मुंबईतील भायखळयाच्या कोळीवाड्यात हजारो गिरणी कामगार, कोळी, आग्री, कष्टकर्यांनी मिळून जोतीरावांच्या सन्मानार्थ त्यांना महात्मा ही पदवी दिला.
हा कार्यक्रम 11 मे 1888 ला झाला. या कार्यक्रमाच्या आयोजनात कामगार नेते ना. मे. लोखंडे, वंडेकर, अय्यावारू, लिंगू, केळुसकर आदींचा पुढाकार होता.
जोतीरावांच्या वयाला नुकतीच 61 वर्षे पुर्ण झाली होती. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी या समारंभाला आपला खास प्रतिनिधी म्हणून यंदे यांना पाठवलेले होते.
त्यांनी ही प्रेमाचं, आदराचं प्रतिक असलेली महात्मा पदवी स्विकारली. त्यानंतर अडीच वर्षांनी जोतीराव गेले.
आत्मा हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी आपल्याकडं वापरला जातो. 1. शरिरात असलेले चैतन्य, जीव या अर्थानं तो जसा वापरला जातो.
2. माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा दुसर्या शरीरात प्रवेश करतो, मुक्ती मिळाली नाही तर आत्मा अधांतरी राहतो. आत्मा अमर असतो अशा दुसर्या अर्थानेही आत्मा हा शब्द वापरला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर यातल्या दुसर्या अर्थानं वापरली जाणारी आत्म्याची संकल्पना नाकारली. बौद्ध विचारवंत राजा ढाले व इतर काहीजण महात्मा या पदवीऎवजी क्रांतिबा अशी पदवी वापरू लागले.
माझा क्रांतिबा ला विरोध किंवा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही.
खुद्द जोतीरावांनी पहिल्या अर्थानं आत्मा हा शब्द वापरलेला आहे आणि दुसर्या अर्थानं तो वापरला जाणं वेडेपणाचं ठरवलेलं आहे.
शरीराचे पोटी आत्मा जन्मे बेटा, दिमाखाच ताठा व्यर्थ करी,
घडामोडी सर्व स्मरणात ठेवी, तुलना करवी सर्व कामी,
झाला अनुभव टाका एकीकडे, सत्याशी वाकडे होई मुर्ख,
गुरू म्हणे आत्मा आहे निराधार,सांगे बडीवार त्याचा फार,
कुडीविना आत्मा दावीना मजला, धिक्कार गुरूला जोती म्हणे!
[महात्मा फुले समग्र वांड्मय, मुंबई, 2006, पृ.601]
शरीरात असणारं चैतन्य या अर्थानं ते म्हणतात, कुडीबाहेर म्हणजे शरीराबाहेर आत्मा नसतो.
या ठिकाणी 2 प्रश्न विचारात घ्यायला हवेत.
1. जी पदवी दस्तुरखुद्द फुल्यांनी स्विकारली, पुढची अडीच वर्षे ती वापरात होती, ती घटना आता इतिहासाचा भाग झालेली असताना ती कशी नाकारता येईल?
2. तोपर्यंत पदवी देण्याचा अधिकार स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना नव्हता तरीही ती परंपरा मोडीत काढून हजारो गिरणी कामगार, कोळी, आग्री, स्त्री-पुरूष कष्टकर्यांनी मिळून जोतीरावांच्या सन्मानार्थ त्यांना महात्मा ही पदवी दिलेली असताना ती नाकारणं म्हणजे त्या आमच्याच कष्टकरी स्त्री-पुरूष पुर्वजांच्या प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेच्या भावनेला नाकारणं होत नाही काय?
विचारार्थ सादर---
-प्रा.हरी नरके
आपल्याला काय वाटतं?
No comments:
Post a Comment