Monday, July 2, 2018

संमेलनाध्यक्षपद-निवड की निवडणूक?

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे एक सन्मानाचे पद आहे. या पदासाठी प्रतिभावंताला निवडायचे की लोकप्रिय साहित्यिकाला असा पेच गेली 40 वर्षे आपण पाहिला. मंचावर राजकारणी हवेत की नकोत असा एक लुटुपुटूचा वाद दरवर्षी खेळला जायचा. एका जाणत्या राजकीय नेत्याने आजवर उद्घाटकपदाचा सन्मान इतक्यांदा मिळवलाय की संमेलनाची शताब्दी होताना उद्घाटकपदाची त्यांचीही सेंच्युरी झाली पायजेलाय!

पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबादच्या मूळच्या चार जुन्या साहित्य संस्था  आणि इतर काही समाविष्ठ संस्था व स्वागत समिती यांच्या हजारेक मतदारांमधून सर्वाधिक मतं कशी मिळवायची याचं तंत्र तयार केलं गेलं. अनेक वर्षे निजामशाहीत राहिल्यानं विकासाचा फार मोठा बॅकलॉग असलेल्या मराठवाडा पॅटर्ननं यात यश मिळवायला सुरूवात केली. ही मुसंडी इतकी मोठी आणि सातत्यपुर्ण होती की कौतुकरावांचा गंडा बांधल्याशिवाय संमेलनाध्यक्ष होताच येत नाही असं बोललं जाऊ लागलं.

नागपुरकर श्रीपाद भालचंद्र जोशी महामंडळाचे अध्यक्ष झाले आणि निवडणुक नको सन्मानाने निवड करावी याचं पारडं जड झालं. निर्णय झाला. महामंडळाचे नी श्री.भा.जोशींचे अभिनंदन.

निवड की निवडणुक या दोन्ही बाजूंची काही तगडी भुमिका आहे. आता त्यावर फड रंगू लागले.
गंमत म्हणजे हिरीरिने निवडणुक लढवून, जिंकून अध्यक्ष झाल्यावर बहुतेकांनी निवडच करायला हवी असे सूर लावले.

निवडणुकीला आपण उभं राहणार नाही अशी तात्विक भुमिका असल्यानं ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर, विजय तेंडूलकर, मालती बेडेकर, जी.ए.कुलकर्णी, मंगेश पाडगावकर, रा.चिं. ढेरे असे अनेक दिग्गज योग्यता असूनही अध्यक्ष होऊ शकले नाहीत. निवडणुकीच्या तंत्राचं गणित न जमल्यानं बा.भ.बोरकर, इंदिरा संत, ह.मो.मराठे, भारत सासणे, प्रभा गणोरकरांना पराभव पत्करावा लागला. दया पवार, शिवाजी सावंत निवडणुकीची धावपळ चालू असतानाच गेले.

अरूण कोलटकर, बाबूराव बागूल, दि.पु.चित्रे, नामदेव ढसाळ निवडणुकीच्या भानगडीत पडलेच नाहीत. तर भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, शहाणे यांचा आजही निवडणुकीला किंवा संमेलनाच्या जत्रेलाच विरोध आहे.

लोकशाही हवी तर मग ती सर्वच क्षेत्रात हवी, साहित्य संमेलनाला उभं राहण्यात कसला आलाय अपमान? असं काही विचारतात तर काही म्हणतात संमेलनाध्यक्षपद काय झेड.पी. अध्यक्षपद आहे काय निवडणुकीला उभं राह्यला?

मतदार यादीवर नजर टाकली तर त्यात थोडेफार साहित्यिकही असायचे.
कार्यकर्तेही असायचे. हौशी लोकही असायचे.

संमेलनाचा राजकीय डोलारा सांभाळायला राजकीय क्षेत्रातले स्वागताध्यक्ष असतात. त्यांच्यासोबत टिकायचे तर कार्यकर्ते नी हौशी लोकही नकोत?

चिपळूणला श्री सुनिल तटकरे स्वागताध्यक्ष होते. राजकारणी स्टेजवर हवेत की नकोत अशी चर्चा चालू होती, ते अगदी उत्स्फुर्तपणे म्हणाले, " आता संमेलनाला साहित्यिकांनीही यावं ना!
आमची काय हरकत नाय!"

ऎतिहासिक आणि मार्मिक उद्गार!!!

दरम्यान विद्रोहीवाल्यांच्या एकाच्या आठ दहा चुली झाल्या. मुदलात त्यातल्या किती जणांचा साहित्याशी संबंध आहे?

आजकालच्या निवडणुकांमध्ये कौन बनेगा विजेता या खेळात सरशी कोणाची व्हायची? सांस्कृतिक वर्चस्व कोणाचे यावरून संघर्ष कसा रंगायचा? कोट्यावधी रूपये संमेलानावर कोण खर्च करू शकतो? गेल्या चाळीस वर्षात परिसंवादाचे विषय, वक्ते, कवी फारसे का बदलले गेले नाहीत?

निवडीच्या नव्या काळातही प्रा. गणेश देवी, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. आ.ह.साळुंखे, प्रा. श्याम मनोहर, किरण नगरकर, ना.धों. महानोर, अरूणा ढेरे, अनिल अवचट, सानिया, आशा बगे अशांना हा सन्मान मिळेल का?  नेमाडे, पठारे, शहाणे यांना संमेलनाच्या मांडवात आणण्यात महामंडळ नी आयोजक यशस्वी होतील का?
बघूयात. नव्या पद्धतीला थोडा वेळ देऊयात.

गेल्या 141 वर्षात झालेल्या 91 साहित्य संमेलनांमध्ये आजवर निवड अथवा निवडणुकीद्वारे माझ्या मते 21 प्रतिभावंतांना हा सन्मान मिळालेला आहे. म.गो.रानडे, चिं.वि.वैद्य, ह.ना.आपटे, श्री.व्यं.केतकर, वि.दा.सावरकर, वि.स.खांडेकर, प्र.के.अत्रे, वि.द.घाटे, लक्ष्मणशास्त्री जोशी, वि.वा.शिरवाडकर, वि.भि.कोलते, पु.ल.देशपांडे, दुर्गा भागवत, गं.बा.सरदार, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, विश्राम बेडेकर, नारायण सुर्वे, य.दि.फडके, अरूण साधू, सदानंद मोरे. त्यांची निवड काळाच्या आणि गुणवत्तेच्या निकषावर महत्वपुर्ण ठरलेली आहे. [ या नावांमध्ये आजवर झालेल्या अध्यक्षांमधील आणखी दहाएक नावांचा समावेश व्हायला हवा]   [ याचा अर्थ उरलेले 60 अध्यक्ष महत्वाचे नव्हते असे मात्र नव्हे. व्यक्तीपरत्वे ही यादी बदलू शकते. यात व्यक्तीगत आवडनिवड आणि आकलन यामुळे फरक होऊ शकतो. ]


-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment