Sunday, April 9, 2017

मराठी साहित्याची श्रीमंती वाढवणारा मौलिक ग्रंथ


मराठी साहित्याची श्रीमंती वाढवणारा मौलिक ग्रंथ : अंगारवाटा... शोध शरद जोशींचा,

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे वडील पोस्टात नोकरीला होते. ते सातार्‍यात कार्यरत असताना शरद जोशींचा जन्म झाला. शरद जोशी कोल्हापूरला प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होते. ते संस्कृतप्रेमी होते. एका मित्राने तू संस्कृत भाषेचे उच्च शिक्षण घेणार असशील असं म्हटल्यानं जोशी चिडले आणि कॉमर्सला गेले. मुंबईच्या ज्या सिडनम कॉलेजमधून आजचे जगातले सर्वात महत्वाचे अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती आणि इतर अनेकजण शिकले तिथे जोशींनी उच्च शिक्षण घेतले.
मुळात उच्च दर्जाचा अर्थशास्त्रज्ञ असलेला हा माणूस आय.ए.एस.परीक्षा पास झाला. आज ज्याला यु.पी.एस.सी.ची परीक्षा म्हणतात तिला त्या काळात आय.ए.एस.ची परीक्षा म्हणत असत.  त्या परीक्षेत पास होऊनही थोडे कमी गुण मिळाल्यानं त्यांना आय. ए. एस. केडर न मिळता इंडीयन पोस्टल सर्व्हीसचे केडर मिळाले. आयुष्यभर नोकरी करून निवृत्त होताना त्यांचे वडील ज्या पदावर होते तिथून शरद जोशींनी सेवेची सुरूवात केली.
या खात्यात उच्चपदी जाण्याची संधी असतानाही त्यांनी ही नोकरी सोडली आणि ते स्वित्झर्लंडला गेले. तिथे जागतिक टपाल सेवेत आठ वर्षे त्यांनी नोकरी केली.  खूप सुखाची आणि भरपूर पगाराची असलेली ही नोकरी सोडून आपल्या पत्नीच्या व मुलींच्या इच्छेविरूद्ध ते भारतात परत आले  आणि शेती करू लागले.
शेती तोट्यात का जाते या प्रश्नाचा पिच्छा पुरवताना त्यांनी शेतकरी चळवळ उभारली.
स्वातंत्र्य चळवळीनंतरची सर्वाधिक लोक तुरूंगात गेल्याचा विक्रम करणारी ही चळवळ त्यांनी  नावारूपाला आणली. देशातला शेतीप्रश्न त्यांनीच ऎरणीवर आणला. त्यांनी शेतकर्‍यांना आत्मसन्मान दिला. स्वाभिमान दिला. "भीक नको, हवे घामाचे दाम" ही घोषणा त्यांनीच जन्माला घातली.
"इंडीया विरूद्ध भारत" अशी ठळक मांडणी करून सदैव लाथाडल्या गेलेल्या शेतकर्‍याची वेदना इंडीयाच्या वेशीवर टांगली. लक्ष्मीमुक्तीच्या आंदोलनातून दोन लाख महिलांची नावं सात बाराच्या उतार्‍यावर लावली गेली.
भारतातल्या बहुतेक प्रश्नांचे मूळ दारिद्र्यात आहे आणि या दारिद्र्याचे मूळ शेतकर्‍याच्या शोषणात आहे, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित वाजवी दाम मिळाल्याशिवाय हे दारिद्र्य दूर होणार नाही हे त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं समजावून सांगितलं.  शेतीचं खरंखुरं अर्थशास्त्र मांडलं.
पंतप्रधान व्ही.पी.सिंग जोशींचे मित्र होते. जोशींनी राज्यसभेचं खासदार व्हावं अशी त्यांची इच्छा होती. जोशींनी मात्र त्या खासदारकीसाठी प्रकाश आंबेडकरांचं नाव सुचवलं. आंबेडकर खासदार झाले पण त्यांनी आपलं नाव शरद जोशींनी सुचवलं होतं असं कधीही म्हटलं नाही.
देशाचं पंतप्रधानपद मिळवण्याची पात्रता असलेला हा माणूस. त्यांच्या सभेला वक्ते म्हणून उपस्थित असलेले अटलजी, चरण सिंग, चंद्रशेखर, व्ही.पी.सिंग पुढे पंतप्रधान झाले. महाराष्ट्रातल्या चार माणसांमध्ये ही क्षमता असूनही ज्यांना ते पद मिळालं नाही त्यातले सगळ्यात उपेक्षित शरद जोशी.
हा माणूस योद्धा होता. दणकट होता. त्यानं बावीस वेळा शेतकर्‍यांसाठी तुरुंगवास भोगला. तब्बेतीकडं दुर्लक्ष करून एस.टी.च्या लाल डब्यातून प्रवास करीत दहा हजार सभा गाजवल्या. 16 पुस्तकं लिहिली. शेकडो कार्यकर्त्यांना नाव मिळवून दिलं. शरद जोशींवर शेकडो केसेस दाखल झालेल्या होत्या.
शरद जोशी अफाट प्रतिभेचे नेते होते. तुफान वक्ते होते. ते फटकळ, काहीसे उद्धट, महत्वाकांक्षी आणि कोरड्या स्वभावाचे होते. आपल्या नशिबी श्रेयहिनताच लिहिलेली आहे याची पुर्वकल्पना असूनही ते अविरतपणे लढत राहिले. कोट्यावधी रूपये कमवण्याची क्षमता अंगी असलेल्या या माणसानं अनेकदा खिसा खाली असल्यानं कार्यकर्ते, मित्र यांच्याकडून मिळालेल्या शेसव्वासे रूपयांवर गुजराण केली. त्यांचे हे हालाखीचे दिवस वाचताना डोळे पाणावतात. त्यांच्या  पत्नीनं आत्महत्या केली. दोन्ही मुली परदेशात गेल्या. तिकडेच स्थाईक झाल्या. एकटा पडलेला हा योद्धा आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी एकाकी झुंजत राहिला. आपल्या जवळच्या  नातेवाईकांनीसुद्धा आपल्याला एक वाया गेलेला मुलगा म्हणून हिनवावं याचं त्यांना  वाईट वाटायचं.
मी त्यांना अनेकदा भेटलो होतो.
त्यातल्या दोन प्रदीर्घ भेटी तर कायमच लक्षात राहिल्या. चाकणला रोटरी क्लबतर्फे माझं महात्मा फुल्यांवर भाषण होतं. त्यावेळेला शरद जोशी राष्ट्रीय पातळीवरचे नेते असूनही ते श्रोत्यांमध्ये येऊन बसले होते. श्रोत्यांमध्ये त्यांना
बसलेलं बघून  मला भाषण करताना  खूप टेन्शन आलेलं होतं. भाषण संपल्यावर ते स्टेजवर आले. त्यांनी पाठीवर थाप मारून मला दाद दिली. ध्रुवशेट कानपिळे यांच्याकडं बसून आम्ही तासभर गप्पा मारल्या. आम्ही एकत्र जेवन केलं.
दुसरा प्रसंग एस.एम. जोशी वारले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला शरद  जोशी आले होते. तिथे गोविंद तळवलकरही आलेले होते. दोघांमधून विस्तवही जात नव्हता. गोविंदरावांनी म.टा.मधून  जोशींची कायमच  सालटं काढलेली होती. त्या अंत्ययात्रेत साने गुरूजी स्मारक, सारसबाग, टिळकरोड ते वैकुंठ स्मशानभुमी असा सुमारे तासाभराचा पायी प्रवास करताना माझ्या खांद्यावर हात टाकून जोशीसर मला असंख्य गोष्टी सांगत होते.
शरद  जोशींचं सारंच आयुष्य हे चमत्कार वाटावा असं मौलिक आणि गूढ  होतं.
त्यांच्या कार्याचं, स्वभावाचं, योगदानाचं अतिशय साक्षेपी चित्रण करणारा ग्रंथ प्रसिद्ध लेखक, संपादक श्री. भानू काळे यांनी लिहिला आहे. हा 534 पृष्ठांचा  अतिशय मौलिक ग्रंथ आहे. तो पुण्याच्या उर्मी प्रकाशनानं अवघ्या 500 रूपयांना दिलेला आहे.
मराठीमध्ये गेल्या अनेक वर्षात असा महाग्रंथ लिहिला गेला नव्हता.
या चरित्र ग्रंथासाठी काळे यांनी आपल्या आयुष्यातील दहापेक्षा जास्त वर्षे अभ्यासात घालवली. साधनं जमवण्यासाठी, जोशींच्या सहकारी, मित्र, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी काळे देशविदेशात गेले. शेकडो ग्रंथ, हजारो लेख आणि अक्षरश: लाखो दस्तावेज त्यांनी धुंडाळले.
हे पुस्तक एकदा हातात घेतलं की वाचून पुर्ण होईपर्यंत खाली ठेवता येत नाही. शरद जोशी हा अफाट माणूस समजावून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. विशेष म्हणजे ही जोशींची केवळ विभुतीपुजा नसून अतिशय साक्षेपानं चरित्र नायकाच्या गुणदोषांचा धांडोळा घेणारा हा ग्रंथ  झालेला  आहे. अनेक घटना वाचकांपुढं प्रथमच आणणारा हा ग्रंथ म्हणजे चाकण ते स्वित्झर्लंडपर्यंत शेकडो जणांना भेटून केलेलं एका दैदिप्यमान कालखंडाचं अपुर्व दस्तावेजीकरण होय.
अतिशय वाचनिय, प्रभावी आणि मौलिक ग्रंथ लिहून भानू काळे या व्यासंगी लेखकानं भारतीय भाषांमधला गेल्या दोन दशकातला सगळ्यात महत्वाचा संदर्भग्रंथ आपल्याला दिलेला आहे.
शिक्षणयात्रा, व्यावसायिक जगात, डोंगरकुशीतल्या नंदनवनात, मातीत पाय रोवताना,उसाचे रणकंदन, धुमसता तंबाखू, पांढरे सोने,लाल कापूस, शेतकरी संघटना : तत्वज्ञान आणि उभारणी, अटकेपार, किसानांच्या बाया आम्ही, राजकारणाच्या पटावर, राष्ट्रीय मंचावर जाताना, सहकारी आणि टिकाकार, अंगाराकडून ज्योतीकडे :शोध नव्या दिशांचा, साहित्य आणि विचार, सांजपर्व अशी 17 प्रकरणं आणि 5 परिशिष्टं असलेला हा ग्रंथ आहे.
हे पुस्तक वाचून खुप अस्वस्थता आली. असा नेता आणि असा चरित्रग्रंथ हे मानवतेची श्रीमंती वाढवतात. आजच्या समकालीन जगण्याला ऎतिहासिक मोल प्राप्त करून देणारा हा योद्धा पुरूष मध्यमवर्गियांच्या कायम हेटाळणीचा विषय राहिलेला आहे.
"आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची आहे" असं रोखठोक सत्य सांगणार्‍या शरद जोशींची आपण कायम उपेक्षाच केली, आता या ग्रंथाचीही उपेक्षाच करणार का?
[अंगारवाटा... शोध शरद जोशींचा, भानू काळे, उर्मी प्रकाशन,पुणे, 12 डिसेंबर, 2016, पृष्ठे 510+ 24 आर्टप्लेट्स, किंमत  500 रूपये ]
पुस्तकासाठी संपर्क :-
प्रा.सुरेशचंद्र म्हात्रे,
शेतकरी संघटना,
अंगारमळा, आंबेठाण, ता.खेड, जि.पुणे,410 501,
फोन. 98223 00348,
अनंतराव देशपांडे, 86683 26962, 94035 41841,
लेखकाचा संपर्क :- bhanukale@gmail.com

No comments:

Post a Comment