Monday, April 10, 2017

चित्रकाराच्या चुकीनं महात्मा जोतीराव फुले यांना चिकटली दाढी


चित्रकाराच्या चुकीनं महात्मा जोतीराव फुले यांना चिकटली दाढी
चुक दुरूस्तीला लागली 65 वर्षे --
आपल्या भारतीय समाजात एखादी गोष्ट रुजायला फार काळ जाऊ द्यावा लागतो आणि जर रुजलेली गोष्ट चुकीची असेल तर ती गोष्ट दुरूस्त करायलाही फार झटावं लागतं.
एका चित्रकाराच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळं फुल्यांना दाढी चिकटली आणि ती काढायला 65 वर्षे लागली.
त्याचं असं झालं.....
जोतीराव 1890 च्या 28 नोव्हेंबरला गेले. त्यानंतर त्यांची छोटी चरित्रं अनेकांनी लिहिली. मात्र त्यांचं विस्तृत आणि सप्रमाण चरित्र लिहिण्याचा संकल्प सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी सोडला. ते विदर्भातले चिखलीचे. ते महाराष्ट्रभर फिरले. त्यावेळी हयात असलेल्या सर्व फुलेवाद्यांना ते प्रत्यक्ष भेटले. त्यांच्याकडून फुल्यांच्या आठवणी लिहून घेतल्या. चरित्राचे दस्तावेज जमा केले. पाटलांनी खूपच मेहनत घेतली.
1927 साली जोतीरावांची जन्मशताब्दी होती. त्यावर्षात हे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा निर्धार होता.
पुस्तकाची छपाई पुण्याच्या छापखान्यात चालू होती. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जोतीरावांचा फोटो छापण्यासाठी ते फोटोची शोधाशोध करू लागले. त्यांना मिळालेले सर्वच फोटो हे
कॉपिंगवरून कॉपिंग केलेले असल्यानं त्यात अस्पष्टपणा आलेला होता.
जोतीरावांना आपला भाऊ मानणार्‍या एका महिलेकडं अस्सल फोटो असल्याचं पाटलांना समजलं. तिच्याकडं फोटो होता,पण तो देव्हार्‍यात ठेवलेला होता. तिनं एक दिवसासाठी पाटलांना तो दिला. त्या फोटोला अनेक वर्षे गंध, हळदकुंक लावल्यानं आणि दुधानं धुतल्यानं ओघळ आलेले होते. त्याकाळात स्वयंपाक चुलीवर केला जायचा त्या धुरानंही तो फोटो काळपट पडलेला होता. पाटलांनी फोटो मुखपृष्ठकाराला दिला. त्यावरून चित्र काढताना जोतीरावांच्या चेहर्‍यावरचे ओघळ म्हणजे दाढी असावी असा चित्रकाराचा गैरसमज झाला.
फुल्यांनी तरूणपणात दाढी राखलेली होती परंतु पुढे त्यांनी ती काढून टाकली. ते मोठे व्यापारी, कंत्राटदार, पुण्याचे आयुक्त आणि पुणे कमर्शियल अ‍ॅंड कॉट्रॅंक्टीग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असल्यानं अतिशय टापटीपीनं राहायचे. मात्र त्याकाळात आजच्यासारखी कटिंग सलून्स नसायची. दर चार दिवसांनी केस कापणारे घरोघर जावून केस कापायचे.
जोतीरावांच्या चेहर्‍यावर दोन दिवसाचे खुंट वाढलेले होते. चित्रकारानं पठ्ठ्यानं त्याची रितसर दाढीच बनवून टाकली.
गावी पाटलांची बहीण वारल्याची तार आल्यानं पाटील गावी गेले.
इकडं मुखपृष्ठ छापून तयार झालं. पुस्तकाची बांधणी झाली.
पाटलांना पुस्तक थेट प्रकाशन समारंभातच बघायला मिळालं.
चित्रकाराची ती चुक इतकी रूजली की ती दुरूस्त करताना 60 वर्षांनी माझ्या नाकी नऊ आले. दरम्यान त्या चित्रावरून अनेकांनी तैलचित्रे तयार केली होती. महाराष्ट्र शासनानं सुद्धा असंच एक बटबटीत तैलचित्र करून घेऊन सर्वत्र लावलेलं होतं. तेही अनेक ठिकाणी रूजलं होतं.हे सारं दुरूस्त करणं सोपं काम नव्हतं. 1989 पासून प्रक्रिया सुरू करून तिची पुर्तता व्हायला 1992-93 उजाडावा लागला. पाटलांनी जमवलेल्या त्या आठवणींचं संकलन केलेलं पुस्तक मी 1993 साली "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेलं आहे.
18 एप्रिल 1884 ला जोतीरावांनी काढलेल्या त्यांच्या या फोटोची काचेची एक फूट बाय एक फूट अशी मोठ्ठी निगेटिव्ह मिळाली. त्यावरची धूळ झटकून त्यावर बरीच तांत्रिक मेहनत करावी लागली. पुण्याचे सत्यशोधक गोपीनाथराव पालकर यांच्या वाड्यात त्यांच्या वडलांच्याकडे एकुण सुमारे 200 निगेटिव्हज होत्या.
फोटोग्राफर विजय व सरोजा परूळकर यांच्याकडून तांत्रिक प्रक्रिया करून घेण्यात यश आलं.
पुढं इतरांचंही सहकार्य मिळालं, त्यात डॅा. बाबा आढाव यांचा विशेष उल्लेख करायला हवा.
आणि एकदाचं जोतीरावांचं अस्सल छायाचित्र शासनातर्फे प्रकाशित झालं.
यापुढं तरी हेच कृष्णधवल छायाचित्र सर्वत्र लावलं जाईल याची दक्षता घ्यायला हवी.
- प्रा. हरी नरके