Monday, March 30, 2020

निरामय सूर जपून ठेवा गलबला फार झाला - प्रा. हरी नरके


भारत नावाच्या आपल्या देशात एकाच काळात अनेक देश राहात असतात. त्यांचं जगणं इतकं परस्परविरोधी असतं की त्याचे पदर समजून घेताना गोंधळून जायला होतं. एका बाजूला कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यू वाढताहेत ही धडकी भरवणारी बातमी असते तर दुसरीकडे त्याहून जास्त रूग्ण बरे झाल्याची दिलासा देणारीही बातमी असते.

एका शेजारी देशात कोरोनाकाळात तिथल्या अल्पसंख्यकांना अन्नधान्य वाटप केलं जात नसल्याची बातमी असते. तर दुसरीकडे बुलंदशहरमध्ये एक हिंदू कॅन्सरने मृत्यू पावला असता त्याच्या अंत्ययात्रेला एकही हिंदू हजर नव्हता तेव्हा तिथल्या मुस्लीमांनी त्याचा अंत्यविधी केला अशी बातमी पुढे येते.

डॉक्टर, नर्सेस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करण्यामुळे कोरोनाचे शेकडो रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक घटना तर जगभरात ३४ हजार बळी गेलेले आहेत नी सात लाखांना कोरोनाची लागण झालेली आहे. अमेरिका तसेच युरोपमधील श्रीमंत देशांचे कंबरडे कोरोनाने मोडले असतानाही आपल्याकडे अनेकांना गांभिर्यच नाहीए. शेकडो लोक झुंडींनी आजही आपली अक्कल पाजळीत गावच्या जत्रा साजर्‍या करताहेत व जमावाला आटोक्यात आणणार्‍या पोलीसांवरच दगडफेक करताहेत.

दवाखाने अपुरे पडत असतानाही काही शहरी वस्त्यांमध्ये जमाव अद्यापही काबूत येत नाहीये, आपापल्या गावाला जाण्यासाठी लोक टॅंकरचा वापर करताहेत, लाखो बेघर उपासीपोटी मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत निघालेत, अशावेळी खूप अपराधी वाटतं.

तर दुसर्‍या बाजूला जनजीवन सुरळीत होईल या आशावादाने काही लोक समाजमाध्यमांवर खाण्यापिण्याचे पदार्थ झळकवतात, वाढदिवसाच्या जाहीराती टाकतात. डॉक्टर आणि नर्सेससाठी सुरक्षासाधनांचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येतात तेव्हा दुसरीकडे काहीजण दारू दुकानं उघडी ठेवा अशी बिनदिक्कत मागणी करतात. सरकार रस्त्यावरच्या लोंढ्यांसाठी निवारा केंद्रे काढीत असताना, जेवणाची व्यवस्था करीत असताना काही जातीयवादी मदतकोशाचे सवते सुभे उभे करतात. या संकटकाळात राजकारण करणारांची तसेच जे आपला छुपा अजेंडा पुढे रेटताहेत अशांची किळस येते. रात्रंदिवस काम करणार्‍या यंत्रणेचे मनोबल वाढवण्याऎवजी त्यांच्यावर टिकेचे कोरडे ओढणारे हे निष्क्रीय टिकोजीराव बघितले की संताप येतो.

मन विषन्न आणि उद्विग्न होऊ न देता तरिही निर्धाराने निकोप,निरामय सूर जपून ठेवायला हवा. गलबला कितीही वाढला तरी काम करायलाच हवे. एक कवी म्हणतो तसे " ज्यांच्यासाठी करिशी यात्रा, तेच परतले भिवून तमाला, नकोस परतू तुही परंतु चाल गड्या तू चाल!"

आशावादी राहणं हा भाबडेपणा वाटावा अशा ह्या संकटकाळात कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता हेही दिवस जातील ही भावना जपायलाच हवी नाही का?

-प्रा.हरी नरके, ३० मार्च २०२० 

No comments:

Post a Comment