Wednesday, July 4, 2012

होय, खरोखरच प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत... -


होय, खरोखरच प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत...
-
Sunday, July 01, 2012 AT 03:15 AM (IST)

पुणे - मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खरोखरीच शिक्षक-प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत. याबाबत आता अंतर्मुख होऊन विचार करायलाच हवा, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

"निश्‍चित नोकरी व मजबूत पगार असल्याने शिक्षक-प्राध्यापक मराठीच्या अस्तित्वासाठी झटत नाहीत', अशी खंत साहित्यिक हरी नरके यांनी ग. ह. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख मनोहर जाधव म्हणाले, ""मूठभर शिक्षक-प्राध्यापकांच्या बळावर मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवता येणार नाही. त्यासाठी प्राध्यापकांच्या सांघिक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. शिक्षक-प्राध्यापकांच्या संघटनांनीही हा विषय आपल्या अजेंड्यावर घ्यायला हवा. यामुळे या विषयाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होईल.''

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख श्‍यामा घोणसे म्हणाल्या, ""मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दुर्दैवाने प्राध्यापक मंडळी कमी पडत आहेत. "मला माझ्या विषयाशी बांधिलकी आहे,' ही भावना लोप पावत आहे. म्हणून या प्रश्‍नावर आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. या प्रश्‍नाची जबाबदारी केवळ शिक्षक-प्राध्यापकांनी नव्हे; तर आता समाजानेच उचलायला हवी.''

फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका रेखा देशपांडे म्हणाल्या, ""शालेय स्तरावर मुलांचा मराठी विषय पक्का करून घेणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे; पण मुले महाविद्यालयात आल्यानंतर त्यांची शालेय स्तरावरील मराठी पक्की नसल्याचे आम्हाला अनेकदा दिसून येते. हा विषयही विचारात घेतला जावा.''

माजी शिक्षक दीनानाथ गोरे म्हणाले, ""मराठीसाठी हल्लीचे शिक्षक-प्राध्यापक प्रयत्न करीत नाहीत, या मताशी मीही सहमत आहे. मुलांवर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण लादले जात आहे. इच्छा असूनही त्यांना मराठीतून शिकता येत नाही, अशी सद्यःस्थिती आहे.'' अहिल्यादेवी हायस्कूलच्या मराठीच्या शिक्षिका सविता दाणी म्हणाल्या, ""मराठीसाठी तळमळीने कार्य करणारे, व्यासंग असलेले, कष्ट करून स्वत:ला विकसित करणारे शिक्षक आहेत; पण अशा शिक्षकांचे प्रमाण कमी आहे. आपल्याकडे "मुलांनो, तुम्हीच वाचा धडा' म्हणणारेही शिक्षक आहेत. ते आपली जबाबदारी का झटकत आहेत, याचा शोध घ्यायला हवा.''

No comments:

Post a Comment