Sunday, July 8, 2012

महात्मा फुले यांची निर्मिक संकल्पना

----------------------------------------------------------------------
महात्मा फुले यांची निर्मिक संकल्पना 
प्रा. हरी नरके 

महात्मा जोतीराव फुले हे पर्यायी संस्कृतीचे जनक होते. बहुजन समाजाच्या मानसिकतेचं समग्र परिवर्तन करण्यासाठी त्यांनी विचार मांडले, चळवळी चालवल्या. बहुतांश भारतीय समाज हा देव, धर्म, ईश्‍वर, परमेश्‍वर यावर अपार श्रद्धा असलेला आहे. तो पोकळीत जगू शकत नाही. अशा समाजाला विज्ञाननिष्ठा, साधनशुचिता आणि विवेकाच्या आधारावर उभी केलेली बुद्धिनिष्ठ श्रद्धा देण्याची त्यांची धडपड होती. 33 कोटी देवांवर विसंबून असलेल्या समाजाला परंपरा आणि परिवर्तन यांचा सुवर्णमध्य साधून एक नवा विचार त्यांनी दिला. त्यांनी पारंपरिक देव, ईश्‍वर, परमेश्‍वर, संकल्पना नाकारुन "निर्मिका'ची संकल्पना विकसित केली.सत्यशोधकाला 33 नियमांची आचारसंहिता घालून देताना ही निर्मिक संकल्पना त्यांनी पायाभूत मानली आहे. लिंगभाव, वर्ग आणि जातीची विषमता संपूर्णपणे नाकारणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित ही संकल्पना ते मांडतात. 

""अज्ञानाशी ज्ञान, पांगळ्या अन्नदान, हेच बा स्मरण निर्मिकाचे !!'' ही आपली निर्मिकपूजेची, आराधनेची संकल्पना ते सांगतात. बुद्ध कबीर येशू, महंमद पैगंबर, संत तुकाराम, टॉमस पेन, मिशनरी वृत्ती आणि अमेरिकन उदारमतवाद यांच्या प्रभावातून त्यांची ही संकल्पना विकसित होताना दिसते. सत्यधर्माची, शोषणविरहित आणि सर्वचिकित्सक मानसिकता वाढीला पूरक ठरणारी ही मांडणी काळाच्या ओघात ओढाताण झाल्यानं बाजूला पडली असली तरी भारतीय समाजमनाला ती एक उत्तम पर्याय देते, ही निश्‍चित. 

No comments:

Post a Comment