ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले १८४८ साली शाळेत शिकवायला जात असताना पुण्यातील काही "द्विज" समाजकंटक आणि सनातनी त्यांच्या अंगावर चिखल, शेण,दगड मारीत असत. २०१२ साली त्याच पुण्यातील एक इसम जोतीराव व सावित्रीबाईंची बदनामी करताना आढळुन आला आहे.मात्र त्याने चतुराईने आपण "सत्यशोधक" नाटकाचे लेखक,दिग्दर्शक आणि सावित्रीबाईंची भुमिका करणारी अभिनेत्री यांच्यावर हल्ला करीत आहोत अशी बतावणी केलेली आहे.{"गोपुविरचित सत्यशोधक: ऎसा जोती होणे नाही", परिवर्तनाचा वाटसरू, १६-३० जुन} हे तिघेही जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांच्यावरच्या या हिंसक हल्ल्याने काहीजण चेकाळुन गेले आहेत तर काहीजण दचकुन गेले आहेत.या हल्लेखोराने ५०-६० ईंग्रजी पुस्तकातील अवतरणांचा बेफाम मारा करुन आपण फुल्यांवरील एकमेव अधिकारी विद्वान असल्याचा उत्तम भास निर्माण केला आहे.अत्यंत थंड डोक्याने "संतप्तपणाची पोज" घेत तुफान उन्माद निर्माण करण्यासाठी केलेले हे विकृत लेखण आहे.सदर इसम आपण फुल्यांच्या बाजुचे आहोत असे ओरडून सांगत असला तरी मुलत: तो त्यांचा अवमान कसा करीत आहे हे पुराव्यानिशी मांडण्यासाठी हा लेख.
"सुनियोजित जातीय आणि धार्मिक दंगली घडवुन सर्व ब्राहमण पुरुषांची कत्तल करण्याची" चिथावणी देणारी पुस्तिका लिहिणारे मराठा सेवा संघाचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांचे किंवा मराठा महासंघाचे पुण्याचे अध्यक्ष श्री.शांताराम कुंजीर यांचे हे लेखण असावे असेच मला ते वाचताना वाटत होते. परंतु हे आकसपुर्ण लेखन करणारे स्कालर आहेत प्रा. विजय कुंजीर! फुले पतीपत्नीवर लिहिण्यासाठी त्यांचे दोघांचे समग्र साहित्य आणि त्यांची अद्ययावत चरित्रे तरी किमान वाचलेली असावीत अशी माझी या विषयाचा एक विद्यार्थी म्हणुन अपेक्षा होती.कुंजीरांनी हि पुस्तके वाचलेली आहेत असा आरोप मी त्यांच्यावर करुच शकत नाही.कुंजीरांनी फुल्यांची म्हणुन दिलेली बारिकसारिक माहितीही निराधार आणि नकली आहे.कुंजीरांची भाषा शिवराळ आणि मस्तवाल आहेच परंतु त्यांची तात्विक मांडणीही पुरुषी,सरंजामी आणि सत्ताधा-यांचे हितसंबंध जोपासणारी "फुलेविरोधी" मांडणी आहे."भट’,’बामण’,ब्राह्मण्यावरची" त्यांची टिका अनुषंगिक आहे.मुळात फुल्यांची बदनामी करण्यासाठी वापरलेला तो धूर्त डावपेच आहे.
फुलेवादी असणे म्हणजे दररोज त्यांच्या फोटो किंवा पुतळयाची पुजा करणे किंवा चढ्या सुरात आरत्या गाणे नव्हे. "स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,ज्ञाननिर्मिती,चिकित्सा आणि संसाधनांचे फेरवाटप" हा फुलेविचारांचा गाभा आहे.कुंजीरांचे लेखन याला पोषक असेल तर ते फुलेवादी आणि ते त्याला घातक असेल तर ते फुलेविरोधी ठरवावे लागते.
कुंजीर आपल्या लेखात तुच्छतेने म्हणतात,"बरे ईंग्रजी येवुनही कृष्णशास्त्रींची बायको काय तारे तोडणार? बामनी पितृसत्ताकतेतील संततीजनन यंत्र ते,तिला ईंग्रजी आले काय की फ्रेंच आले काय ,काय फरक पडणार?" एका स्त्रीविषयीची ही घृणास्पद विचारधारा फुलेवादात बसते काय? "सत्यशोधक" या नाटकात सावित्रीबाईंची भुमिका अत्यंत तळमळीने साकारणा-या पर्ण पेठे यांच्याविषयी कुंजीर म्हणतात,"जोतीराव नाटकभर एका अल्लड शालेय कन्येसम सावित्रीबाईबरोबर संसार करत होते.फुले दुटप्पी वाटतात इतके ते सावित्रीबाईंचे पात्र मुल आहे.एकुण फेन्सी ड्रेस करुन शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात फिरत असल्यागत सावित्रीबाई वावरते.इतके पोचट पात्र आहे सावित्रीबाईंचे." आजवर देशभरातल्या ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी "तिकीट" काढुन हे नाटक बघितलेले आहे.त्यात फुल्यांवरील अनेक अधिकारी विद्वान,जाणते रंगकर्मी, सामाजिक चळवळींचे नेते,कार्यकर्ते,आणि सामान्य नागरिक यांचा समावेश होता. दुषित पुर्वग्रहांनी माथेफिरु बनलेल्या "फुकट्या" कुंजीरांचा एकमेव अपवाद वगळता माझ्यासह सर्व प्रेक्षकांना पर्णचा अभिनय आवडलेला आहे. फुले साहित्य, चरित्र, भाषा, समाजव्यवहार आणि नाट्यव्यवहार यांचे आकलनच जर शाळकरी आणि जातीयवादी असेल तर मग शाळकरीच उपमा सुचणार! कायतर म्हणे पेठेंनी आपल्या मुलीलाच सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी का घेतले? मी या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेत सुरुवातीपासुन आहे. सर्वप्रथम पेठेंनी या रोलसाठी ब्राह्मणेतर समाजातील अभिनेत्रींचीच निवड केलेली होती.माझ्या परिचयाच्या अशा तिघीजणींना त्यांच्या व्यक्तीगत अडचणींमुळे तालमी केल्यानंतरही नाटक सोडावे लागले.शेवटी प्रयोगाचा दिवस जवळ येवुन ठेपल्यानंतर पर्णने स्वता:हुन ही भुमिका मी करीन पण नाटक झालेच पाहिजे असे कर्तव्यबुद्धीने सांगितले.ज्या लोकांचा कृतज्ञताबुद्धीशी परिचयच झालेला नसतो अशांच्या पुरुषी,सरंजामी मानसिकतेला ही तळमळ समजणारच नाही.त्यामुळे ते असलेच गरळ ओकणार. या नाटकाची निर्मिती करणारी पुणे मनपा कामगार युनियन सफाई कामगारांसाठी अनेक वर्षे झटत आहे.ज्या लोकांनी आयुष्यात कधीही नाटकात काम केलेले नव्हते अशांना आठआठ महिने अहोरात्र राबुन पेठेंनी रंगमंचावर समर्थपणे व सफाईने उभे केले त्या अतुल पेठेंचे पांग कुंजीरांनी कसे फेडलेत? तर म्हणे मुख्य रोल उच्च वर्णियांना दिलेत आणि दुय्यम रोल बहुजनांना. भरतमुनीचे नाट्यशास्त्र चुकीच्या कारणासाठी साक्षीला उभे करुन कुंजीरांनी आपले ठार अडाणीपणच उघडे केलेय.नाटकात भुमिका करणे हे कायम निम्न जातींचे काम मानले गेलेय.त्यात सगळेच रोल मग ते प्रमुख असोत कि दुय्यम शुद्र-अतिशुद्रच करत आलेत हे कुंजीरांच्या गावीच नाही. कुंजीरांचा दावा आहे की, सावित्रीबाई "व्रत", "प्रकृती" असले ब्राह्मणी शब्द वापरुच शकत नाहीत.त्यावरुन थेठ गोपुंची जात काढुन ते मोकळे होतात.कुंजीरांनी जोतीराव-सावित्रीबाईंच्या भाषेचा-लेखनाचा काडीमात्रही अभ्यास केलेला नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या साहित्यात त्यांनी अनेकदा "व्रत","प्रकृती" हे शब्द वापरलेले आहेत..{पाहा:महात्मा फुले समग्र वांग्मय, पृ.२६७,६३२ आणि सावित्रीबाई फुले समग्र वांग्मय,पृ.८, ९९} कुंजीरांच्या मते गोपुंची ही भाषा सावरकरी आहे, ब्राह्मणी आहे.मात्र ज्याअर्थी फु्ल्यांनी ही भाषा वापरलीय त्याअर्थी कुंजीर फुल्यांनाच सावरकरी आणि ब्राह्मणी ठरवुन त्यांचा अवमान करतात हे सिद्ध होते.
या नाटकाद्वारे मुख्य प्रवाहामध्ये फुल्यांना पोचविण्यासाठी प्रतिभावंत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष स्वत:च्या खिशाला खार लावुन विनामुल्य काम केले.म्हणुन कामगार युनियनने कृतज्ञतेपोटी काही रक्कम पेठ्यांना प्रवासखर्चासाठी दिली. तीही त्यांनी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्यातिथे देणगी म्हणुन देवुन टाकली. ही "दानत" परपुष्ट आणि "शोषक" असणा-या सरंजामदारांना कशी समजणार? या "फुकट्यांचा" अपराधभाव मग जागा झाला. एकीकडे अजाअज,इमावच्या आरक्षणाला संपुर्ण विरोध करणारी आणि त्याच वेळी आम्हालाही इमावमध्ये आरक्षण द्या म्हणणारी ही सत्ताधारी मानसिकता असल्याने कांगावा करुन "दलितांना आरक्षणाऎवजी खाजगी धर्मादाय मार्गाने हे शिकवु पाह्तायत" अशा चोराच्या उलट्या बोंबा मारु लागली.
कुंजीरांचा आरोप आहे की, भांडारकर प्रकरणामुळे मराठा जातीयवादाला उत्तर म्हणुन पेठ्यांनी हे नाटक बसवले. प्रयोगात पुढे मराठ्यांबद्दलचे ९६ कुळी ,पंचकुळी हे उल्लेख गाळल्याबद्दल हेच कुंजीर तक्रारही करतात.जर यातुन पेठेंना मराठा जातीयवादाला उत्तरच द्यायचे असते तर हे उल्लेख गाळण्याऎवजी त्यांनी ते अधिक ठळक केले असते.पण तर्कहीन पद्धतीने कुंजीर दोन्हीबाजुंनी बोलत राहतात. दुतोंडी वाचाळपणा करीत पाल्हाळ लावित जातात. या भरताडात कुंजीर मस्तवालपणे असेही सुचवतात की, फुले द्रष्टे नव्हतेच, फुल्यांना संस्कृतचा गंधही नव्हता,ते संस्कृतचे विरोधक होते, फुल्यांना ईतिहासकरणाची जाण नव्हती,फुल्यांना खरी राष्ट्रभक्ती कळलीच नव्हती, फुल्यांचे ’महा्त्मेपण’ जे काही होते ते केवळ ख्रिस्ती मिशन-यांमुळेच होते,ते ब्राह्मणद्वेष्टे होते,ते हिंदु हा शब्द वापरतच नसत. कुंजीरांचे हे सारेच आरोप निराधार आणि अडाणीपणाचे आहेत. जोतीरावांची बदनामी करण्यासाठीच कुंजीरांनी हे आरोप केलेले आहेत.
फुल्यांच्या लेखनात "हिंदु" हा शब्द अनेकदा आलाय.{पाहा:म.फु.स.वा.,पृ.१९७,३३६,३४९,३६३,३६५,४१९} सावित्रीबाईंनी तर या धार्मिक भेदभावावर कवितेतुन प्रश्नही उपस्थित केलेला आहे.{सा.फु.स.वा.पृ.८३-८७} सावित्रीबाई आणि जोतीरावांनी आपल्या लेखनात असंख्य संस्कृत श्लोक पान नंबरसकट उद्धृत केलेले आहेत.जोतीरावांना संस्कृत भाषेची आवड होती.ते संस्कृत ग्रंथांचे नियमित वाचक होते.त्यांनी पाठक गुरुजींची खाजगी शिकवणी लावुन संस्कृतचा व्यासंग केलेला होता.{पाहा:आम्ही पाहिलेले फुले,पृ.६१ आणि म.फु. स.वा.पृ.२६४} "इतिहास" आणि "नेशन{राष्ट्र"}विषयक जोतीरावांची मांडणी वाचली की कुंजीरांच्या याबाबतच्या अज्ञानाची किव येते.{स.वा.पृ.२६५,५२३, आणि सा.फु.स.वा.४५-५०} महात्मा फुल्यांच्या जडणघडणीत बुद्ध,अश्वघोष, येशु,प्रेषित महंमद पैगंबर, कबीर, तुकाराम, टामस पेन आणि मिशनरी अशा अनेकांचा वाटा होता.त्यांच्या प्रतिभेचे आणि द्रष्टेपणाचे सारे श्रेय केवळ मिशन-यांना देणे हा फुल्यांचा अवमानच होय.मिशन-यांनी दिलेले शिक्षण जरी महत्वाचे असले तरी ते इतरही अनेकांना मिळाले होते मग ते का नाही फुले बनू शकले? "आपल्याला बालपणीच्या मुस्लीम मित्रांच्या संगतीमुळे हिन्दुधर्माविषयी व जातीभेदाविषयी प्रश्न पडु लागले" असे फुले स्वत:च आवर्जुन नमुद करतात.{म.फु.स.वा.पृ.३३६} पण हे काहीही कुंजीरांनी वाचलेले नसल्याने ते तोंडावर आपटतात.
कुंजीरांनी वारकरी संप्रदायाबद्दल अत्यंत बेजबाबदार,टवाळखोर आणि उथळ मांडणी केलीय.महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे.तो एव्हढ्या सवंगपणे हाताळण्याचा विषय नाही.त्यात फार मोठी सामाजिक गुंतागुंत आहे.फुले स्वत: देहु-आळंदीला वारीच्या काळात व्याख्यानांसाठी जात असत.{आ.पा.फु.पृ.७४-७५} सत्यशोधक समाजाचे बहुतेक सर्व सभासद वारकरी होते.फुल्यांनी केलेली सत्यधर्माची स्थापनाच मुलत: कबीर,तुकारामादी संतांच्या विचारांवर आधारित होती, हे विसरुन कसे चालेल? लोकांपासुन फटकुन राहण्यालाच क्रांतीकारकत्व मानणारे कुंजीरांसारखे लोक एकतर विक्षिप्त {सिनिकल} असतात किंवा दहशतवादी तरी!
कुंजीरांनी मराठी रंगभुमीविषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापरलेली आहे.मराठीतले पहिले आधुनिक नाटक जोतीरावांनी लिहिलेले आहे.त्याचे नाव "तृतीय रत्न" असे आहे. कुंजीरांप्रमाणे जोतीरावांनाही संस्कृतचा द्वेष वाटत असता तर त्यांनी त्याचे नाव "तिसरे" रत्न ठेवले असते.मराठी नाटक,नाटककार आणि रंगभुमी यावरील कुंजीरांची सगळी टिका कमरेखालची आणि हिडीस आहे. ही टिका आपण गोपु किंवा पेठेंवर करित असल्याचे ते भासवित असले तरी त्यांचा खरा रोख पहिले नाटककार महात्मा फुले यांच्यावरच आहे. गोपुंच्या सत्यशोधकची संहिता पुस्तकरुपाने १९९६ पासुन बाजारात उपलब्ध आहे.मग त्यावर हल्ला करण्यासाठी कुंजीर एव्हढी वर्षे का थांबले होते? पेठेंनी बसवलेले हे नाटक गाजु लागले,त्यातुन खरे फुले लोकांपर्यंत पोचु लागले.ज्यांना फुल्यांचे अपहरण करुन सत्ताधारी वर्गाचे हितसंबंध जपायचे आहेत त्यांना बहुजनांचे लक्ष ख-या प्रश्नांकडुन विचलीत करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाचे नाटक करावेच लागते. चिकित्सेचे दरवाजे कायमचे बंद करण्यासाठी हेतुपुर्वक शिवराळभाषा वापरायची,जातीय हेत्वारोप करायचे,त्यातुन ब्राह्मण-ब्राह्मणेतरांतील सामाजिक अभिसरण रोखायचे, सगळे काही जन्मावरच ठरते अशी सनातनी भुमिका घ्यायची आणि बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांची नसबंदी करायची हे यांचे सत्ताधारी राजकारण असते.हे नाटक बघायला मोठ्या संख्येने जाणा-या बहुजन वर्गाचा बुद्धीभेद करण्यासाठी आणि त्याला नाटक पाहण्यापासुन रोखण्यासाठीच कुंजीरांनी हे लेखन केलेले आहे.
खरेतर कुंजीरांना गोपु,पेठे यांच्यावर साधार,संयत आणि समर्पक वैचारिक टिका करुन ही चर्चा पुढेही नेता आली असती,पण मग ज्ञाननिर्मितीच्या कामांबद्दल तुच्छता पसरवता आली नसती, जातीनिर्मुलन, चिकित्सा, स्त्रीपुरुषसमता या फुलेवादी विषयपत्रिकेकडे लोक वळले असते.तेच तर कुंजीरांना व्ह्यायला नको आहे.
हे नाटक मी अनेकवेळा बघितलेले आहे.ते अत्यंत श्रेष्ट दर्जाचे नाटक आहे.अतुल पेठे यांनी रंगावृती एका मोठ्या उंचीवर नेवुन ठेवलेली आहे.गोपु आणि पेठे यांना "समरसतावादी,प्रतिगामी, बामणी", म्हणणे ही कुंजीरांची जात्यंधता आणि कृतघ्नता आहे.मी तिचा निषेध करतो.या नाटकामुळे फुल्यांचे "जातीय अपहरण" रोखले जात आहे.या नाटकातुन पैसे कमावणे हा त्यांचा हेतु नाही. मोफत, अल्पदरात किंवा चेरिटी शो करुन चळवळीतील अनेक संस्थांना पेठेंनी लाखो रुपयांची मदत या नाटकातुन आजवर मिळवुन दिलेली आहे.कुंजीर ईतके लबाड आहेत की त्यांनी सफाईकामगारांचा आपल्याला कळवळा असल्याचे भासवित त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवुन हे सारे लेखन केलेले आहे.पण प्रयोगातील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.वादासाठी एकवेळ पेठे आणि गोपु तुमचे नाहीत असे मान्य करुया, पण ही सफाई कामगार मंडळी तर तुमची होती ना?मग त्यांना दाद देण्याची तुमची दानत कुठे गेली? मुळात या वर्गाशी कुंजीरांना काही देणेघेणे असते तर त्यांच्या अपार मेहेनतीवर थुंकण्याचे असले काम त्यांनी केलेच नसते.
"हे नाटक म्हणजे जोतीरावांचे समग्र चरित्र नव्हे.एका मोठ्या माणसाचे अल्पसे दर्शन घडवण्याचा त्यामागे इरादा आहे..फुले पतीपत्नीच्या गौरीशंकराएव्हढ्या कामाचे टेकेडीवजा दर्शन घडवणारा तो एक सत्यशोधक जलशा आहे"असे स्पष्ट आणि स्वच्छ निवेदन नाटकाच्या सुरुवातीलाच गोपुंनी केलेले आहे.नाट्यव्यवहार या विषयातले केवळ वर्तमानपत्री ज्ञान असल्यामुळे अडाणीपणाने या नाटकात "हे का नाही? आणि "ते का नाही?" असले बाष्कळ प्रश्न कुंजीर विचारतात. सगळ्यांची नावे असायला ही संहिता म्हणजे काही लग्नपत्रिका नाही की वाण्याच्या सामानाची पोतडीही नाही.आजवर फुल्यांवर शंकरराव मोरे यांच्यापासुन मिरजकरांपर्यंत अनेकांनी नाटके लिहिलेली आहेत. आपापल्यापरिने फुल्यांचा शोध त्यांनी घेतलेला आहे.यातली किती नाटके कुंजीरांनी वाचलीयत किंवा पाहिलीयत याची कल्पना नाही.कारण त्यांचे "फुकट्यांसाठीचे" प्रयोग झालेले नाहीत. एक रटाळ,पाल्हाळिक आणि अत्यंत दुर्बोध लेख खरडणे आणि उत्तम नाटक लिहिणे यात काय फरक असतो,याची प्राथमिक माहिती कुंजीरांनी करुन घ्यायला हरकत नाही.हजारो लोकांना विचार करायला लावणारे,अस्वस्थ करणारे,अनेकांच्या डोळ्यांतुन अश्रु काढणारे हे नाटक म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळीला ताकद देणारे श्रेष्ट नाटक आहे.आम्ही "सत्यशोधकसाठी" गोपु,पेठे,कामगार युनियन आणि सर्व टीमचे कृतज्ञ आहोत.तुम्ही या कृतघ्नांकडे लक्ष देवु नका. हे नाटक बंद पडावे यासाठीच त्यांचा हा सगळा खटाटोप चालु आहे.त्याला आपण बळी पडता कामा नये.
आजकाल रातोरात प्रसिद्ध होण्याच्या काही क्लुप्त्या पुढे आलेल्या आहेत.ख्यातनाम असलेल्या महात्मा फुले यांच्यासारख्यांची गचांडी धरायची,नळावर धरतात तशा झिंज्या धरणारे वर्दळीवरचे जातीय भांडण गोपु आणि पेठेंशी करीत असल्याचा भास निर्माण करायचा आणि राज्यात जातीय खळबळ माजवुन देत "गाजायचे" ही ट्रिक "पब्लीसिटी स्टंट" म्हणुन कुंजीर वापरित आहेत. पेठे-गोपुंना "बुकलुन" काढताना तुमचा खरा निशाना फुल्यांवर आहे हे आम्हाला कळलेय एव्हढेच आम्ही या नतद्रष्टांना सांगु ईच्छितो.
............................................