Monday, July 2, 2018

डॅाक्टरांची पहिली भेट

लहानपणी मला इंजेक्शनची फार भिती वाटायची. आमच्या घरी तिला सुई टोचणे असं म्हणायचे. मी शाळेत जाण्यापुर्वी सायकल शिकलो होतो. त्याकाळात सायकल दुकानातून सायकल 1 तास भाड्यानं घ्यायला 10 पैसे भाडं असायचं.
सायकल शिकताना अर्थातच रितीप्रमाणे भरपूर वेळा पडलो होतो. जखमा झाल्या होत्या. काहीतर खूप खोलवरच्या होत्या. त्याजागी कायमचे व्रण तयार झाले होते. पण वेगात सायकल चालवायला मला आवडायचं.

मी ज्या स्मशानात साफसफाईचं काम करायचो त्याच्या शेजारी एक पोल्ट्रीफार्म होता.

त्यांना संध्याकाळी काही कामगार हवे होते. शाळेतून आल्यावर मी तिकडे कामाला लागलो. संध्याकाळी 6 ते रात्रौ 10 माझी ड्युटी असायची. कोंबड्यांना खाद्य,पाणी देणं, अंडी जमा करणं, कोंबड्याची घाण काढणं, ही कामं करायचो.
त्याच्या बदल्यात महिना आठ रूपये नी आठवड्याला 2 अंडी मिळायची.
महिन्यातून एकदा कोंबडीही दिली जायची. शिवाय किरकोळ आजारानं मेलेली कोंबडी फेकून देण्याऎवजी आम्ही खात असू.

पोल्ट्रीफार्मवर केंद्राच्या सुरक्षेसाठी काही कुत्री पाळलेली होती. त्यांच्यासाठी घोरपडीहून बडेका गोस्त आणावे लागे. जोशीसर ते शिजवून कुत्र्यांना खायला घालत. कधीकधी आपणही ते खातो असं ते आम्हाला सांगत. चवीला कोंबडीपेक्षा मस्त लागतं असं ते म्हणत.
आमच्या घरी बोलाई असल्यानं तसलं मटण आम्हाला चालत नसे.

वरच्या घोरपडीवरून बडेका गोस्त आणण्याची जबाबदारी माझी असे.
घोरपडीला रेल्वेची दोन फाटकं होती. एक वरचं आणि एक खालचं. बर्‍याचदा ती फाटकं रेल्वे किंवा मालगाडी आल्यानं बंद केली जायची. मग तुंबळ ट्रॅफिक जमायचं. तितक्यात एखादा मदारी, गारूडी, "जमुरे बजाव ताली" म्हणून आपल्या पोतडीतून साप बाहेर काढायचा आणि त्याचे खेळ करायचा. मी खेळ बघत थांबायचो. मजा यायची.

एकदा त्यानं घोषणा केली की आता तो मुंगुस आणि साप यांची लढाई लावणार आहे. मुंगुस नागाला कसा मारून टाकतो ते तो दाखवणार आहे. मला जाम उत्सुकता वाटली.

त्यानं थोडा टाइमपास केला आणि अचानक घोषणा केली जमलेल्या सगळ्यांनी आपापल्या खिशातले पैसे नागदेवतेला दुध पाजण्यासाठी गारूड्याला द्यावेत. जे लोक खिश्यात पैसे असूनही देणार नाहीत त्यांच्या खिशातले पैसे गळून पडतील. हरवतील.
मी जाम टरकलो. पैसे आहेत पण ते आपले नाहीत.

बडेका गोस्त घेतल्यानंतर परत आलेले 20 पैशे माझ्या खिशात होते.

पण ते जोशीसरांना परत द्यायचे होते. नस्ते दिले तर माझी नोकरी गेली असती.

मी गर्दीतून हळूच सटकलो.
खिशातले पैसे चाचपून पाहिले.
सायकलवर टांग मारली आणि वेगानं पोल्ट्रीफार्मकडे निघालो. घोरपडी कॅंटोन्मेंटमधला रस्ता सुनसान होता.
मला खूप घाम फुटला होता. पैसे हरवले तर काय करायचं? या चिंतेनं मी परेशान झालो होतो. जोरजोरात सायकलचे पेडल मारत होतो. प्रचंड घाबरलो होतो.

धोबीघाटाच्या उतारावरून जाताना रस्त्याच्या कडेला मला एक नाग सळसळत जाताना दिसला. मी आणखी घाबरलो.
त्या गारूड्याचा नाग आपल्या खिशातले पैसे घ्यायला आला असावा असं मनात आलं नी मी हादरलो.

बहुधा लक्ष विचलित झालं नी सायकल एका खड्ड्यात आदळली. सायकलनं जोरदार कोलांटउडी मारली. मी जोरात फेकला गेलो.

नंतर मला समजलं की मला जबरा मार लागला होता नी मी बराच वेळ रस्त्याकाठी बेशुद्ध पडून होतो.

इतका उशीर झाला तरी मी कसा आलो नाही म्हणून जोशीसर मला शोधायला रस्त्यावर आले. बघतात तर काय धोबीघाटाच्या उतारावर मी बेशुद्ध पडलेलो. खूप रक्त गेलेलं. त्यांनी मला उचललं, एका रिक्षात घातलं नी घोरपडीच्या एका डॅाक्टरकडं नेलं.

डॅाक्टरांनी मला एक सुई टोचली. मुंगी चावल्यासारखं वाटलं.
थोड्या वेळानं मी शुद्धीवर आलो.
बघतो तर काय खिशातले 20 पैसे गायब झालेले.

जखमा खूप दुखत होत्या. माझा पुढचा एक दात मुळासकट उखडून पडलेला होता. आता आपली नोकरी जाणार याची भिती वाटू लागली होती. 20 पैशांचं काय झालं ह्याबद्दल काय सांगायचं?

त्या रात्री पोल्ट्रीफार्मचे सुपरवायझर कर्वेसर माझ्याजवळ दवाखाण्यात थांबले.
दुसर्‍या दिवशी मला घरी सोडण्यात आलं.

मी घोरपडीहून चालत घरी निघालो. पायाला, हाताला, डोक्याला सगळीकडे मार लागलेला. टाके पडलेले.

धोबीघाटाजवळ आलो नी मला परत भिती वाटायला लागली.

पण तो साप तिथे नव्हता. माझी सायकलही नव्हती.
मात्र रस्त्याच्या कडेला गवतात माझे 20 पैसे पडलेले होते.
बाजूलाच माझा तो मुळासकट उखडलेला दातही पडलेला होता.

म्हणजे, तो गारूडी खोटं बोलला होता तर!

माझ्या खिशातले पैसे तर मला परत सापडले होते.

मात्र पुन्हा कधीही मी गारूड्याचे खेळ पाहायला थांबलो नाही.
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment