Saturday, October 3, 2020

प्राकृत भाषांच्या इतिहासाचे प्रमाणकपरिवर्तन करणारा मौलिक ग्रंथ- प्रा. हरी नरके





माझे काळीजतळापासूनचे स्नेही श्री संजय सोनवणी हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहेत. ते मुलत: बंडखोर विचारवंत आहेत. लिहीत्या हाताचे महत्वाचे सर्जनशील लेखक, इतिहासकार  आणि भाषातज्ञ अशीही सशक्त ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांनी कवी, नाटककार, चित्रकार, संशोधक, प्रकाशक, उद्योगपती म्हणुनही दणकट योगदान दिलेले आहे.

नानाविध विषयांवरील गाजलेले ग्रंथ त्यांनी आजवर लिहिलेले आहेत. ते धडाडीचे ब्लॉगर असून त्यांचे शेकडो लेख बहुचर्चित ठरलेले आहेत.

" प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास" हा त्यांचा ग्रंथ प्राकृत भाषांच्या इतिहासाचे प्रमाणकपरिवर्तन (पॅराडाईम शिफ्ट ) करणारा मौलिक ग्रंथ आहे. मराठीत या विषयावर अशाप्रकारची मुलभूत, संशोधनपर मांडणी करणारे पुस्तक आजवर उपलब्धच नव्हते. 

सिंधू संस्कृतीचा शोध १९२० साली लागला. हे वर्ष त्या शोधाचे शताब्धीवर्ष आहे. ह्या शताब्धीवर्षातली ही सर्वाधिक मौलिक कृती होय.


या ग्रंथाची तीन ठळक वैशिष्ट्ये आहेत.

(१) या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीय भाषांच्या इतिहासावरची सर्वस्वी नवी वैचारिक मांडणी सादर केलेली आहे. या पुस्तकाची दखल प्रत्येक भाषाप्रेमी व भाषा अभ्यासकांना घ्यावीच लागेल. 

(२) एकाच वेळी भाषातज्ञ आणि सामान्य भाषाप्रेमी नागरिक यांच्या ज्ञानात मुलभूत स्वरूपाची भर घालणारा हा वादळी ग्रंथ आहे. तो संशोधनपर असूनही किचकट नाही. दुर्बोध तर नाहीच नाही. विद्वत्ताप्रदर्शनाची पंडीती हौस म्हणुन तो लिहिलेला नसून समकालीन भाषक चर्चाविश्वात प्रवाही, सुगम, सुबोध मांडणीद्वारे केलेला सप्रमाण हस्तक्षेप म्हणजे हा ग्रंथ होय.

(३) सोनवणी प्राकृत भाषांचे मूळ शोधणारे सखोल उत्खनन या ग्रंथात मांडतात. ते संदर्भयुक्त असूनही विलक्षण सोपे, प्रवाही आहे. या अनोख्या ग्रंथात त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक वर्चस्वाचे हत्त्यार म्हणुन भाषक इतिहासाची आजवार कशी अनैतिहासिक व अशास्त्रीय मांडणी करण्यात आली यावर विदारक प्रकाशझोत टाकलेला आहे. मराठीचे इतिहासकार म्हणून मिरवणारांनी केलेले आणि शेंदूर थापून इतरांनी प्रतिष्ठीत केलेले बहुतांश लेखन सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी झालेले असल्याचे सोदाहरण दाखवून सोनवणी त्याचे समग्र वस्त्रहरण करतात. इंडोइरोपियन भाषा गटाच्या समर्थकांचे मत अशास्त्रीय असल्याचे सोनवणी दाखवून देतात. त्याचप्रमाणे आधी संस्कृत आणि त्यातून प्राकृत ही भाकड मांडणी ते फेटाळून लावतात.


माझे असे आग्रही मत आहे की, किमान चारपाच पीएच.डी. प्रबंधांचा ऎवज या एका ग्रंथात सामावलेला असल्याने महाराष्ट्रातील विद्यापीठांनी सोनवणींना या ग्रंथलेखनाबद्दल मानद डॉक्टरेट द्यायला हवी.

सर्व विद्यापीठांच्या मराठी विभागांनी मराठी भाषा व साहित्यातील एम.एम.या पदव्युत्तर पदवीसाठी हा ग्रंथ अभ्यासक्रमाला लावायला हवा.

माझ्यामते सोनवणी हे महान पंडीत, संत ज्ञानेश्वर, एकनाथ आणि महाकवी संत तुकारामांचे थेट वंशज/वारस आहेत. एकनाथ म्हणाले होते, " संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली?" मराठी ही महाराष्ट्री प्राकृतच असून ती संस्कृतपासून जन्मलेली नाही. ती एक प्राचीन, समृद्ध आणि प्रतिष्ठीत भाषा आहे अशी मांडणी करणारे एकनाथ पहिले. बहिणाबाइ म्हणतात, "तुकारामांनी वेदांचा अर्थ प्राकृतातून सांगितला." वेद म्हणजे पवित्र, वेद म्हणजे ज्ञान. वेद म्हणजे शास्त्र अशी समजूत असताना हे सारे करायला मराठी सक्षम आहे असे त्यांनी सिद्ध केले. ज्ञानेश्वर ही भाषा अमृतातेही पैजा जिंकणारी आहे असे सांगतात.  यांचा वारसा विकसीत करताना सोनवणी म्हणतात, " वैदिक भाषा व संस्कृत भाषा आणि प्राकृतातील परस्परसंबध हा प्राकृत भाषा ही वैदिक भाषेसाठी मावशी तर संस्कृत भाषेसाठी आई असा आहे." ते पुढे म्हणतात, " जगातील सर्व आदीभाषा ह्या प्राकृतच आहेत." त्यांनी असेही म्हटले आहे की, " भाषेचा इतिहास म्हणजे संस्कृतीचा इतिहास असतो. प्राकृत/पालीची संस्कृती कधीही दुय्यम नव्हते. संस्कृतसारख्या प्रगल्भ भाषेची जन्मदात्री याच प्राकृत ठरल्या. हा इतिहास प्रेरक आहे. प्राकृताच्या वंशजांना काही शिकवणारा आहे. या पुस्तकात मी द्राविड भाषांचा समावेश केला नसला तरी त्याही तेवढ्याच प्राचीन आणि साहित्यसमृद्ध आहेत यात शंका नाही. मी अनेकदा म्हटलेले पुन्हा उद्घृत करतो. जी संस्कृती जीवंत असते त्या संस्कृतीची भाषा कधीही मरत नाही. भले ती कालौघात बदलत राहील कारण परिवर्तन हा प्रवाही संस्कृतीचा अटळ भाग असतो. आपली भाषासंस्कृती पुढेही प्रगल्भ होत जाईल, ज्ञानभाषा बनेल आणि सुक्ष्मातीसुक्ष्म तरल भावनांनाही अभिव्यक्त करु शकण्याची अधिकधिक शक्ती मिळवेल." 


एक अतिशय गुंतागुंतीचा, किचकट आणि तांत्रिक विषय ज्या जिव्हाळ्याने सोनवणी उलगडवून दाखवतात त्याला तोड नाही.

माणसं भाषेच्या माध्यमातून संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पोचवित असतात. त्यामुळे माणसाचा भौतिक विकास, संस्कृती आणि भाषाविकास यांचे घट्ट नाते असते.

उत्खननात प्राचीन मानवी सांगाडे जसजसे सापडत गेले तसतसा माणसांच्या स्थलांतराचा नकाशा बदलत, उलटापलटा होत गेला. इंडो इरोपियनांच्या मूळ भाषेचे वास्तव दाखवणारा एकही पुरावा उपलब्ध नाही. आहेत ते सर्व तर्क ह्या महत्वाच्या गोष्टीकडे सोनवणी भाषाअभ्यासकांचे लक्ष वेधतात.


या पुस्तकाचा समारोप करताना सोनवणी म्हणतात, " प्राकृत, पाली व द्राविड भाषांनी या देशाचा सांस्कृतीक इतिहास रचला. या भाषा पुरातन काळापासुन जसा माणुस या उपखंडात स्थिर झाला तशा विकसीत व्हायला सुरुवात झाली. भुवैशिष्ट्यांनुसार त्यांनी आपापली स्थानिक वैशिष्ट्येसुद्धा विकसीत करत नेली. अतिपुरा प्राकृत अत्यंत साधी कमी गुंतागुंतीची व तेंव्हाच्या संथ जीवनव्यवहारांना पुरेशी ठरेल अशीच असणार हे उघड आहे. भारतात चाळीस हजार वर्ष जुनी भीमबेटका व अन्य गुंफांतील चित्रे काढुन अभिव्यक्त होणारा टोळीमानव राहत होता. त्याची भाषा नसेल असे म्हणणे अवैज्ञानिक आहे. सिंधु संस्कृती तर व्यापारी/उत्पादक/सर्जक संस्कृती. तेंव्हापर्यंत प्राकृतांनी किती प्रगल्भ रुप धारण केले असेल याची आपण कल्पना करु शकतो. भारतात सर्वाधिक साहित्य याच भाषांत लिहिले गेलेले आहे. रामायण-महाभारतादि ग्रंथही मुळचे प्राकृतातीलच होते असे विद्वानांनी दाखवुन दिल्याचे आपण पाहिले आहे. ऋग्वेदाच्याही या आधारभाषा बनल्या. महावीर-बुद्ध काळापर्यंत या भाषा एवढ्या प्रगत झालेल्या होत्या की त्याच भाषा जगातील महत्वाच्या धर्मांच्याही भाषा बनल्या. तांत्रिकांचे असंख्य ग्रंथ पुरातन काळापासुनच प्राकृतात येऊ लागले. अनेक संस्कृतात अनुवादित झाले आणि बृहत्कथेप्रमाणे मुळ ग्रंथ गायब झाले. पण म्हणून भाषेचा प्रवाह थांबला नाही. प्रगल्भ ग्रंथांबरोबरच लोकगीते, लोककथा, लोकनाट्यांतुन प्राकृत भाषा कलासौंदर्याने विस्फोटत राहिल्या. धर्म साहित्यात धीरगंभीर राहिल्या. आणि आजही या भाषा जीवंत आहेत. या भाषांनी अन्य भाषांपासुन घेतले तसेच अनेक भाषांनाही अनेक शब्द/संज्ञांचे प्रदानही केले. या नेहमीच जीवंत भाषा होत्या. प्रवाही होत्या. विकसनशील होत्या. या भाषांची निर्मिती या देशातील मानसशास्त्रीय प्रकृतीची निर्मिती आहे. प्राकृत नामाभिमान अगदी यथार्थपणे ही भाषा मिरवत आली आहे. ही भाषा अन्य कोणत्या भाषेतुन प्रसवली गेली असे म्हणने या भाषांवर अन्याय करणारे आहे."

Institute for Research on World-Systems (IROWS) University of California चा संदर्भ देऊन सोनवणी सांगतात, की " इ.स.पुर्व १५००० मध्ये शेतीचा व भाषेचा जन्म सोबतच झाला असावा." शब्द आणि संज्ञांचा प्रवास स्थलांतरामुळे झाला नसून व्यापारामुळे झाल्याचेही ते दाखवून देतात.


इंडियुरोपियन भाषा गटाऎवजी समान भाषा प्रवृत्तीवर ते भर देतात.

त्यांचे महत्वाचे प्रतिपादन असे आहे की, "सिंधू संस्कृतीचा व प्राकृत भाषांचा विकास साथसाथ झालेला आहे." भाषा हाच संस्कृतीचा मुलप्राण असतो हे सोनवणी दाखवून देतात.

या पुस्तकात सिंधू संस्कृतीच्या अंतरंगाचा सखोल आलेख मांडत जात सोनवणी आपल्याला दाखवून देतात की मुख्य प्राकृत भाषा आठ होत्या.


१. मागधी 

२. अर्धमागधी 

३, पाली

४. माहाराष्ट्री

५. गांधारी

६. शौरसेनी 

७. पैशाची, चुलिका पैशाची

८ प्रागतिक प्राकृत अथवा अपभ्रंश 

या पुस्तकात त्यांचा साधार इतिहास अनेक संदर्भ ग्रंथांमधले पुरावे, युक्तीवाद करीत सोनवणी रेखांकित करतात.

( प्रा.हरी नरके यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून-)


No comments:

Post a Comment