Thursday, July 12, 2012

मेरिट कशाला म्हणायचे?

       आरक्षण चर्चा काही निरिक्षणे: राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायासाठी आंतरजातीय विवाह, धर्मचिकित्सा, आर्थिक फ़ेरवाटप, स्त्रीपुरुष समता, आरक्षण,साधनसंपत्तीचे समान वाटप,सर्वांना समान संधी हे टप्पे अनिवार्य आहेत.

      १.आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशिल आहे.काही तासात किती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, होतेय. याचा अर्थ मिडीयाच्या भाषेत बोलायचे तर हा खुप टीआरपी खेचणारा विषय आहे.
     २.माणसे भरभरुन मते व्यक्त करतात, हे निश्चितच स्वागतार्ह आहे.सर्वांना धन्यवाद.
     ३.काही गंमतीदार मुद्देही पुढे आले.ज्यांना स्वताला आरक्षण हवे आहे, त्यांची "आमची जात ओबीसीत घाला" अशी मागणी आहे, तेही आरक्षणाला विरोध करण्यात पुढे असावेत?ही दांभिकता कधी जाणार?
     ४.काहींचा आरक्षणाला विरोधही आहे, आणि त्याचवेळी त्यांना आर्थिक आधारावर आरक्षणही हवे आहे, हा दुटप्पीपणा का?
     ५.काही कांगावाबहाद्दर आजोबाची शिक्षा नातवाला का वगैरे ?विषयांतर करीत आहेत, किंवा मुळ हेतुला बगल देत आहेत.
     ६.शिक्षेचा सवालच नाही. ओपणवाले मुळात लो्कसंख्येत किती आहेत? अ. जा. अ.ज.+ओबीसी +विजाभज +विमाप्र= ८० टक्के होतात. त्यांना सर्वांना मिळुन आरक्षण किती?५० टक्के. उर्वरित २० टक्केंना जागा किती? ५० टक्के. कुठेय शिक्षा? सर्वांचा १०० टक्के वाटा एकट्याने खायची सवय जडल्याने हा २०टक्के ओपणवाल्यांना अन्याय वाटतोय.या देशाच्या साधनसंपत्तीत सर्वांचा वाटा नाही काय?
    ७.मेरिट कशाला म्हणायचे? फक्त मार्क्स म्हणजे मेरिट? ते कसे मिळाले? त्यांची अनुकुल प्रतिकुल परिस्थिती बघायची नाही?सुशिक्षित पालक, उत्तम शिक्षक, दर्जेदार शाळा,नामवंत क्लासेस,अभ्यासाच्या सोयी,साहित्य,यांच्यामुळे मार्क्स वाढतात, उलटी स्थिती असेल तर कमी होतात, हे बघायला नको?
    ८.गुणवत्ता=उपजत प्रतिभा+अनुकुल परिस्थिती+परिश्रम+संधी.......
    ९.पिढ्यांनपिढ्या संधी नाकारली गेल्याने अनेक मागासांच्या गुणवत्तेला देश मुकला हे का दिसत नाही?
    १०. मागासांमधली अपवादात्मक उदाहरणे{शहरी, नवश्रीमंत, सुस्थितीतील, २ किंवा ३ पिढ्यातील}घेवुन सामाजिक अन्यायाकडुन लक्ष दुसरीकडे वळवायचे टेक्निक जुने झालेय. काही नवे आक्षेप तरी शोधावेत, प्रतिभावंतांकडे एव्हढा दुष्काळ ?
     ११.आरक्षण पालीसीत काही दोष आहेत, हे आम्ही नाकारलेलेच नाही.जरुर दोष दाखवा,विधायक चर्चा करा, पर्याय सुचवा.स्वागतच आहे.