निष्ठावंत पुरोगामी असले तरी कशी उपेक्षा येते याबद्दलच्या आमच्या ३० वर्षांपुर्वीच्या गप्पा मला अलिकडे जास्त आठवतात.
३६ वर्षांपुर्वी त्यांच्या महाविद्यालयाने व त्यांनी आयोजित केलेल्या रूईया करंडक वादविवाद स्पर्धेत मी पहिला आलो होतो, तेव्हा त्यांची माझी ओळख झाली. सामाजिक चळवळीत भेटीगाठी होत राहिल्या. तसं तर १९८२ सालीच त्यांना मी नामांतर आंदोलनात बघितलेलं होतं. मात्र नोव्हेंबर १९९० मध्ये महात्मा फुले स्मृतिशताब्धी वर्षात नारायण आठवले व अनुराधा आठवले यांनी गोव्यात आम्हाला एका मंचावर आणलं. प्रा.पुष्पा भावे, प्रा. सीताराम रायकर व प्रा. द. ता. भोसले यांच्यासह माझी भाषणं गोव्यात आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी मी शिवाजी महाराजांच्या जबरदस्त प्रेमात होतो. मी त्यांच्यावर फारच गौरवपर, उदात्तीकरण करणारं बोलायचो. भाषणानंतर एकदा पुष्पाताईंनी माझे बौद्धिक घेतले. मला म्हणाल्या " हरी, तू चळवळीत नवखा आहेस. शिवाजी महाराज थोरच होते पण ते एक राजे होते आणि मध्ययुगीन राजे होते, हे कधीही विसरू नकोस. आजच्या आपल्या लोकशाही जीवनदृष्टीला त्यांच्याबद्दल आदर बाळगूनही तिथेच थांबता येणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास तिथूनच सुरू होतो आणि तिथेच संपतो हे खरे नाही. हिंदुत्ववाद्यांना त्यांचे असलेले प्रेम खरे नाही, ते पुतणामावशीचे प्रेम आहे. त्यांच्याआडून त्यांना ब्राह्मणी मुल्यव्यवस्था पुन्हा आणायचीय. हे लाभार्थी त्यांची चिकित्सा करायला घाबरतात. सोयिस्कररित्या विसरतात, पण आपण चिकित्सा करायला हवी. माझे हे बोल मी "सरकार" आहे, तुझी सिनियर आहे म्हणून कायम लक्षात ठेव."
पुष्पाताई, ज्या काळात तुमच्या या विचारांची महाराष्ट्रीय समाजाला विशेष गरज आहे, तेव्हाच तुम्ही निघून गेलात.
- प्रा. हरी नरके
No comments:
Post a Comment