महाराष्ट्राला श्रेष्ट दर्जाची वैचारिक परंपरा लाभलेली आहे.अनेकविध विषयांवर कसदार आणि कलदार लेखन करणा-या व्यासंगी विद्वानाची फार मॊठी मांदियाळी महाराष्ट्राने प्रसवलेली आहे.महात्मा फुले,न्या.रानडे,राजारामशास्त्री भागवत, डॊ‘बाबासाहेब आंबेडकर, भांडारकर, पां.वा.काणे, लक्ष्मणशास्त्री जोशी, वि.रा.शिंदे, गं.बा.सरदार, नरहर कुरुंदकर,वा.वि.मिराशी, य.दि.फडके, या प्रथम श्रेणीच्या फळीतील अव्वल दर्जाचे विचारवंत असणारे प्रा.राम बापट यांचे २ जुलैला निधन झाले. बापटसर म्हणजे नानाविध विषयांकडे पाहण्याची अंतर्दृष्टी देणारे ज्ञानमग्न शिक्षक होते.सरांना पुणे विद्यापिठातुन निवृत होवुन २१ वर्षे उलटून गेली असली तरी ते दररोज विद्यार्थी,कार्यकर्ते आणि विद्वान यांच्या गोतावळ्यात चर्चा आणि मंथनात बुडुन गेलेले असायचे.
ते महाराष्ट्राच्या वैचारिक व सामाजिक परंपरेची उकल करणारे महापंडीत होते.विचारांच्या विकासाचे ईतिहासचक्र आणि त्यामागची प्रेरक तत्वे व उर्जा यांच्या शोधात त्यांनी हयात घालवली.ते अविवाहीत होते.सत्तासंबंधावर आधारलेल्या राजकारणाचा आरपार वेध घेत समताधिष्टीत समाजाची उभारणी कशी करायची यावर त्यांचे मुलगामी चिंतन होते.ते सदैव नव्या विचारांचे स्वागत करणारे,नव्या संशोधनाला चालना देणारे संशोधक होते.ते प्रत्येक सिद्धांताची कशोशीने छाननी करणारे,मराठी भाषेच्या अंगभुत लयीवर मांड असणारे कसदार लेखक होते. देशविख्यात मृदुभाषी वक्ते होते. त्यांना अनेक विषयात गती होती. नाट्यशास्त्र, कला, सौंदर्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान ते संरक्षणशास्त्र असा फार मोठा अवाका असणारे ते मुलगामी चिंतक होते. सर्व सामाजिक चळवळींबद्दल त्यांना ममत्व होते.बापटसर म्हणजे क्रियाशील असा चळवळ्या महापंडीतच!
गेले काही महिने ते अल्झायमर्सने आजारी होते.तरीही ते सदैव कार्यमग्न असत.गेल्या महिन्यातच त्यांचा फोन आला होता.माझे नवोदित साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण तयार झाले का याची सर चौकशी करीत होते. म्हणाले मला आजकाल आजारपणामुळे काहीसे विस्मरण होते.संमेलनाला मी येणार आहे.पुढची तारीख कोणती ठरलीय ते आठवणीने कळवा.या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याची बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हा सरांचा अभिनंदनपर फोन आला होता.त्यानंतर संमेलनाबद्दलचा हा त्यांचा तिसरा फोन होता.हे साहित्य संमेलन काही कारणामुळे पुढे ढकलले गेले आणि आता ते होईल तेव्हा सर असणार नाहीत!
बापटसरांची माझी ओळख एका शिबिरात झाली.त्यांचे व्याख्यान ऎकणे ही एक वैचारिक मेजवानीच असे.गेल्या ३० वर्षात त्यांची शेकडो व्याख्याने ऎकली.विद्यापिठात शिकत असताना मी त्यांच्या विभागाचा विद्यार्थी नसुनही काहीवेळा आम्ही मित्र त्यांच्या वर्गात बसत असू. १९८९ साली माझे "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन"हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.बाळ गांगल यांनी सोबत साप्ताहिकात महात्मा फुले यांच्यावर बेछूट,शिवराळ आणि निरर्गल टिका केली होती.तिचे साधार खंडन करणारे पुस्तक मी लिहावे यासाठी सरांनी मला प्रोत्साहन दिलेले होते.मी त्यांनाच प्रस्तावनेसाठी गळ घातली.सर म्हणाले मला नक्कीच आवडेल पण तुम्ही प्रा.य.दि.फडके यांची प्रस्तावना घ्या. फडके हे फार मोठे संशोधक आहेत. मुख्य म्हणजे ते "जडीबुटी" संशोधक नाहीत. तुमच्या पुस्तकाला ते अधिक न्याय देवु शकतील.फडके यांचे लेखन जोरकस आणि आक्रमक असते,ते गांगलांचे चांगले वाभाडे काढतील. यानिमिताने तुमची फडकेसरांशी ओळख व्हावी अशी माझी ईच्छा आहे. मी यदिसरांकडे गेलो.त्यांनी तात्काळ प्रस्तावना दिली.पुस्तक बहुचर्चित आणि विद्वतमान्य ठरले.तेव्हापासुन बापटसरांकडे कधीही जावे,कोणत्याही विषयावर त्यांच्याशी गप्पा माराव्यात हा नित्य परिपाठ झाला.
त्यानंतरचे माझे प्रत्येक पुस्तक आस्थेवाईकपणे वाचुन सर प्रतिक्रिया देत.एखादे पुस्तक मिळाले नाही तर फोन करुन पुस्तक घ्यायला कधी येवु असे विचारत. फुले-आंबेडकरांचे प्रत्येक पुस्तक मुळातुन त्यांनी वाचलेले होते.काही महिन्यांपुर्वी चित्रमय चरित्राचा बाविसावा खंड त्यांना भेट द्यायला गेलो होतो.पुस्तक बघुन सर हरखले.उत्तम आणि दर्जेदार निर्मितीबद्दल त्यांनी कौतुक केले.सरकारी पुस्तक इतके सुंदर असु शकते यावर विश्वास बसत नाही ,असे म्हणाले.मी पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांचे नाव लिहुन ते त्यांना भेट देणार तर ते म्हणाले,"थोडे थांबा.पुस्तकावर माझे नाव लिहु नका.पुस्तक मला द्या.आठ दिवसात वाचून परत करतो.मी आता माझ्याकडची सगळी पुस्तके वेगवेगळ्या संस्थांना वाटुन टाकली आहेत.आता हेही कोणालातरी देणार,त्यापेक्षा माझी आठवण म्हणुन तुमच्याकडेच ठेवा. मी त्यांच्या घरात नजर टाकली तर खरेच सगळी कपाटे रिकामी दिसत होती.पुस्तके म्हणजे सरांचा जीव की प्राण! आजवर त्यांनी मला वाचायला त्यांच्याकडची कितीतरी पुस्तके आवर्जुन दिली. आठवणीने परत मागुन घेतली.ब्राह्मण-अब्राह्मणबोध सारखी अनेक दुर्मिळ पुस्तके त्यांच्याकडुन मिळाली म्हणुनच मला वाचता आली.दोनच दिवसात सरांचा फोन आला, म्हणाले पुस्तक वाचुन झालेय. मी गेलो तर सरांनी नोट्स काढुन ठेवलेल्या.त्यापुस्तकाविरुद्ध दरम्यान काही दुषित पुर्वग्रहातुन आणि हितसंबंधीय आकसातुन एकदोन वृतपत्रांनी विरोधात लिहिले होते.सर,म्हणाले,मी पुस्तक संपुर्ण वाचलेय.उत्तम झालेय.त्यानंतर सरांनी तपशीलवार चर्चा केली.कौतुक केले."छापुन आलेली टिका चुकीची आहे.माझा लेखी अभिप्राय देतो.या खोडसाळ टिकेकडे लक्ष देवु नका.मधल्याकाळात तुम्ही ज्यांना मदत केली तीच मंडळी कृतघ्न होवुन आज तुमच्यावर तुटून पडत आहेत,याचा मनस्ताप करुन घेवु नका.असत्य फारकाळ टिकत नसते.महाराष्ट्राने माथेफिरुपणाला कधीही थारा दिलेला नाही." हे सरांचे बोल ऎकुण खुप बरे वाटले.
१९९० साली आम्ही शासनातर्फे महात्मा फुले समग्र वांग्मयाची नवी आवृती काढली.अवघ्या दहा रुपयातील या प्रती लोकांनी रेशनसारख्या रांगा लावुन विकत घेतल्या.सर स्वत:फोटोझिंको प्रेसवर गेले.३तास रांगेत उभे राहिले. त्यांचा नंबर यायच्या आतच पुस्तक संपले.सरांनी मला फोन करुन एक प्रत द्यायची व्यवस्था करता येईल का अशी विचारणा केली.मी माझ्याकडची प्रत घेवुन गेलो. पुस्तक त्यांना दिले तर सर पैसे घेण्याचा आग्रह करु लागले.पुस्तक खास सवलतीच्या दरातील असल्याने त्याचा काळाबाजार होवु नये यास्तव आम्ही एक पथ्य पाळीत असु.हे पुस्तक हरी नरकेंकडुन दहा रुपये या छापील किमतीत विकत मिळाले असे पत्र द्या असे मी सांगताच सरांनी तसे पत्र नी दहा रुपये आनंदाने दिले.ते पत्र आजही मी जपुन ठेवले आहे.
मध्यंतरी सरांनी मी लिहिलेला "भारतीय संविधान आणि ओबीसी" याविषयावरील शोधनिबंध आवर्जुन वाचायला मागुन नेला आणि त्यावर माझ्याशी विस्तृत चर्चा केली.राखीव जागांवर एव्हढे भरपुर लिहिले गेले आहे, पण मग हाच पैलु कसा काय उपेक्षित राहिला? याचे मला आश्चर्य वाटते असे म्हणुन आता तुम्हीच यावर स्वतंत्र पुस्तक लिहा असे आग्रहपुर्वक सांगुन गेले.
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ कसा घालायचा हा मोठा पेच असतो.समाजाने आत्मभान न हरवता आत्मविश्वासाने पावले टाकावीत यासाठी नव्याने निर्माण होत असलेल्या सांस्कृतिक आणि नैतिक मुल्यविषयक प्रश्नांवर विवेकी आणि समतोल मांडणी करावी ती सरांनीच.आस्थेवाईक विश्लेषण,चिकित्सक धांडोळा आणि अनेक पेचप्रसंगांची खुबीदार उकल करण्यात त्यांचा हातखंडा होता.सेमिनार,कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे आणि वैचारिक चर्चांमध्ये ते रमुन जात.त्यांनी फार मोजकेच लेखन केले आहे."परामर्श" हा त्यांचा एकमेव ग्रंथ.६मौलिक प्रस्तावनांचा हा संग्रह.मे.पुं.रेगे,राम मनोहर लोहिया, अशोक चौसाळकर,सदानंद मोरे,गो.मा.पवार आदिंच्या पुस्तकांना लिहिलेल्या या प्रस्तावना एव्हढ्या मुलगामी आणि मौलिक आहेत की हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावे आणि वाचावे असे आहे.आजच्या युगधर्मातील पुरोगामी मुल्यांची बांधिलकी मानुन,अभिनिवेशरहित,समतोल नी तारतम्याने मांडणी करण्यात सर अग्रेसर असत.प्राचीन काळापासुन भारतीय समाज बहुविध व बहुसांस्कृतिक होता.त्याला उच्चतर नैतिक पातळीवर नेणारांबद्दल सरांना अपार ओलावा होता.महाराष्ट्रातील सांस्कृतिक व्यवहार स्वातंत्र्यशील,समतावादी आणि लोकशाहीकरणाला पोषक होण्यासाठी जनसमुहांना विश्वासात घेवुन,अलगपणाची बेटे न रचता, क्रांतिकारकांना जिव्हाळ्याने परंपरेशी जोडीत पुढे गेले पाहिजे.आजचे राज्यकर्ते आपल्या प्रभुत्ववादी नितीकरता संत आणि प्रागतिक परंपरांचा गैरवापर करित असताना या प्रस्थापितांवर सडेतोड तोफ डागली पाहिजे असे सर सांगत असत."सत्य हे एकांगी नसते,पण त्याचे समग्र दर्शन एकदम न होता कलेकलेने होत असते.जसा ज्ञाता असे ज्ञान.सत्याची प्रतिती निरिक्षकाची भुमिका,स्थान,तेज दृष्टीचा टप्पा किंवा पल्ला आणि दृष्टीकोन यावर अवलंबुन असते.प्रत्येकाने सत्याचा तलाश आपापल्या परिने आणि रितीने लावला पाहिजे, त्यासाठी कायम विनम्र पण टोकदार नी ठाम भुमिका घेतली पाहिजे सोयीपुरता ईतिहासाचा वापर करुन क्रौर्य आणि पशुतेने वागुन उद्याचा चांगुलपणा जन्माला येईल असे मानणारे सामाजिक अंध असतात.समता,न्याय आणि संमीलन या ईतिहासाच्या मुख्य प्रेरणा असतात. वर्तमानाकडे पाठ फिरवणारे लोक हे अटळपणे दुतोंडी भाषा आणि दुटप्पी व्यवहार यांच्या आहारी जातात"हे सरांचे सांगणे होते.वर्ग ,जाती,लिंगभावाच्या विषमतेला विरोध करणारे बापटसर चिकित्सा, साधनशुचिता आणि ज्ञाननिर्मितीची अनावर प्रॆरणा देत जगले आणि तोच संदेश देत शांतपणे आपला निरोप घेते झाले.
...................
No comments:
Post a Comment