डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे राज्य शासनाने आजवर 22 खंड प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या खंड 17 ते 22 चे संपादन करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली.
आजकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातले काही शब्द तोडून मोडून, संदर्भ सोडून वापरण्याची आणि युवकांना बुद्धीभेदाचे आणि विद्वेषाचे बाळकडू पाजण्याची मोहीम काही देशविघातक शक्तींनी हाती घेतलेली आढळते. हे लोक वारंवार मागचे पुढचे संदर्भ वगळून सांगत असतात की, बघा बाबासाहेबांनी कसा अमक्याचा गौरव केला होता, तमक्याची स्तुती केली होती. बाबासाहेबांच्या साहित्याचा सखोल अभ्यास न करता आपल्याला सोयीचे असलेले तुकडेच फक्त सामान्य माणसाच्या तोंडावर फेकायचे [व्हॉटसापायचे] आणि त्याच्या मनात गोंधळ निर्माण करायचा हा कट फार मोठा असावा.
अशावेळी विरोधकांना अंडर इस्टीमेट न करता, कोणतेही व्यक्तीगत कुत्सित शेरे न मारता, अतिशय शांत डोक्याने या मोहीमेचा सप्रमाण प्रतिवाद करायला हवा. अन्यथा याच गोष्टींना उद्या ते पुराव्यांचे संच बनवून बाजारात आणतील आणि आपला अंधार पेरण्याचा उद्योग भरभराटीला नेतील.
या ऎतिहासिक वैचारिक लढाईचे नेतृत्व देशाचे कायदा मंत्री म्हणून 1947 ते 1951 या 5 वर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करावे लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा चौदावा खंड [भाग 1 व 2] 16+1385= 1401 पृष्ठांचा आहे.
त्यात भारताच्या संसदेत या कायद्यावर झालेल्या विस्तृत चर्चांचा समावेश आहे. देशाचे कायदा मंत्री म्हणून ना.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या चर्चांना उत्तरे द्यावी लागली, खासदारांच्या प्रश्नांचे समाधान करावे लागले, ते सारे या ग्रंथात आलेले आहे. ते आपण मुळातून वाचायला हवे.
सभागृहात अनेकदा खडाजंगी चर्चा होत. खासदारांमध्ये अनेक सनातनी सभासद होते. "हिंदू धर्म खतरे में हैं!" अशी पेटंट पण खोटीच आवई ते वारंवार उठवित असत. सभागृहाबाहेर यावर लेख-अग्रलेख लिहिले जात, परिसंवाद झडत, मोर्चे काढले जात. सारा देश या चर्चेने ढवळून निघाला होता. बाबासाहेबांना घेरण्याचे राजकारण शिजत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुलत: अव्वल दर्जाचे बॅरिस्टर होते. आपल्या विलक्षण युक्तीवादांनी ते भल्याभल्यांची भंबेरी उडवित असत. त्यांचा व्यासंग अतिशय दांडगा होता. हिंदू धर्माचे जुने कायदे हे श्रुती [वेद], स्मृती, धर्मशास्त्र म्हणून मान्यता पावलेले अन्य ग्रंथ यांच्यावर आधारलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत संदर्भ दिल्यानुसार नुसत्या स्मृतींची संख्या 137 एव्हढी होती. त्यात याज्ञवल्क्य स्मृती, मनु स्मृती, पराशर स्मृती अशांचा समावेश होता. ते केवळ धार्मिक ग्रंथ नव्हते तर ते कायद्याचे ग्रंथ होते. ते लिगल अॅंड पिनल असलेले ग्रंथ होते.
नवे कायदे बनवताना जुन्यांचे संदर्भ, तपशील चर्चेत पुरवावे लागतात, खंडन-मंडन करावे लागते. कायदेशीर युक्तीवाद करावे लागतात. 5 वर्षे बाबासाहेब या विषयावर एकाकी झुंजत होते.
या वादात बोलताना बाबासाहेबांनी सनातनी हिंदूंना प्रिय असलेल्या ग्रंथांतील तरतुदींचा एक स्ट्रॅटेजी [रणनिती] डावपेच म्हणुन उल्लेख केला, कोणा स्मृतीकाराचे नाव घेतले की बघा-बघा तुमच्या बाबासाहेबांनी आमच्या अमक्यातमक्याचा कसा गौरव केलाय अशी हाकटी पिटणे हा अप्रामाणिकपणा झाला. संशोधनाची शिस्त ज्यांना पाळायची नसते ते तमाम मंबाजी-आंबाजी असलेच कुटील डाव खेळणार!
ते उल्लेख करण्यामागे बाबासाहेबांचा उद्देश काय होता, हेतू काय होता हे बघणे महत्वाचे आहे. त्यांना हिंदू कायद्यातली आपली नवी दुरूस्ती कशी आणि का महत्वाची आहे हे पटवून द्यायचे असायचे की त्या जुन्या ग्रंथांचा, ग्रंथकारांचा उदोउदो करायचा असायचा हे बघणे अत्यावश्यक आहे.
अन्यायकारक जुने सगळेच जेव्हा मोडीत काढायचे असते, नाकारायचे असते तेव्हा मूळ ग्रंथांचे संदर्भ द्यावेच लागतात.
संविधानाच्या कलम 13 मध्ये बाबासाहेबांनी सगळा विषमतावादी मनू मोडीत काढलेला असताना ज्यांना त्यातही मनूचा गौरवच दिसत असेल ते खरेच धन्य होत.
विख्यात संस्कृततज्ञ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांच्याकडून मूळ संस्कृतातली मनुस्मृती अभ्यासून ती त्यांनी महाडला साधूसंतांच्या हस्ते 25 डिसेंबर 1927 ला जाळली होती.
बाबासाहेबांच्या शेकडो भाषणांमध्ये आणि पुस्तकांमध्ये त्यांनी ज्या मनूचे वाभाडे काढलेले आहेत, जो मनू 2200 वर्षांपुर्वीच्या कालबाह्य झालेल्या समाजव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता त्याचा गौरव जे न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या आधुनिक वैश्विक मुल्यांचे पुरस्कर्ते होते ते बाबासाहेब करतील हे केवळ अशक्य होय.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment