Wednesday, July 4, 2012

मराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत


मराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत - नरके
-
Saturday, June 30, 2012 AT 03:15 AM (IST)

पुणे - 'निश्‍चित नोकरी आणि मजबूत पगार असल्यामुळे शिक्षक-प्राध्यापक मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झटत नाहीत, याचा मला शिक्षक म्हणून खेद वाटतो. अनेक भाषा लोप पावत आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा स्थितीत मराठीला सक्षम करण्यासाठी आपण जागे व्हायलाच हवे,'' असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. हरी नरके यांनी गुरुवारी येथे केले.

शिक्षणतज्ज्ञ ग. ह. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे "अभिजात मराठी भाषा' या विषयावर नरके यांचे व्याख्यान झाले. या वेळी मंडळाच्या कार्यकारी विश्‍वस्त डॉ. मंदा खांडगे, अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना आफळे उपस्थित होते.

नरके म्हणाले, 'मराठी श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. जे नाही म्हणतात, त्यांचे मत विचारात घेतले जाऊ नये. मराठी ही जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी भाषा आहे. तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांनी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा. पण, विनंती करूनही ते पुढे येत नाहीत. मराठीसाठी विधायक वातावरण निर्माण व्हावे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आता सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत.''