आज सुमारे ८० कोटी भारतीय लोक टेलिव्हीजन बघतात. त्यातला बहुसंख्य प्रेक्षक हा मनोरंजनाच्या वाहिन्या बघतो. एकट्या मराठीत दररोज विविध वाहिन्यांद्वारे ४० ते ५० मालिका दाखवल्या जातात. सर्वोत्तम टीआरपी मिळवणे हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेऊन या मालिका तयार केल्या जातात. या टीआरपीवरून वाहिनीला कमी किंवा जास्त जाहीराती मिळतात. या मिळणार्या जाहीरातींद्वारे वाहिनीला रेव्हुन्यू (महसूल- पैसा) मिळत असतो. कोणीही केवळ लोकहितार्थ वाहिनी चालवतो नसतो. या उद्योगातून दोन पैसे मिळवण्यासाठीच ही सारी धडपड केली जात असते. त्यात काहीच वावगे नाही. परंतु यामागे केवळ अर्थकारण, व्यापारी दृष्टीकोन एव्हढाच मर्यादित हेतू असतो का? तुम्हाला काय वाटते?
या उद्योगाद्वारे मनोरंजनाच्या आडपडद्यात संस्कृतीचं राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? हे फक्त अर्थकारण नसतं. तर मनोरंजन, माहिती, इतिहास, निखळ करमणुक, गोष्टी सांगणं यांच्याद्वारे जे संस्कार रुजवले जातात ते कोणते असतात? कोणती भाषा, कोणती मुल्यव्यवस्था सातत्याने तुमच्या माथ्यावर मारली जाते? कथा कुठलीही असो जी कटकारस्थानं खेळली जातात, जो चोरटा वा उघड व्याभिचार दाखवला जातो, जो लखलखाट आणि श्रीमंती थाट यांचा मारा केला जातो ते सारे अकारण, हेतूशुन्य असते असे तुम्हाला वाटते काय?
प्रत्येक माणसाला हलक्याफुलक्या, प्रसन्न, बौद्धिक मनोरंजनाची गरज असते. ओढही असते. पण हे सोपे काम नसते. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. त्याने भाषा,संस्कृती, विचार,तत्वज्ञान,कलांची निर्मिती करून मानवी आयुष्याला सार्थकता दिलेली आहे. पण विविध मनोरंजन वाहिन्यांद्वारे दररोज जो काही रतीब घातला जातो त्याचा भर निर्बुद्ध करमणूकीवर असतो का? असल्यास तो तसा का असतो? प्रेक्षकांना फक्त बघे बनवणं, निष्क्रीय बनवणं, फारसा विचार करु नका, चंगळवादावर भर द्या, जगण्याकडे गम्भीरपणे बघु नका, फक्त मजा करा, मानवी दु:खं, सामाजिक समस्या, संवेदनशीलता, बौद्धिकता यांना फाट्यावर मारा अशी शिकवण या करमणुकीच्या माध्यमातून चलाखीने पेरली जाते का? माणसाच्या अबोध मनाचा कब्जा विशिष्ट्य राजकीय विचारसरणीच्या सुगीसाठी केला जातोय का?
सुबुद्ध प्रेक्षकांना काय वाटते?
-प्रा. हरी नरके, २४/१०/२०२०
No comments:
Post a Comment