Sunday, October 18, 2020

महामानवाच्या कार्याला दशमी परिवाराकडून मानवंदना

 Ninad Vaidya - सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार,

महामानवाची गौरवगाथा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या मालिकेने आज सर्वांचा निरोप घेतला. १८ मे २०१९ रोजी स्टार प्रवाह वर सुरू झालेला आपला प्रवास १७ ऑक्टोबर २०२० रोजी येऊन थांबला आहे.

मालिका सुरू होण्याआधी मनात अनेक प्रकारच्या भावना होत्या. आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या महासूर्याची गोष्ट आपल्याला सांगायची आहे. त्यासाठी डोंगराएवढं धाडस असणे आवश्यक होते. ते धाडस एकट्याने पूर्ण कदापी शक्य नव्हते. त्यातही बाबासाहेबांचा जीवनप्रवास, त्यांचे क्रांतिकारक कार्य इतके रॅडिकल होते की आताच्या काळात कोणता टीव्ही समुह ते दाखवण्याचे धाडस करेल याबद्दल मनात प्रचंड काळजी होती. पण अशा वेळेतही कोणत्याही राजकीय, सामाजिक दबावाला बळी न पडता स्टार प्रवाह या धाडसासाठी तयार झाले. धार्मिक सुधारणांच्या कार्याला दाखवताना आपण कोणत्याही प्रकारे हात आखडता घ्यायचा नाही या म्यूच्युअल अंडरस्टँडिंगवर स्टार प्रवाह आणि दशमी क्रिएशन अगदी ठाम होते. 

मी लहानाचा मोठा झालो तो शिवाजी पार्क, दादर परिसरात. घरात लहानपणापासून आंबेडकरी चळवळीतील कार्य़कर्त्यांचा राबता असायचा. ६ डिसेंबर रोजी लागणाऱ्या पुस्तकांच्या स्टॉल साठी लागणारे साहित्य, पुस्तके आणि इतर गोष्टींचा रतीब २६ नोव्हेंबर पासूनच घरात असायचा. सर्वच मातब्बर कार्यकर्ते मंडळी यांचा सहवास लहानपणापासूनचा. त्यामुळे बाबासाहेबांचं व्यक्तीमत्त्वाचं कुतूहूल हे कायम मनात घर करून होतं. 

आमच्या कुटूंबाची वेल ही थेट सुरू होते कोकणातून. सुरबानाना टिपणीसांपासून. एक प्रकारे बाबासाहेबांशी असलेलं आमचं नातं आमच्या पणजोबांच्या पीढीपासून. त्यामुळे ही गोष्ट सांगण्याची जेवढी एक्साईटमेंट होती त्याहून मोठी जबाबदारी आपण खांद्यावर घेतोय याचेही भान होतेच.

स्टार प्रवाहच्या एका मिटिंग दरम्यान सतीश राजवाडे यांनी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर काही शक्य आहे का अशी विचारणा केली. आणि, नितीन वैद्य सरांनी पुढच्या क्षणाला आमचा याच विषयावर अभ्यास सुरू आहे, जर तुम्ही तयार असाल तर आम्ही नक्कीच उत्तम मालिका बनवू शकतो असं ठामपणे सांगितलं. 

प्रचंड मेहनतीनंतर मालिकेसाठी लागणारी टीम बनवली गेली. बेस्ट ऑफ द बेस्ट लोकं निवडण्यात आली. लेखक संशोधकांनी अपार मेहनतीने मालिकेचा क्राफ्ट तयार केला. प्रत्येक घटना, सणावळ्या यांच्या सत्यतेबद्दल प्रा. हरी नरके सरांनी अतिशय मेहनतीने काम केले. दशमीच्या क्रिएटिव प्रोड्युसर आणि मालिकेच्या स्टोरी रायटर अपर्णा पाडगावर यांच्यावर मात्र आता मोठी जबाबदारी येऊन पडली होती. अख्खं राजकीय, सामाजिक आयुष्य टिव्ही ऑडियंससाठी दाखवताना त्याचं फिक्शनमध्ये रुपांतरण कसं करावं यासाठी जीवतोड मेहनत घेतली. त्यात स्क्रीनप्लेसाठी शिल्पा कांबळे यांची साथ लाभली. 

संवादलेखनाची बाजू आधी चिन्मय केळकर नंतर हितेश पोरजे

यांनी उत्तम सांभाळली. प्रत्येक एक्झुक्यूशनसाठी क्रिएटिव टिम मध्ये अक्षय पाटील, किरण आणि प्रोडक्शन टीम मधून दादा गोडकर यांनी जीव ओतून ही मालिका उभी केली. 

नितीन वैद्य यांनी मालिकेचा प्रत्येक भाग आधी स्वतः पाहून छोटे छोटे बारकावे आणि कंटेट मध्ये सुचना करत फायनल केल्या. त्यातूनच साकारली महामानवाची गौरवगाथा. 

सुरूवातीला फक्त २०० च भाग करायचे असा मानस घेऊन उतरलेलो आम्ही आज साडे तीनशे भागांवर येऊन पोहोचलो. हे करताना प्रोडक्शन कॉस्टबद्दल कसलीच तमा बाळगायची नाही यावर आम्ही सर्वच सुरूवातीपासून ठाम होतो. मग बाबासाहेबांचा लंडन, अमेरिकेतील प्रवास असो किंवा त्यांची आंदोलने असोत. महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन, नाशिकच्या काळाराम मंदिराचे आंदोलन, मनूस्मृती दहन आंदोलन हे छोट्या पडद्यावर शेकडो कलाकारांसोबत दाखवणे प्रचंड खार्चिक काम. जितके कलाकार शक्य झाले त्या सर्वांसोबत चित्रित करून प्रत्येक ऐतिहासिक घटना लार्जर दॅन लाईफ करण्याचे प्रयत्न मनापासून केले. 

मग आला राजगृहचा टप्पा. मला खुप कौतुक वाटतं. लोकं राहण्यासाठी घर बांधतात. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. मग ते असं वर वर दाखवणं योग्य ठरलं नसतं. म्हणून राजगृहचा आलीशान सेट उभा केला गेला. बाबासाहेबांसारखंच राजगृह देखील देखणं आणि आलिशान दिसलंच पाहीजे हा आमचा हट्ट होताच शिवाय आमची कमिटमेंट देखील. आपणा सर्वांना तो भाग खुप आवडला...

आणि, मालिकेच्या शीर्षकगीताला विसरून कसं चालेल बरं. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. आज कुठेही शाळा, कॉलेजात, गॅदरिंगला हे गाणं वाजलं नाही, सादरीकरण झालं नाही असा प्रसंगच विरळा. ठिकठिकाणाहून निरोप येत होते. मुलं मालिका पाहतायेत. आम्हाला भिवा बनायचं म्हणतायेत. भिवा सारखाच अभ्यास करायचा आहे असा निश्चय करतायेत. काही पुस्तकांच्या दुकानातून तर नेपोलियनच्या पुस्तकाच्या प्रती अचानक संपून गेल्याचे निरोप आले. खैरमोडे लिखित ग्रंथांची आवृत्तीही संपली. त्यासाठी त्यांनी मालिकेला धन्यवाद दिले. खुप आनंदाचा क्षण होता.

चांगदेव खैरमोडे यांचे पुत्र अरविंद खैरमोडे यांनी मालिकेचे एकेक पात्र उभे करताना आम्हाला जे मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळेच कास्टिंग परफेक्ट होऊ शकलं. कास्टिंग बद्दल बोलायला आपण नवीन पोस्ट घेऊयात. कारण तो एक स्वतंत्र विषय आहे. 

आज हे सर्व लिहीताना मन भरून येतंय. बाबासाहेबांनंतर सावित्रीजोती मालिकेचा प्रवासही असाच घडत आला आहे. त्यावरही लिहीनच. पण गौरवगाथा मालिकेला ज्या हजारो लोकांचे हात, बुद्धी आणि श्रम लागले आहेत त्यांचे मोल करणं खुप कठिण आहे. 

आणि तुम्ही प्रेक्षकांनी जी साथ दिलीत, जे प्रेम दिलंत त्याचे मोल कशातही करता येणारे नाही. मी तुम्हा सर्वांचा कोटी कोटी ऋणी आहे. महामानवाची गौरवगाथा आमच्या तुमच्या हातून घडली हीच त्या महामानवाच्या कार्याला दशमी परिवाराकडून एक छोटीशी मानवंदना. Special Thanks to Vaibhav Chhaya Sameer Shinde

आपलाच

Ninad Vaidya


No comments:

Post a Comment