Wednesday, October 21, 2020

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले

 







स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दशमी क्रियेशनची आपली मालिका फार लवकर संपली, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली. काही कृतक मालिका इतक्या बोअर मारतात की प्रेक्षक आता यांना आवरा, यांच्यापासून आम्हाला वाचवा असा धावा बोलतात. अशा पार्श्वभुमीवर ही मालिका आणखी हवी असे वाटत असतानाच ती संपलीसुद्धा.

हजारो चाहत्यांनी मालिकेबद्दल समाधान व्यक्त केले. एकदोघांनी अ, ब, क यांना तुम्ही मालिकेत का दाखवले नाही? अशा विचारणाही केल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एव्हरेस्टच्या उंचीचे व्यक्तीमत्व. त्यांच्या अवतीभोवती उत्तम काम करणारे हजारो नेतेलोक होते. त्यातल्या सगळ्यांना मालिकेत आणणे केवळ अशक्य होते. मी पहिल्या एपिसोडपासून ३४३ व्या एपिसोडपर्यंत सहज मोजदाद केली तेव्हा लक्षात आले की ( मालिकेतल्या सभेत/गर्दीत उपस्थित असलेले एक्स्ट्रालोक सोडून ) ज्यांना मालिकेत कोणतेतरी छोटेमोठे व्यक्तीमत्व साकारायचे होते, किंवा संवाद बोलायचे होते, अशी एकुण १२०० पेक्षा अधिक कॅरेक्टर्स आम्ही दाखवली. तरीही काही नेते राहिले हे खरेय. आम्हाला त्यांनाही मालिकेत दाखवायचे होते. पण नाही जमले ही खंत आहेच... 

एका मित्रांने अशा भावना व्यक्त केल्या की "बाबासाहेबांच्या मालिकेला न्याय देण्यासाठी रिचर्ड अ‍ॅटनबरोच हवे होते." रिचर्ड अ‍ॅटनबरो महानच होते! पण त्यांनी " गांधी " चित्रपटात बाबासाहेबांना किती स्थान दिलेले होते याचा एकदा शोध घ्या. आम्हीही घेतो.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.    

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले. तुम्हाला ती आवडली याचा आम्हाला जरूर आनंद आहे. खरंतर आम्हाला अशा आणि एव्हढ्या कौतुकाची खरंच अपेक्षा नव्हती. टिकेला सामोरं जाण्याचीच आम्ही तयारी ठेवलेली होती. पण एकही वादंग न होता ही मालिका सुरळीतपणे पार पडली. आता हे सामाजिक दस्तावेजीकरण/चित्रीकरण पुढची किमान शंभर वर्षे नव्या पिढ्यांना बघायला हॉटस्टारवर उपलब्ध असेल. तुमच्या नानाविध अपेक्षा, तुम्ही केलेली सकारात्मक किंवा नकारात्मक टिका, तुमच्या अगदी प्रत्येक प्रतिक्रियेची आम्ही विधायक नोंद घेतलेली आहे. तुम्ही हजारोंनी मालिकेचे तोंड भरून कौतुक केलेत, एकदोघांनी मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, दोष दाखवलेत आणि मालिकेची दखल घेतलीत याचाच आम्हाला आनंद आहे. या प्रतिक्रियांचा उपयोग आम्हाला यापुढचे काम करताना नक्कीच होईल. या अनुभवाच्या प्रकाशात नव्या प्रकल्पांमध्ये आपण भेटतच राहणार आहोत. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो अशी गावाकडे म्हण आहे. एका मालिकेने थांबून आपल्याला कसे चालेल? ही बाबासाहेबांवरची पहिली मालिका आहे, शेवटची नाही.

असाच लोभ कायम असावा.

स्नेहांकित,

हरी नरके

No comments:

Post a Comment