Tuesday, April 11, 2017

कमिशनर फुले : शेअर मार्कॆट

पुणे शहराचे कमिशनर म्हणून जोतीराव फुले यांनी १८७६ ते १८८३ अशी सात वर्षे काम केले. शहराला बंद नळाद्वारे पाणी मिळावे, रस्ते, बागा, ग्रंथालये, शाळा, दवाखाने उभारले जावेत यासाठी ते झटले. शहराचे आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यावर त्यांनी भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गव्हर्नर जनरलच्या पुणे भेटीच्या काळात रोषनाई व हारतुरे यावर अवास्तव खर्च न करता तो पैसा शाळा उभारण्यासाठी खर्च करावा असा बाणेदारपणा त्यांनी दाखवलेला होता. आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.
दारू विक्रीचे परवाने द्यायला त्यांचा विरोध होता.ते लिहितात, "थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा. तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा. देऊ नका थारा वैरभावा." दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.
जोतीरावांनी शेयर मार्केटवर अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यातून या धंद्यात काय खबरदारी घ्यावी लागते, हा धंदा करताना कोणकोणती कौशल्ये असायला हवीत अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केलेले आहे.
उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.
‘सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!
उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!
सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!
नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!
तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!
उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!
आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!
आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!
नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!
उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!
अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!
कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
‘महापराक्रमी’ हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.
शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!
शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!
लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.
लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.
त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.
उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.
- प्रा.हरी नरके
.................
संदर्भ --
1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991 

No comments:

Post a Comment