"सावित्री-जोती, आभाळाएव्हढी माणसं होती", ही मालिका सोनी मराठीवर सोम. ते शनि. सायं. ७.३० वाजता दाखवली जाते. या आठवड्यात या मालिकेचे १५० एपिसोड पुर्ण होतील. सावित्री-जोतींचा शिक्षणक्रांतीचा संघर्ष आता वेगवान झालेला आहे. आधुनिक भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया घालणार्या या जोडप्याचा जीवनप्रवास अतिशय प्रभावी पद्धतीने या मालिकेत चित्रित करण्यात आलाय. जानेवारीत सुरू झालेली ही मालिका लॉकडाऊनचे काही महिने वगळता दमदार आणि जोरकस प्रवास करतेय. आम्हाला जाणत्या प्रेक्षकांची उत्तम साथ मिळतेय. सावित्रीबाई-जोतीरावांच्या जीवनातील आजवर कुठेही प्रकाशित न झालेले, लोकांना फारसे माहित नसलेले असंख्य नवे पैलू आम्ही या मालिकेद्वारे प्रथमच प्रकाशझोतात आणीत आहोत. या विषयावरचा ३५ वर्षांचा माझा सगळा रिसर्च आम्ही या मालिकेद्वारे तुमच्यापुढे प्रथमच उलगडत असल्याने ही मालिका चुकवू नका.
दशमी क्रियेशनची दर्जेदार निर्मिती, सोबत दशमीची तगडी टिम, अभिजीत शेंडे, प्रसाद ठोसर यांच्यासारखे लेखनसहकारी, ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, पुजा नायक, मनोज कोल्हटकर यांच्यासारखे नामवंत कलावंत, उमेश नामजोशींचे दिग्दर्शन आणि सोनी मराठीची सर्व ताकद या मालिकेमागे असल्याने सर्वच थरातील आणखी प्रेक्षकांनी ही मालिका बघायला हवी. अशा मालिका वारंवार तयार होत नसतात. एका जबरदस्त अनुभवाला मुकायचे नसेल तर ही मालिका नक्की बघा. आपले अभिप्राय आम्हाला कळवा. त्रुटी, उणीवा, दोष सांगा. आवडलेले एपिसोड लोकांना बघायला सांगा. आपल्या विधायक टिकेचे आम्ही स्वागतच करू.
लॉकडाऊननंतर सर्व भाषिक भारतीय टिव्ही इंडस्ट्री मोठ्या अडचणींमधून मार्ग काढीत पुढे जातेय. अशावेळी प्रेक्षकांचे भरिव पाठबळ लाभणार नसेल तर मग अशा ऎतिहासिक, समाजप्रबोधनपर, शिक्षण आणि मनोरंजन यांचा सुमेळ असलेल्या मालिकांचे भवितव्य टांगणीला लागेल. जोतीसावित्रीने तुमच्यासाठी आयुष्य पणाला लावले, समर्पित केले, तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबासहीतचा अर्धा तास त्यांना देऊ शकणार नाही का?
आजच्या विपरीत सामाजिक-राजकीय परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आज क्षीण झालेल्या पुरोगामी चळवळी आणि फक्त व्हर्च्युअल बोलभांडगिरी करणारे, फ्रस्टॆटेड निष्क्रीय कार्यकर्ते यांनी अशा प्रयत्नांना साथ द्यायला हवी. तुमची सक्रीय साथ आम्हाला हवी आहे. आज सनातनी शक्ती शिरजोर झालेल्या आहेत, त्यांच्याशी लढण्याचे मनोबल हरवत चाललेय. अशा वळणावर आमचे तगडे, थेट स्टॆटमेंट आम्ही या मालिकेद्वारे समाजापुढे आणीत आहोत. तुमची सकारात्मक साथ या प्रयत्नांना मिळणार की नाही? की फक्त विक्षिप्त आणि निष्क्रिय जगण्यालाच तुमचे प्राधान्य आहे? जोती-सावित्रीसारखे जे लोक सगळ्यांचे असतात, सगळ्यांसाठीच लढलेले असतात, त्यांच्यामागे तुम्ही आहात की नाही हे तुमच्या कृतीतून दाखवून देण्याची वेळ आत्ता आलेली आहे....
जय जोती-जय सावित्री!
- प्रा. हरी नरके,
२०/१०/२०
No comments:
Post a Comment