Friday, March 20, 2020

डॉ. आंबेडकर अखिल भारताचे नेते होतील - राजर्षी शाहू छत्रपती


पुढारी, सर्व आवृत्या, संपादकीय पृष्ठ, शनिवार, दि. २१ मार्च २०२०

डॉ. आंबेडकर अखिल भारताचे नेते होतील - राजर्षी शाहू छत्रपती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताचे नेते होतील असे जाहीर भाकीत छ. शाहू महाराजांनी ज्या माणगाव परिषदेत केले होते तिची आज शताब्धी आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पीएच. डी. ही पदवी संपादन करणारे भीमराव आंबेडकर हे पहिले भारतीय. भारतात परत आल्यानंतर बडोद्यातील नोकरीत आलेल्या कटू व जातीय बहिष्काराच्या अनुभवांनी भीमरावांना जखमी केलेलं होतं. सिडनेहॅम महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करीत असतानाच साऊथबरो कमिशन भारतात आले. २७ जानेवारी १९१९ ला भीमरावांनी कमिशनला साक्ष दिली. सर्व भारतीयांना मताधिकार मिळाला पाहिजे अशी ऎतिहासिक मागणी त्यांनी कमिशनसमोर केली. एव्हढी क्रांतिकारक मागणी करूनही तत्कालीन ब्राह्मणी वर्तमानपत्रांनी या साक्षीला प्रसिद्धी दिली नाही. आपले स्वत:चे वर्तमानपत्र असावे म्हणून ३१ जानेवारी १९२० ला त्यांनी मूकनायक हा पेपर सुरू केला. त्याला अडीच हजार रूपयांची देणगी देऊन रा. शाहूंनी भीमरावांना भक्कम पाठबळ दिले.

माणगाव परिषद म्हणजे भीमरावांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात मानता येईल. ही दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद, दि. २१ व २२ मार्च १९२० रोजी पार पडली. माणगाव, कोल्हापूर येथे गुढीपाडव्याला झालेल्या या परिषदेचा सविस्तर वृत्तांत १० एप्रिल १९२० च्या मूकनायकमध्ये प्रकाशित करण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आलेली होती. परिषदेला दस्तुरखुद्द शाहूराजे उपस्थित होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष दादासाहेब इनामदार हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताचे नेते होतील असे जाहीर भाकीत छ. शाहू महाराजांनी या परिषदेत केले आणि ते खरेही ठरले. भीमरावांना पंडीत ही पदवी देण्यात यावी असेही महाराजांनी सुचवले. महाराजांना माणसांची अचुक पारख होती. भीमराव नवखे असताना त्यांच्याबद्दल असे भविष्य वर्तवणे ह्यातून महाराजांचा द्रष्टेपणाच दिसून येतो.

या परिषदेत अस्पृश्यांसाठीच्या राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी करण्यात आली. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजेत असे भीमरावांनी ठणकावून सांगितले. हीच मागणी त्यांनी पुढे १३ वर्षे लावून धरली. पुणे करारानंतर राखीव जागा मिळवून ते यशस्वी झाले.  छ. शाहूंचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. महात्मा फुले १८८० मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू करतात आणि ४० वर्षांनी १९२० मध्ये बाबासाहेब शाहू जयंती उत्सव सुरू करतात हे महत्वाचे आणि ऎतिहासिक पाऊल होते. मूकनायकचा शाहू जयंती विशेषांक काढण्यासाठी भीमरावांनी महाराजांना जे पत्र लिहिले त्यातून २६ जून ही रा. शाहूंची खरी जन्मतारीख मिळाली. सुमारे नव्वद वर्षे शाहू चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी दिलेली २६ जुलै ही चुकीची तारीख प्रमाण मानली जात होती. दहा वर्षांपुर्वी बाबासाहेबांच्या या दुर्मिळ पत्रामुळे त्यात दुरूस्ती करण्यात आली.  शाहू जयंती सुरू करण्याच्या बाबासाहेबांच्या या प्रेरक कृतीतून उर्जा घेऊन प्रस्तुत लेखकाने २० वर्षांपुर्वी त्यावेळचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करून शासकीय पातळीवर ग्रामपंचायत ते मंत्रालय शाहू जयंती सुरू करायला लावली. त्याकामी अनुकूल अभिप्राय देऊन कोल्हापूरचे सुपुत्र व ख्यातनाम सनदी अधिकारी भूषण गगराणी यांनी अमूल्य सहकार्य केले.

गुणवत्ता जन्माने मिळत नाही. ती संधी मिळण्यावर अवलंबून असते, अस्पृश्यांना व ब्राह्मणेतरांना कायम संधी नाकारून उच्चवर्णियांनी आपली तथाकथित गुणवत्ता [ ! ] संपादन केलेली आहे हे खडे बोल भीमरावांनी या परिषदेत सुनावले. सर्वांन समान संधी, ज्यांना पिढ्यानुपिढ्या संधी नाकारली गेली त्यांना विशेष संधी हे तत्वज्ञान महाराजांनी कोल्हापूर राज्यापुरते १९०२ सालापासून स्विकारलेले होते. योग्य नेता नसेल तर त्या समाजाची प्रगती होत नसते असे महाराज या परिषदेत म्हणाले. भीमरावांच्या रूपाने अस्पृश्यांना सुयोग्य नेता मिळाल्याचा आनंद महाराजांनी व्यक्त केला.

मृत जनावराचे मांस खाणे हा गुन्हा मानावा, अस्पृश्यांनी मेलेली जनावरे ओढू नयेत, मुलांमुलींना सहशिक्षण असावे, स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक असावे, सार्वजनिक रस्ते, विहीरी, तलाव, शाळा, धर्मशाळा, भोजनगृहे, वाहने, करमणुकीच्या जागा अस्पृश्यांना खुल्या असाव्यात. अस्पृश्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क असावा,पडीक जमिनी अस्पृश्यांना कसायला द्याव्यात अश मागण्या माणगाव परिषदेत करण्यात आल्या. याच परिषदेत बाबासाहेबांनी विचारार्थ मांडलेल्या २ मुद्द्यांची पुर्तता शंभर वर्षांनंतरही अद्याप झालेली नाही. धार्मिक कार्ये स्वहस्ते करण्याचा अधिकार सर्व जातीतील सुशिक्षितांना असावा, यासाठी शासनाने विद्यापीठाच्या पातळीवर परीक्षा घेऊन पुजारी, धर्माधिकारी, शंकराचार्य यांच्या नियुक्त्या कराव्यात. एकाच जातीतील लोकांना जन्माने हा अधिकार मिळण्याऎवजी सर्व हिंदुंना ह्या जागा मिळाव्यात ही क्रांतिकारक मागणी आजही पुर्ण झालेली नाही. एरवी गुणवत्तेच्या गप्पा मारणार्‍या, आरक्षणाला नाकं मुरडणार्‍या वर्गाने या जागा गुणवत्तेवर भराव्यात आणि एका जातीला केवळ जन्माने मिळालेले १००% आरक्षण रद्द करावे यासाठी कधीही पाऊल उचललेले नाही. आजही सर्व शंकराचार्य एकाच जातीचे का? याला सुयोग्य उत्तर मिळालेले नाही. अस्पृश्यांनी परंपरागत कामे सोडून शेतीकडे वळावे, सहकारी बॅंका स्थापन कराव्यात हा बाबासाहेबांचा सल्ला आजही गंभीरपणे घेण्यात आलेला दिसत नाही.

बाबासाहेबांनी नोकरी करावी हे आपल्याला पसंत नसल्याचे महाराज म्हणाले. महाराजांचा सल्ला भीमरावांनी ताबडतोब मानला आणि तिथल्यातिथे सिडनेहॅम महाविद्यालाचा राजीनामा दिला. महाराजांनी रजपूतवाडीच्या कॅंपवर भोजनाला येण्याचे भीमरावांना निमंत्रण दिले. ते भीमरावांनी सहर्ष स्विकारले.

माणगाव परिषदेतूनच प्रेरणा घेऊन सव्वादोन महिन्यात ३१ मेला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये दुसरी परिषद घेण्यात आली. महाराजांच्या कन्येची तब्बेत बरी नसतानाही महाराज नागपूर परिषदेला हजर राहिले. अस्पृश्यांच्या परिषदेला शाहूराजे नागपूरला येणार तेव्हा त्यांचे स्वागत करायला नको म्हणून नागपूरकर भोसले शिकारीला निघून गेले. शाहूमहाराज माणगाव परिषदेला हजर राहण्यासाठी शिकारीहून मुद्दाम परत आलेले होते. हा फरक असतो जातपात मानणारे आणि तिचे निर्मुलन करणारे यांच्यात.

या परिषदेने अस्पृश्य व ब्राह्मणेतर यांच्या सहकार्याच्या वाटचालीला सुरूवात झाली. ही एका नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात होती. ही एका अभिनव सामाजिक अभियांत्रिकीच्या राजकारणाची पायाभरणी होती. ती कायम टिकली असती तर सनातनी आणि जातीयवादी शक्तींचा पराभव अटळ होता. पण तसे व्हायचे नव्हते. माणगाव परिषदेनंतर अवघ्या अडीच महिन्यांनी भीमराव आपले अपुरे राहिलेले उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. ते तिकडे डॉक्टर ऑफ सायन्स आणि बॅरिस्टर या सर्वोच्च पदव्यांचे शिक्षण घेत असतानाच ६ मे १९२२ ला महाराजांचे अकाली निधन झाले.
माणगाव परिषदेची शताब्धी साजरी करीत असताना विषयपत्रिका व सामाजिक समिकरणावर आधारित राजकारणाची व समाजकारणाची प्रेरणा आपण घेणार असू तरच या शताब्धीला अर्थ असेल.

प्रा. हरी नरके, २१ मार्च २०२०

http://newspaper.pudhari.co.in/viewpage.php?edn=Kolhapur&date=2020-03-21&edid=PUDHARI_KOL&pid=PUDHARI_KOL&pn=6#Article/PUDHARI_KOL_20200321_06_3/415px/1349075

No comments:

Post a Comment