Monday, March 30, 2020

निरामय सूर जपून ठेवा गलबला फार झाला - प्रा. हरी नरके


भारत नावाच्या आपल्या देशात एकाच काळात अनेक देश राहात असतात. त्यांचं जगणं इतकं परस्परविरोधी असतं की त्याचे पदर समजून घेताना गोंधळून जायला होतं. एका बाजूला कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यू वाढताहेत ही धडकी भरवणारी बातमी असते तर दुसरीकडे त्याहून जास्त रूग्ण बरे झाल्याची दिलासा देणारीही बातमी असते.

एका शेजारी देशात कोरोनाकाळात तिथल्या अल्पसंख्यकांना अन्नधान्य वाटप केलं जात नसल्याची बातमी असते. तर दुसरीकडे बुलंदशहरमध्ये एक हिंदू कॅन्सरने मृत्यू पावला असता त्याच्या अंत्ययात्रेला एकही हिंदू हजर नव्हता तेव्हा तिथल्या मुस्लीमांनी त्याचा अंत्यविधी केला अशी बातमी पुढे येते.

डॉक्टर, नर्सेस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करण्यामुळे कोरोनाचे शेकडो रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक घटना तर जगभरात ३४ हजार बळी गेलेले आहेत नी सात लाखांना कोरोनाची लागण झालेली आहे. अमेरिका तसेच युरोपमधील श्रीमंत देशांचे कंबरडे कोरोनाने मोडले असतानाही आपल्याकडे अनेकांना गांभिर्यच नाहीए. शेकडो लोक झुंडींनी आजही आपली अक्कल पाजळीत गावच्या जत्रा साजर्‍या करताहेत व जमावाला आटोक्यात आणणार्‍या पोलीसांवरच दगडफेक करताहेत.

दवाखाने अपुरे पडत असतानाही काही शहरी वस्त्यांमध्ये जमाव अद्यापही काबूत येत नाहीये, आपापल्या गावाला जाण्यासाठी लोक टॅंकरचा वापर करताहेत, लाखो बेघर उपासीपोटी मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत निघालेत, अशावेळी खूप अपराधी वाटतं.

तर दुसर्‍या बाजूला जनजीवन सुरळीत होईल या आशावादाने काही लोक समाजमाध्यमांवर खाण्यापिण्याचे पदार्थ झळकवतात, वाढदिवसाच्या जाहीराती टाकतात. डॉक्टर आणि नर्सेससाठी सुरक्षासाधनांचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येतात तेव्हा दुसरीकडे काहीजण दारू दुकानं उघडी ठेवा अशी बिनदिक्कत मागणी करतात. सरकार रस्त्यावरच्या लोंढ्यांसाठी निवारा केंद्रे काढीत असताना, जेवणाची व्यवस्था करीत असताना काही जातीयवादी मदतकोशाचे सवते सुभे उभे करतात. या संकटकाळात राजकारण करणारांची तसेच जे आपला छुपा अजेंडा पुढे रेटताहेत अशांची किळस येते. रात्रंदिवस काम करणार्‍या यंत्रणेचे मनोबल वाढवण्याऎवजी त्यांच्यावर टिकेचे कोरडे ओढणारे हे निष्क्रीय टिकोजीराव बघितले की संताप येतो.

मन विषन्न आणि उद्विग्न होऊ न देता तरिही निर्धाराने निकोप,निरामय सूर जपून ठेवायला हवा. गलबला कितीही वाढला तरी काम करायलाच हवे. एक कवी म्हणतो तसे " ज्यांच्यासाठी करिशी यात्रा, तेच परतले भिवून तमाला, नकोस परतू तुही परंतु चाल गड्या तू चाल!"

आशावादी राहणं हा भाबडेपणा वाटावा अशा ह्या संकटकाळात कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता हेही दिवस जातील ही भावना जपायलाच हवी नाही का?

-प्रा.हरी नरके, ३० मार्च २०२० 

Thursday, March 26, 2020

प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं-प्रा.हरी नरके,

१८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ (सुमारे एक कोटी) लोक प्लेग साथीच्या रोगाला बळी पडले. (मराठी विश्वकोश)
क्रांतीज्योती सावित्रीबाई आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. पुण्यात 1897 साली प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याच साथीत 9 फेब्रुवारी 1897ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते खंदे नेते होते. जोतीरावांच्या विचाराने प्रेरित होऊन 'दीनबंधू' नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवित. लोखंडे यांना भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं.
जोतीरावांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती. मुंबईत फुल्यांना "महात्मा "उपाधी देणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात लोखंड्यांचा पुढाकार होता. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा ते मोठा आधारस्तंभ राहिले होते. चळवळीतला जवळचा सहकारी गेल्याने सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला.
मुंबई पाठोपाठ पुण्यात साथ पसरू लागली, तशा जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती. त्यामुळे उपाययोजना काय करायच्या याविषयीही माहिती नव्हती. त्यात समाजामध्ये देवीचा कोप यासारख्या अंधश्रद्धा होत्या. साहजिकच प्लेगच्या आजाराने माणसं मरत होती तेव्हा ते देवीच्या कोपाने मरतायत अशी अनेकांची भावना झाली. पुण्यात जसजसं मृत्यूचं थैमान सुरु झालं तसं लोकच नाही तर बडे राजकीय नेतेही पुणे सोडून दुसरीकडे राहायला निघून जात होते. उंदरांमार्फत प्लेगचा प्रसार होत होता, उंदीर मरून पडलेले लोकांना दिसायचे. लोक बिथरून जायचे. ताप येऊन काखेत गाठ यायची आणि माणसं कोलमडून पडायची, हे सावित्रीबाई आजूबाजूला पाहात होत्या.
यशवंतच्या मदतीनं रुग्णांवर उपचार:
सावित्रीबाईंनी स्वतः आपल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून तार करून बोलावून घेतलं. डॉक्टर यशवंत फुले ब्रिटीश मिलिटरीमध्ये नोकरी करत होते. रजा घेऊन आलेल्या यशवंतकडून परिस्थिती समजून घेऊन सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात केली.
हा संसर्गजन्य रोग जीवघेणा असल्याने आईने धोका पत्करू नये, असं डॉ. यशवंत यांचं म्हणणं होतं. पण त्यावर सावित्रीबाईंना वाटायचं आज महात्मा फुले असते तर ते परिस्थिती पाहून शांत बसले नसते. खेरीज नारायण मेघाजी लोखंडेंचा प्लेगने मृत्यू झालेला असताना आजाराच्या भीतीने त्या दूर राहू शकल्या असत्या. पण लोकांच्या दुःखापुढे त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती.
महात्मा फुलेंचं नाव घेतो तर लोकांसाठी काम केलं पाहिजे या विचारावर त्या ठाम होत्या. असं म्हणून त्या कामाला लागल्या. पुण्यात हडपसरजवळ आताच्या ससाणेनगर परिसरात यशवंत यांच्या सासऱ्यांची शेती होती.
हा भाग तेव्हा पुणे शहराच्या वेशीवर होता. इथल्या माळावर काही झोपड्या बांधल्या आणि त्यांनी दवाखाना सुरू केला. घरोघरी जाऊन कोणाला ताप आला असेल किंवा प्लेगची लक्षण दिसत असतील तर त्या विशेषतः मुली आणि महिला पेशंट्सना दवाखान्यात घेऊन येत. आणि यशवंतच्या मदतीने उपचार करत.
तेव्हा पुण्यात प्लेगची इतकी दहशत पसरली की सरकारी दफ्तरं ओस पडली होती आणि लोक उपचारासाठी आपणहून घराबाहेर कमी संख्येने बाहेर पडत होते. देवीचा कोप असेल या भीतीने घरात आजारी माणसांना दडवून ठेवलं जात होतं. ब्रिटीश सरकारसमोर साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचं मोठं आव्हान होतं. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा बडगा उगारला. त्यात रँड या ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या बडग्याने लोकांमध्ये असंतोष पसरू लागला होता.
पुणे शहरात घराघरात आरोग्यसेवा पोहचवणं जिकिरीचं होतं. भीतीमुळे लोक मदत करायलाही पुढे सरसावत नसत. गाडी-घोडे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर समाजातल्या विशिष्ठ वर्णाच्या आणि प्रस्थापित वर्गासाठी प्राधान्याने मिळत. गावात आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या दलित वस्तीत कशी पोहचणार हा प्रश्न होता.
तत्कालीन परिस्थितीत जातींमध्ये भेदाभेद, अस्पृश्यता असताना वाडी वस्तीत उपचार पोहचणं दुरापस्त होतं. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतंत्रपणे तळागाळातल्या लोकांसाठी काम करायला सुरूवात केली.
रुग्णसेवा करतानाच प्लेगची लागण :
सावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची नोंद कागदोपत्री आहे. मुंढव्याच्या दलित वस्तीत पांडुरंग प्लेगने आजारी असल्याची माहिती सावित्रीबाईंना मिळाली. अकरा वर्षांच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेतलं.
मुंढव्यापासून आठ किलोमीटर चालत त्यांनी ससाणेनगर गाठलं. माळावरच्या दवाखान्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग वाचला खरा पण दरम्यानच्या काळात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती. काम करताना तापाने सावित्रीबाई फणफणल्या. अखेर 10 मार्चला त्या अविरतपणे काम करत असताना गेल्या.
सावित्रीबाईंना 1 जानेवारी 1848 साली शाळेचं पहिलं काम सुरू केलं होतं, आणि त्या गेल्या 1897 साली. जवळपास पन्नास वर्षं त्यांनी शिक्षणक्षेत्रात, सामाजिक सुधारणेसाठी आणि सेवेसाठी धडाडीने काम केलं.
शिक्षणाखेरीज समाजसेवेचं आणि लोकांना मदत करण्याचं सावित्रीबाईंचं काम पाहाताना नेहमी वाटतं, की आपल्याकडे झाशीच्या राणीने केलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगितली जाते. जितकी ती शौर्यगाथा राजकीयदृष्ट्या रोमांचक आहे तितकंच तोलामोलाचं सावित्रीबाईंचं हे शौर्य आहे.
सावित्रीबाईंच्या कार्याकडे दुर्लक्ष:
आपल्याला इतिहास नेहमी लढाया, पराक्रम यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. आपण सामाजिक सेवेत हौतात्म्य पत्करणाऱ्यांच्या इतिहासाकडे कमी आकर्षित होतो. जेव्हा सावित्रीबाई पांडुरंगाला पाठीवर घेऊन चालत होत्या तेव्हा एकप्रकारे त्या प्लेगशी झगडत होत्या. मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाठीवरच्या पांडुरंगाला त्यांनी अखेर वाचवलं.
पुणे नगरपालिकेचा त्यावेळचा रेकॉर्ड पाहिला तर भयावह चित्र डोळ्यासमोर येतं. मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीही कर्मचारी नसायचे. त्यामुळे पालिकेत फक्त आकड्यांच्या नोंदी आहेत. 10 मार्च 1897 या दिवशी किती माणसं मरण पावली याचाच आकडा मिळतो.
एकेका दिवसाला 775, 685 असे भयंकर आकडे आहेत. त्यावेळच्या पुण्यात एका दिवसात नऊशे माणसं मरण पावली असतील तर किती हाहा:कार माजला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नगरपालिकेच्या रेकॉर्ड्समध्ये दिड-दोन महिन्यांच्या काळात अशाच आकड्यांच्या नोंदी सापडतात.
त्या काळात माध्यमांची अस्पृश्यताही ठळकपणे दिसते. लोकमान्य टिळकांच्या केसरीने तर सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची साधी बातमीही छापली नाही. खरंतर टिळक आणि आगरकरांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुल्यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही.
साहजिकच सावित्रीबाईंचा अनुल्लेख ओघानेच आला. पण केसरीने बातमी दिली नसली तरी दीनबंधू वर्तमानपत्राने दिली होती. बहुजन समाजात जनजागृतीच्या उद्देशाने दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र निघत असे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येतंय याचा सारांश ब्रिटीश गव्हर्नरला पाठवला जाई. त्यात दीनबंधूच्या बातमीचा उल्लेख सापडतो.
माध्यमांनीच नव्हे तर त्यावेळच्या प्रस्थापित समाजाने आणि नेत्यांनीही सावित्रीबाईंच्या योगदानाची उपेक्षा केलेली दिसते. पुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुल्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले. या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.
- प्रा.हरी नरके, २६ मार्च २०२०
(डॉ. हरी नरके हे लेखक आणि फुले यांचे विचार, साहित्य तसंच चळवळीचे अभ्यासक आहेत.)
शब्दांकन, संपादन : प्राजक्ता धुळप, बीबीसी मराठी.

स्मृती आवडत्या चित्रपटांच्या - प्रा. हरी नरके


** विशेष आवडलेले चित्रपट -

मसान, पथेर पांचाली, Rashomon राशोमन, The Great Dictator दि ग्रेट डिक्टेटर, Modern Times मॉडर्न टाईम्स, City Lights, कागज के फुल, साहिब, बिबी और गुलाम, प्यासा, मंटो, निशांत, अंकुर, भुमिका, सुरज का सातवा घोडा, मम्मो, अलिफ, अर्धसत्य, ध्यास पर्व, कोर्ट, फॅंड्री, Girls of the Sun, Goliath, Daughter, गाभ्रीचा पाऊस, सामना, श्वास, देऊळ, आर्टीकल १५, जख्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, श्यामची आई, गांधी, Schindler's List, Seven Samurai,Bicycle Thieves,The Sound of Music,How Green Was My Valley हाऊ ग्रीन वाझ माय व्हॅली, A Billion Color Story, Children of Heaven,

** आवडलेले चित्रपट-

एलिझाबेथ एकादशी, मोगले आझम, दो आंखे बारह हाथ, गंगा जमुना, पाकीझा, दिवार, शोले, ज्वेल थिफ, गाईड, सरफरोश, अब तक छपन्न, जब वुई मेट, A Wednesday! वेनसडे, सत्या, लगान, मुल्क, देव, चोरी चोरी, अर्थ, सारांश, शापित, भाग मिल्खा भाग, दंगल, टायटॅनिक, जाने भी दो यारो, बॅंडीट क्वीन, मि. इंडीया, मुन्नाभाई एम.बी.बी.एस, लगे रहो मुन्नाभाई, रंग दे बसंती, पी.के., थ्री इडीयट्स, चक दे, गॅंग्ज ऑफ वासेपूर, आंधी, इजाजत, बॉम्बे, रंग दे बसंती, हजारो ख्वाईसे, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल चाहता हैं, स्पर्श, चश्मे बद्दूर, तिसरी कसम, पेज थ्री, सैराट, कासव, कायद्याचं बोला, स्वदेश, तारे जमिन पर, दामिनी, रंगिला, बिनधास्त, तुकाराम, दोघी, बाधा, शाळा, ख्वाडा, किल्ला, आनंदी गोपाळ, उंबरठा, जोगवा, सिंहासन, नाळ, दशक्रिया, आस्था, खेल, रोजा, मासूम, उमराव जान, मंडी, बाझार, डोर, इक्बाल, उडान, कहानी, धनक, परीनिता, दि डर्टी पिक्चर, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, चुपके चुपके, चितचोर, The Legend of Bhagat Singh, दि लिजंड ऑफ भगतसिंग, रेनकोट, गंगाजल, दृश्यम, पिंक, खाकी, कभी कभी, तलवार, राझी, दिल धडकने दो, हैदर, दिल क्या करे, विकी डोनर, रोड टू संगम, हेराफेरी, रुस्तम, एक दुजे के लिए, अंकुश, प्रहार, परिंदा, वेलकम, ७२ मैल, अनारकली ऑफ आरा, ऑखों देखी, झेड प्लस, इंग्लीशविंग्लीश, यस बॉस, शूल, स्पेशल छब्बीस, अय्यारी, पिंजर, ट्रॅफिक, चलती का नाम गाडी, चांदनी बार, नटरंग, पेज थ्री, कार्पोरेट, फॅशन, लाईफ इन मेट्रो, रंगीला, न्यू दिल्ली टाइम्स, M.S. Dhoni: The Untold Story, ओ माय गॉड, फुकरे, टॅक्सी नं.९२११, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर, मेरा साया, गोलमाल, जॉली एल.एल.बी, नॉट ओन्ली मिसेस राऊत, कळत नकळत, मुक्तीभवन, खुबसुरत, घर, हंगामा, शादी में आना जरूर, ट्रॅप, पती पत्नी और वो, एतराज, एतबार, मोह,माया,मनी, करंट, ट्रेन टु पाकीस्तान, मिर्च मसाला, माया मेमसाब, सलाम बॉम्बे, अर्थ १९४७, बनगरवाडी, ३६ चायना टाऊन, कमिने, अभिमान, मेरा नाम जोकर, आवारा, श्री ४२०, मजबूर, बादशहा, बॉर्डर, भेजाफ्राय, पार्टीशन, बेगम जान, फिर मिलेंगे, सेक्शन ३७५,


शाळकरी वयात सर्वाधिक आवडलेले सिनेमे- आक्रोश, मंथन,

माध्यमिक विद्यालयात शिकत असताना लागोपाठ दोनदा बघितलेला पहिला चित्रपट- घरौंदा

शाळकरी वयात गणेशोत्सवात रस्त्यावर बघितलेला पहिला चित्रपट- उपकार

शाळकरी वयात थिएटरमध्ये जाऊन बघितलेला पहिला चित्रपट- जय संतोषी मा

तुम्हाला सर्वाधिक आवडलेले दहा चित्रपट कोणते?

प्रा.हरी नरके, २६ मार्च, २०२०

टीप- ही यादी सर्वसमावेशक नाही. मला सहज आठवलेले हे चित्रपट आहेत. मला आवडलेल्या सर्वच चित्रपटांचा जागेअभावी यात समावेश केलेला नाही. संपुर्ण यादी खूप मोठी होईल.

Tuesday, March 24, 2020

तर ३० कोटी भारतीयांच्या जिवाला धोका पोचू शकतो? प्रा.हरी नरके


१. रुपये १५ हजार कोटीची कोरोना उपचार व प्रतिबंध यासाठीची तरतूद अपुरी तरिही स्वागतार्ह पाऊल.


२. मार्च २२ ला संध्याकाळी झुंडींनी रस्त्यांवर उतरून जो जल्लोश केला, कोरोनासंसर्गाद्वारे कोरोनाबाधीत वाढवले त्याबद्दल नाराजीही नाही, उलट शाबासकी याचा अर्थ यांनाही तेच हवे होते.

३. २१ दिवस देश दरवाजाच्या आत हे पाऊल उशीरा उचलले असले तरी आवश्यकच.

४. ज्यांचे हातावर पोट आहे अशा कोट्यावधींच्या जगण्याची तरतूद करण्यात सरकार अपयशी. त्यांचा साधा विचारसुद्धा आजच्या भाषणात नव्हता.

५. अन्यथा देश २१ वर्षे मागे जाईल याचा अर्थ कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्यास आजच्या १३७ कोटीवरून आपली लोकसंख्या थेट २००० सालच्या १०५ कोटीवर जाण्याची भिती. ही धोक्याची घंटा भयंकर आहे. तीस ते ३२ कोटी भारतीयांच्या जिवाला धोका होऊ शकतो ह्या भयावह कल्पनेने जिवाचा थरकाप उडतो.काळजी घ्यायलाच हवी.


६. गेली सहा वर्षे सतत महासत्तेची भाबडी स्वप्नं विकणारांची आज स्पष्ट कबुली, आरोग्यव्यवस्थेत आपण अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झरलंड, इटलीच्या खूप मागे. हे उशीर सुचलेले शहाणपण कायम ठेवा आणि आरोग्यव्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष केंद्रीत करा.

- प्रा.हरी नरके, २४ मार्च २०२०

Monday, March 23, 2020

संग्रही असलेली, एकदा वा अनेकदा वाचलेली काही आवडती पुस्तकं



१. लिळाचरित्र, चक्रधर स्वामी २. तुकाराम गाथा, संत तुकाराम, ३. धग, उद्धव शेळके, ४. संत वाड्मयाची सामाजिक फलश्रुती, गं. बा. सरदार, ५. कोसला, डॉ. भालचंद्र नेमाडे, ६. राधामाधवविलासचंपू, संपादक वि.का. राजवाडे, ७. मृत्युंजय, शिवाजी सावंत, ८. गाथा सप्तसती, ९. श्यामची आई, साने गुरूजी, १०. मनुस्मृती : काही विचार, नरहर कुरूंदकर, ११. स्मृतीचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, १२. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, वि.का.राजवाडे, १३. पोटमारा, रवीन्द्र पांढरे, १४. जागर, नरहर कुरूंदकर, १५. रामनगरी, राम नगरकर, १६. युगांत, इरावती कर्वे, १७. बलुतं, दया पवार, १८. गावगाडा, त्रिं. ना. आत्रे, १९. आठवणीचे पक्षी, प्र. ई. सोनकांबळे, २०. भाऊसाहेबांची बखर,

२१. एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर, २२. रणांगण, विश्राम बेडेकर, २३. वैर्‍याची एक रात्र, व्होल्गा ल्येंगेल, अनु. जी. ए. कुलकर्णी,  २४. एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर, २५. आणि माणसाचा मुडदा पडला, रामानंद सागर, २६. बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर, २७. माझा प्रवास, वरसईकर गोडसे, २८. झाडाझडती, विश्वास पाटील,  २९. शिवाजी जीवन रहस्य, नरहर कुरूंदकर, ३०. शाळा, मिलिंद बोकील, ३१. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे, ३२. सती, प्रविण पाटकर, ३३. विद्रोही तुकाराम, डॉ. आ.ह. साळुंखे,  ३४. रारंग ढांग, प्रभाकर पेंढारकर, ३५. मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, डॉ. आ.ह. साळुंखे,   ३६. हंस अकेला, मेघना पेठे,  ३७. बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३८. मुंबई दिनांक, अरूण साधू, ३९. फकीरा, अण्णाभाऊ साठे, ४०. जातीसंस्थेचे निर्मुलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

४१. गोलपीठा, नामदेव ढसाळ, ४२. सिंहासन, अरूण साधू, ४३. शतकाचा संधीकाल, दिलीप चित्रे, ४४. नागीण, चारूता सागर, ४५. श्री विठ्ठल : एक महासमन्वय, डॉ. रा.चिं. ढेरे, ४६. ताम्रपट, रंगनाथ पठारे, ४७. शेतकर्‍याचा असूड, महात्मा जोतीराव फुले, ४८. सात पाटील कुलवृत्तांत, रंगनाथ पठारे, ४९. सेकंड सेक्स, सिमॉन दि बोव्हा, ५०. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, जयंत पवार, ५१. अक्षरनिष्ठांची मांदियळी, डॉ. अरूण टिकेकर, ५२. इडापिडा टळो, आसाराम लोमटे, ५३. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, आनंद विंगकर, ५४. गुलामगिरी, महात्मा जोतीराव फुले, ५५. भिजकी वही, अरूण कोलटकर, ५६. वासुनाका, भाऊ पाध्ये, ५७. लांबा उगवे आगरी, डॉ. म.सु.पाटील, ५८. झोत, डॉ. रावसाहेब कसबे, ५९. पिंगळावेळ, जी.ए.कुलकर्णी, ६०. प्रकाशाची सावली, दिनकर जोषी,

६१. तमस, भीष्म सहानी, ६२. तुघलक, गिरिश कार्नाड, ६३. घासीराम कोतवाल, विजय तेंडुलकर, ६४. वाडा चिरेबंदी, महेश एलकुंचवार, ६५. शांतता कोर्ट चालू आहे, विजय तेंडुलकर, ६६. चक्र, जयवंत दळवी, ६७. बळी, मालती बेडेकर, ६८. मेटकॉफ हाऊस ते राजभवन, राम प्रधान, ६९. मर्ढेकरांची कविता, बा.सी. मर्ढेकर, ७०. शतपत्रे, लोकहितवादी, ७१. आहे मनोहर तरी, सुनिता देशपांडे, ७२. व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे, ७३. बदलता भारत, भानू काळे, ७४. हमरस्ता नाकारताना, सरिता आवाड, ७५. लेखकाची गोष्ट, विश्राम गुप्ते, ७६. शोध, मुरलीधर खैरनार, ७७. माणसं, डॉ. अनिल अवचट, ७८. जेव्हा मी जात चोरली होती, बाबुराव बागूल, ७९. स्त्रीपुरूष तुलना, ताराबाई शिंदे, ८०. प्राचीन महाराष्ट्र, डॉ. श्री.व्यं. केतकर,

८१. मी कसा झालो, आचार्य अत्रे, ८२. माणसं आरभाट आणि चिल्लर, जी. ए. कुलकर्णी, ८३. प्रतिस्पर्धी, किरण नगरकर, ८४. बियॉण्ड दि लाईन्स, कुलदीप नय्यर, ८५. अजुनि वाढताती झाडे, रस्किन बॉण्ड, ८६. मैला आंचल, फनिश्वरनाथ रेणू, ८७. राग दरबारी, श्रीलाल शुक्ल, ८८. आत्मरंगी. रस्किन बॉण्ड, ८९. गोदान, प्रेमचंद, ९०. चालत दुरूनी आलो मागे, राजेंद्र यादव, ९१. तिरिछ, उदय प्रकाश, ९२. सेपियन्स, युवाल नोवा हरारी, ९३. माणूस, मनोहर तल्हार, ९४. रंग माझा वेगळा, सुरेश भट, ९५. आठवले तसे, दुर्गा भागवत, ९६. घातचक्र- अरूण गद्रे, ९७. क्लोरोफॉर्म, डॉ. अरूण लिमये, ९८. समग्र विंदा, विंदा करंदीकर, ९९. एक कहाणी अशीही, मन्नू भंडारी, १००. ओअ‍ॅसिशच्या शोधात, फादर फ्रान्सीस दिब्रिटो,

१०१. नचिकेताचे उपाख्यान, संजय भास्कर जोशी, १०२. चिरदाह, भारत सासणे, १०३. पण लक्षात कोण घेतो? हरी नारायण आपटे, १०४. बिढार, जरीला, झूल, हूल, हिंदू , डॉ. भालचंद्र नेमाडे, १०९. भुमी, सेतू, आशा बगे, १११. होमो डेअस, युवाल नोवा हरारी, ११२. एका कोळीयाने, पु. ल. देशपांडे, ११३. हसरे दु:ख, भा. द. खेर, ११४. उदकाचिये आर्ती, मिलिंद बोकील, ११५. वारूळ, बाबाराव मुसळे, ११६. शुभ्र काही जीवघेणे, अंबरिश मिश्र, ११७. शोध राजीव हत्त्येचा, डी. कार्तिकेयन, ११८. फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट, डॉमनिक लॅपिए, ११९. मुकज्जी, शिवराम कारंत, १२०. कर्वालो, के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र, १२१. खेळता खेळता आयुष्य, गिरीश कार्नाड, १२२. संवादु अनुवादू, उमा कुलकर्णी. १२३. सिटी ऑफ जॉय, डॉमनिक लॅपिए, १२४. महात्मा फुले : पंढरीनाथ सीताराम पाटील, १२५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, १२६. आसूरवेद, आणि पानिपत, संजय सोनवणी, १२८. रस अनौरस, राजन खान, १२९. मोराची बायको, किरण येले, १३०. निळ्या डोळ्याची मुलगी, शिल्पा कांबळे,
१३१. वेटींग फॉर व्हीजा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १३२. धर्मशास्त्राचा इतिहास, पा.वां.काणे, अनु. यशवंत आबाजी भट, 
तुम्ही यातली किती वाचली आहेत?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च, २०२०


*** टीप- ही यादी सर्वसमावेशक नाही. माझ्या संग्रही चाळीस हजार पुस्तकं आहेत. मी अनेक ग्रंथालयांचा सदस्य आहे. माझ्या मित्रांचाही समृद्ध ग्रंथसंग्रह आहे. त्यातून मी वाचलेल्या पुस्तकातली मला आवडलेली एकुण पुस्तकं किमान एक हजार तरी भरतील. मला आवडलेली असूनसुद्धा जागेअभावी किमान ८६८ पुस्तकं या यादीत आलेली नाहीत. जी पुस्तकं या यादीत आलेली नाहीत त्यांच्या कर्त्यांनी लगेच नाराज होऊन हेत्वारोप करू नयेत. किंवा यादीत नाहीत याचा अर्थ ती पुस्तकं मी वाचलेलीच नाहीत असाही अर्थ लावू नये. एखादा पुरस्कार मिळाला म्हणून ते पुस्तक मला आवडलेच पाहिजे असा आग्रह कशासाठी?

काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा

१. " डागतर, पईले दावलो तवा फकस्त पू येऊलालाता, आता वास घान मारूलालाय." पेशंट तक्रार करीत होता.
कान तपासला. त्यानं कानात ठेवलेला कापसाचा बोळा काढला. बघतो तर आत दुसरा बोळा. तो काढला तर काय आत तिसरा बोळा. एकुण सात बोळे काढले. त्यानं ठोकून ठोकून सातसात बोळे कोंबल्यामुळे दुर्गंधी येत होती. मी चिडलो. हा काय मुर्खपणा आहे? तर तो म्हणाला," सायब, तुमीच मनलो व्हतो की आंगोळीच्या टायमाला कानात कापसाचा बोळा ठिवा मनून, म्हनुन ठिवलो. आंगोळ जाल्यावर काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा. माजी काय चूक?" मी कपाळाला हात लावला. कानात ठेवलेला बोळा आंघोळीनंतर काढा असं मी कुठं सांगितलं होतं हा त्याचा प्रश्न बिनतोड होता.

२. एका पेशंटनं मला बुचकळ्यात टाकलं. " डागतर, तुमी गोळ्या तर दिलाव, पन जिरंना गेल्यात. अप्पूट जाईनाबी गेलीय. आन जिरंनाबी गेलीय. काय उपेग?" सखोल विचारपूस केल्यावर कळलं, तो काय म्हणतोय ते. त्याचं म्हणणं गोळी कानात जात नाहीये. दोन तुकडे करून घातली तरी ती कानात जिरत नाहीये.
तुम्हाला गोळी कानात घालायला कोणी सांगितलं? अहो ती तोंडातून घ्यायची गोळी आहे.
कानात घालायच्या ड्रॉपच्या खाली गोळ्या लिहिल्याने त्यानं गोळी पण कानात घालायचीय असा समज करून घेतलेला.

३. शाखेत जाणारा मित्र सांगत होता, त्याला एक दिवस आदेश मिळाला, "लोहगाव विमानतळावर जायचें. तिथे दिल्लीवरून *** *** **** येतील. त्यांना घेऊन शाखेवर यायचें.
आणि हो, काही कारणानें ते आले नाहीत तर तू मात्र परत यायचें हो, काय समजलें?"
सुचना कशा फुलप्रूफ हव्यात.

फटाके, ढोल, महाआरत्या, वाजतगाजत मिरवणुका, शेकडोंनी एकत्र जमून केलेला जल्लोश, हे बघितलं की हा देश किती महान लोकांचा आहे त्याचे दर्शन होते.
जे सर्वांचे होणार तेच आपल्याही वाट्याला येणार. कारण आपण सारे एकाच हवेत श्वास घेतो. सर्वांची नियती एकच.

वाजवा म्हणताना वाजवून झालं की थांबा असंही सांगायला लागतंय, हे अनुभवी लोक कसे काय विसरले? की त्यांनाही हेच हवं होतं?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च २०२०

१ व २ चा संदर्भ- डॉ. संजय कुलकर्णी, कुलकर्ण्याचा दवाखाना, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१९,

Sunday, March 22, 2020

ज्यांना कंटाळा परवडतो त्यांचा मला हेवा वाटतो- प्रा. हरी नरके












ज्यांना कंटाळा परवडतो त्यांचा मला हेवा वाटतो- प्रा. हरी नरके
नुकतीच एक कादंबरी वाचली. त्यातला नायक सतत म्हणत असतो, कंटाळा आला. घरात बसून बसून कंटाळा आला अशी तक्रार काही लोक बर्‍याचदा करतात. मला कळत नाही हे बोअर होण्याचे औषद मिळते कोण्या दुकानात? कोणत्या पिठाच्या गिरणीतले पीठ खाल्ले की कंटाळा येतो? मला कळायला लागले, तेव्हापासूनचे जे आठवते त्यात कंटाळा आला होता असा एकही क्षण माझ्या वाट्याला आलेला नाहीये. लहान असताना सकाळी एक नोकरी, दुपारी शाळा, संध्याकाळी दुसरी नोकरी या रगाड्यात कंटाळ्याची चैन कधी परवडलीच नाही.

पुस्तकं वाचता यायला लागली, त्यांची गोडी लागली तसी पुस्तकं विकत घ्यायची सवय जडली. आज घरात सुमारे ४०,००० [चाळीस हजार] पुस्तकं असताना, त्यातली किमान पाचशेक तरी वाचायची बाकी असताना कंटाळ्यासाठी वेळच काढता येत नाही मला. एक वैचारिक पुस्तक वाचलं की दुसरं ललित वाचायचं. यासाठी समोर शेकडो पुस्तकं प्रतिक्षेत असताना कंटाळा आसपास फिरकूच शकत नाही. आमच्यासारख्या ज्यांना बिडी, काडी, सिगारेट, गुटका, दारू, तंबाखू, गांजा यांची कुणाचीच साथ परवडत नाही त्यांना पुस्तकं सोबत असली की दिवसरात्रीचे २४ तास कमी पडतात राव. ज्यांना कंटाळा परवडतो त्यांचा मला खरंच हेवा वाटतो.
-प्रा.हरी नरके, २२ मार्च २०२०

........................................

घरात बसा, बाहेर फिरु नका अशी आर्जवं का करायला लागताहेत? लहान मुलांचं एकवेळ ठीकाय,पण प्रौढांना असं बाबापुता का करावं लागावं?
सगळेच अश्या पोस्टी टाकायलेत, त्याचा परिणाम उलटाच होऊ नये म्हणजे मिळवली. रविवारी घरात बसणं इतकं कष्टाचं असतं? इतकं अवघड की त्यासाठी दुसर्‍यांनी इनंती करायला लागत्येय?
आमच्या महाविद्यालयात राज्यपातळीवरील एकांकिका स्पर्धा भरवण्यात आली होती. आमच्या प्राचार्यांनी त्यासाठी विषय दिला होता, "दारू वाईट असते!"
राज्यभरातून ६३ संघ आले होते. सलग तीन दिवस दररोज प्रत्येकी २१ एकांकिका बघून परिक्षकांवर झालेला परिणाम फारच नामी होता.
पुरस्कार वितरण समारंभात बोलताना मुख्य परिक्षक म्हणाले, " तीन दिवस दारू वाईट असते याचा इतका मारा झालाय की आज घरी गेल्यावर लावल्याशिवाय काही पर्याय नाही बघा!"
-प्रा. हरी नरके, २१/०३/२०२०


Friday, March 20, 2020

डॉ. आंबेडकर अखिल भारताचे नेते होतील - राजर्षी शाहू छत्रपती


पुढारी, सर्व आवृत्या, संपादकीय पृष्ठ, शनिवार, दि. २१ मार्च २०२०

डॉ. आंबेडकर अखिल भारताचे नेते होतील - राजर्षी शाहू छत्रपती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताचे नेते होतील असे जाहीर भाकीत छ. शाहू महाराजांनी ज्या माणगाव परिषदेत केले होते तिची आज शताब्धी आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पीएच. डी. ही पदवी संपादन करणारे भीमराव आंबेडकर हे पहिले भारतीय. भारतात परत आल्यानंतर बडोद्यातील नोकरीत आलेल्या कटू व जातीय बहिष्काराच्या अनुभवांनी भीमरावांना जखमी केलेलं होतं. सिडनेहॅम महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करीत असतानाच साऊथबरो कमिशन भारतात आले. २७ जानेवारी १९१९ ला भीमरावांनी कमिशनला साक्ष दिली. सर्व भारतीयांना मताधिकार मिळाला पाहिजे अशी ऎतिहासिक मागणी त्यांनी कमिशनसमोर केली. एव्हढी क्रांतिकारक मागणी करूनही तत्कालीन ब्राह्मणी वर्तमानपत्रांनी या साक्षीला प्रसिद्धी दिली नाही. आपले स्वत:चे वर्तमानपत्र असावे म्हणून ३१ जानेवारी १९२० ला त्यांनी मूकनायक हा पेपर सुरू केला. त्याला अडीच हजार रूपयांची देणगी देऊन रा. शाहूंनी भीमरावांना भक्कम पाठबळ दिले.

माणगाव परिषद म्हणजे भीमरावांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात मानता येईल. ही दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद, दि. २१ व २२ मार्च १९२० रोजी पार पडली. माणगाव, कोल्हापूर येथे गुढीपाडव्याला झालेल्या या परिषदेचा सविस्तर वृत्तांत १० एप्रिल १९२० च्या मूकनायकमध्ये प्रकाशित करण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आलेली होती. परिषदेला दस्तुरखुद्द शाहूराजे उपस्थित होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष दादासाहेब इनामदार हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताचे नेते होतील असे जाहीर भाकीत छ. शाहू महाराजांनी या परिषदेत केले आणि ते खरेही ठरले. भीमरावांना पंडीत ही पदवी देण्यात यावी असेही महाराजांनी सुचवले. महाराजांना माणसांची अचुक पारख होती. भीमराव नवखे असताना त्यांच्याबद्दल असे भविष्य वर्तवणे ह्यातून महाराजांचा द्रष्टेपणाच दिसून येतो.

या परिषदेत अस्पृश्यांसाठीच्या राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी करण्यात आली. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजेत असे भीमरावांनी ठणकावून सांगितले. हीच मागणी त्यांनी पुढे १३ वर्षे लावून धरली. पुणे करारानंतर राखीव जागा मिळवून ते यशस्वी झाले.  छ. शाहूंचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. महात्मा फुले १८८० मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू करतात आणि ४० वर्षांनी १९२० मध्ये बाबासाहेब शाहू जयंती उत्सव सुरू करतात हे महत्वाचे आणि ऎतिहासिक पाऊल होते. मूकनायकचा शाहू जयंती विशेषांक काढण्यासाठी भीमरावांनी महाराजांना जे पत्र लिहिले त्यातून २६ जून ही रा. शाहूंची खरी जन्मतारीख मिळाली. सुमारे नव्वद वर्षे शाहू चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी दिलेली २६ जुलै ही चुकीची तारीख प्रमाण मानली जात होती. दहा वर्षांपुर्वी बाबासाहेबांच्या या दुर्मिळ पत्रामुळे त्यात दुरूस्ती करण्यात आली.  शाहू जयंती सुरू करण्याच्या बाबासाहेबांच्या या प्रेरक कृतीतून उर्जा घेऊन प्रस्तुत लेखकाने २० वर्षांपुर्वी त्यावेळचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करून शासकीय पातळीवर ग्रामपंचायत ते मंत्रालय शाहू जयंती सुरू करायला लावली. त्याकामी अनुकूल अभिप्राय देऊन कोल्हापूरचे सुपुत्र व ख्यातनाम सनदी अधिकारी भूषण गगराणी यांनी अमूल्य सहकार्य केले.

गुणवत्ता जन्माने मिळत नाही. ती संधी मिळण्यावर अवलंबून असते, अस्पृश्यांना व ब्राह्मणेतरांना कायम संधी नाकारून उच्चवर्णियांनी आपली तथाकथित गुणवत्ता [ ! ] संपादन केलेली आहे हे खडे बोल भीमरावांनी या परिषदेत सुनावले. सर्वांन समान संधी, ज्यांना पिढ्यानुपिढ्या संधी नाकारली गेली त्यांना विशेष संधी हे तत्वज्ञान महाराजांनी कोल्हापूर राज्यापुरते १९०२ सालापासून स्विकारलेले होते. योग्य नेता नसेल तर त्या समाजाची प्रगती होत नसते असे महाराज या परिषदेत म्हणाले. भीमरावांच्या रूपाने अस्पृश्यांना सुयोग्य नेता मिळाल्याचा आनंद महाराजांनी व्यक्त केला.

मृत जनावराचे मांस खाणे हा गुन्हा मानावा, अस्पृश्यांनी मेलेली जनावरे ओढू नयेत, मुलांमुलींना सहशिक्षण असावे, स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक असावे, सार्वजनिक रस्ते, विहीरी, तलाव, शाळा, धर्मशाळा, भोजनगृहे, वाहने, करमणुकीच्या जागा अस्पृश्यांना खुल्या असाव्यात. अस्पृश्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क असावा,पडीक जमिनी अस्पृश्यांना कसायला द्याव्यात अश मागण्या माणगाव परिषदेत करण्यात आल्या. याच परिषदेत बाबासाहेबांनी विचारार्थ मांडलेल्या २ मुद्द्यांची पुर्तता शंभर वर्षांनंतरही अद्याप झालेली नाही. धार्मिक कार्ये स्वहस्ते करण्याचा अधिकार सर्व जातीतील सुशिक्षितांना असावा, यासाठी शासनाने विद्यापीठाच्या पातळीवर परीक्षा घेऊन पुजारी, धर्माधिकारी, शंकराचार्य यांच्या नियुक्त्या कराव्यात. एकाच जातीतील लोकांना जन्माने हा अधिकार मिळण्याऎवजी सर्व हिंदुंना ह्या जागा मिळाव्यात ही क्रांतिकारक मागणी आजही पुर्ण झालेली नाही. एरवी गुणवत्तेच्या गप्पा मारणार्‍या, आरक्षणाला नाकं मुरडणार्‍या वर्गाने या जागा गुणवत्तेवर भराव्यात आणि एका जातीला केवळ जन्माने मिळालेले १००% आरक्षण रद्द करावे यासाठी कधीही पाऊल उचललेले नाही. आजही सर्व शंकराचार्य एकाच जातीचे का? याला सुयोग्य उत्तर मिळालेले नाही. अस्पृश्यांनी परंपरागत कामे सोडून शेतीकडे वळावे, सहकारी बॅंका स्थापन कराव्यात हा बाबासाहेबांचा सल्ला आजही गंभीरपणे घेण्यात आलेला दिसत नाही.

बाबासाहेबांनी नोकरी करावी हे आपल्याला पसंत नसल्याचे महाराज म्हणाले. महाराजांचा सल्ला भीमरावांनी ताबडतोब मानला आणि तिथल्यातिथे सिडनेहॅम महाविद्यालाचा राजीनामा दिला. महाराजांनी रजपूतवाडीच्या कॅंपवर भोजनाला येण्याचे भीमरावांना निमंत्रण दिले. ते भीमरावांनी सहर्ष स्विकारले.

माणगाव परिषदेतूनच प्रेरणा घेऊन सव्वादोन महिन्यात ३१ मेला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये दुसरी परिषद घेण्यात आली. महाराजांच्या कन्येची तब्बेत बरी नसतानाही महाराज नागपूर परिषदेला हजर राहिले. अस्पृश्यांच्या परिषदेला शाहूराजे नागपूरला येणार तेव्हा त्यांचे स्वागत करायला नको म्हणून नागपूरकर भोसले शिकारीला निघून गेले. शाहूमहाराज माणगाव परिषदेला हजर राहण्यासाठी शिकारीहून मुद्दाम परत आलेले होते. हा फरक असतो जातपात मानणारे आणि तिचे निर्मुलन करणारे यांच्यात.

या परिषदेने अस्पृश्य व ब्राह्मणेतर यांच्या सहकार्याच्या वाटचालीला सुरूवात झाली. ही एका नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात होती. ही एका अभिनव सामाजिक अभियांत्रिकीच्या राजकारणाची पायाभरणी होती. ती कायम टिकली असती तर सनातनी आणि जातीयवादी शक्तींचा पराभव अटळ होता. पण तसे व्हायचे नव्हते. माणगाव परिषदेनंतर अवघ्या अडीच महिन्यांनी भीमराव आपले अपुरे राहिलेले उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. ते तिकडे डॉक्टर ऑफ सायन्स आणि बॅरिस्टर या सर्वोच्च पदव्यांचे शिक्षण घेत असतानाच ६ मे १९२२ ला महाराजांचे अकाली निधन झाले.
माणगाव परिषदेची शताब्धी साजरी करीत असताना विषयपत्रिका व सामाजिक समिकरणावर आधारित राजकारणाची व समाजकारणाची प्रेरणा आपण घेणार असू तरच या शताब्धीला अर्थ असेल.

प्रा. हरी नरके, २१ मार्च २०२०

http://newspaper.pudhari.co.in/viewpage.php?edn=Kolhapur&date=2020-03-21&edid=PUDHARI_KOL&pid=PUDHARI_KOL&pn=6#Article/PUDHARI_KOL_20200321_06_3/415px/1349075

जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - प्रा.हरी नरके


जागतिक मानवाधिकार इतिहासात जे महत्व फ्रेंच राज्यक्रांतीला आहे तेच मोल भारतीय मानवमुक्ती आंदोलनात महाड परिषदेला आहे. महाड येथे ९३ वर्षांपुर्वी १९ व २० मार्चला [१९२७]  भरलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षपदावरून दिलेला हा विचार आजही कालबाह्य झालेला नाही. परिषदेला ३००० पेक्षा अधिक उपस्थिती होती. परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम उर्फ दादासाहेब गायकवाड होते. [ नाशिकचे दादासाहेब गायकवाड वेगळे.] ज्यांनी आपल्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली त्या महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षात [१८२७-१९२७] महाडला ही परिषद भरवण्यात आलेली होती. परिषदेत बाबासाहेबांनी केलेले भाषण व मांडलेले ठराव आजही प्रेरणादायी आणि कालसुसंगत आहेत.

ही परिषद पंढरपूरला घ्यावी असा प्रस्ताव बाबासाहेबांसमोर होता. परंतु ही परिषद महाडला घेण्यामागे काही खास कारणे होती. त्यांचा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या भाषणात प्रारंभीच केलेला आहे.
एकेकाळी कोकण ही अस्पृश्यांची जागृत भुमी होती. महात्मा फुल्यांचे जिवलग मित्र गोपाळबाबा वलंगकर यांनी स्थापन केलेली " अनार्य दोष परिहारक मंडळी" कोकणात स्थापन झालेली होती.

या संस्थेच्या बहुमोल योगदानाचा बाबासाहेबांनी आवर्जून उल्लेख केलेला होता. बाबासाहेबांचे बालपणाचे काही दिवस दापोलीला गेलेले होते. त्यांचे मूळगाव आंबावडे [ आंबाडवे ] हे महाडपासून जवळच होते. त्यामुळे आपला परिसर हाही आपुलकीचा भाग होताच. सत्यशोधक आमदार सी. के. बोले यांच्या विधीमंडळातील ठरावानुसार महाडचे चवदार तळे सर्वांना खुले केल्याचा निर्णय महाडचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपनीस यांनी घेतलेला होता. सुरबानाना महाडचे असल्याने या तळ्यावरच सत्याग्रह करावा असा त्यांचा व त्यांचे मेहुणे चित्रे यांचा आग्रह होता. बाबासाहेब नुकतेच आमदार झालेले होते. कायद्याची अंमलबजावणी करावी, मानवाधिकार स्थापन करावा आणि आपले गुरू जोतीराव फुले यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करावे असे अनेक उद्देश महाडची निवड करण्यमागे होते.

महाड सत्याग्रहापर्यंत बाबासाहेबांना महात्मा फुले परिचित नव्हते असे नरहर कुरूंदकर म्हणतात. ते कुरूंदकरांचे अज्ञान होय. कुरूंदकरांनी ३ एप्रिल १९२७ चा बहिष्कृत भारत वाचला असता तर त्यांनी असले निराधार व असत्य विधान केले नसते. या अंकात बाबासाहेबांनी महाड परिषदेचा सविस्तर वृत्तांत छापलेला आहे. त्यात बाबासाहेब जोतीरावांचा गौरवपुर्ण उल्लेख करतात. [ पृ.६ ] वलंगकरांनी अ. दो. प. मं.या संस्थेमार्फत अस्पृश्यांच्या फक्त अडचणी दूर केल्या नाहीत तर लेखनाद्वारे पुष्कळ जागृती निर्माण केली. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीराव फुले यांचे अनेक खरे साथीदार व उत्साही शिष्य या संस्थेचे संचालक होते. गोपाळबाबांनी केलेली जागृती अनुपम होती असे बाबासाहेब सांगतात. दीनबंधूंच्या फायली त्याच्या साक्षीदार असल्याची नोंद बाबासाहेब करतात.

अस्पृश्यता आणि जातीनिर्मुलन करण्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत, सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असावेत, मेलेली जनावरे ओढण्याचे व मृतमांस खाण्याचे बंद केले पाहिजे, शिक्षण व दारूबंदी सक्तीची करायला हवी, आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी व्हायला हवी, अनिष्ठ विचारांचा मनावर बसलेला गंज साफ करायला हवा, सरकारी नोकरीत शिरले पाहिजे, शेतीचा व्यवसाय करायला हवा, सहकारी बॅंका स्थापन करायला हव्यात, सहकारी पतसंस्था स्थापन करायला हव्यात, सरकारी पडीक जमिनी ताब्यात घेऊन त्या कसल्या पाहिजेत, लष्कर, पोलीस, शाळाखाते अशा महत्वाच्या जागांवर अस्पृश्यांची नेमणुक व्हायला हवी, महारकी सोडली पाहिजे, मुलगा २० वर्षांचा व मुलगी १५ वर्षांची झाल्याशिवाय लग्नं करू नयेत, शाळा, वसतीगृहे, शिष्यवृत्त्या सुरू कराव्यात आदी मुद्दे आजही मार्गदर्शक ठरावेत असेच आहेत.

लिहिताना आणि बोलताना बाबासाहेब भीडभुर्वत बाळगीत नसत. एक मुलगा बी. ए. झाल्याने समाजास जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी पास झाल्याने होणार नाही, सरकारी नोकरीचे महत्व फक्त ब्राह्मण, मराठे व मुसलमान यांनाच समजलेले आहे. सरकारी नोकर म्हणजे सरकारचे हृदय होत. तेव्हा अस्पृश्यांनी सरकारी नोकर्‍या मिळवाव्यात. आपल्यापेक्षा आपल्या मुलाबाळांची परिस्थिती काकणभर सुधारलेली असावी असे ज्या आईबापास वाटत नाही ते आणि जनावरे यात फरक नाही. सद्गृहस्थहो, स्वत:साठी नाही तर किमान आपल्या संततीच्या उज्वल भवितव्यासाठी तरी माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या असे बाबासाहेब कळकळीने सांगतात.

बाबासाहेब द्रष्टे होते. ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, आंतरजातीय विवाहातून जातीनिर्मुलन, समाजजागृतीसाठी, मानवाधिकारासाठी आंदोलने ही पायाभुत भुमिका या परिषदेत त्यांनी मांडली. रूजवली. परिषदेच्या समारोपात चित्रे यांनी मांडलेल्या पुर्वनियोजित ठरावानुसार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा क्रांतिकारक कृतीकार्यक्रम राबवण्यात आला. या ओंजळभर पाण्याने जागृतीचा अग्नी पेटवला. तो आज विझूविझू झालाय. तो पुन्हा पेटवण्याची गरज आहे.

बाबासाहेबांची वाणी आणि लेखनी किती धारदार होती त्याचा आजच्या मरगळलेल्या मनांना परिचय व्हावा यासाठी पुढील उतारा नक्की वाचा-

" आज अस्पृश्य वर्गात समाविष्ट होणार्‍या जातींपैंकी  ***जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालवण्याची या जातीला सवय पडून गेलेली आहे. ह्या प्रघातामुळे या जातीला मुळी गावात इज्जत नाही. मान, मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झालेला आहे. काहीही म्हणा! जोड्यात वागवा! पण मला तुकडा वाढा अशी या जातीची वृत्ती बनून गेलेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. अशारितीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यांसाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे." [ पृ.७]

" पेशवाईत अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ऒळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे." [पृ.५, जो प्रसंग आम्ही "एक महानायक" या हिंदी मालिकेमध्ये कालच दाखवलेला आहे.]

- प्रा. हरी नरके,२० मार्च २०२०


Monday, March 16, 2020

मालिका पुढे चालू ठेवायची असेल तर -- प्रा.हरी नरके





डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही स्टार प्रवाहवरील मालिका बंद करू नका, तिचे भाग वाढवा, आम्हाला मालिका बघायची आहे, अशी एकमुखी मागणी माझ्या परवाच्या पोस्टवर करण्यात आली. धन्यवाद.ही मालिका वाढवावी अशी तुमची खरीच इच्छा असेल तर तुम्हाला विश्वासात घेऊन काही गोपनीय गोष्टी उघड करतो.
१. मालिकेला पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद असला तरी आणखी खूप जास्त प्रतिसाद मिळाला तरच यापुढे ही मालिका चालू ठेवणे व्यवहार्य ठरेल.
२. शेवटी सगळी सोंगं करता येतात, पैशाचे सोंग आणता येत नाही. ही मालिका बायोपिक असल्याने, तो काळ उभा करण्यासाठी, नेहमीच्या मालिकांपेक्षा जास्त पैसा खर्चावा लागतो.
३. तितका रिटर्न जर होत नसेल तर मग वाहिनीने काय करावे असे तुम्हाला वाटते? कुठलीही वाहिनी आतबट्ट्याचा व्यवहार करू शकत नाही.
४. ही मालिका सुरू झाली तेव्हापासून तिचा प्रेक्षकवर्ग टिकून राहिलेला आहे, एपिसोडपरत्वे छोटीमोठी वाढ / घट होत राहिली, मात्र मुख्य लोकप्रियता कायम राहिली. म्हणुन ठरलेले २०० एपिसोड संपल्यावरही मालिकेला ४०% मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळेच मालिका पुढे चालु राहिली.
५. अर्थात आता पुन्हा मुदतवाढ मागायची/ द्यायची असेल तर खूप जास्त प्रतिसाद वाढेल याची हमी कोण देणार? तुम्हाला खालील गोष्टी अग्रक्रमाने कराव्या लागतील.
६. रात्री ह्याच वेळी दुसर्‍या एका वाहिनीवर एक ऎतिहासिक विषयावरील चरित्र मालिका चालू होती. ती बघायची असल्याने आमची इच्छा असूनही आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका बघू शकत नसल्याचे अनेक लोक आम्हाला सांगत असत. ती मालिका बंद होऊनही या मालिकेच्या प्रेक्षकसंख्येत भरिव वाढ का झाली नाही?
७. आज दहा महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका चालूय. मालिका उत्तम आहे, आम्ही एकही भाग चुकवत नाही असे लक्षावधी लोकांचे अभिप्राय आम्हाला मिळतात मात्र हे लोक वाचकांच्या पत्रव्यवहारात या मालिकेबद्दल का लिहित नाहीत?
८. अपवाद वगळता समाज माध्यमांवरही [ फेसबुक/ ट्विटर/ व्हॉटसप] तुम्ही का लिहित नाही?
९. तुम्ही रोज बघता तर मग इतरांना बघायला का प्रवृत्त करीत नाही?
१०. एका अतिरेकी मानसिकतेच्या छोट्या वर्गाने या मालिकेवर सतत दुषित पुर्वग्रहातून हल्ले केले, त्याला उत्तर द्यावे असे तुम्हाला का वाटले नाही?
११. आंबेडकरी समाजातला एक छोटा आत्मकेंद्रीत वर्ग ह्या मालिकेवर पहिल्या दिवसापासून बहिष्कार घालून बसलेला आहे. त्याला फक्त नाकं मुरडण्याचा कार्यक्रम माहित आहे. आम्ही काही विधायक करणार नाही, इतरांनाही करू देणार नाही, अशी ही आडमुठी भुमिका तुम्हाला पटते का?
१२. समाजात असा एक सनातनी वर्ग आहे की ज्याच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जन्मजात अढी आहे. त्यांची संख्या मूठभरच आहे.
प्रागतिक विचाराचे सर्व जाती-धर्मातील लोक ही मालिका बघतात. आंबेडकरी समाजापेक्षाही ही प्रेक्षकसंख्या अधिक आहे. आंबेडकरी समाजातील मूठभरांनी आत्मघातकी वृत्ती सोडून ही मालिक यापुढे बघावी, इतर समाजातील प्रेक्षकांनाही इकडं वळवावं असं तुम्हाला वाटत नाही काय?
१३. आम्ही कायम समतोल मांडणी करीत आलोय. आंबेडकरी समाजातल्या उच्च बुद्धीजिवींनाही माहित नसलेल्या असंख्य गोष्टी या मालिकेने प्रथमच उजेडात आणल्या. तरिही जे फक्त टिकाच करतात, त्यांच्यामागे उभं राहायचं की मालिकेच्या मागे याचा निर्णय तुम्ही सुबुद्ध प्रेक्षकांनी घ्यायचाय.
१४. तुमचे वाढीव सहकार्य मिळणार नसेल तर ही मालिका फार लवकरच आपला निरोप घेईल.
१५. जगातले नंबर एक विद्वान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील गुणवत्तासंपन्न मालिका मराठी वाहिन्यांवरील नंबर एकची मालिका व्हावी असं तुम्हाला वाटत नाही काय? किमान पहिल्या दहामध्ये ती यावी यासाठी तुम्ही काहीच करणार नसाल तर मग आमचाही नाईलाज होईल.
१६. आम्ही आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही. पण उगीच मालिका अर्ध्यावर आलीय असा खोटाखोटा दिलासाही देणार नाही. तुमच्या वाढीव सहकार्याशिवाय ह्या मालिकेला यापुढे पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणं खरंच कठीण वाटतंय.
निर्णय आता तुमच्या हातात आहे.
-प्रा.हरी नरके, १६ मार्च २०२०
https://www.facebook.com/Mahamanvachi.Gauravgatha.FC/videos/841247446347731/

* अधिकारों सें इन्सान ग्यानी नही बनता. आप के पास सिर्फ अधिकार होना काफी नही हैं. क्यों की ग्यान अधिकारो से नही पढने से मिलता हैं. ग्यान से व्यक्ती दूरदर्शिता और मुत्सद्दीपण पा सकता हैं, जो व्यक्ती, समाज और देशके विकास के लिए आवश्यक होता हैं.   
* देशके भविष्य के निर्माण में नेता, पार्टी और उनकी प्रतिष्ठा का कोई स्थान नही होता हैं. देश का भविष्य इनके सर्वोपरी होता हैं. बल प्रयोग के आधारपर राष्ट्र की एकता या विकास का माहौल नही बनाया जा सकता हैं. उसके लिए दूरदर्शिता और भाईचाराही जरूरी हैं.

Saturday, March 14, 2020

गौरवगाथा २५० नाबाद- मालिका निरोपाच्या जवळ आलीय


























डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेचे काल २५० भाग पूर्ण झाले. रसिक प्रेक्षक, जाहीरातदार, स्टार प्रवाह वाहिनी आणि दशमी क्रिएशन यांचे हार्दीक आभार.

सर्व थरातील प्रेक्षकांनी ही मालिका उचलून धरली. सर्वच जात- धर्म- पंथ- प्रदेश- वयोगट यातल्या प्रेक्षकांचा दणकट प्रतिसाद मिळाला नसता तर ही मालिका फार पुर्वीच गुंडाळली गेली असती.

गेल्या अनेक वर्षात कोणत्याही खाजगी वाहिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मालिका करण्याची हिम्मत दाखवली नव्हती. दशमीचे नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांनी हे धाडस केले. स्टार प्रवाहचे सतिश राजवाडे, अभिजीत खाडे आणि सर्व टीम यांनी ही कल्पना उचलून धरली. सुरुवातीला २०० भागांना मान्यता देण्यात आलेली होती. मध्यंतरी त्यात थोडी वाढ करण्यात आली. १८ मे २०१९ पासून गेली दहा महिने स्टार प्रवाह वर रात्री ९ वाजता ही मालिका प्रक्षेपित होते.

मात्र आता मालिका शेवटाच्या जवळ पोचलेली आहे. तुमचं सर्वांचं प्रेम शेवटपर्यंत कायम राहिल असा विश्वास वाटतो.

हा अनुभव व्यक्तीश: मला खूप काही शिकवून समृद्ध करणारा होता. धन्यवाद नितीनसर. कोट्यावधी प्रेक्षकांच्या या ताकदीकडे सामाजिक चळवळीने संपुर्ण दुर्लक्ष करून हे कुरण सनातनी विचारांच्या कंपूला बहाल केलेले आहे.

आपले बहुतेक विचारवंत आणि साहित्यिक यांना निष्क्रीयता व आत्मकेंद्रीतता यामुळे मालिकाविश्व, त्याची परिणामकारकता, कोट्यावधींपर्यंत पोचण्याची क्षमता याची जाणीव झालेली नाही. ते सामान्य माणसाच्या जगण्याशी, त्याच्या आवडीनिवडीशी नाळ जोडू शकलेले नाहीत. ते बहुधा कालबाह्य झालेले आहेत. जे सामान्य जनतेपासून फटकून राहतात ते फुले-शाहू-आंबेडकरवादी कसे काय असू शकतात? आणि म्हणे हे परिवर्तनवादी. नेमकं कसलं परिवर्तन करणारेत हे? कशाच्या आणि कुणाच्या जोरावर? हे क्रांती करणार पण तिही स्वत:पुरती. मनातल्या मनात. त्यांच्या या तुसड्या आणि आत्मसंतुष्ट मानसिकतेमुळेच बहुधा प्रतिगामी शक्ती वेगाने वाढत आहेत. प्रबोधन चळवळी माना टाकीत आहेत. मला याची जाणीव आहे की मालिकांना अनेक मर्यादा असतात. बर्‍याच तडजोडी कराव्या लागतात. मालिकांमुळे क्रांती होणार नाही. मात्र अनुकूल मानसिकता नक्कीच घडवता येईल.

या यशाचे शिल्पकार असलेल्या खालील मान्यवरांचे मी कृतज्ञतापुर्वक आभार मानतो. ही नामावली प्रातिनिधिक आहे. प्रत्यक्षात या यशात आणखी खूप मान्यवरांचा सहभाग आहे.

नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर, सागर देशमुख, सतिश राजवाडे, शिल्पा कांबळे, अभिजीत खाडे, चिन्मय केळकर, शिवानी रांगोळे, वैभव छाया, अक्षय पाटील, अजय मयेकर, गणेश रासने, दीपक प्रभाकर  नलावडे, अमृत गायकवाड, चिन्मयी सुमीत, पूजा नायक, मिलिंद अधिकारी, संकेत कोर्लेकर, पुष्कर सरद, मृण्मयी सुपल, आदर्श शिंदे, सोहम देवधर, किरण शिंगाडे, अमित ढेकळे,निनाद लिमये, दादा गोडकर, पवन झा,पद्मनाभ बिंड, अजित दांडेकर, नरेंद्र मुधोळकर

-प्रा.हरी नरके, १३ मार्च २०२०

Wednesday, March 11, 2020

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता-






कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता- टीम कोलाज

सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.

सावित्रीबाई फुले आद्य भारतीय शिक्षिका आहेत. जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून परिवर्तनाची चळवळ त्यांनी चालवली. देशातली मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. त्यांनीच देशातलं पहिलं साक्षरता अभियान चालवलं. फसवल्या गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. सत्यशोधक समाजाची चळवळ चालवली. स्वतःच्या घरातला हौद अस्पृश्यांसाठी खुला करून जातिनिर्मूलनाच्या कार्यक्रमाला सुरवात केली. बालविवाहांना विरोध केला. विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला. एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवलं. शिवाय त्याचं आंतरजातीय लग्न करून दिलं.

जोतिबांच्या नंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. प्लेगच्या साथीत आजाऱ्यांची सेवा केली. त्यातच त्यांचं निधन झालं. हे सारं आपल्याला माहीत असतं. पण सावित्रीबाई स्वतः उत्तम कवयित्री होत्या. त्यांनी संपादनं करून चांगलं डॉक्युमेंटेशनही करून ठेवलीय. त्यांनी एकूण पाच पुस्तकं लिहिलीत. ती अशी,

‘काव्यफुले’ या १८५४ साली प्रकाशित झालेल्या सावित्रीबाईंच्या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. सावित्रीबाईंनी त्यात निसर्गविषयक, सामाजिक, बोधपर आणि ऐतिहासिक अशा कविता आहेत.
‘जोतिबांची भाषणे’ हे पुस्तक सावित्रीबाईंनी संपादित केवंय. त्याचं संपादन चार्लस जोशी यांनी केलंय. हे पुस्तक २५ डिसेंबर १८५६ ला प्रसिध्द करण्यात आलं. त्यात जोतीरावांची चार भाषणं आहेत.

‘सावित्रीबाईंनी जोतीरावांना लिहिलेली पत्रे’ नावाचंही पुस्तक सावित्रीबाईंच्या नावाने प्रसिद्ध झालं. यात त्यांनी एकूण तीन पत्रे असून ती नायगाय आणि ओतूरहून लिहिलेली आहेत.

‘मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे’ हे पुस्तक १९८२ मधे आलं. या पुस्तकात उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने, कर्ज या विषयांवरील भाषणं आहेत. याचं संपादन शास्त्री नारो बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी केलंय. बडोद्याच्या वत्सल प्रेसने हे पुस्तक प्रकाशित केलंय.

‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या कवितासंग्रहात सावित्रीबाईंनी देशाचा इतिहास काव्यरुपाने सांगितलाय. जोतीरावांच्या कार्याचं चित्रणही त्यात केलंय. यामधे ५२ रचना आहेत. हे काव्य जोतीरावांच्या मृत्यूनंतर १८९१ मधे प्रसिद्ध झालं. १८९२ मधे ते पुस्तकरुपाने आलं.

सावित्रीबाईंचं समग्र साहित्य आज उपलब्ध आहे. त्याची नवी आवृत्ती आजच प्रसिद्ध झालीय. त्यात कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या या पाच कविता,

पेशवाई

पुढे पेशवाई तिचे राज्य आले
अनाचार देखी अती शूद्र भ्याले
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते
खुणा नाश या ढुंगणी झाप होते
स्वराज्यी स्वधर्मी परी व्याघ्र दाढी
असंतोष त्यांचा कुणाही न काढी
प्रजेला एकसारखे वागवीती
तरी शूद्र सारे स्वधर्मी रहाती
तुला बोलवी रावबाजी धनी ग
स्वपत्नीस धाडी निर्लाजा पती ग
छळे ब्राम्हणाला अशी स्रैणशाही
मुखा बोलती ही जळो पेशवाई
पहा शंकराचे लुटी पूज्य क्षेत्र
अशी माजली पेशवाई विचित्र
पुढे जाहली मूर्खसत्ता विनाश
नसे दु:ख कोणा नसे सुख आस
छळी स्त्रीस शूद्रा बहू पेशवाई
अशा कारणे इंग्रजी राज्य होई
ध्वजा इंग्रजी लाविता बाळ नातू
तया निंदता रोरवातील जंतू
मिळे इंग्रजी फूस शूद्रादिकांना
लढाई कराया जमे जाति नाना
पराभूत हो पेशवाई करुनी
तिथे आणती शूद्र आंग्लाई शहाणी

इंग्रजी माऊली
पेशवाई गेली

इंग्रजी माऊली आली
निराशेचा गर्द अंधार
नरक स्वर्गाचे भय अनिवार
न्यूनगंडाचे मनी विचार
अशा या काळी, इंग्रजी माऊली आली
दूर फेकुनि रुढी द्यारे
परंपरेची मोडून दारे
लिहीणे वाचणे शिकूण घ्यारे
छान वेळ आली.... इंग्रजी माऊली आली
भटधर्मांच्या क्लृप्त्या नाना
अज्ञानामुळे शूद्रजनांना
पिळती छळती बहु तयांना
पेशवाई मेली.... इंग्रजी माऊली आली
भटशाहीचे राज्य जळाले
शहाणे इंग्रज विजयी झाले
शूद्र जनांना हित हे ठरले
मनूस्मृती मेली.... इंग्रजी माऊली आली
शूद्र जनांना ज्ञान सावली
अतिशूद्रांची पालनवाली
इंग्रज सत्ता सुखकर झाली
भयानकता गेली.... इंग्रजी माऊली आली
देश इंडिया नाही कुणाचा
इराणी बहान यवन हुणांचा
असा खरा तो इंडिया रक्ताचा
ठोक रे आरोळी.... इंग्रजी माऊली आली

शूद्रांचे दुखणे (अनुष्टुभ)

दोन हजार वर्षांचे शूद्रा दुखणे लागले
ब्रम्हविहित सेवेचे भू-देवांनी पछाडले
अवस्था पाहुनि त्यांची होय शब्दी मन उठे
सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुध्दी अटे
शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व पशूत्व हाटते पहा

मानव आणि सृष्टी

पाऊस पडला शिवारात या निर्मल झाली सृष्टी
फळाफुलांना कडधान्यांना पोषक देई पुष्टी
झिमझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी
फळाफुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी
कोकीळ गाते कहुकहुनी मोर डोलुनी नाचे
फुलाभोवती आनंदाने फीरती भुंगे चांचे
सुंदर सृष्टी मानव सुंदर जीवन सारे
सद्भावाच्या पर्जन्याने बहरुनी टाकू 'वा'रे

       मानवी जीवन विकसूया

       भय चिंता सारी सोडुनि या
       इतरा जगवू स्वत: जगूया
मानवप्राणी निसर्गसृष्टी द्वय शिक्क्याचे
एकच असे ते म्हणुनि सृष्टीला शोभवु मानव लेणे

हेही वाचाः

आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?
शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

http://kolaj.in/published_article.php?v=Poet-Savitribai-PhuleQV7940538&fbclid=IwAR1b0-W_Mc-zct_aWIJ3x3wQM709Sd_gIs7rgEN0WrFIC7YCXWh07Dstqjo

Tuesday, March 10, 2020

शेण नाही, ही तर फुलं आहेत-







शेण नाही, ही तर फुलं आहेत- प्रा. हरी नरके, kolaj.in कोलाज.इन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाला खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. यंदा २०१९ ला जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख.....

‘जोतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’
- नारायण महादेव उर्फ मामा परमानंद (३१ जुलै, १८९०)

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात, आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, यावर एक वाद झालेला होता. इंग्रजांच्या रूपात शत्रू समोर दिसत असल्याने आपण स्वाभाविकच राजकीय स्वातंत्र्याला अग्रक्रम दिला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आता आपले सामाजिक प्रश्न आपसूक सुटतील असा लोकांचा समज होता. परंतु जसजसे दिवस उलटू लागले, तसतसा लोकांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातून सामाजिक चळवळी हळूहळू जोर पकडू लागल्या.

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’

विविध क्षेत्रातल्या सामाजिक न्यायाच्या चळवळी संघटित करणाऱ्यांच्या हे लक्षात येऊ लागलं की या विषयाची जोतीराव सावित्रीबाईंनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.
जोतीराव सावित्रीबाईंवर मराठीत आजवर दोनशेहून अधिक ग्रंथ लिहिले गेलेत. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, तेलगू, बंगाली, कन्नड, पंजाबी, ऊर्दू, सिंधी, गुजराती या भाषांमधेही काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. यातल्या सावित्रीबाईंवर लिहिल्या गेलेल्या छोट्यामोठ्या पुस्तकांची संख्या ४० आहे. त्यातील ललितेतर वैचारिक ग्रंथ लक्षात घेतले तर त्यात मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे.

सावित्रीबाईंचं चिकित्सक चरित्रच नाही

त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्र ग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. प. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित असून त्यात फारसं नवीन काहीही नाही. मात्र सावित्रीबाईंचं आजवर एकही चिकित्सक चरित्र लिहिलं जाऊ नये, हे खेदजनक होय.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं.

शेण नाही, ही तर फुलं आहेत

सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता  येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत दोन साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्तीस केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणाऱ्यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणाऱ्याच आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह

१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

बरोबर काय न्यायचं आहे?

दुसऱ्या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्न दान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड

१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचं अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्यागच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

(लेखक ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत आहेत.)

http://kolaj.in/published_article.php?v=-Savitribai-Phule-storyHJ4370693&fbclid=IwAR1C1XbFRV5FEA7yZsK6Wq30FHm9wEBD3bZ5NeexgOBYNEByOpoaGSTyGbw

पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं






पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं...हरी नरके, बीबीसी मराठीसाठी

ज्येष्ठ समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च हा स्मृतिदिन. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याच साथीत 9 फेब्रुवारी 1897ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते खंदे नेते होते.

जोतिबांच्या विचाराने प्रेरित होऊन 'दीनबंधू' नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवित. लोखंडे यांनां भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं.

जोतिबांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती. मुंबईत फुल्यांना महात्मा उपाधी देणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात लोखंड्यांचा पुढाकार होता. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा ते मोठा आधारस्तंभ राहिले होते. चळवळीतला जवळचा सहकारी गेल्याने सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला.

मुंबई पाठोपाठ पुण्यात साथ पसरू लागली, तशा जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती. त्यामुळे उपाययोजना काय करायच्या याविषयीही माहिती नव्हती. त्यात समाजामध्ये देवीचा कोप यासारख्या अंधश्रद्धा होत्या. साहजिकच प्लेगच्या आजाराने माणसं मरत होती तेव्हा ते देवीच्या कोपाने मरतायत अशी अनेकांची भावना झाली.

पुण्यात जसजसं मृत्यूचं थैमान सुरु झालं तसं लोकच नाही तर बडे राजकीय नेतेही पुणे सोडून दुसरीकडे राहायला निघून जात होते. उंदरांमार्फत प्लेगचा प्रसार होत होता, उंदीर मरून पडलेले लोकांना दिसायचे. लोक बिथरून जायचे. ताप येऊन काखेत गाठ यायची आणि माणसं कोलमडून पडायची, हे सावित्रीबाई आजूबाजूला पाहात होत्या.

यशवंतच्या मदतीनं रुग्णांवर उपचार

सावित्रीबाईंनी स्वतः आपल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून तार करून बोलावून घेतलं. डॉक्टर यशवंत फुले ब्रिटीश मिलिटरीमध्ये नोकरी करत होते. रजा घेऊन आलेल्या यशवंतकडून परिस्थिती समजून घेऊन सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात केली.

हा संसर्गजन्य रोग जीवघेणा असल्याने आईने धोका पत्करू नये, असं डॉ. यशवंत यांचं म्हणणं होतं. पण त्यावर सावित्रीबाईंना वाटायचं आज महात्मा फुले असते तर ते परिस्थिती पाहून शांत बसले नसते. खेरीज नारायण मेघाजी लोखंडेंचा प्लेगने मृत्यू झालेला असताना आजाराच्या भीतीने त्या दूर राहू शकल्या असत्या. पण लोकांच्या दुःखापुढे त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती.


महात्मा फुलेंचं नाव घेतो तर लोकांसाठी काम केलं पाहिजे या विचारावर त्या ठाम होत्या. असं म्हणून त्या कामाला लागल्या. पुण्यात हडपसरजवळ आताच्या मोहम्मदवाडी, ससाणेनगर परिसरात यशवंत यांच्या सासऱ्यांची शेती होती.

हा भाग तेव्हा पुणे शहराच्या वेशीवर होता. इथल्या माळावर काही झोपड्या बांधल्या आणि त्यांनी दवाखाना सुरू केला. विशेषतः मुली आणि महिला घरोघरी जाऊन कोणाला ताप आला असेल किंवा प्लेगची लक्षण दिसत असतील तर त्या पेशंट्सना दवाखान्यात घेऊन येत. आणि यशवंतच्या मदतीने उपचार करत.
तेव्हा पुण्यात प्लेगची इतकी दहशत पसरली की सरकारी दफ्तरं ओस पडली होती आणि लोक उपचारासाठी आपणहून घराबाहेर कमी संख्येने बाहेर पडत होते. देवीचा कोप असेल या भीतीने घरात आजारी माणसांना दडवून ठेवलं जात होतं.

ब्रिटीश सरकारसमोर साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचं मोठं आव्हान होतं. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा बडगा उगारला. त्यात रँड या ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या बडग्याने लोकांमध्ये असंतोष पसरू लागला होता.

पुणे शहरात घराघरात आरोग्यसेवा पोहचवणं जिकिरीचं होतं. भीतीमुळे लोक मदत करायलाही पुढे सरसावत नसत. गाडी-घोडे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर समाजातल्या विशिष्ठ वर्णाच्या आणि प्रस्थापित वर्गासाठी प्राधान्याने मिळत. गावात आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या दलित वस्तीत कशी पोहचणार हा प्रश्न होता.
तत्कालीन परिस्थितीत जातींमध्ये भेदाभेद, अस्पृश्यता असताना वाडी वस्तीत उपचार पोहचणं दुरापस्त होतं. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतंत्रपणे तळागाळातल्या लोकांसाठी काम करायला सुरूवात केली.

रुग्णसेवा करतानाच प्लेगची लागण

सावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची नोंद कागदोपत्री आहे. मुंढव्याच्या दलित वस्तीत पांडुरंग प्लेगने आजारी असल्याची माहिती सावित्रीबाईंना मिळाली. अकरा वर्षांच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेतलं.

मुंढव्यापासून आठ किलोमीटर चालत त्यांनी ससाणेनगर गाठलं. माळावरच्या दवाखान्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग वाचला खरा पण दरम्यानच्या काळात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती. काम करताना तापाने सावित्रीबाई फणफणल्या. अखेर 10 मार्चला त्या अविरतपणे काम करत असताना गेल्या.
सावित्रीबाईंना 1 जानेवारी 1848 साली शाळेचं पहिलं काम सुरू केलं होतं, आणि त्या गेल्या 1897 साली. जवळपास पन्नास वर्षं त्यांनी शिक्षणक्षेत्रात, सामाजिक सुधारणेसाठी आणि सेवेसाठी धडाडीने काम केलं.
शिक्षणाखेरीज समाजसेवेचं आणि लोकांना मदत करण्याचं सावित्रीबाईंचं काम पाहाताना नेहमी वाटतं, की आपल्याकडे झाशीच्या राणीने केलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगितली जाते. जितकी ती शौर्यगाथा राजकीयदृष्ट्या रोमांचक आहे तितकंच तोलामोलाचं सावित्रीबाईंचं हे शौर्य आहे.

सावित्रीबाईंच्या कार्याकडे दुर्लक्ष

आपल्याला इतिहास नेहमी लढाया, पराक्रम यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. आपण सामाजिक सेवेत हौतात्म्य पत्करणाऱ्यांच्या इतिहासाकडे कमी आकर्षित होतो. जेव्हा सावित्रीबाई पांडुरंगाला पाठीवर घेऊन चालत होत्या तेव्हा एकप्रकारे त्या प्लेगशी झगडत होत्या. मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाठीवरच्या पांडुरंगाला त्यांनी अखेर वाचवलं.

पुणे नगरपालिकेचा त्यावेळचा रेकॉर्ड पाहिला तर भयावह चित्र डोळ्यासमोर येतं. मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीही कर्मचारी नसायचे. त्यामुळे पालिकेत फक्त आकड्यांच्या नोंदी आहेत. 10 मार्च 1897 या दिवशी किती माणसं मरण पावली याचाच आकडा मिळतो.

एकेका दिवसाला 775, 685 असे भयंकर आकडे आहेत. त्यावेळच्या पुण्यात एका दिवसात नऊशे माणसं मरण पावली असतील तर किती हाहाकार माजला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नगरपालिकेच्या रेकॉर्ड्समध्ये दिड-दोन महिन्यांच्या काळात अशाच आकड्यांच्या नोंदी सापडतात.
त्या काळात माध्यमांची अस्पृश्यताही ठळकपणे दिसते. लोकमान्य टिळकांच्या केसरीने तर सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची साधी बातमीही छापली नाही. खरंतर टिळक आणि आगरकरांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुल्यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही.

साहजिकच सावित्रीबाईंचा अनुल्लेख ओघानेच आला. पण केसरीने बातमी दिली नसली तरी दीनबंधू वर्तमानपत्राने दिली होती. बहुजन समाजात जनजागृतीच्या उद्देशाने दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र निघत असे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येतंय याचा सारांश ब्रिटीश गव्हर्नरला पाठवला जाई. त्यात दीनबंधूच्या बातमीचा उल्लेख सापडतो.

माध्यमांनीच नव्हे तर त्यावेळच्या प्रस्थापित समाजाने आणि नेत्यांनीही सावित्रीबाईंच्या योगदानाची उपेक्षा केलेली दिसते.

पुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुल्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले. या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.

१८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली. (मराठी विश्वकोश)

(डॉ. हरी नरके हे लेखक आणि फुले यांचे विचार, साहित्य तसंच चळवळीचे अभ्यासक आहेत. वरील लेखाचे शब्दांकन आणि संपादन बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केले आहे)

https://www.bbc.com/marathi/india-51815816?fbclid=IwAR0el49CLu8FmZNO38WoRq1sX9g2PxoMWuuWl1-VjB8t5aV6iW0xji1EkqY

जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट







सुमारे ४० वर्षांपुर्वीची गोष्ट. माझ्या मित्राची आई महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका होती. अतिशय बुद्धीमान आणि कर्तबगार महिला. उत्तम वाचन आणि सामाजिक जाणीवेतून वंचितांसाठी सतत कार्यरत असलेल्या. एकदा आमच्यात बोलता बोलता सावित्रीबाई फुलेंचा विषय निघाला. सावित्रीबाई झाल्या नसत्या तर आज तुम्ही प्राध्यापिका होऊ शकला नसतात, असं मी बोलून गेलो. त्यांना खूप राग आला. त्या म्हणाल्या, असंच काही नाही. त्यांनी जे काही महिलांच्या शिक्षणासाठी केलं, ते त्या झाल्या नसत्या तरी अन्य कुणीतरी केलंच असतं. काळ कुणासाठी थांबत नसतो. कामं कुणासाठी अडून राहात नसतात."
" जी गोष्ट गरजेची असते ते काम होतेच. कोणी होवो अगर ना होवो. सावित्रीबाईंचे उगीच देव्हारे माजवण्याची गरज नाही."
मी खूप हिरमुसलो. दुखावला गेलो.
मित्राची आई माझ्याबद्दल जिव्हाळा आणि आत्मियता असलेली व्यक्ती असल्याने त्यांचं म्हणणं पटलं नाही तरी मी गप्प बसलो.
पण मुद्दा मनात ठसठसत राहिला.
त्यांच्या महाविद्यालयाला स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगलेल्या, एका महान राष्ट्रीय नेत्याचे नाव देण्यात आलेले होते. त्या नेत्यांच्या जयंतीनिमित्त एकदा आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. राजकीय स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान दिलेले हे नेते सामाजिक बाबतीत सनातनी असल्याचा माझा आक्षेप ऎकून त्या खवळल्या. "हरी, अरे तू काय बोलतोयस ते तुला कळतंय तरी का? ते झाले नसते तर आपला देश स्वतंत्र झालाच नसता. एव्हढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना माणसांनं आपलं वय, पात्रता आणि अक्कल यांचा विचार करावा" असंही त्या मला म्हणाल्या.
मीही हट्टाला पेटलो आणि म्हणलो, " त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी काम केलं ते मोठंच होतं. पण समजा त्यांनी ते केलं नसतं तरी स्वातंत्र्य मिळालंच असतं. कामं कुणासाठी अडून राहात नसतात, असं तुम्हीच म्हणता ना?"
त्या अतिशय संतापल्या आणि मला " मुर्ख आहेस. चालता हो," म्हणाल्या.
मी म्हटलं, " मी काय वावगं बोललो? जो न्याय सावित्रीबाईंना तोच लोकमान्यांना का नाही?"
त्यांना ते पटलं नाही. त्या म्हणाल्या, " ते वेगळं, हे वेगळं."
माणसं असा दुटप्पीपणा का करतात? जात माणसाच्या अबोध मनात [नेणीवेत] दडलेली असते नी ती नकळत काम करत असते हेच खरं काय?
एरवी अतिशय समतोल वागणारी ही माझ्या मित्राची आईसुद्धा नकळत असं वागून गेली असावी काय? मी त्यांना जातीयवादी म्हणणार नाही.
एरवी उत्तम युक्तीवाद करणार्‍या बुद्धीजिवी माणसांचाही जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट असतो काय?
-प्रा.हरी नरके, १० मार्च, २०२०


Monday, March 9, 2020

१२४ वा स्मृतीदिन - शहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा - प्रा. हरी नरके






१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे...........




जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्शक शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला अपघाती निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड

१८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. मुंबईत यावर्षी झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शांतता प्रस्थापनेचे काम केले. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.

* २५ डिसेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले.

* १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली.
त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले.

* १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. जगवली. स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेऊखाऊ घातलं.

* ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपन, मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला.

जोतिरावांच्या मृत्यूनंतर स्वत: सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आधुनिक भारताच्या इतिहासातली अशी ही बहुधा पहिलीच घटना असावी.

सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री आणि शिक्षणतज्ञही होत्या. त्यांचा काव्यफुले हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. त्यात पर्यावरण जागृती, शिक्षणाचे महत्व,
निसर्ग आणि माणसाचे नाते, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्त्रीपुरूष समता अशा विषयांवरच्या मौलिक कविता आहेत.

त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणारे कृतीशील शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणातला गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय सुचवले व ते अंमलात आणले.

स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, संवाद, वादविवाद, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. आधुनिक भारताचा स्त्रीपुरूष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात त्यांनी केली.
आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना उर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते.

- प्रा. हरी नरके, १ मार्च, २०२०

संदर्भ-
प्रा. हरी नरके, सावित्रीबाई फुले चरित्र, नागानालंदा प्रकाशन, इस्लामपूर, २००५
प्रा.हरी नरके, [ संपा.] सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले गौरवग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८



[लेखक सावित्रीबाईंचे चरित्रकार असून त्यांनी महात्मा फुले समग्र वाड्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय यांचे संपादन केलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख व प्राध्यापक राहिले असून त्यांनी राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ समितीचे सचिव म्हणून [१९९० ते २०१८] काम केलेले आहे.]