Wednesday, July 4, 2012

मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा


मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, July 03, 2012 AT 12:30 AM (IST)
Tags: marathi,   pune
पुणे - मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, तसेच भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांनी उदासीनता टाळून मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हायला हवे, अशा प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

निश्‍चित नोकरी आणि मजबूत पगार असल्याने शिक्षक-प्राध्यापक मराठीच्या अस्तित्वासाठी झटत नाहीत, अशी खंत साहित्यिक हरी नरके यांनी ग. ह. पाटील स्मृत्यर्थ आयोजित समारंभात व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर समीक्षक डॉ. शंकर सारडा म्हणाले, ""शिक्षक-प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत, यात खरोखरीच तथ्य आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे, नव्या साहित्याकडे आकृष्ट करणे ही शिक्षक-प्राध्यापकांची कामे आहेत; पण याचा विसर पडत चालला आहे. समीक्षात्मक अभ्यास करून त्यावर भाष्य करणारे, मराठीसाठी मनापासून झटणारे रा. श्री. जोग, पु. ग. सहस्रबुद्धे, व. दि. कुलकर्णी, वा. ल. कुलकर्णी असे शिक्षक-प्राध्यापक हल्ली दिसत नाहीत.''

साहित्यिक ह. मो. मराठे म्हणाले, ""आपल्या विषयात तरबेज, कुशल असलेल्यांनाच शिक्षक-प्राध्यापक म्हणून घेतले जायला हवे; पण तसे होत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पूर्वी मराठी शिकवणे "चॅलेंज' वाटायचे. ते "चॅलेंज' राहिलेले नाही. आपला विषय विद्यार्थ्यांच्या मनात उतरवणे, हे एक कौशल्य आहे. या गोष्टी प्रथम आत्मसात केल्या जाव्यात.''

नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे म्हणाले, ""मराठी भाषा शिकवणाऱ्यांनी आपला विषय पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा; पण "नोकरीसाठी नोकरी' करणारे शिक्षक-प्राध्यापक आपल्याकडे मोठ्या संख्येने आहेत, हे चित्र बदलायला हवे. त्यांनी उदासीनता टाळून अधिक गतिमान व्हायला हवे. मराठीच्या अस्तित्वासाठी नागरिकांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे.''

प्रा. विलास वाघ म्हणाले, ""मराठी भाषेला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी शिक्षक-प्राध्यापकांसमोर सध्या कोणताही कार्यक्रम नाही. ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात, बंद पाळतात, संप करून आग्रहीपणाने भूमिका मांडतात; पण मराठीसाठी ते रस्त्यावर उतरले, असे चित्र अद्याप आपल्याला पाहायला मिळाले नाही.''

... याचाही विचार करावा 
""या प्रश्‍नाबाबत केवळ शिक्षक-प्राध्यापकांना दोष देऊन चालणार नाही. शिक्षणव्यवस्था निर्माण करणाऱ्यांचा तो दोष आहे. त्यांनी या प्रश्‍नाकडे गंभीरपणे पाहायला हवे. मातृभाषेला डावलणे, भरमसाट इंग्रजी शाळांना परवानगी देणे... अशा सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांपुढे मराठीचे अस्तित्व शिक्षक-प्राध्यापकांनी कसे टिकवायचे? याचाही विचार केला जावा,'' असे साहित्यिक रामनाथ चव्हाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment