Monday, July 2, 2012

गांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण?जागतिकीकरणाच्या आजच्या लाटेत "स्पर्धाच स्पर्धा चोहीकडे" असे वातावरण आहे.थातुरमातुर स्पर्धा आयोजित करायच्या.लोकांना एसएमएस करायला लावायचे आणि त्यातुन मजबूत कमाई करायची असा हा सापळा असतो. काही वाहीन्या आणि प्रिंटमिडीयातील मंडळींनी अलिकडॆच या लाटेत हात धुवुन घेण्याच्या उद्देशाने अशीच एक स्पर्धा घोषित केलेली आहे.महात्मा गांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण? हे ठरविण्यासाठीची ही मेरेथोन स्पर्धा आहे.  २६ सदस्यीय ज्युरींनी १०० नामांकनांमधुन ५० नावे निवडलेली आहेत. २५ जुनपर्यन्त वाचक आणि प्रेक्षकांनी केलेल्या मतदानातुन तसेच आजपासुन ३१ जुलैपर्यंत घेतल्या जाणा-या देशव्यापी "ओपिनियन पोल"मधुन १०जणांची नावे निवडली जातील. १५ ओगस्टला त्यातुन एका सर्वश्रेष्ट भारतीयाचे नाव घोषित केले जाईल.
या ५०जणांमध्ये डा.बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरु, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, डा.राममनोहर लोहिया,राजगोपालाचारी,विनोबा भावे,कांशीराम,इंदिरा गांधी यांच्यासह नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि मदर तेरेसा यांचाही समावेश आहे.या यादीत उद्योगपती जे.आर.डी.टाटा, शास्त्रद्न्य डा.होमी भाभा,विक्रम साराभाई, ओस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक सत्यजित रे आणि ओलेंपिकमध्ये भारताला होकीची असंख्य सुवर्णपदके मिळवुन देणारे मेजर ध्यानचंद यांचीही नावे आहेत.
चित्रपट,संगित, नाटक,क्रिडा,उद्योग अश्या ग्लेमर असणा-या  आणि माध्यमप्रिय क्षेत्रातील किती लोक या यादीत असावेत? ६० टक्के! रजनीकांत,देव आनंद, दिलीप कुमार, किशोर कुमार, राजकपुर, मिल्खासिंग, कपिल देव, गावस्कर, सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, अमिताभ बच्चन, ए.आर.रहमान, लता मंगेशकर आदिंची बाजारातील केवळ लोकप्रियता बघुनच त्यांना या यादीत घातले असावे हे स्पष्टच आहे.या मालिकेतील निम्मे लोक आज हयात असुन त्यांच्या कामाचे मुल्यमापन आत्ता लगेच करण्याची एव्हढी काय घाई होती तेच समजत नाही.बाबासाहेब, नेहरु, पटेल यांच्यासारख्या राष्ट्र्नेत्यांसोबत या हयात मंडळीची  तुलना करणे पोरकटपणाचे आहे.कोणत्याही स्पर्धेत एक संकेत पाळला जातो.स्वत: आयोजकाने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी त्यात भाग घेवु नये.पण या स्पर्धेच्या आयोजकांपैकी असणा-या  एका मोबाईल कंपनीचे मालकही या यादीत आहेत.संयोजकच स्वत: स्पर्धक असण्याची ही जगातील एकमेव स्पर्धा असावी.
या स्पर्धेवर माझे प्रामुख्याने २ आक्षेप आहेत.{१}पहिले सर्वश्रेष्ट भारतीय म्हणुन महात्मा गांधी यांची निवड कोणी,कधी आणि कोणत्या निकषांच्या आधारे केली हे जाहीर करण्यात आलेले नाही. {२}जाती,धर्म,प्रदेश,भाषा, लिंगभाव,वर्ग,वर्ण आदि भेदांचे माहेरघर असणा-या या देशातील लोकव्यवहार आणि लोकमत घडविण्याची यंत्रणा यांचे भान ठेवण्यात आलेले नाही.
या यादीत अवघ्या सहा महिलांना स्थान देण्यात आलेले आहे.या यादीतील सुमारे ६५%लोक हे भारतीय वर्णव्यवस्थेने ज्या ३ वर्णांना{ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य} "द्विज" मानले त्यातील ६५% आहेत.मुस्लीम समाजातील जातीव्यवस्था सच्चर आणि मिश्रा आयोगांनी अधोरेखित केलेली आहे.त्यामुळे धर्मांतरित द्विजांचा विचार केला तर ही संख्या ८०% वर जाते. भटके-विमुक्त आणि आदिवासींना या यादीतुन बहिष्कॄत करण्यात आलेले आहे.इतर मागास वर्ग आणि अनुसुचित जाती यांचे  प्रतिनिधित्त्व दाखविण्यापुरतेच आहे.
महात्मा गांधी हे एक महान नेते होते यात वादच नाही.देशाच्या स्वातं-यासाठी त्यांनी दिलेले योगदान अभुतपुर्व होते.असे असुनही एक खेदजनक अनुभव आपल्यासमोर मांडला पाहिजे. त्यांच्या साहित्याचे १०० खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत.त्यांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला होता. ४० खंड प्रकाशित करुन तो बंद करण्यात आला.कारण त्या ग्रंथांची किंमत नाममात्र ठेवुनही त्याला ग्राहकच मिळेना.सरकारने  हे संच शाळा,महाविद्यालये, विद्यापिठे यांना मोफत देण्याची योजना आखली परंतु प्रतिसाद शुन्य.आजही हे खंड निर्मितीखर्चाच्या फक्त एक टक्का भावातही  घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे सरकारची मोठी पंचायत झालेली आहे.ही पुस्तके रद्दीत घालता येत नाहीत आणि गोडावून्स अडकुन पडलेली आहेत.
कविवर्य कुसुमाग्रजांची एक गाजलेली कविता आहे.शिवराय,फुले,बाबासाहेब,टिळक,गांधीजी यांचे पुतळे एकदा गप्पा मारत बसलेले असतात.सर्वांच्या व्यथा ऎकुन गांधीजी म्हणतात,"तुमचे तसे बरे आहे,तुमच्यामागे एकेक जात, किमान पोटजात तरी आहे.माझ्यामागे आहेत केवळ सरकारी कार्यालयांच्या भिंती." गेला महिनाभर आपण एक वाद झडताना बघत आहोत. गांधीवादी,सत्याग्रही म्हनवुन मिरवणारे काहीजण गांधीभवनाची मालकी कोणाची यावरुन एकमेकांच्या झिंज्या उपटित आहेत.
मध्यंतरी राजकुमार हिरानी यांनी "गांधीगिरी" चित्रित करणारा मुन्नाभाई पडद्यावर आणला तो सुपरहिट झाला.
डा.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींवर अनेकदा प्रखर टिका केलेली आहे."गांधी आणि कांग्रेसने अस्प्रृश्यांचे काय केले?" रानडे,गांधी आणि जिना आदी ग्रंथांत याचे अनेक पुरावे मिळतात."अस्पृशता नष्ट व्हावी म्हणुन गांधीजी प्रयत्न करीत आहेत हे मी कधीच नाकारलेले नाही परंतु ते मुर्खांच्या साम्राज्यात विहार करणा-या तत्वद्न्यान्यापैकी एक योगभ्रष्ट विभुती दिसतात.महात्मा हे एखाद्या वावटळीसारखे असतात, त्यांच्यामुळे धुळ तेव्हढी उडते, समाजाचा स्तर मात्र उंचावत नाही".अश्या कडवट शब्दांत बाबासाहेबांनी हल्ला केलेला आहे.जातीव्यवस्थेच्या प्रश्नांच्या संदर्भात ते दोघे परस्परविरोधी छावणीत राहुनही एकमेकांमुळे विकसित होत गेले असे मानणारा अभ्यासकांचा एक वर्ग आहे.
बाबासाहेबांनी प्रतिकुल परिस्थितीतुन येवुन अपार कष्टाने जी असामान्य उंची गाठली ती बघता, "मेकर्स ओफ युनिव्हर्स" च्या मालिकेत संपुर्ण जगातील गेल्या दहा हजार वर्षातील निवडक १०० महापुरुषांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले आहे.त्यात बुद्ध,महावीर आणि अशोक हे अग्रभागी आहेत.मात्र या मालिकेत गांधीजींना स्थान देण्यात आलेले नाही.
बाबासाहेबांना मत द्या,असे सांगणारे बरेच एसएमएस मला आले.दुसरीकडे स्पर्धेत अजिबात भाग घेवु नका असेही सांगणारे काही निघाले.चळवळीतील लोकांचे फोननंबर मिळविण्याची संघाची ही खेळी आहे,सबब फोन करु नका असेही सांगणारे निघाले.
गांधीजींना परस्पर सर्वश्रेष्ट ठरवुन टाकायचे आणि आता त्यांच्यानंतर कोण ते सांगा असे विचारायचे हा रडीचा डाव नाही काय? बाबासाहेबांसमोर बाजारबुणगे वाटावेत अश्या काही अत्यंत सामान्य कुवतीच्या लोकांना या स्पर्धेत आणायचे हाही नविन प्रकारचा जातीवादच नाही काय? जातीग्रस्त मानसिकता असणारे भारतीय लोक बाबासाहेबांचे मोठेपण कबुल करण्याची दानत आतातरी दाखवतील काय?असे काही प्रश्न आहेत. जनता,ज्युरी आणि बाजार काय करतो ते १५ आगस्टला कळेलच.
ज्या भारतीय मतदारांनी १९५२ आणि १९५४ च्या लोकसभा निवडणुकीत "राज्यघटनेच्या या जनकाला" पराभुत केले होते त्यांना आपली चुक दुरुस्त करण्याची ही संधी आहे.ते आपली चुक दुरुस्त करतील काय?
.....................................................................................................................................................................
{टिप:पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असुन प्रथम क्रमांकाची मते डा.बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली आहेत.उरलेल्या ९ जणांमध्ये पं.नेहरु,इंदिरा गांधी,मदर तेरेसा,सचिन तेंडुलकर,वल्लभभाई पटेल,जे.आर.डी.टाटा,अटलबिहारी वाजपेयी,अब्दुल कलाम,लता मंगेशकर असा क्रम आहे.}