Tuesday, July 3, 2018

मीटर नेहमी चालू राहायला पाहिजे

किडन्या काढण्यासाठी लहान मुलं पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा ग्रामस्थांनी पाच जणांना ठार केलं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे हे लोक ज्योतिष सांगून गावोगाव भटकत जगत होते. जगाचं भविष्य सांगणारांना आपलं स्वत:चं मात्र भविष्य काही कळलं नसणार! अन्यथा असा अकाली आणि भीषण हिंसक मृत्य़ू वाट्याला न येता. गावकर्‍यांमध्ये एव्हढं क्रौर्य कुठून येतं? हा शुद्ध रानटीपणाय. माणसं मारण्याचा, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.

आता चार दिवस सहानुभुतीचा धुरळा ऊठेल. त्यांचे नेते प्रकाशझोताने आणखी मोठे होतील. लाचार भटके मात्र भिक मागत पुन्हा येरे माझ्या मागल्या करीत भटकतच राहतील.

हे भटक्या जमातींचे लोक आपापल्या परिसरातील शेतांमध्ये किंवा जवळपासच्या कारखाण्यांमध्ये मजुरी का करीत नाहीत? असे गावोगावी भटकत जगण्यात नेमके काय सुख असते?

भटक्यांचे राष्ट्रीय नेते गेली 50 वर्षे नेमकी कसली चळवळ करताहेत? ते त्यांना व्यवसाय परिवर्तन करायला का शिकवित नाहीत? सन्मानाने जगायला का सांगत नाहीत? लाचारी, व्यसनं सोडायचा संस्कार का करीत नाहीत? त्यांचं कायमचं पुनर्वसन का करीत नाहीत?

मुंबईतल्या प्रत्येक मंदिरासमोर, फोर्टमधल्या हरेक फूटपाथवर अनेक बायका गाई घेऊन बसलेल्या असतात. त्यांच्याकडे हिरवा चारा असतो. कणकेचे लाडू असतात. भाविक ते विकत घेतात आणि श्रद्धेने गाईला खाऊ घालतात. चाराही त्याच बाईचा, गायही तिचीच आणि तरीही भाविक खिशातले पैसे खर्चून त्या गाईला खाऊ घालण्यासाठी आतुर असतात हे काय गौडबंगाल असते?

मुंबईच्या चेंबूरजवळ असलेल्या पांजरापोळ भागात दोनेक हजार झोपड्यांमध्ये डवरी गोसावी राहतात. या बायका भल्या पहाटे ऊठतात, तबेल्यात जातात, दूध काढलेली गाय भाड्याने घेतात. हिरवा चारा आधल्या दिवशीच विकत घेतलेला असतो. या बायका या भाडोत्री गाया घेऊन आपापल्या वतनात जातात. यांच्या बसण्याच्या ह्या जागा वर्षानुवर्षे ठरलेल्या असतात. फिक्स असतात. त्याचंही भाडं स्थानिक दादांना द्यावं लागतं.

मंदिरात दर्शनाला येणारे भाविक खिशातले पैसे खर्चून चारा किंवा लाडू विकत घेतात, गाईला खायला घालतात, नमस्कार करतात. त्यातून पापांपासून त्यांना मुक्ती मिळते. लाभणार्‍या पुण्यातून परत नवी पापं करायला ते नव्या दमानं कामाला लागतात. पुण्यं कमावण्याचा शॉर्टकट मार्ग.

सगळेच पापी असतात असंही नाही. अनेक भाबडे असतात. देवभोळे गोभक्त असतात.

दिवसभराचा बिजनेस झाला की ती बाई तबेल्यात गाय नेऊन जमा करते. गवळ्याला गायीमागे दरडोयी 200 ते 300 रूपये भाडं देते. गवळ्याचा चार्‍याचा खर्च वाचतो. गाय सांभाळायचीही कटकट वाचते. बसल्या जागी गायीमागे 200 ते 300 रुपये त्याला मिळतात. दुधाचा पैसा मिळतो तो वेगळाच.

त्या बाईला 100 पासून 500 पर्यंत कमाई उरते. या बहुतेक सगळ्या बायका नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या असतात. त्या दिवसरात्र गोभक्ती करतात तेव्हा संध्याकाळी त्यांची चूल पेटते.

त्यांचे नवरे काय करतात?

बहुसंख्य नवरे दिवसभर हातभट्टीची मारून टूण्ण झालेले असतात. बायको घरी आली की तिला मारझोड करून तिने कमावलेले अर्धे पैसे हिसकावून घेतात, पुन्हा हातभट्टीवर नाहीतर देशी दारूच्या दुकानावर जातात नी दारू ढोसतात. राष्ट्रीय कार्यक्रम. शॉर्टकटनं, मेहनत न करता जगण्याचा परंपरागत मार्ग.

बापानं दररोजची आईला दारू पिऊन केलेली ही मारहाण बघून मुलगेही यात पटाईत होतात. शाळेत जा, शिका, अभ्यास करा, या भानगडीपेक्षा शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या धंद्यातले तेही "तज्ञ" बनतात. एक्स्पर्ट बनतात. येरे माझ्या मागल्या--- अशा रितीने आपली उज्वल परंपरा अबाधित ठेवतात.

मध्यंतरी मुंबई मनपाने या बायकांना गाया घेऊन बसायला बंदी केली. चुली पेटेनाशा झाल्या. बायका पोरं उपाशी मरू लागले.

काही तळमळीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनाला आणली. काही विवेकी संपादक मित्रांनी यावर लेख लिहिले. ओळखीतनं वाहिन्यांनी बातम्या दिल्या. आवाज उठवला.
मी एका ओळखीच्या मंत्री महोदयांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहिले, फोन केला.
बंदी उठली. प्रश्न सुटला.

भटक्यांचे एक राष्ट्रीय नेते माझ्यावर नाराज झाले. म्हणाले, " एक मोठे वकील होते. त्यांचा मुलगाही वकील झाला. त्याने 20-25 वर्षे प्रलंबित असलेली केस जिंकली. कौतुकानं बातमी पित्याला सांगितली. पिताश्री म्हणाले, "तू मुर्ख आहेस. अरे तुझं सगळं शिक्षण मी याच तर केसच्या फिमधून केलं होतं. तुझ्या मुलाचं शिक्षण कसं होणार?"

कथेचा अर्थ मला समजला नाही.

राष्ट्रीय नेते म्हणाले, "गेली 50 वर्षे मी भटक्यांचा राष्ट्रीय नेता कशामुळे आहे? माझ्या पुढच्या पिढीचीही मौजमजा कोणाच्या पैशावर चालूय? आम्ही काहीही कामधंदा न करता राजेशाहीत जगायचं असेल तर या वंचितांना असंच ठेवलं पाहिजे. त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटले तर आम्ही मेलोच. माझ्या अनेक पिढ्यांची रोजगार हमी योजना संपवायला निघालायस काय? प्रश्न कायम राहिले तरच आमचे नेतृत्व टिकणार ना? तरच आम्ही लेख लिहिणार. वाहिन्यांवर पोपटपंची करणार. तरच आम्हाला पुरस्कारबिरस्कार मिळणार. आम्ही मेनबत्ती मोर्चे काढणार. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई मिळवून देण्याच्या बहाण्याने आमचीही व्यवस्था भागवणार! मीटर नेहमी चालू राहायला पाहिजे. टाकी कायम फुल राहिली पाहिजे."

नेते दर वर्षा दोन वर्षाला मेळावे, परिषदा, शिबिरं घेतात. त्यासाठी दरडोई पट्टी [ वर्गणी ] जमा करतात. डोळ्यातून हुकमी आसवं काढतात. भाषणातून तळमळीची गाणी गातात. गयावया करतात. बातम्या, लेखमाला छापून येतात. पुरस्कार नेत्यांचे घर चालत येतात. बाय द वे हे राष्ट्रीय नेते डवरी गोसावी नाहीत बरं का! जागृतीच्य नावावर अंधार पेरण्याचा यांचा पिढीजात धंदा आहे. आतातर त्यांची पुढची पिढीही यात वाकबगार झालीय.

उपेक्षित, वंचितांच्या समस्या कायम आहेत म्हणून तर हे नेते मजेत जगताहेत. नी वंचित असे कुत्र्याच्या मौतीनं मरताहेत.

ते यांना गावोगाव फिरण्याऎवजी शिकण्याचा, भिक न मागता स्वाभिमानानं जगण्याचा, दारू सोडण्याचा, बायकांना मारहाण न करण्याचा, छोट्यामोठ्या चोर्‍यामार्‍या न करण्याचा, लाचारीनं न जगण्याचा, व्यवसाय परिवर्तनाचा मार्ग का सांगत नाहीत?

आयतं खाण्यात, लाचारीनं जगण्यात जी मजा आहे ती कष्टात कशी असणार भाऊ? कष्ट, मेहनत, घाम गाळणं हे तर मुर्खांचे उद्योग.
मेहनत न करता जगण्याचा, शॉर्टकटनं पैसे कमावन्याचा हा परंपरागत मार्गच महत्वाचा.

बदल घडतच नाही असं मात्र नाही. पण त्याचा वेग अतिमंद आहे. या गतीनं आणखी शेदीडशे वर्षं हे लोक असेच भटकत राहणार. लाचारीनं मरण जगत राहणार.

राष्ट्रीय नेत्यांच्या वीसेक पिढ्या सराईतपणे खोटं बोलून, नक्राश्रू ढाळीत त्यांना आणि संवेदनशील मध्यमवर्गीयांना लुटत राहणार. अशा घटना तर नेत्यांसाठी महापर्वच!
-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment