Sunday, April 30, 2017

"मुक्ता"फळं --

1. देशासाठी सैनिक सीमेवर एव्हढा त्रास सोसतात आणि हे देशप्रेमी भारतात आरक्षण आहे म्हणून विदेशात जातात. किती अव्वल दर्जाची देशभक्ती! लोकमान्य टिळक इंग्रजांना म्हणाले होते, तुम्ही कितीही गुणवान असाल, बुद्धीमानही असाल पण आम्हाला सुराज्य नको तर "स्व"राज्य हवे आहे आणि "स्वराज्यात" सर्वांना प्रतिनिधित्व द्यायचे तर आरक्षण आणखी काही काळासाठी तरी आवश्यक आहे. ज्या घटनापरिषदेने सर्वप्रथम आरक्षण दिले त्या परिषदेत 90 टक्के लोक उच्चवर्णीय होते.
2. जे कोणी उच्चशिक्षण किंवा चांगल्या करियरसाठी परदेशात गेले, स्वत:ची प्रगती करण्यासाठी गेले त्यांना माझा विरोध नाही. ही पोस्ट त्यांच्याविरोधात नाही.
3. मात्र जे लोक आम्ही आरक्षणामुळे देश सोडला असं सांगतात त्यांच्या गुणवत्तेचे परदेशात कोणते दिवे लागलेत? असे जे परदेशात गेलेत त्या "स्वयंघोषित बुद्धीमानांनी" कोणते नवे शोध लावलेत? त्यांनी जगाला नवे काय दिलेय? कोणती क्रांती केलीय? त्यांच्यापैकी कितींना नोबेल पुरस्कार मिळालेत?
4. हे लोक महागडे उच्च शिक्षण भारतात फुकटात घेऊन मग परदेशात जातात. असल्या आप्पलपोट्यांची काळजी आपल्याला कशाला हवी?
मुळात हे लोक बुद्धीमान असतात याला पुरावा काय? असे कोणते कौशल्य यांच्याजवळ असते किंवा कोणते ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे झेंडे यांनी फडकवलेत? नाचता येईना तर म्हणे अंगण वाकडे!
5. आपण अणुबॉम्ब बनवला. औद्योगिक क्रांती केली. आज आपण जगातली तिसरी सत्ता बनण्याच्या मार्गावर आहोत. आपले यांच्यावाचून काय अडलेय? या पोटार्थी लोकांची भारताला खरंच गरज आहे काय?
6. भारत सरकारच्या NSSO नुसार देशात 40 कोटी रोजगार आहेत आणि त्यातले असंघटित क्षेत्रात [ हमाल, ड्रायव्हर, शेतमजूर इ. ] सुमारे 37 कोटी लोक आहेत आणि त्यात आरक्षण नाही.
7. उर्वरित तीन कोटींपैकी एक कोटी रोजगार केंद्र व राज्य सरकारांकडे असून त्यातल्या निम्म्या म्हणजे 50 लक्ष जागा आरक्षित आहेत. खाजगी क्षेत्रात 2 कोटी रोजगार असून त्यात आरक्षण नाही. सैन्यातही आरक्षण नाही.
8. ओबीसी आरक्षणातील सात लाख सरकारी जागा रिक्त आहेत. [ भारत सरकारच्या डी.ओ.पी.टी. नुसार] अनु. जाती, अनु. जमातीच्या काही लाख जागाही भरलेल्या नाहीत. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील हे "बुद्धीमान लोक" भ्रष्टाचार, दहशतवाद, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, जातीयवाद, महागाई, बेरोजगारी, महिला अत्त्याचार यामुळे हा देश सोडत नाहीत. मात्र अवघ्या एक ते सव्वा टक्के [ 40 कोटी रोजगारातील अर्धा कोटी] जागा राखीव असल्याने देश सोडतात?
9. या सन्माननीय भगिनी महिला आरक्षणातूनच पुण्याच्या महापौर झाल्या ना? त्यांनी आधी या आरक्षित पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच ही मुक्ताफळं ऎकवावीत.
10. गुणवत्तेच्या शिखरावर असलेले नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अमर्त्य सेन, संपर्क क्रांतीचे जनक डॉ. सॅम पित्रोदा, परममहासंगणक बनवणारे डॉ. विजय भटकर, आधारचे जनक डॉ. नंदन निलेकणी, इन्फोसिसचे डॉ. नारायण मुर्ती, उद्योगाचे एव्हरेस्ट जेआरडी टाटा, भारतीय जागतिकीकरणाचे जनक डॉ. मनमोहन सिंग, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खगोलशास्त्रातले विश्वमान्य संशोधक डॉ. जयंत नारळीकर, मिसाईलमॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कुणीही आरक्षणाला विरोध केलेला नाही - प्रा. हरी नरके Prof. Hari Narke

Thursday, April 20, 2017

बाबासाहेबांचे विचार

https://www.youtube.com/watch?v=3m0N0smWGa4
साडेनऊच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी (१४ एप्रिल २०१७)
मुलाखत संपादीत अंश,
Published on Apr 15, 2017
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती, आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. देशाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पाहता,
बाबासाहेबांचे विचार कसे महत्वाचे ठरतात आणि येणाऱ्या पिढीसाठी ते कसे मार्गदर्शक आहेत. या विषयी अधिक चर्चा करण्यासाठी, प्राध्यापक हरी नरके १४ एप्रिलला साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले होते.... त्यांच्याकडून जाणून घेऊया....

विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

https://www.youtube.com/watch?v=57Kd4RXzytI
Mahacharcha Live 13 April 2017 '
विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर... '
सहभाग - प्रा. हरी नरके, अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, योगिनी बाबर, निर्माता: जयू भाटकर
गुरूवार दि.13 एप्रिल, 2017 सायं. 7:30 ते 8:30वा. Live
Published on Apr 19, 2017
DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi
Show : Mahacharcha

मौनाचा कट?

समाजाच्या संवेदना आरपार बधीर झाल्यात काय?
शीतल वायळनं बापाकडं हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्त्या केली. प्रसार माध्यमांनी थोडी चर्चा केली. नवे विषय पुढे येताच हा विषय मागे पडला.
मध्यंतरी म्हैसाळच्या घटनेत मुलींची गर्भातच अवैध हत्त्या करण्याचा विषय पुढे आला, थोडी चर्चा झाली, मग तोही मागे पडला.
खरा प्रश्नाय तो हा की अशावेळी लोकमानस का हलत नाही? का ढवळत नाही?
स्त्रीप्रश्न, [लिंगभाव] वर्ग, जात, पर्यावरण, कुटुंबनियोजन अशा अनेक बाबतीत समाजमन बधीर का?
या मुद्द्यांवर प्रमुख राजकारणी, जाणते नेते, त्यांचे चेलेचपाटे साधी प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत. राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असे विषय नसतातच. यावर काम करणारांना कसलीही राजकीय प्रतिष्ठा नाही असं परवा डॉ. नीलम गोर्‍हे या शिवसेनेच्या प्रवक्त्या एका वाहिनीवर जाहीरपणे म्हणाल्या.
कोपर्डीची घटना निषेधार्ह आणि संतापजनक होती. धिक्कारार्हच होती. त्याबाबत समाजमन चवताळून उठलं, हे योग्यच झालं, पण मग सोनई, खर्डा, निमखेडी, मलकापूर, बुलडाणा, मनिषा हिंगणे अशी हत्त्याकांडं नी शीतल वायाळ आत्महत्त्या झाली तेव्हा समाज का संतापत नाही?
कुटुंब नियोजन, आर्थिक विषमता, हुंडा, सोकॉल्ड ऑनर किलींग, पर्यावरणाचे प्रश्न यावर बहुजन मौन बाळगतात आणि जात, लिंगभाव, वर्गीय विषमता यात बुद्धीवाद्यांना रस नाही.
अशा प्रश्नांवर बोलायचीही त्यांची तयारी नसेल तर अवघड आहे. हा आप्पलपोटेपणाय की सोयिस्कर स्विकारलेला शहामृगी पवित्राय?
अवघा समाज एव्हढा बथ्थड का बरं झाला असावा?
@ प्रा. हरी नरके

लालदिवे गाडीवरचे आणि ---

लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरचे लाल दिवे हटवले याचे स्वागतच आहे.
लाल दिवे काढणार ही बातमी भलतीच उचलून धरली गेलीय.
आपल्या देशात एकुणच प्रतिकात्मक कृतींवर सारा भर असतो. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट राहायचा नसेल तर खालील प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत.
जणू काही लालदिवेमुक्त भारत झाल्यानं क्रांतीच झाल्याचा गाजावाजा केला जातोय, प्रत्यक्षात तो खरा नाहीये.
सैन्यातील अधिकारी, न्यायाधिश यांच्या गाड्यांवर लाल दिवे राहणार की तेही जाणारेत?
लाल दिवे गेले तरी जोवर सिक्युरिटीच्या नावावर सोबत असलेला पोलीसफाटा असणारच आहे, तो तेच काम करील जे दिवा करायचा.
परदेशात लोकप्रतिनिधी रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहनातून प्रवास करतात ते आपल्याकडं कसं आणता येईल याचाही विचार व्हायला हवा.
ज्यांना खरंच धोका आहे अशा मोजक्या पदांचं ठिकाय, पण आज जे सरसकट कमांडो आणि पोलीस दलातील फौजा सोबत बाळगल्या जातात त्यांची खरंच गरज असते काय?
मंत्र्यांच्या ताफ्यात [कन्हाँयमध्ये] सतत पाचपन्नास गाड्या कशाला लागतात?
अधिकारी निळे दिवे वापरणार म्हणजे लाल गेला निळा आल्यानं कसलं डोंबलाचं परिवर्तन होणारेय?
दिवे गेले, आता टेबलाखालून आणि वरून चालणारी देवघेव थांबवण्यासाठी खरंच काही होणारेय का?
सतत लोकप्रतिनिधींच्या पगार नी भत्त्यात बेसुमार वाढ करायची नी दिवे वगैरे काढल्याचा गाजावाजा करायचा हा दांभिकपणा झाला. उद्या दिवे काढल्याचाही भत्ता सुरू व्हायचा.
अ‍ॅंब्युलन्स आणि फायर ब्रिगेड वगळता बाकी सगळेच दिवे काढायला काय हरकत आहे?
@ प्रा. हरी नरके

अजानचे भोंगे, महाआरत्या आणि धार्मिक उत्सवाचे डिजे -

सध्या देशभर उष्णतेच्या लाटांनी तापदायक हवामान निर्माण केलेलं असतानाच सोनू निगमच्या अजानच्या भोंग्याविषयीच्या ट्विटनं वातावरण आणखीच तापलंय.
सोनूचं काय चुकलं? आणि त्याला हे आत्ताच का सुचलं असे दोन्हीबाजूनं प्रश्न विचारले जात आहेत आणि ते स्वाभाविकही आहेत.
वरवर पाहता हा खुपच निरागस आणि निष्पाप मुद्दा त्यानं उपस्थित केलाय असं वाटतं. कायदे आणि नियम निमुटपणे पाळणारे मध्यम व उच्च मध्यमवर्गीय लोक म्हणतील त्याचं बरोबरच आहे.
1. ध्वनी प्रदुषणानं उच्चतम पातळी गाठलेली असताना आणि मा.सर्वोच्च न्यायालयानं याबाबत आदेश दिलेला असताना तो का पाळायचा नाही अशी एक बाजूय.
2. यात धर्माचा प्रश्न न आणता एक आरोग्यविषयक बाब म्हणून याच्याकडं  का पाहू नये?
3. सर्वच धर्माच्या धांगडधिंगा करणार्‍या मिरवणुका, लग्नाच्या वराती, जयंत्या, आरत्या, महाआरत्या, गणपती, नवरात्री, गरबा, अजान आणि इतर धार्मिक उत्सव आणि राजकीय सभांमध्ये लाऊडस्पीकर, डि.जे. व फटाके वाजवून ध्वनीप्रदुषण करायला बंदी असावी.  यात कोणालाच सूट द्यायचं कारण नाही.
4. सोनूची ही सुचना आत्ताच का आली? त्याच्यामागं कोण आहेत? म्हणजे त्याचे बोलवते धनी कोण आहेत? यामागच्या राजकारणाचं काय? त्याचा हा प्रश्न पाॅलीटिकली करेक्ट आहे की नाही यातही मला रस नाही.
5. आपण अनेकदा साध्यासरळ आरोग्य आणि पर्यावरण विषयक बाबींना जात, धर्म, संस्कृती, श्रद्धा, परंपरा, रितीरिवाज असं वळण देऊन ते प्रश्न अवघड करून टाकतो.
6. जात, धर्म, लिंगभाव, वर्ग, वंश, प्रांत आदींची विविधता असलेल्या आपल्या भारतीय समाजात काही बाबी शिक्षण, संवाद, शिस्त, कठोर नियम आणि कायदे यांच्या माध्यमातूनच निपटाव्या लागतील.
7. अशावेळी सर्वांचे [विशेषत: कट्टरतावाद्यांचे ] समाधान करण्याच्या नादात किंवा अनुनयात भयानक समस्या किंवा दुखणी तयार होतात.
8. फक्त आणि फक्त पर्यावरणाचा आणि सामाजिक सलोख्याचा विचार करून न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायलाच हवा.
@ प्रा. हरी नरके

पुणे मनपातील तोडफोड वास्तुदोषामुळे

पुणे मनपातील तोडफोड वास्तुदोषामुळे : मुख्यमंत्र्यांची दोन्ही गटांना क्लीनचिट
कालपासून शिस्तबद्ध सत्ताधारी भाजपाला बदनाम करण्यासाठी तोडफोडीच्या खोट्या बातम्या माध्यमांमधून पसरवल्या जात आहेत.
पार्टी विथ डिफरन्स की डिफरन्सेस अशा पक्षातील आमच्या गणेशराव बिडकर आणि गणेशराव घोष यांच्या दोन गटात हाणामार्‍या झाल्याच्या तद्दन चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत.
प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींनी महापौरांच्या समवेत आज घटनास्थळाला समक्ष भेट दिली असता हा मनपाच्या वास्तुदोषातून उद्भवलेला प्रकार असल्याचं आय.आय.टी. खरगपूरच्या संचालकांनी निदर्शनाला आणून दिलं. ते म्हणाले, " मुख्यालयाची ही इमारत सदोष असून तिला दक्षिण व उत्तरेकडं दरवाजे ठेवण्यात आल्यानं या खुर्च्या आणि टेबलं एकमेकांवर आपटून फुटलेली आहेत. पक्षाचे सर्व शिस्तबद्ध कार्यकर्ते आणि नेते हा आचंबित करणारा प्रकार बघून घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागल्यानं जखमी झाले. त्यांना मनपानं नुकसान भरपाई द्यावी तसंच ही इमारत तात्काळ जमीनदोस्त करण्यात येऊन जागतिक किर्तीचे वास्तुरचनाकार श्रीमान संजयजी काकडे यांच्या कंपनीकडे नव्या उभारणीचं काम सोपावावं अशी मागणी बीडकर-घोष द्वयानं संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून मा. मुख्यमंत्री यांनी दोन्ही गटांना क्लीनचिट दिलेली आहे.
या इमारतीजवळच ओंकारेश्वर ही जुनी स्मशानभुमी असल्यानं हा वास्तुदोष उद्भवला असून नॉस्ट्राडेमस यांनी आपल्या भविष्यग्रंथात 2017 साली 18 एप्रिल रोजी असं घडणार असल्याचं भविष्य लिहून ठेवलेलं आहे असंही महापौरांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिलं. सीबीआयनंही यास दुजोरा दिलेला आहे.
सबब या मुख्यालयाच्या ठिकाणी 57 मजली काकडे मॉल उभारण्यात यावा आणि मनपा मुख्यालय मनपा हद्दीबाहेर हलवावं या मागणीवर मनपा प्रशासन व महापौर पारदर्शकपणे विचार करीत आहेत.
@--प्रा.हरी नरके

स्वयंप्रकाशित प्रॉपर्टी --

आम्ही विचारी आम्ही विवेकी झुंडीमध्ये एकसाथ,
कायद्याचं राज्य हातचा मळ संविधान मातर तोंडपाठ,
संविधान वाचन? गरज काय? रक्तातच हाय!
प्रॉपर्टी हजारो कोटींची शेंदूर फासलाय अस्मितेचा,
बॉस म्हणालं तो हाय एजंट तो हाय भडवीचा,
बॉसचा इषारा काफी हाय भुईसपाट करु नरडं दाबू,
कोर्ट नाय बिर्ट नाय कायदा किस झाडका बाबू?
हाण गड्या तुझीच बारी बंधुता गेली डेंगण्यामारी,
आमच्या सोबत नाय? मग दुश्मन तुडवू तिच्यामारी,
बॉसवर आमची निष्ठा अपार बॉस फायद्याचं परमिट,
आमची अ‍ॅक्शन विद्रोही सम्यक लोकशाही गिरमिट,
सहकार्य? पायजेल आज्ञापालन फकस्त रोबो ड्यामिट!
@ प्रा.हरी नरके

Wednesday, April 12, 2017

डॉ.बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र


शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.
1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी अशी शेतं एकत्र करून शेतकर्‍याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.
2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्‍या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.
3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.
4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.
5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.
6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.
असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते.
त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्‍यांचे मोर्चे काढले.
त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली. शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले.
देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.
आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो.
डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.
-- प्रा. हरी नरके

बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब

तथागत गौतम बुद्ध यांचं कृ.अ. केळुसकर लिखित चरित्र बाबासाहेबांना मॅट्रीकच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल 1908 साली भेट देण्यात आलं. त्याच्या वाचनानं बाबासाहेब प्रभावित झाले, प्रेरित झाले आणि बुद्धाकडं वळले. पुढची 48 वर्षे डॉ. बाबासाहेब सातत्यानं बुद्ध विचार, कार्य आणि सामाजिक परिवर्तन याबाबत अभ्यास,संशोधन आणि लेखन करीत होते.
1924 साली बार्शीला केलेल्या भाषणात पहिल्यांदा त्यांनी धर्मांतराचा उल्लेख केला.
1933 साली सुभेदार सवादकर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपण धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला असून आपला कल बुद्धाकडं असल्याचं कळवलं. [ही पत्रं सुभेदार सवादकर यांच्या नात लंडनच्या प्रेरणा तांबे Prerna Tambay यांनी मला उपलब्ध करून दिली.]

13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याच्या परिषदेत त्यांनी धर्मांतराची ती सुप्रसिद्ध घोषणा केली.
त्यानंतर ते याबाबतीतला समाजमनाचा कल आणि कानोसा जाणून घेण्यासाठी विविध जातींच्या परिषदा आयोजित करू लागले. देशविदेशातील बौद्ध परिषदांना उपस्थित राहून
हा विषय मांडू लागले. जनतेला या विषयाकडं घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करू लागले.
1950च्या दशकात त्यांनी बुद्धावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
"बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या 180 प्रती छापून घेऊन अभिप्रायार्थ त्यांनी जागतिक पातळीवरील तज्ञांकडं त्या पाठवल्या. या पुस्तकाची छपाई अशी करण्यात आली होती की त्याच्या पृष्ठाच्या एका बाजुला मजकूर छापलेला होता आणि त्याची मागची बाजू तज्ञांना टिपणं, नोंदी, अभिप्राय लिहिता यावा यासाठी कोरी ठेवण्यात आली होती.
या ग्रंथाच्या छ्पाईसाठी डॉ. बाबासाहेबांकडे निधी नसल्यानं त्यांनी पंतप्रधान नेहरू यांना एक पत्र लिहिलं. 1956 साली बुद्धांच्या 2500 वर्षांच्या निमित्तानं केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं या पुस्तकाच्या काही प्रती आगावू नोंदणी करून घ्याव्यात आणि त्याची रक्कम आगावू द्यावी अशी योजना बाबासाहेबांनी सुचवली होती. नेहरूंनी पुस्तकाची आगावू नोंदणी करून घेऊन त्यापोटी निधी द्यायला किंवा अनुदान द्यायला केंद्र सरकारकडं पैसे नाहीत असं कळवत नकार दिला. मात्र तुम्ही पुस्तक अवश्य काढा, विक्रीला ठेवा, लोक नक्की खरेदी करतील असाही अनाहूत सल्ला दिला.
डॉ. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला लक्षावधी अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
त्यांनी आलेल्या सुचना विचारात घेऊन या पुस्तकाचं फेरलेखणाचं काम पुर्ण केलं. प्रस्तावना लिहून पुर्ण केली. या प्रस्तावनेत त्यांनी आपली पत्नी डा. सविता यांनी आजरपणात आपल्याला जपल्यानंच हे पुस्तक आपण लिहून पुर्ण करु शकलो अस नमूद केलं. त्यांचं 6 डिसेंबर 1956 ला महापरीनिर्वाण झालं. पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात मात्र ही प्रस्तावना छापली नाही.
अनेक वर्षांनी समता सैनिक दलानं प्रकाशित केलेल्या मराठी अनुवादात ती प्रस्तावना प्रथमच छापली.
बाबासाहेबांचं शेवटचं भाषण काठमांडूच्या जागतिक परिषदेतलं 20 नोव्हेंबर 1956 चं मानलं जायचं. आम्ही त्यांच्या भाषणांची तीन पुस्तकं [खंड18] छापली आहेत त्यात आम्ही त्यांचं 25 नोव्हेंबर 1956 चं त्यांनी सारनाथला दिलेलं शेवटचं भाषण छापलेलं आहे.
ज्या जागेवर बसून तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तनाचं पहिलं भाषण दिलं त्या जागेवर सम्राट आशोकांनी धम्मैक स्तूप बांधला. त्या स्तूपाच्या सावलीत बसून "चलो बुद्ध की ओर" अशी आर्त हाक बाबासाहेबांनी त्यांच्या या शेवटच्या भाषणात दिलेली होती.
- प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य प्रकाशित करण्याचे दिवस


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य प्रकाशित करण्याचे दिवस --
राज्य सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य प्रकाशित करण्याचं काम 1979 साली सुरू केलं.
वसंत मून तेव्हा तहसीलदार होते. त्यांची या कामासाठी मंत्रालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली.
हे काम जास्त करून प्रकाशझोतात आलं ते रिडल्सच्या वादंगामुळं.
1990-91 ही फुले आंबेडकर स्मृती व जन्मशताब्दी वर्षं होती. त्या काळात महात्मा फुले यांचं साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी सरकरनं एक स्वतंत्र समिती नेमली. मी तेव्हा टेल्कोत नोकरी करीत होतो. मला या कामासाठी बोलावण्यात आलं.
मून यांच्याशी माझी आधीपासून मैत्री होतीच. याकाळात ती आणखी घठ्ठ झाली.
मून मंत्रालयात बसायचे तर मला मंत्रालयासमोर बॅरॅक नं. 18 मध्ये कार्यालय देण्यात आलं.
पुढं राज्यात सत्तांतर झालं.
मंत्रालयात जागा कमी पडते अशा सबबीखाली मून यांना मंत्रालयाबाहेर काढण्यात आलं. त्यांना कोणतीही पर्यायी जागा देण्यात आली नाही.
तुमची अन्यत्र व्यवस्था होईपर्यंत तुम्ही फुले समितीच्या कार्यालयात बसा असं सांगून मी त्यांना माझ्या कार्यालयात घेऊन आलो.
मून सरकारी नोकरीतून लवकरच निवृत्त झाले. त्यांना मानधन तत्वावर हे काम पुढं चालू ठेवायला सांगण्यात आलं.
त्या काळात त्यांची तब्बेत बरी नसायची. पुढं तर त्यांना पॅरलिसिसचा अ‍ॅटॅक आला. अशा परिस्थितीत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका खंडात काही दोष राहून गेले. खंडाची विक्री बंद करून तो मागे घ्यावा लागला. संपादकांची चूक झाली असं खापर त्यांच्यावर फोडून त्यांच्या मानधनातून हा खर्च वळता करण्याच्या हालचाली बाबूंनी सुरू केल्या.
पुढं मून यांचं निधन झाल्यावर ह्या कामासाठी सरकारनं अनेक सुप्रसिद्ध विचारवंत, लेखकांकडे विचारणा केली. त्यावेळी सरकार संपादक तथा समिती सचिवाला दरमहा दोन हजार रूपये इतकं मानधन देत असल्यानं बहुधा कोणीही ह्या कामासाठी यायला तयार झालं नाही.
दरम्यान टेल्कोची परिस्थिती संप आणि इतर कारणांनी कठीण झाल्यानं टेल्कोनं मला परत बोलावलं.
अशावेळी फुले आंबेडकर या दोन्ही समित्यांचं काम बंद पडण्याचा धोका निर्माण झाला. मी टेल्को सोडून या दोन्ही समित्यांच्या कामांना वेळ द्यायचा निर्णय घेतला. 2001ला टेल्को सोडली आणि मंत्रालयात पुर्णवेळ जबाबदारी स्विकारली.
त्यावेळी मला टेल्कोत सरकारी मानधनाच्या वीसपट जास्त वेतन मिळत होतं.
माझ्या अल्प कारकिर्दीत मला डॉ. बाबासाहेबांचे खंड 17 चे तीन भाग, अठराचे तीन भाग, 19, 20 आणि 21 प्रकाशित करता आले. मराठी भाषांतराचे अनेक खंड तयार करून छापखाण्यात पाठवले. अनेक खंडांच्या सुधारित आवृत्त्या काढता आल्या.
बाहेर लोकांचा असा समज असतो की या कामासाठी सरकार लाखो रूपये मानधन देतं. बंगला, लाल दिव्याची गाडी आणि वर कायकाय सुविधा वगैरे देतं, त्यांच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो, सरकार अतिशय भरघोष म्हणजे दरमहा रूपये दोन हजार मानधन द्यायचं. [मला वाटतं शिपायाला सुद्धा तेव्हा नक्कीच यापेक्षा जास्त पगार होता.] लाल डब्यातून म्हणजे एस.टी. किंवा मनपा बसमधुन प्रवास करावा लागायचा. मुंबईत राहण्याची कसलीही आणि कोणतीही व्यवस्था नसल्यानं दररोज पुणे मुंबई पुणे प्रवास करावा लागायचा. पुस्तक प्रकाशनाचं काम पण कार्यालयात एकही प्रूफरिडर नाही, संपादन वा संशोधन सहाय्यक नाही.
एकच सांगतो टेल्को सोडून या कामासाठी मी मंत्रालयात गेल्यानंतर मला पहिलं मानधन अडीच वर्षांनी मिळालं.
कामं चालू होती.
आणि सरकार उदार झालं, या कामांसाठी सरकारनं मानधन वाढवायचा निर्णय घेतल्याचा जी.आर. काढला आणि चमत्कार झाला.
ज्यांनी आधी सरकारला हे काम करायला आपल्याला जमणार नाही असं लेखी दिलं होतं, तेच सारे मंत्र्यांकडे शिष्टमंडळं घेऊन जाऊ लागले.
ते सारे आपलीच नियुक्ती सरकारनं केली पाहिजे असा दबाव आणू लागले.
मी जेव्हढे ग्रंथ प्रकाशित केले होते त्यावर अभिप्रायार्थ किंवा पुस्तक परीक्षण म्हणून एकही बरा शब्द तोवर कोणीही लिहिला नव्हता. मात्र मानधन वाढीचा जी.आर. आला आणि आदर्शाच्या आणि अस्मितेच्या गप्पा मारणारे सारे सम्राट, नायक आणि नेते एकवटले. प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाचे वाभाडे काढले जायला लागले. माहिती अधिकार, विधीमंडळात प्रश्नांचा मारा, वर्तमानपत्रांतून टिकेचा भडीमार सुरू झाला.
मी आमच्या मंत्र्यांकडं राजीनामा सादर केला.
त्यानंतर गेल्या 10 वर्षात हे काम किती पुढं गेलं मला माहित नाही.
- प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती

मी राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे काम सोडून आता 10 वर्षे झाली तरीही बाबासाहेबांची पुस्तके का मिळत नाहीत याबद्दल लोक आजही माझ्याकडेच चौकशी करीत असतात.
2006 साली बाबासाहेबांच्या साहित्याचा "पत्र व्यवहाराचा 21 वा खंड" प्रकाशित केल्यानंतर मी या जबाबदारीतून मुक्त झालो. माझ्या अल्प कारकिर्दीत मी खंड 17 चे तीन भाग, आठराचे तीन भाग, 19, 20 आणि 21 प्रकाशित केले. अनेक खंडांच्या सुधारित आवृत्त्या काढल्या.
माझ्या जागेवर आलेले डॉ. मधुकर कासारे एक वर्ष उलटले तरी रूजूच झाले नाहीत. शेवटी सरकारने त्यांना काढून प्रा.दत्ता भगत यांची नियुक्ती केली. भगत सरांनी आग्रह केल्यावरून मी 22 वा फोटो बायोग्राफीचा खंड प्रकाशित करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. सात वर्षांपुर्वी तो खंड आम्ही प्रकाशित केला.
भगत सरांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर प्रा. अविनाश डोळस आले.
गेल्या सात वर्षात पुढचा म्हणजे 23 वा खंड प्रकाशित झाला की नाही? 1 ते 22 खंडातील किती उपलब्ध आहेत, जे मिळत नाहीत ते का मिळत नाही याबद्दल अधिक चौकशी आपण प्रा.अविनाश डोळस यांच्याकडे करायला हवी.
त्यांचा कार्यालयीन दूरध्वनी- 022 22835610, पत्ता- शासकीय बॅरॅक नं. 18, मंत्रालयासमोर, मुंबई, 400021
------------------------------------------------
https://drambedkarbooks.com/2016/01/31/pdf-writings-sppeches-of-dr-babasaheb-ambedkar/

Tuesday, April 11, 2017

कमिशनर फुले : शेअर मार्कॆट

पुणे शहराचे कमिशनर म्हणून जोतीराव फुले यांनी १८७६ ते १८८३ अशी सात वर्षे काम केले. शहराला बंद नळाद्वारे पाणी मिळावे, रस्ते, बागा, ग्रंथालये, शाळा, दवाखाने उभारले जावेत यासाठी ते झटले. शहराचे आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यावर त्यांनी भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गव्हर्नर जनरलच्या पुणे भेटीच्या काळात रोषनाई व हारतुरे यावर अवास्तव खर्च न करता तो पैसा शाळा उभारण्यासाठी खर्च करावा असा बाणेदारपणा त्यांनी दाखवलेला होता. आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.
दारू विक्रीचे परवाने द्यायला त्यांचा विरोध होता.ते लिहितात, "थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा. तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा. देऊ नका थारा वैरभावा." दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.
जोतीरावांनी शेयर मार्केटवर अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यातून या धंद्यात काय खबरदारी घ्यावी लागते, हा धंदा करताना कोणकोणती कौशल्ये असायला हवीत अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केलेले आहे.
उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.
‘सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!
उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!
सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!
नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!
तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!
उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!
आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!
आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!
नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!
उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!
अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!
कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
‘महापराक्रमी’ हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.
शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!
शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!
लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.
लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.
त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.
उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.
- प्रा.हरी नरके
.................
संदर्भ --
1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991 

फुले सत्यशोधक की ब्राह्मणद्वेष्टे?

आजवर महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणार्‍या आणि बोलणार्‍या वर्गाने फुले = शाळा, हौद, स्त्रीशिक्षण, असं समीकरण करून टाकलेलं आहे.
ही कामं मोलाचीच आहेत पण फुले यांचा तो फक्त एक पैलू आहे. फुले तेव्हढ्यापुरतेच मर्यादित नव्हते.
फुले ब्राह्मणद्वेष्टे होते असं विपर्यस्त चित्रण केलं गेलेलं आहे. जोतीरावांच्या ब्राह्मण समाजाविषयीच्या लेखनाचा सोयिस्करपणे राजकीय हत्त्यार म्हणून वापर करण्यात आलेला आहे. त्यामागे काही राजकीय कटकारस्थानं होती.
वास्तवात फुले यांची टिका नेतृत्वावरची, प्रवृत्तीवरची टिका  होती. त्यावेळी ब्राह्मण समाज ब्रिटीशांखालोखाल अनेक क्षेत्रात नेतृत्व करीत होता, त्यामुळं ती ब्राह्मण समाजावरची टिका असल्याचा गैरसमज निर्माण करण्यात आला.
फुले सत्यशोधक होते. त्यांच्यानंतर या चळवळीचं अपहरण करून तिचं ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर करण्यात आलं. सत्यशोधक चळवळीमध्ये ब्राह्मण आणि अब्राह्मण दोघेही होते. मात्र ब्राह्मणेतर चळवळीतले सर्व लोक सत्यशोधक होते काय? या प्रश्नाचं खरं उत्तर "नाही" असंच द्यावं लागेल.
"ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी!
मानव भावंडे सर्व एकसहा त्याजमध्ये आहां तुम्ही सर्व
बुद्धीसामर्थ्याने सुख द्यावे घ्यावे दीनास पाळावे जोती म्हणे!"
ही आहे फुले यांची मुख्य शिकवण.
[महात्मा फुले समग्र वांड्मय, म. शासन, मुंबई, 1991, पृ. 569]

"भांडणे लागता सर्वांचे वाटोळे पाखंड सोहळे फेका दूर,
येणारे अरिष्ट कसे तरी टाळा शूद्रादिक गळा पडा आता
वेळ आली आत्मपरीक्षण करा निर्मिकास स्मरा जोती म्हणे!"

[महात्मा फुले समग्र वांड्मय, म. शासन, मुंबई, 1991, पृ. 577]

जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र ब्राह्मण होते. त्यात भांडारकर, गोवंडे, भिडे, वाळवेकर, जोशी, भवाळकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, न्या.रानडे, लोकहितवादी अशा अनेकांचा समावेश होता.

जोतीरावांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला.
आपल्या मृत्यूपत्रात या मुलाला आपली संपत्ती मिळावी अशी तरतूद केली.
या मृत्यूपत्रावर त्यांनी साक्षीदार म्हणून जिवलग मित्र भांडारकरांची सही घेतली.
या मृत्यूपत्रातील काही शब्दांचा जाणीवपुर्वक विपर्यास करून काही जातीयवादी संघटना स्वत:चा ब्राह्मणद्वेषाचा अजेंडा सेट करीत असतात.
जोतीराव जर ब्राह्मणद्वेष्टे असते तर त्यांनी ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला असता का?
त्यालाच आपली संपत्ती मिळावी यासाठी मृत्यूपत्र केलं असतं काय?
ते शासकीय कार्यालयात नोंदवताना त्यावर ब्राह्मण सहकार्‍याची साक्षीदार म्हणून सही घेतली असती काय?
त्यांनी आणि सावित्रीबाईंनी ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी स्वत:च्या घरात बालहत्त्या प्रतिबंधक गृह चालवलं असतं काय? त्यात 35 ब्राह्मण विधवांची बाळंतपणं केली असती काय?
विधवांचं अमाणूषपद्धतीनं  केशवपन होत असे त्याविरूद्ध नाभिकांचा संप घडवला असता काय?
ब्राह्मण हे आपले भाऊ आहेत असं लिहिलं असतं काय? तेही मानवातली शोभा आहेत असं कौतुक केलं असतं काय?
जे ब्राह्मण स्त्री-शूद्र आणि अतिशूद्र यांना आजही दासानुदास मानतात त्यांची सावली आपल्या प्रेतावर पडू देऊ नये असं जोतीराव त्या मृत्यूपत्रात म्हणतात.
त्यातील अर्थनिर्णायक शब्द वगळून सर्वच ब्राह्मणांची सावली जोतीराव नाकारतात असा दुष्ट प्रचार केला गेला.
ह्या राजकीय दुष्टाव्याला बळी पडून महाराष्ट्रात सामाजिक द्वेषाचं राजकारणं फुललं.
निकोप, निरामय, सत्यशोधक असलेल्या जोतीरावांचा वापर ब्राह्मणद्वेषासाठी किंवा अन्य कोणाच्याही द्वेषासाठी होऊ द्यायचा का?
याचा सारासार विचार करायलाच हवा.
त्यांचं साहित्य असं संदर्भ सोडून वापरण्याला आणि त्याचा विपर्यास करून स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्याला पायबंद घातला जायला हवा की नको?
- प्रा. हरी नरके
....................
संदर्भ 1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991
.....................................

Monday, April 10, 2017

उद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले


जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.
जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.
ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.
जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या दहा वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांचा कालातीत वारसा कोणता याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या गोष्टी याचा विचार करायला हवा.
जोतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं.
जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.
‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.
जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.
सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती.
ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.
एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.
कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.
नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी  १८७३ साली  [144 वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं.
डॉ. जी.एस.घुर्ये आणि डॉ. एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचं विशेषत: जातीव्यवस्थेचं ज्या पद्धतीनं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचं हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.
प्रा. हरी नरके
.......................
संदर्भ 1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991


महात्मा की क्रांतिबा?


मुंबईतील भायखळयाच्या कोळीवाड्यात हजारो गिरणी कामगार, कोळी, आग्री, कष्टकर्‍यांनी मिळून जोतीरावांच्या सन्मानार्थ त्यांना महात्मा ही पदवी दिला.
हा कार्यक्रम 11 मे 1888 ला झाला. या कार्यक्रमाच्या आयोजनात कामगार नेते ना. मे. लोखंडे, वंडेकर, अय्यावारू, लिंगू, केळुसकर आदींचा पुढाकार होता.
जोतीरावांच्या वयाला नुकतीच 61 वर्षे पुर्ण झाली होती. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी या समारंभाला आपला खास प्रतिनिधी म्हणून यंदे यांना पाठवलेले होते.
त्यांनी ही प्रेमाचं, आदराचं प्रतिक असलेली महात्मा पदवी स्विकारली. त्यानंतर अडीच वर्षांनी जोतीराव गेले.
आत्मा हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी आपल्याकडं वापरला जातो. 1. शरिरात असलेले चैतन्य, जीव या अर्थानं तो जसा वापरला जातो.
2. माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो,  मुक्ती मिळाली नाही तर आत्मा अधांतरी राहतो. आत्मा अमर असतो अशा दुसर्‍या अर्थानेही आत्मा हा शब्द वापरला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर यातल्या दुसर्‍या अर्थानं वापरली जाणारी आत्म्याची संकल्पना नाकारली. बौद्ध विचारवंत राजा ढाले व इतर काहीजण महात्मा या पदवीऎवजी क्रांतिबा अशी पदवी वापरू लागले.
माझा  क्रांतिबा ला विरोध किंवा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही.
खुद्द जोतीरावांनी पहिल्या अर्थानं आत्मा हा शब्द वापरलेला आहे आणि दुसर्‍या अर्थानं तो वापरला जाणं वेडेपणाचं ठरवलेलं आहे.
शरीराचे पोटी आत्मा जन्मे बेटा, दिमाखाच ताठा व्यर्थ करी,
घडामोडी सर्व स्मरणात ठेवी, तुलना करवी सर्व कामी,
झाला अनुभव टाका एकीकडे, सत्याशी वाकडे होई मुर्ख,
गुरू म्हणे आत्मा आहे निराधार,सांगे बडीवार त्याचा फार,
कुडीविना आत्मा दावीना मजला, धिक्कार गुरूला जोती म्हणे!
[महात्मा फुले समग्र वांड्मय, मुंबई, 2006, पृ.601]
शरीरात असणारं चैतन्य या अर्थानं ते म्हणतात, कुडीबाहेर म्हणजे शरीराबाहेर आत्मा नसतो.
या ठिकाणी 2 प्रश्न विचारात घ्यायला हवेत.
1. जी पदवी दस्तुरखुद्द फुल्यांनी स्विकारली, पुढची अडीच वर्षे ती वापरात होती, ती घटना आता इतिहासाचा भाग झालेली असताना ती कशी नाकारता येईल?
2. तोपर्यंत पदवी देण्याचा अधिकार स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना नव्हता तरीही ती परंपरा मोडीत काढून हजारो गिरणी कामगार, कोळी, आग्री, स्त्री-पुरूष कष्टकर्‍यांनी मिळून जोतीरावांच्या सन्मानार्थ त्यांना महात्मा ही पदवी दिलेली असताना ती नाकारणं म्हणजे त्या आमच्याच कष्टकरी स्त्री-पुरूष पुर्वजांच्या प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेच्या भावनेला नाकारणं होत नाही काय?
विचारार्थ सादर---
-प्रा.हरी नरके
आपल्याला काय वाटतं?

जोतीराव की ज्योतिबा?

अनेकजण आदरानं, आपुलकीनं "ज्योतिबा" असा उल्लेख करतात. त्याला माझा विरोध किंवा आक्षेप नाही. या नामोल्लेखाबाबत झालेला एक सांस्कृतिक संघर्ष आपल्याला केवळ माहित असावा यास्तव हे टिपण--- यामागे शिळ्या कढीला उत आणण्याचा किंवा कोणाला तरी टार्गेट करण्याचा हेतू नाही.
जोतीराव नेहमी आपली सही "जोती" किंवा "जोतीराव" अशीच करीत असत.
"ज्योतिबा" असा उल्लेख त्यांच्या अखंडात [ कवितेत ] अपवाद म्हणून एकदाच आलाय आणि तोही बहुधा मीटर जुळवण्यासाठी आला असावा.
अन्यथा ते कायम जोतीराव किंवा जोती असेच लिहित असत.
त्यामुळे डॉ. य.दि.फडके, डॉ. स.गं.मालशे, डॉ. बाबा आढाव किंवा माझ्या लेखनात तुम्हाला "ज्योतिबा" असे लिहिलेले दिसणार नाही. आम्ही नेहमी "जोतीराव" असेच लिहितो.
कृष्णशास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुले यांचे घनिष्ठ मित्र होते. त्यांचा मुलगा विष्णुशास्त्री हा जोतीरावांच्या अंगाखांद्यांवर खेळलेला होता. परंतु पुढे त्यांनी आपल्या निबंधमाला या मासिकाच्या 44 आणि 48 व्या अंकात जोतीरावांवर कडवट टिका केली. त्यात त्यांनी जोतीरावांचा "मि.जोती"  असा उल्लेख केलाय.
"मि.जोती हे पोक्त आहेत असे ऎकतो," ही विष्णुशास्त्रींची भाषा त्यांच्या अहंकारातून आलेली होती. त्यांनी जोतीरावांना व्याकरण कसे येत नाही यावर आपली लेखणी झिजवली होती. त्यावेळी राज्यात भीषण दुष्काळ पडलेला होता, हजारो लोक अन्नपाण्याविना मरत होते आणि त्याबद्दल एक अवाक्षरही न लिहिता हे शास्त्रीबुवा व्याकरणावर प्रवचनं झोडत होते. त्याचवेळी जोतीराव - सावित्रीबाई मात्र एक हजार गरजू, गरिब मुलामुलींना दुष्काळातून वाचवून अन्नपाणी देण्याची व्यवस्था करीत होते. त्यांचे संगोपन करीत होते.
विष्णुशास्त्री हा आपल्या जिवलग मित्राचा मुलगा, आपल्याला मुलासारखाच असं मानून जोतीरावांनी विष्णुशास्त्रींना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. जोतीरावांचे जिवलग मित्र, न्या.रानडे, लोकहितवादी, भिडे, जोशी, वाळवेकर आणि गोवंडे यांना विष्णुशास्त्रींचे हे लेखन उद्दामपणाचे वाटले होते. त्यांना कुणालाही ते आवडले नव्हते. ते याबाबतीत जोतीरावांसोबत होते.
धोंडीबा, कोंडीबा, दगडोबा तसा हा "ज्योतिबा" असं विष्णुशास्त्रींचं म्हणणं. विष्णुशास्त्री आपल्या लेखात  "जोतीराव" असं सन्मानदर्शक नाव द्यायला आपला विरोध असल्याचं सुचित करतात आणि म्हणूनच हा संदर्भ लक्षात घेता डॉ. य.दि. फडकेसरांसह आम्ही सर्वजण त्यांना "जोतीराव"च  म्हणतो.
तुम्ही काय म्हणायचा हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे.
विष्णुशास्त्री हे फार मोठे विद्वान होते.फर्डे पत्रकार होते. त्यांची निबंधमालेतली कामगिरी खरोखरच अजोड होती. ते वयाच्या 32 व्या वर्षी अकाली गेले.
ते वारले तेव्हा त्यांनी आत्महत्त्या केल्याचा पोलीसांचा आरोप होता, अशावेळी जोतीरावांनी आपले सत्यशोधक मित्र डॉ.  वि. रा. घोले यांच्याकरवी मृत्यूचा दाखला द्यायला लावला आणि त्यांच्या शवाची होणारी विटंबना थांबवली.
विष्णुशास्त्रींना मराठी भाषेचे शिवाजी म्हणायची प्रथा आहे. अर्थात लोकमान्य, महात्मा या जशा लोकांनी दिलेल्या पदव्या आहेत तशी शिवाजी ही लोकांनी दिलेली पदवी नसून त्यांनी स्वत:च आपण मराठी भाषेचे शिवाजी आहोत अशी गर्जना केलेली होती. आणि गंमत म्हणजे मराठीच्या शिवाजीनं ही गर्जना मराठीतून न करता चक्क इंग्रजीतून केलेली होती.
असो.
-प्रा.हरी नरके.

चित्रकाराच्या चुकीनं महात्मा जोतीराव फुले यांना चिकटली दाढी


चित्रकाराच्या चुकीनं महात्मा जोतीराव फुले यांना चिकटली दाढी
चुक दुरूस्तीला लागली 65 वर्षे --
आपल्या भारतीय समाजात एखादी गोष्ट रुजायला फार काळ जाऊ द्यावा लागतो आणि जर रुजलेली गोष्ट चुकीची असेल तर ती गोष्ट दुरूस्त करायलाही फार झटावं लागतं.
एका चित्रकाराच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळं फुल्यांना दाढी चिकटली आणि ती काढायला 65 वर्षे लागली.
त्याचं असं झालं.....
जोतीराव 1890 च्या 28 नोव्हेंबरला गेले. त्यानंतर त्यांची छोटी चरित्रं अनेकांनी लिहिली. मात्र त्यांचं विस्तृत आणि सप्रमाण चरित्र लिहिण्याचा संकल्प सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी सोडला. ते विदर्भातले चिखलीचे. ते महाराष्ट्रभर फिरले. त्यावेळी हयात असलेल्या सर्व फुलेवाद्यांना ते प्रत्यक्ष भेटले. त्यांच्याकडून फुल्यांच्या आठवणी लिहून घेतल्या. चरित्राचे दस्तावेज जमा केले. पाटलांनी खूपच मेहनत घेतली.
1927 साली जोतीरावांची जन्मशताब्दी होती. त्यावर्षात हे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा निर्धार होता.
पुस्तकाची छपाई पुण्याच्या छापखान्यात चालू होती. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जोतीरावांचा फोटो छापण्यासाठी ते फोटोची शोधाशोध करू लागले. त्यांना मिळालेले सर्वच फोटो हे
कॉपिंगवरून कॉपिंग केलेले असल्यानं त्यात अस्पष्टपणा आलेला होता.
जोतीरावांना आपला भाऊ मानणार्‍या एका महिलेकडं अस्सल फोटो असल्याचं पाटलांना समजलं. तिच्याकडं फोटो होता,पण तो देव्हार्‍यात ठेवलेला होता. तिनं एक दिवसासाठी पाटलांना तो दिला. त्या फोटोला अनेक वर्षे गंध, हळदकुंक लावल्यानं आणि दुधानं धुतल्यानं ओघळ आलेले होते. त्याकाळात स्वयंपाक चुलीवर केला जायचा त्या धुरानंही तो फोटो काळपट पडलेला होता. पाटलांनी फोटो मुखपृष्ठकाराला दिला. त्यावरून चित्र काढताना जोतीरावांच्या चेहर्‍यावरचे ओघळ म्हणजे दाढी असावी असा चित्रकाराचा गैरसमज झाला.
फुल्यांनी तरूणपणात दाढी राखलेली होती परंतु पुढे त्यांनी ती काढून टाकली. ते मोठे व्यापारी, कंत्राटदार, पुण्याचे आयुक्त आणि पुणे कमर्शियल अ‍ॅंड कॉट्रॅंक्टीग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असल्यानं अतिशय टापटीपीनं राहायचे. मात्र त्याकाळात आजच्यासारखी कटिंग सलून्स नसायची. दर चार दिवसांनी केस कापणारे घरोघर जावून केस कापायचे.
जोतीरावांच्या चेहर्‍यावर दोन दिवसाचे खुंट वाढलेले होते. चित्रकारानं पठ्ठ्यानं त्याची रितसर दाढीच बनवून टाकली.
गावी पाटलांची बहीण वारल्याची तार आल्यानं पाटील गावी गेले.
इकडं मुखपृष्ठ छापून तयार झालं. पुस्तकाची बांधणी झाली.
पाटलांना पुस्तक थेट प्रकाशन समारंभातच बघायला मिळालं.
चित्रकाराची ती चुक इतकी रूजली की ती दुरूस्त करताना 60 वर्षांनी माझ्या नाकी नऊ आले. दरम्यान त्या चित्रावरून अनेकांनी तैलचित्रे तयार केली होती. महाराष्ट्र शासनानं सुद्धा असंच एक बटबटीत तैलचित्र करून घेऊन सर्वत्र लावलेलं होतं. तेही अनेक ठिकाणी रूजलं होतं.हे सारं दुरूस्त करणं सोपं काम नव्हतं. 1989 पासून प्रक्रिया सुरू करून तिची पुर्तता व्हायला 1992-93 उजाडावा लागला. पाटलांनी जमवलेल्या त्या आठवणींचं संकलन केलेलं पुस्तक मी 1993 साली "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेलं आहे.
18 एप्रिल 1884 ला जोतीरावांनी काढलेल्या त्यांच्या या फोटोची काचेची एक फूट बाय एक फूट अशी मोठ्ठी निगेटिव्ह मिळाली. त्यावरची धूळ झटकून त्यावर बरीच तांत्रिक मेहनत करावी लागली. पुण्याचे सत्यशोधक गोपीनाथराव पालकर यांच्या वाड्यात त्यांच्या वडलांच्याकडे एकुण सुमारे 200 निगेटिव्हज होत्या.
फोटोग्राफर विजय व सरोजा परूळकर यांच्याकडून तांत्रिक प्रक्रिया करून घेण्यात यश आलं.
पुढं इतरांचंही सहकार्य मिळालं, त्यात डॅा. बाबा आढाव यांचा विशेष उल्लेख करायला हवा.
आणि एकदाचं जोतीरावांचं अस्सल छायाचित्र शासनातर्फे प्रकाशित झालं.
यापुढं तरी हेच कृष्णधवल छायाचित्र सर्वत्र लावलं जाईल याची दक्षता घ्यायला हवी.
- प्रा. हरी नरके

Sunday, April 9, 2017

आणि महात्मा फुले यांची जन्मतारीख सापडली -



महात्मा फुले यांची जन्मतारीख माहित नसल्यानं अनेक वर्षे त्यांची फक्त पुण्यतिथी [ 28 नोव्हेंबर ] केली जायची.
1969 साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि स.गं.मालसे यांनी फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1828 ला झाला असावा अशी एक शक्यता नोंदवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केलेली होती.
तथापि फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले जन्मवर्ष 1827 दिलेले असल्यानं ही नोंद सदोष वाटत होती.
माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक 1989 ला प्रकाशित झालं. त्यातून कमलताई विचारे यांचा माझा परिचय झाला. सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या त्या सुनबाई. त्यांच्याकडच्या दुर्मिळ कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेताना 1891 साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे चरित्र मिळालं.
कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
त्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. 
या चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची 11 एप्रिल 1827 ही जन्मतारीख दिलेली सापडली.
महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण युरेका ! युरेका! चा क्षण होता.
डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर या सार्‍यांशी बोललो. खात्री करून झाल्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
फुले जन्मतारखेबाबत म.टा. आणि इतर वर्तमानपत्रात लेख लिहिले. शासकीय समितीची मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली.
सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही तारीख नोंदवली. मुख्य म्हणजे विधानभवनातील फुले पुतळ्याखालीही ही नोंद करून घेतली.
म. फुले यांची तोवर सर्वत्र झळकलेली रंगीत तैलचित्रं अतिशय बटबटीत होती. गोपीनाथराव पालकर आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांच्या काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो विकसित करण्यात यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं. 28 नोव्हेंबर 1992 ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली. सदर फोटो मोठा करून फुलेवाड्यात लावला.
सातत्याने गेली 25 वर्षे प्रयत्न केल्यानंतर आता कुठं म.फुले जयंती साजरी होऊ लागलेली आहे.
एखादं चांगलं काम रुजायला किती काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो. पण सत्य आणि कळकळ असेल तर यश मिळतं.
-प्रा. हरी नरके
महात्मा जोतीराव फुले यांचे अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र.

मराठी साहित्याची श्रीमंती वाढवणारा मौलिक ग्रंथ


मराठी साहित्याची श्रीमंती वाढवणारा मौलिक ग्रंथ : अंगारवाटा... शोध शरद जोशींचा,

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे वडील पोस्टात नोकरीला होते. ते सातार्‍यात कार्यरत असताना शरद जोशींचा जन्म झाला. शरद जोशी कोल्हापूरला प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होते. ते संस्कृतप्रेमी होते. एका मित्राने तू संस्कृत भाषेचे उच्च शिक्षण घेणार असशील असं म्हटल्यानं जोशी चिडले आणि कॉमर्सला गेले. मुंबईच्या ज्या सिडनम कॉलेजमधून आजचे जगातले सर्वात महत्वाचे अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती आणि इतर अनेकजण शिकले तिथे जोशींनी उच्च शिक्षण घेतले.
मुळात उच्च दर्जाचा अर्थशास्त्रज्ञ असलेला हा माणूस आय.ए.एस.परीक्षा पास झाला. आज ज्याला यु.पी.एस.सी.ची परीक्षा म्हणतात तिला त्या काळात आय.ए.एस.ची परीक्षा म्हणत असत.  त्या परीक्षेत पास होऊनही थोडे कमी गुण मिळाल्यानं त्यांना आय. ए. एस. केडर न मिळता इंडीयन पोस्टल सर्व्हीसचे केडर मिळाले. आयुष्यभर नोकरी करून निवृत्त होताना त्यांचे वडील ज्या पदावर होते तिथून शरद जोशींनी सेवेची सुरूवात केली.
या खात्यात उच्चपदी जाण्याची संधी असतानाही त्यांनी ही नोकरी सोडली आणि ते स्वित्झर्लंडला गेले. तिथे जागतिक टपाल सेवेत आठ वर्षे त्यांनी नोकरी केली.  खूप सुखाची आणि भरपूर पगाराची असलेली ही नोकरी सोडून आपल्या पत्नीच्या व मुलींच्या इच्छेविरूद्ध ते भारतात परत आले  आणि शेती करू लागले.
शेती तोट्यात का जाते या प्रश्नाचा पिच्छा पुरवताना त्यांनी शेतकरी चळवळ उभारली.
स्वातंत्र्य चळवळीनंतरची सर्वाधिक लोक तुरूंगात गेल्याचा विक्रम करणारी ही चळवळ त्यांनी  नावारूपाला आणली. देशातला शेतीप्रश्न त्यांनीच ऎरणीवर आणला. त्यांनी शेतकर्‍यांना आत्मसन्मान दिला. स्वाभिमान दिला. "भीक नको, हवे घामाचे दाम" ही घोषणा त्यांनीच जन्माला घातली.
"इंडीया विरूद्ध भारत" अशी ठळक मांडणी करून सदैव लाथाडल्या गेलेल्या शेतकर्‍याची वेदना इंडीयाच्या वेशीवर टांगली. लक्ष्मीमुक्तीच्या आंदोलनातून दोन लाख महिलांची नावं सात बाराच्या उतार्‍यावर लावली गेली.
भारतातल्या बहुतेक प्रश्नांचे मूळ दारिद्र्यात आहे आणि या दारिद्र्याचे मूळ शेतकर्‍याच्या शोषणात आहे, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित वाजवी दाम मिळाल्याशिवाय हे दारिद्र्य दूर होणार नाही हे त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं समजावून सांगितलं.  शेतीचं खरंखुरं अर्थशास्त्र मांडलं.
पंतप्रधान व्ही.पी.सिंग जोशींचे मित्र होते. जोशींनी राज्यसभेचं खासदार व्हावं अशी त्यांची इच्छा होती. जोशींनी मात्र त्या खासदारकीसाठी प्रकाश आंबेडकरांचं नाव सुचवलं. आंबेडकर खासदार झाले पण त्यांनी आपलं नाव शरद जोशींनी सुचवलं होतं असं कधीही म्हटलं नाही.
देशाचं पंतप्रधानपद मिळवण्याची पात्रता असलेला हा माणूस. त्यांच्या सभेला वक्ते म्हणून उपस्थित असलेले अटलजी, चरण सिंग, चंद्रशेखर, व्ही.पी.सिंग पुढे पंतप्रधान झाले. महाराष्ट्रातल्या चार माणसांमध्ये ही क्षमता असूनही ज्यांना ते पद मिळालं नाही त्यातले सगळ्यात उपेक्षित शरद जोशी.
हा माणूस योद्धा होता. दणकट होता. त्यानं बावीस वेळा शेतकर्‍यांसाठी तुरुंगवास भोगला. तब्बेतीकडं दुर्लक्ष करून एस.टी.च्या लाल डब्यातून प्रवास करीत दहा हजार सभा गाजवल्या. 16 पुस्तकं लिहिली. शेकडो कार्यकर्त्यांना नाव मिळवून दिलं. शरद जोशींवर शेकडो केसेस दाखल झालेल्या होत्या.
शरद जोशी अफाट प्रतिभेचे नेते होते. तुफान वक्ते होते. ते फटकळ, काहीसे उद्धट, महत्वाकांक्षी आणि कोरड्या स्वभावाचे होते. आपल्या नशिबी श्रेयहिनताच लिहिलेली आहे याची पुर्वकल्पना असूनही ते अविरतपणे लढत राहिले. कोट्यावधी रूपये कमवण्याची क्षमता अंगी असलेल्या या माणसानं अनेकदा खिसा खाली असल्यानं कार्यकर्ते, मित्र यांच्याकडून मिळालेल्या शेसव्वासे रूपयांवर गुजराण केली. त्यांचे हे हालाखीचे दिवस वाचताना डोळे पाणावतात. त्यांच्या  पत्नीनं आत्महत्या केली. दोन्ही मुली परदेशात गेल्या. तिकडेच स्थाईक झाल्या. एकटा पडलेला हा योद्धा आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी एकाकी झुंजत राहिला. आपल्या जवळच्या  नातेवाईकांनीसुद्धा आपल्याला एक वाया गेलेला मुलगा म्हणून हिनवावं याचं त्यांना  वाईट वाटायचं.
मी त्यांना अनेकदा भेटलो होतो.
त्यातल्या दोन प्रदीर्घ भेटी तर कायमच लक्षात राहिल्या. चाकणला रोटरी क्लबतर्फे माझं महात्मा फुल्यांवर भाषण होतं. त्यावेळेला शरद जोशी राष्ट्रीय पातळीवरचे नेते असूनही ते श्रोत्यांमध्ये येऊन बसले होते. श्रोत्यांमध्ये त्यांना
बसलेलं बघून  मला भाषण करताना  खूप टेन्शन आलेलं होतं. भाषण संपल्यावर ते स्टेजवर आले. त्यांनी पाठीवर थाप मारून मला दाद दिली. ध्रुवशेट कानपिळे यांच्याकडं बसून आम्ही तासभर गप्पा मारल्या. आम्ही एकत्र जेवन केलं.
दुसरा प्रसंग एस.एम. जोशी वारले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला शरद  जोशी आले होते. तिथे गोविंद तळवलकरही आलेले होते. दोघांमधून विस्तवही जात नव्हता. गोविंदरावांनी म.टा.मधून  जोशींची कायमच  सालटं काढलेली होती. त्या अंत्ययात्रेत साने गुरूजी स्मारक, सारसबाग, टिळकरोड ते वैकुंठ स्मशानभुमी असा सुमारे तासाभराचा पायी प्रवास करताना माझ्या खांद्यावर हात टाकून जोशीसर मला असंख्य गोष्टी सांगत होते.
शरद  जोशींचं सारंच आयुष्य हे चमत्कार वाटावा असं मौलिक आणि गूढ  होतं.
त्यांच्या कार्याचं, स्वभावाचं, योगदानाचं अतिशय साक्षेपी चित्रण करणारा ग्रंथ प्रसिद्ध लेखक, संपादक श्री. भानू काळे यांनी लिहिला आहे. हा 534 पृष्ठांचा  अतिशय मौलिक ग्रंथ आहे. तो पुण्याच्या उर्मी प्रकाशनानं अवघ्या 500 रूपयांना दिलेला आहे.
मराठीमध्ये गेल्या अनेक वर्षात असा महाग्रंथ लिहिला गेला नव्हता.
या चरित्र ग्रंथासाठी काळे यांनी आपल्या आयुष्यातील दहापेक्षा जास्त वर्षे अभ्यासात घालवली. साधनं जमवण्यासाठी, जोशींच्या सहकारी, मित्र, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी काळे देशविदेशात गेले. शेकडो ग्रंथ, हजारो लेख आणि अक्षरश: लाखो दस्तावेज त्यांनी धुंडाळले.
हे पुस्तक एकदा हातात घेतलं की वाचून पुर्ण होईपर्यंत खाली ठेवता येत नाही. शरद जोशी हा अफाट माणूस समजावून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. विशेष म्हणजे ही जोशींची केवळ विभुतीपुजा नसून अतिशय साक्षेपानं चरित्र नायकाच्या गुणदोषांचा धांडोळा घेणारा हा ग्रंथ  झालेला  आहे. अनेक घटना वाचकांपुढं प्रथमच आणणारा हा ग्रंथ म्हणजे चाकण ते स्वित्झर्लंडपर्यंत शेकडो जणांना भेटून केलेलं एका दैदिप्यमान कालखंडाचं अपुर्व दस्तावेजीकरण होय.
अतिशय वाचनिय, प्रभावी आणि मौलिक ग्रंथ लिहून भानू काळे या व्यासंगी लेखकानं भारतीय भाषांमधला गेल्या दोन दशकातला सगळ्यात महत्वाचा संदर्भग्रंथ आपल्याला दिलेला आहे.
शिक्षणयात्रा, व्यावसायिक जगात, डोंगरकुशीतल्या नंदनवनात, मातीत पाय रोवताना,उसाचे रणकंदन, धुमसता तंबाखू, पांढरे सोने,लाल कापूस, शेतकरी संघटना : तत्वज्ञान आणि उभारणी, अटकेपार, किसानांच्या बाया आम्ही, राजकारणाच्या पटावर, राष्ट्रीय मंचावर जाताना, सहकारी आणि टिकाकार, अंगाराकडून ज्योतीकडे :शोध नव्या दिशांचा, साहित्य आणि विचार, सांजपर्व अशी 17 प्रकरणं आणि 5 परिशिष्टं असलेला हा ग्रंथ आहे.
हे पुस्तक वाचून खुप अस्वस्थता आली. असा नेता आणि असा चरित्रग्रंथ हे मानवतेची श्रीमंती वाढवतात. आजच्या समकालीन जगण्याला ऎतिहासिक मोल प्राप्त करून देणारा हा योद्धा पुरूष मध्यमवर्गियांच्या कायम हेटाळणीचा विषय राहिलेला आहे.
"आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची आहे" असं रोखठोक सत्य सांगणार्‍या शरद जोशींची आपण कायम उपेक्षाच केली, आता या ग्रंथाचीही उपेक्षाच करणार का?
[अंगारवाटा... शोध शरद जोशींचा, भानू काळे, उर्मी प्रकाशन,पुणे, 12 डिसेंबर, 2016, पृष्ठे 510+ 24 आर्टप्लेट्स, किंमत  500 रूपये ]
पुस्तकासाठी संपर्क :-
प्रा.सुरेशचंद्र म्हात्रे,
शेतकरी संघटना,
अंगारमळा, आंबेठाण, ता.खेड, जि.पुणे,410 501,
फोन. 98223 00348,
अनंतराव देशपांडे, 86683 26962, 94035 41841,
लेखकाचा संपर्क :- bhanukale@gmail.com

Monday, April 3, 2017

4 भिंतींचं घर मी एकटी चालवते

"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते, 4 भिंतींचं घर मी एकटी चालवते!"
-- भीमराव गोपनारायण
माझे कविमित्र भीमराव गोपनारायण यांचा "सर्वा" हा कवितासंग्रह गाजलेला आहे. हे विदर्भातल्या अकोल्याकडचे कवी राज्य परिवहन [एस.टी.] मध्ये वाहक [ कंडक्टर ]म्हणुन काम करतात आणि अतिशय दमदार कविता करतात.
मराठीतलं कवितेचं दालन अतिशय समृद्ध आहे. हाल, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम ते केशवसुत, मर्ढेकर, कोलटकर, चित्रे, ढसाळ,महानोर,
आणि इतर अनेक ही मराठी कवितेच्या सह्याद्रीची उत्तुंग शिखरं आहेत.
मराठीला चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. त्यातले कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे हे तीन कवी. खांडेकरांनी कविता लिहिली की नाही ते मला माहित नाही, मात्र त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितासंग्रहाला उत्तम प्रस्तावना लिहिलीय.
नारायण सुर्वेंना कालिदास सन्मान मिळालाय. बालकवी, मुक्तीबोध, माधव ज्युलियन, यशवंत, रेगे, बी, अनिल, राय किणीकर, बहिणाबाई, बी.रघुनाथ, ना.वा.टिळक, बा.भ. बोरकर, इंदिरा संत, शांताबाई, मेश्राम, भट, मनोहर, डहाके, तुलसी परब, अरूण काळे, भुजंग मेश्राम, लोकनाथ यशवंत,आरती प्रभू, [चिं. त्र्यं. खानोलकर] यांचे असंख्य चाहते आहेत. पाडगावकर, बापट आणि विंदांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम तुफान लोकप्रिय होते. माडगूळकरांच्या गीतरामायणानं असंख्य लोकांची मनं जिंकली होती. आजही अशोक नायगावकर, अजिम नावाज राही, प्रकाश होळकर,संजय चौधरी, कल्पना दुधाळ, नारायण सुमंत, भरत दौंडकर, व्रजेश सोळंकी, उत्तम कोळगावकर, आसावरी काकडे, संतोष पवार, प्रकाश घोडके, अरूण म्हात्रे, सौमित्र, नीरजा, अनुराधा पाटील, फ.मु., फुटाणे, प्रभा गणोरकर, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, संदीप खरे, चंद्रशेखर गोखले, अजय कांडर, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, हेमंत दिवटे, श्रीधर तिळवे आदी कवी लोकप्रिय आहेत.
सकस कविता मोठ्या प्रमाणात लिहिली जात असली तरी फुटकळ आणि टाकावू कवितेचं पिकही जोरदार असतं. महाराष्ट्रात बाकी कशाचाही दुष्काळ पडेल पण कवितेचा? छे. केवळ अशक्य.12 कोटी मराठी माणसांमध्ये किमान सव्वाएक कोटी तरी कवी असतीलच.
राज्यात एव्हढे सव्वाएक कोटी कवी तरी कवितासंग्रह म्हणे खपत नाहीत. याचा अर्थ हे कवी आपल्याला ऎकवतात पण इतरांचं विकत घेऊन वाचत नसणार !
कवितासंग्रह आग्रह करूकरू विकत घ्यायला लावणारा कविताप्रेमी एकच माणूस संजय भास्कर जोशी.
तर कवीकुळामध्ये बाबा आदमच्या काळापासून लोकप्रिय असलेल्या या काही वर्ल्डफेमस दंतकथा --
*1.एकदा रस्त्यात पकडा,पकडा असा जोरदार आरडाओरडा झाला. एक जण जीव खाऊन पळत होता, रस्त्यातल्या लोकांनी त्याला पकडलं. " काय रे, चोर्‍या करणं शोभतं का? काय चोरलंस बोल?"
तो म्हणाला, "अहो, मी काहीही चोरलेलं नाही."
"मग तो मागचा दाढीवाला का पकडा पकडा असं जीवखाऊन बोंबलतोय?"
इतक्यात धापा टाकत टाकत दाढीवालेच पोचले. ते म्हणाले, " मी सुप्रसिद्ध कवी महेश केळुस्कर, आकाशवाणीवरून मी माझ्या कविता ऎकवतो. त्या इतक्या मौलिक असतात की ट्रान्झीस्टर, झालंच तर घरातले मोठे रेडीओ अशा सर्वांवरून त्या ऎकता येतात. आज अख्ख्या होल इंडीयात रामदास आठवले सोडले तर माझ्या तोडीचा दुसरा कवी आढळणार नाही. माझ्या कविता संग्रहावर महासवलत योजना चालूय. एक घेतला तर नऊ मोफत.
कविता आवडल्या तर पैसे परत. मला काव्यवाचनाला बोलावणारांना हापूस आंब्याच्या पाच पेट्या भेट देणार शिवाय कौल या चित्रपटाचे दहा पासेस फ्री. कोणालाही आकाशवाणीत बोलावताना माझ्या कविता ऎकण्याची मी अटच घालतो. याला तसाच गळाला लावला होता. मी काय उगीच असिस्टंट डायरेक्टर आहे आकाशवाणीत?
यानं माझं काही चोरलं नाही. पण स्वत:ची कविता ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता !
पकडलेला म्हणाला, " यांची थुकरट कविता ऎकण्यापेक्षा मला पोलीसात द्या, तुरूंगात गेलेलं परवडलं !"
*2. बालगंधर्व नाट्यमंदीरात एक कवीसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. मंत्री कार्यक्रमाला उशीरा पोचले, बघतात तो काय स्टेजवर अवघा एकच कवी. खाली थिएटर हाऊसफुल्ल. ते संयोजकांना म्हणाले, "काय चुकलं, एकच कवी कसा आलाय? इतर का आले नाहीत?"
संयोजक म्हणाले, "सर आलेत ना सगळे. त्याचं कायय की कार्यक्रमाची बातमी वाचून कवीमंडळींनी एव्हढी गर्दी केली की मग आम्हाला आसन व्यवस्थेत बदल करावा लागला. कवींना सभागृहात बसवलंय. वर बसलाय तो रसिक श्रोता आहे."
*3. अलका सिनेमागृहाजवळ लकडी पुल आहे. तिकडे एक महिला पुलावरून नदीत उडी मारीत होती. तिला जिव देताना पोलीसांनी व जागृक पुणेकर नागरिकांनी वाचवलं.
"बाई, का जीव देताय," असं विचारलं, ती म्हणाली, "काय करू? नवरा कवी आहे. मुडदा मला सिनेमा दाखवायला म्हणुन घेऊन आला आणि सिनेमा सुटल्याबरोबर त्याच्या कविता ऎकवायला लागला. मला सांगा सलमान खानचा सिनेमा बघितल्यानंतर असल्या भिकार कविता ऎकण्यापेक्षा जीव दिलेला काय वाईट?"
नवरा म्हणाला, "माझ्या कविता ऎकायला नाही म्हणते म्हणजे ही देशद्रोही नाही का? जिथं माझ्या कवितांची नक्कल थेट आकाशवाणीत महेश केळुस्कर आणि रामदास आठवले मारतात, त्या कवितांना वाईट म्हटलेलं मी कसं चालवून घेईन? ती उडी मारीत होती म्हणून बरं नाही तर मीच ढकलली असती. आता देवेन भाऊंना सांगून मी गोवंशाबरोबरच कवीवंशाच्या रक्षणाचा कायदाच करून घेणार आहे."
*4.एकदा एक कवी हार्ट अ‍ॅटॅक आल्यानं आय.सी.यु.मध्ये अ‍ॅडमिट होते. तब्येत अतिशय सिरियस होती. डाक्टरांनी कवीच्या पत्नीला बोलावलं, म्हणाले, "सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या. मनाची तयारी करा. जास्तीतजास्त दोन ते तीन तास आहेत तुमच्या हातात."
पत्नी म्हणाली, "डाक्टर काहीही करा,पण यांना किमान 12 तास जगवा. आमचा मुलगा यु.एस.ला असतो. तो निघालाय. 12 तासात दवाखान्यात पोचेल. निदान शेवटची भेट व्हायला हवी."
डाक्टर म्हणाले, "शक्य नाही. कितीही प्रयत्न केले तरी 12 तास शक्यच नाही."
कवीचा मित्र शेजारी उभा होता. तो म्हणाला, " वहीनी, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्याकडं मस्त आयडीया आहे. मी करतो 12 तासांची व्यवस्था."
मित्र कवीकडं गेला. म्हणाला, "दोस्ता, डाक्टरांनी सगळी आवराअवर करायला सांगितलीय. अरे तू जाणार आता. तू गेल्यावर तुझ्या कविता कोण ऎकविल आम्हाला? हे बघ, कवी जर कविता म्हणता म्हणता गेला तर त्याच्याएव्हढं भारी दुसरं काहीच नाही. ही घे तुझी वही, कर सुरू."
कवी कविता म्हणु लागला...कवी कविता सादर करीत राहिला... कवी कविता...
मुलगा विमानतळावरून धावत धावत दवाखान्यात पोचला. आई त्याला वडीलांच्या खोलीत घेऊन गेली. मुलानं बघितलं, वडील कविता म्हणत होते, कविता ऎकताऎकता त्यांचा मित्र मात्र मरून पडला होता.
*5. रेल्वेनं प्रवास करणारे शेजारी बसलेले 2 प्रवासी एकमेकांची ओळख करून घेत होते. पहिला म्हणाला, "मी कवी आहे."
तेव्हा दुसरा म्हणाला, " मी ठार बहिरा आहे."

अभिनेता जितेंद्र

अभिनेता जितेंद्र 7 एप्रिलला वयाची 75 वर्षे पुर्ण करीत असताना त्याला आपल्या पहिल्या चित्रपटाची नक्कीच आठवण येत असणार.
व्ही. शांताराम हे अतिशय नामवंत निर्माते आणि प्रतिभावंत दिग्दर्शक. त्यांनी जितेंद्रला ’गीत गाया पत्थरोने’ या चित्रपटात सर्वप्रथम नायकाची भुमिका दिली.
त्यासाठी त्याला लेखी करार करावा लागला. त्याला मानधन म्हणून एकुण 20 हजार रूपये देण्यात आले. या करारानुसार पुढील 3 वर्षे त्याला इतर संस्थेच्या चित्रपटात काम करता येणार नव्हते.
जितेंद्रचा ’गीत गाया पत्थरोने’ हा पहिलाच चित्रपट खुप गाजल्यामुळे जितेंद्रला प्रचंड मागणी आली. एक निर्माता त्याला एका चित्रपटासाठी 1 लाख रूपये द्यायला तयार झाला. जितेंद्र व्ही. शांताराम यांना भेटला. परवानगी द्यावी अशी त्यानं विनंती केली. त्याबदल्यात व्ही.शांताराम यांच्याकडून मिळालेली सर्वच्या सर्व रक्कम म्हणजे 20 हजार रूपये त्यांना परत करायची त्याने स्वत:हून तयारी दाखवली.
व्ही.शांताराम हे व्यवहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोर आणि कठोर होते. त्यांनी जितेंद्रला एका अटीवर परवानगी द्यायची तयारी दाखवली.
ते म्हणाले, " तुला मिळणार्‍या रकमेतले 20 हजार रुपये तू घे आणि उर्वरित 80 हजार रूपये माझ्या कंपनीच्या खात्यात आणून भर."
जितेंद्रला ही अट मान्यच करावी लागली.

खिसेकापूला फाशी

नगरात होणार्‍या चोर्‍या आणि पाकीटमार्‍यांना आळा घालण्यासाठी महाराजांनी अतिशय कडक पावलं उचलायचं ठरवलं.
त्यांनी जाहीर केलं की यापुढं खिसेकापूला जाहीरपणे भर चौकात फाशी देण्यात येईल. हजारो लोकांपुढे गुन्हेगाराला फाशी दिली की सगळ्यांना जरब बसेल. पुन्हा कुणीही खिसा कापण्याची हिंमत करणार नाही. 
मोठा गाजावाजा करून एका खिसेकापूला हजारो लोकांसमोर फाशी देण्यात आली.
त्या गर्दीचा फायदा घेऊन 16 जणांचे त्याठिकाणी खिसे कापले गेल्याचं कार्यक्रम संपल्यावर दाखल झालेल्या तक्रारींवरून महाराजांना कळलं. सतरावे खुद्द महाराजच होते.

अंगारवाटा, शोध शरद जोशींचा

अंगारवाटा, शोध शरद जोशींचा - संदर्भमुल्य असलेला चरित्रग्रंथ
काळे भानू हे मराठीतले महत्वाचे लेखक आणि साक्षेपी संपादक आहेत. त्यांनी चार महिन्यांपुर्वी "अंगारवाटा, शोध शरद जोशींचा," हा महत्वपुर्ण चरित्रगंथ लिहून प्रकाशित केलेला आहे. भानू काळे यांनी या चरित्र लेखनासाठी खूप मोठी मेहनत केलेली आहे. स्वत: शरद जोशींचे सहकार्य त्यांना याकामी मिळाले. जोशींचे देशविदेशातील असंख्य सहकारी, मित्र आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन, बोलून, पत्रव्यवहार, लिखित पुरावे, वृत्तपत्रे, ग्रंथ, नियतकालिके यातील पुराव्यांचा वापर करून हे पुस्तक लिहिलेलं असल्यानं त्याला संदर्भमुल्य प्राप्त झालेले आहे.
धनंजय कीर,सुमती देवस्थळी,वीणा गवाणकर यांनी लिहिलेली मराठी चरित्रे लोकप्रिय व विद्वतमान्य ठरलेली आहेत.
अशा मोजक्या चरित्र लेखकांच्या तोडीचं काम काळेंनी केलेलं आहे.
या पुस्तकात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्याबाबत दिलेली काही माहिती हादरवून टाकणारी आहे.
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व्ही.टी.कृष्णम्माचारी यांनी 28 एप्रिल 1956 रोजी तयार केलेल्या मसुद्यात "शेतीमालाचे उत्पादन 40 टक्क्यांनी वाढवावे व शेतीमालाची किंमत 20 टक्क्यांनी कमी करावी अशी शिफारस केलेली होती."
चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यात "सारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतीमालाचा भाव ठरवला जाऊ नये" असे मार्गदर्शक तत्वच होते.
1965 साली कृषि मुल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.
त्याच्या 1971 सालच्या अहवालात असे नमूद करण्यात आलेले आहे की, "शेतकर्‍यांना त्यांचा संपुर्ण उत्पादन खर्च भरून निघेल अशा किमती देणे अव्यवहार्य होईल. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील."
शेतकर्‍याची लूट करणे हेच आपल्या देशाचे अधिकृत धोरण होते, आहे, हे वाचून लाज वाटली.
[अंगारवाटा, शोध शरद जोशींचा, भानू काळे, उर्मी प्रकाशन,पुणे,डिसेंबर 2016, पृष्ठे 510+24 आर्टप्लेट, किंमत रू.500 ]

केशवराव विचारे यांच्या भाषणांतून

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वैचारिक स्कूल्स आहेत. नानाविध विचारधारा आहेत.
विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी ही अशीच दोन स्कूल्स.
त्यांच्यात कायम वाद व्हायचे.
एकदा विश्वामित्र म्हणाले, " ज्ञान ही अशी प्रभावी शक्ती आहे की ती कोणीही कायमची दाबून ठेवू शकत नाही. हे चंद्र चांदण्यांनी भरलेलं उघडं आभाळसुद्धा ज्ञानार्जनाचं कितीतरी मोठं माध्यम आहे. आता हे कोणाला झाकता येईल का?"
वसिष्ठ म्हणाले, "सोप्पंय. त्या प्रत्येक ग्रहतार्‍याला देवादिकांची नावं द्यायची. त्यांच्या नित्यपुजा, व्रतवैक्ल्यं यात सगळ्यांना गुंतवून टाकायचं, कोणाची बिशाद आहे विचार वगैरे तापदायक गोष्टींकडे जाण्याची?"
केशवराव विचारे यांच्या भाषणांतून--

सनातनी केशवराव विचारे

तरूणपणी केशवराव विचारे कमालीचे सनातनी होते. तासंतास देवपुजा, व्रतवैकल्यं आणि नवससायास यात बुडून जायचे.
सत्यशोधक भास्करराव जाधव हे गावोगाव, शिक्षणाचं महत्व सांगणारी भाषणं करायचे.
ते अंधश्रद्धांवर टिका करायचे. अडाणीपणा, लाचखोरीवर तुटून पडायचे.
जुन्या विचारांची काही मंडळी त्यांच्यावर चिडून असायची. भास्करराव आपल्या देवाधर्माला शिव्या देतात, त्यांना कायमचा धडा शिकवा, त्यांचा आवाज बंद पाडा, असा अपप्रचार त्यांनी चालवला होता. भास्कररावांची सभा उधळून लावायची, त्यांना मारहाण करायची आणि तरिही नाहीच ऎकलं तर त्यांना ठारच मारायचं असा प्लॅन केशवराव विचारे व त्यांच्या मित्रांनी आखला.
केशवराव व त्यांचे पंधरावीस पहिलवान मित्र तयारीनिशी भास्कररावांच्या कार्यक्रमाला गेले.
भास्कररावांनी त्यांच्या भाषणात देवाधर्माला पहिली शिवी दिली की त्यांच्यावर हल्ला करायचा असं केशवरावांनी सर्वांना सांगून ठेवलं होतं.
भास्करराव अतिशय विद्वान होते. संपुर्ण मुंबई राज्यात ते मॅट्रीकच्या व पदवी परीक्षेत पहिले आलेले होते.
त्यांचं भाषण अतिशय रंगलं. भाषण संपलं.
केशवराव त्यांना भेटायला गेले. म्हणाले, " तुम्ही तर आमच्या देवाधर्माला शिवीगाळ करता असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आज काय विसरलात काय शिव्या द्यायला?"
भास्करराव म्हणाले, " मी आजवर कधीच शिवीगाळ केलेली नाही. करणार नाही. ज्यांच्याकडं विचार नसतात, ते शिवीगाळ करतात. मला काय गरज शिवीगाळीची?"
केशवराव विचारे त्या दिवसापासून सत्यशोधक झाले.

जागृत म्हसोबा

एका गावातला म्हसोबा प्रत्येकाच्या नवसाला पावतो असं भक्तगण सांगायचे. जिल्ह्यात सर्वत्र त्या म्हसोबाचा बोलबाला होता. नवस बोलायला मोठमोठ्या रांगा लागायच्या.कोंबडी,बकरी यांचे बळी दिले जायचे. रक्ताचा ओहळ वाहात असायचा. म्हसोबा अंगात आलेले अनेक लोक तिकडे पडीक असायचे. हे जागृत देवस्थान असल्यानं कोणी नुसती त्याच्यावर शंका जरी घेतली तरी 24 तासात दणका बसतो, हगवण लागते असेही सांगितले जायचे.
केशवराव विचारे सत्यशोधक विचार पेरत गावोगाव फिरायचे.
ते म्हसोबाला कडकडून भेटले. गच्च मिठी मारून त्यांनी म्हसोबाशी अर्थातास गप्पा मारल्या.
बरोबर एक महिन्यानं ते परत म्हसोबाला भेटायला गेले.
ते पुजार्‍याला म्हणाले," म्हसोबा माझ्या नवसाला का पावला नाही?"
पुजारी म्हणाला, "काय नवस केला होता?"
ते म्हणाले, "मला हगवण लागू दे."
पुजारी म्हणाला, "त्यासाठी नवस करायची गरजच नाही, म्हसोबाबद्दल तुमच्या मनात सन्मान, आदर नसेल तरी हगवण लागेल."
केशवराव म्हणाले, "महिन्यापुर्वी मी आलो, म्हसोबाला मिठी मारली. त्याचवेळी मी त्याचे दोन्ही डोळे काढून नेले. आज महिना झाला, माझ्यावर काहीच कारवाई का नाही झाली?"
पुजारी म्हणाला, "सरळ आहे. तुम्ही डोळेच काढून नेल्यानं अ‍ॅक्शन कोणावर घ्यायची ते म्हसोबाला दिसणार कसं ना?"

न्यायाधीश ही सुद्धा माणसंच

न्यायाधीश ही सुद्धा माणसंच असतात. ती काही बेटावर राहात नाहीत. त्यांच्या जडणीघडणीतून त्यांची काही एक अभिरूची तयार झालेली असते.
त्यांनी व्यक्तीगत मतांचा प्रभाव पडू न देता नि:पक्षपातीपणे निकाल देणं अभिप्रेत असलं तरी शेवटी काहीनाकाही प्रभाव हा पडतोच.
सरकारी जमिनी भुमिहीनांनी ताब्यात घेण्याचा सत्याग्रह राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यासाठी एका डाव्या पक्षानं पुढाकार घेतला.
जोरदार आंदोलन झालं.
रितीप्रमाणं पोलीसांनी शेकडो सत्याग्रहींना अटक करून न्यायालयांसमोर हजर केलं.
रितसर केसेस चालल्या.
एका जिल्ह्यात न्यायमुर्तींनी सत्याग्रहींना कोर्ट उठेपर्यंत कैदेची शिक्षा फर्मावली, आणि कोर्ट [ ते स्वत:] तात्काळ उठून गेलं.
दुसर्‍या एका जिल्ह्यात न्यायमुर्तींनी त्याच गुन्ह्यासाठी प्रत्येकी तीनतीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
न्यायमुर्तींच्या अधिकारात त्यांच्या विवेकानुसार हे निकाल देण्यात आलेले होते. कायद्यानुसार ते योग्यच होते.
ज्या न्यायाधिशांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिली होती, ते स्वत: एका भुमिहीन आईवडीलांचे पुत्र होते.
ज्यांनी तीनतीन महिने कारावासाची शिक्षा दिली होती ते स्वत: मोठ्या सरदार घराण्यातले होते आणि त्यांची शेकडो एकर जमीन कुळकायद्यात गेलेली होती.

ग्रंथप्रेमी न्यायमुर्ती

15 वर्षांपुर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या एका सामाजिक निकालपत्रावर टिका करणारा लेख मी सकाळमध्ये लिहिला होता.
त्या निकालपत्रात सामाजिकदृष्ट्या असलेल्या उणीवांवर मी भर दिला होता. लेख विश्लेषणात्मक असला तरी जहाल होता. टोकदार होता.
निकाल देणारे न्यायमुर्ती अतिशय नि:स्पृह आणि कडक म्हणून ओळखले जात. 
लेख वाचून माझ्या काही वकील आणि जिल्हा न्यायाधीश असलेल्या मित्रांनी माझ्यावर बहुधा न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला जाणार असा कयास व्यक्त केला.
मग मीही आपल्याला काही दिवस येरवडा विद्यापीठात पाठवलं जाणार अशी मनाची तयारी केली.
माझ्या एक प्रसिद्ध नाटककार मित्रानं त्याला ते मा. न्यायमुर्ती क्लबमध्ये भेटले असताना त्यांचा मूड बघून माझ्या लेखाचा विषय काढला. न्यायमुर्तींनी तो लेख वाचलेला होता.
"कसा वाटला तुम्हाला तो लेख?" त्यानं त्यांचा अंदाज घेण्यासाठी खडा टाकून बघितला.
न्यायमुर्ती म्हणाले, " लेखातले काही मुद्दे मला नवे होते. ते माझ्यासमोर वकीलांनी मांडले असते तर कदाचित माझा निकाल वेगळा आला असता. शेवटी आम्हाला समोर आलेले मुद्दे, संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय द्यावा लागतो."
मित्रांनं खूष होऊन मला ही वार्ता लगेच फोनवर कळवली.
काही दिवसांनी त्या न्यायमुर्तींची मुंबईला बदली झाली. माझ्या एका वकील मित्रानं त्यांच्याकडं पुन्हा माझ्या त्या लेखाचा विषय काढला. आमची मैत्री असल्याचं सांगितलं. न्यायमुर्ती म्हणाले, "त्यांना माझ्या चेंबरला चहाला बोलवा."
मी त्यांच्या चेंबरला गेलो. ते अतिशय आपुलकीनं वागलं. ते ग्रंथप्रेमी होते. त्यामुळं आमच्या आवडीचे ग्रंथ या विषयावर भरपूर गप्पा रंगल्या.
ते निवृत्त होईपर्यंत आम्ही अनेकदा भेटत असू. निवृत्तीनंतर ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी दिल्लीला राहायला गेले.
ते जेव्हा न्यायमुर्ती झाले तेव्हाचा एक प्रसंग मला वकिलमित्रानं सांगितला होता.
त्यांच्या खेड्यातला एक वर्गमित्र त्यांना भेटायला आला. तो त्यांचा शाळेतला अतिशय जिवलग मित्र होता.
त्याच्या जमिनीची एक केस न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित होती. त्याच्या वकिलानं सांगितलं होतं, केस तुमच्या न्यायमुर्ती झालेल्या मित्रासमोरच चालणार आहे. तुम्ही त्यांना भेटून तुमच्या बाजूनं निकाल देण्यासाठी गळ घाला, म्हणून तो आला होता.
न्यायमुर्तींनी मित्राला समजावून सांगितलं, "एकतर आपण जुने मित्र असल्यानं तुझी ही केस मी चालवणं बरोबर होणार नाही. ती दुसर्‍या न्यायमुर्तींपुढं चालवावी असं मी माझ्या वरिष्ठांना सांगेन. अमूकच निकाल द्या असं सांगणं हा गुन्हा आहे."
पण मित्र काही ऎकायलाच तयार नव्हता. शेवटी न्यायमुर्तींनी त्याला जायला सांगितलं. मित्र चिडला. अद्वातद्वा बोलायला लागला. न्यायमुर्तींनी पोलीसांना बोलावलं. मित्राला दबाव आणण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक करायला लावली.
न्यायमुर्तींनी नंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना फोन करून सांगितलं, "तो चांगला माणूस आहे. माझा शाळेतला जवळचा मित्र आहे. खेड्यातला आणि अल्पशिक्षित असल्यानं त्याला कायदेशीर बाबी, न्यायालयीन शिष्टाचार माहित नाहीत. त्याच्यावर एफआयआर दाखल करू नका. फक्त रात्रभर त्याला पोलीस चौकीत बसवून ठेवा. सकाळी समज आणि दम देऊन सोडून द्या. मी माझ्या पीएजवळ त्याच्या बसच्या तिकीटाचे पैसे पाठवून देतोय. त्याला गावच्या एसटीत तिकीट काढून बसवून द्या. मी पैसे पाठवलेत हे मात्र त्याला सांगू नका."
दुसर्‍या दिवशी पोलीसांनी दम देऊन सोडल्यावर मित्र गावी गेला. सार्‍या गावभर त्यानं न्यायमुर्तींना शिव्या घातल्या. "मोठा काय झाला? गावाला आणि मित्रांना विसरला, वगैरे."
यथावकाश त्याच्या शेतीच्या केसचा निकाल लागला. केस दुसर्‍या न्यायमुर्तींपुढे चालली होती. निकाल मेरीटवर त्याच्या बाजूचा होता.

त्याग

नदीला पूर आल्यानं नदीकाठची घरं पाण्यात बुडाली होती. सर्व रहिवाशांना शेजारच्या शाळेत हलवण्यात आलं होतं.
तीनचार मजली इमारतीत वरच्या मजल्यावर काही ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते.
शाळकरी मुलांचा एक ग्रुप पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पहाटेपासून राबत होता.
चौथ्या मजल्यावर अडकलेल्या आजींना मुलांनी खालून विचारलं, " आजी काही मदत हवी क?"
आजी म्हणाल्या, " अरे घरातलं दूध संपलय. त्यामुळं सकाळपासून चहा घेता आला नाही, दूध आणता का?"
मुलांनी स्वत:च्या पैशांनी दुधाच्या 2 पिशव्या विकत आणल्या.
आजींनी दोरीला बांधून एक कापडी पिशवी खाली सोडली. मुलांनी त्यात दुधाच्या पिशव्या टाकल्या. आजींनी त्या वर खेचून घेतल्या.
मुलं म्हणाली, " आजी, ठीकाय ना? आणखी काही लागलं तर सांगा."
आजी म्हणाल्या, " हात मेल्यांनो, हे कसलं दूध घेऊन आलात? चितळेचं का नाही आणलंत? मी चितळे सोडून दुसर्‍या दुधाला हातसुद्धा लावीत नाही! ठीकय आजचा दिवस चालवून घेते आता."

कुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ

केंद्रात ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय कशला? - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1. जो ओबीसी आयोग स्थापन करण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर, 1992 ला दिले आणि ज्याची स्वतंत्र कायद्याद्वारे स्थापना 1993 साली नरसिंहराव सरकारने केली तो आपणच स्थापन केल्याचा नरेंद्र मोदींचा दावा.
2. गुजरातमध्ये मोदींनी स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्वत:ची घांची [ आपल्याकडची तेली ] ही जात ओबीसीत घालायला लावली, हे तेल बनवणारे तेली नाहीत तर ते तेल विकणारे व्यापारी आहेत.
3. ज्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात "आयुष" नावाचे नवे मंत्रालय स्थापन केले तेच म्हणताहेत मंत्रालये आधीच जास्त आहेत, आता नविन कशाला?
4. ज्या परिवाराचा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध होता त्यांचाच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला विरोध.
5. अनु.जाती, अनु.जमाती नंतर ज्या ओबीसी या तिसर्‍या घटकाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली त्यांच्यासाठी वेगळे मंत्रालय ही 1992 पासूनची मागणी आहे.
6. आपण ओबीसी आहोत याचे निवडणुकीत भांडवल करणारेच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला विरोध करतात! ही तर केवळ कळसुत्री बाहुली!

एल्फिन्स्टन आणि स्वातंत्र्य

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि स्वातंत्र्य
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गवर्नर असताना त्याचा एक ब्रिटीश मित्र त्याला भेटायला गेला. संध्याकाळची वेळ होती.
मित्राची अपेक्षा होती की एल्फिन्सटन आपल्याला पेयपान देईल. पण तसं काही झालं नाही. एल्फिन्सटन लेखन करण्यात व्यस्त होता.
मित्रानं विचारलं, " एव्हढं काय लिहितोयस?"
"पाठयपुस्तकं लिहितोय, भारतीय मुलांसाठी." एल्फिन्स्टन म्हणाला.
मित्र नाराज झाला. "भारतीय लोक रानटी आहेत. त्यांना अजिबात शिकवू नये. तसं केल्यास ते जागृत होतील आणि स्वातंत्र्य मागतील. आपल्याला हा देश सोडून जावं लागेल."
एल्फिन्स्टन म्हणाला, " तुझं खरंय."
"अरे मग कशाला शिकवायचं आपण त्यांना? आहेत तसेच अज्ञानी आणि गुलामीत राहू देत सडत."
एल्फिन्स्टन म्हणाला, "मित्रा, स्वातंत्र्य हे असं मूल्य आहे की जन्माला आलेला प्रत्येक माणूस स्वातंत्र्य मागणारच. फरक एव्हढाच आहे की शिकला तर माणूस लवकर स्वातंत्र्य मागेल. अर्थात नाही शिकला तरी एक ना एक दिवस उशीरा का होईना पण माणूस स्वातंत्र्य मागणारच."
एल्फिन्स्टन पुढं म्हणाला, "आपण भारतीयांना शिकवतोय त्यात आपलाच फायदा आहे. माणसं अडाणी असतील तर त्यांच्यावर जास्त काळ राज्य करता येईल, पण जेव्हा ती उठाव करतील तेव्हा ती तुझ्यामाझ्या वंशजांना तलवारीनं कापून काढतील आणि आपण त्यांना शिकवलं तर ते जा म्हणून नक्कीच सांगतील पण ते तोंडानं आपल्या वंशजांना चले जाव म्हणून सांगतील."
.................

महत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2

ल. सि. जाधव यांचं महत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2
इतकं पारदर्शक, संतुलित आत्मकथन एव्हढं दुर्लक्षित का राहावं?
इतर दलित आत्मकथनांच्या वाट्याला डझनांनी पुरस्कार आलेले असताना ह्याची मात्र उपेक्षा का व्हावी? या आत्मकथनात पानापानावर ना विद्रोह ना आक्रोश. त्यामुळं विद्रोह आणि अस्मितेच्या नावानं आदर्श कोंडवाडे चालवणार्‍या मठाधिपतींना जाधव कसे चालतील? आचार्य अत्रे यांनी 1950 च्या दशकात महात्मा फुल्यांवर दर्जेदार चरित्रपट बनवला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. अत्रे म्हणाले,"चित्रपट ब्राह्मणेतराच्या जीवनावरचा असल्यानं ब्राह्मण प्रेक्षक तिकडे फिरकले नाहीत आणि दिग्दर्शक ब्राह्मण असल्यानं ब्राह्मणेतर चित्रपट बघायला गेले नाहीत." दलित आत्मकथन आणि त्यात होरपळ असं थेट शीर्षक असल्यानं मध्यमवर्गियांनी या पुस्तकाकडं दुर्लक्ष केलं असणार आणि दलित असूनही चढा सूर नाही, आक्रोश नाही, विद्रोह नाही, त्यामुळं मातब्बर दलित साहित्यिकांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं असावं...
त्रं. वि. सरदेशमुख यांच्या "डांगोरा एका नगरीचा" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्र्यं.वि. सरदेशमुख हे ल. सि. जाधव यांचे प्राध्यापक. हे विद्यार्थी - शिक्षक संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्या मौलिक कादंबरीची मुद्रण प्रत जाधवांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात तयार केली. त्यांच्या ह्या कामाची दखल मौज प्रकाशनाचे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांनी आवर्जून घेतली.
या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेबाबतचा या पुस्तकातला भाग अत्यंत मनोज्ञ उतरलेला आहे. त्र्यं. वि.सरांच्या स्वभावाचे अनेक गमतीदार पैलू समजून घेताना वाचक या आत्मकथनात गुंतून पडतो.
आत्मसमर्थन हा प्रत्येक आत्मचरित्राचा अटळ भाग असतो. जाधव मात्र स्वसमर्थनार्थ काहीही न लिहिता उलट आपण कसे भित्रे, बुजरे, संकोची आणि कायम भेदरलेले कसे होतो त्यावर सातत्यानं प्रकाशझोत टाकतात. इतरांना आणि व्यवस्थेला दुगाण्या झाडण्याऎवजी ते आत्मपरिक्षण करीत जातात. लोक दागिने मोडून खातात तसे काही लेखक गरिबी मोडून खातात. जाधव मात्र वेदना मांडतानाही त्याचं भांडवल करायचं टाळतात.
दारिद्र्य, शोषण, बकाल जगणं यात व्यसनाधीनता अपरिहार्यच असते की काय असं वाटावं इतकं त्याचं चित्रण मराठीत आलेलं आहे. झोपडपट्टीत वाढलेला आणि सर्व नातेवाईक व्यसनाधीन असलेला हा माणूस मात्र चक्क निर्व्यसनी असावा हे मला बेहद्द आवडलं.
भावाला ब्रेन ट्यूमर झाल्याचं समजल्यावर कुटुंबाची उडालेली गाळण, त्यासाठीचे त्यांनी केलेले औषधोपचार या सार्‍याबद्दल मूळ पुस्तकातच वाचायला हवं.
सोलापूरच्या बहुतेक सगळ्या साहित्यिकांशी यांची मैत्री. त्यांच्याबद्दलचे अनेक अनुभव यात येतात.
लेखकानं सुरूवातीला सोलापूर मनपा कार्यालयात नोकरी केली. त्यानंतर ते प्राध्यापक होण्यासाठी दोन महाविद्यालयात पत्र आल्यानं रूजू व्हायला गेले. पण कोणीतरी त्यांना तिकडं त्रास दिला जाईल अशी भिती घातल्यानं हा माणूस रूजू न होता तिकडनं सरळ निघून आला.
स्टेट बॅंकेत नोकरी करताना मुंबई इंटर नॅशनल एअरपोर्ट ब्रॅंचचे अनुभव धमाल आहेत.
याकाळात पत्नीच्या एका नातेवाईकांना भेटायला ते झोपडपट्टीत जातात. नातेवाईक खूप गरिब आणि कर्जबाजारी असतात. पण जावई आणि मुलगी भेटायला आली म्हटल्यावर ते या दोघांना आहेर करतात, साडी, चोळी,पॅंट पीस, शर्ट पीस देऊन. नंतर जाधवांच्या लक्षात येतं की त्या गरिबानं चक्क बायकोचं मंगळसूत्र विकून हा आहेर विकत आणलेला असतो. हा सारा भाग गलबलून टाकणारा आहे.
जाधवांच्या आईच्या शेवटच्या आजारपणाची आणि तिच्या मृत्यूची यातली कहाणी चटका लावणारी आहे. आजारपणातल्या खर्चानं जाधव मेटाकुटीला आलेले असताना आई जाते. आता कर्ज काढूनच अंत्यविधी शक्य असतो. अशावेळी आईची पिशवी सापडते, त्यात तिनं आयुष्यभर जमवलेली पैनपै साठवलेली असते. त्यात साडेतीन हजार रूपये सापडतात हे वाचताना डोळे भरून येतात.
इतकं पारदर्शक, संतुलित आत्मकथन एव्हढं दुर्लक्षित का राहावं? सोलापूरच्या सुविद्या प्रकाशनानं उत्तम निर्मितीमुल्यं असलेलं 280+8, पृष्ठांचं हे पुस्तक अवघ्या 230 रूपयांना दिलेलं आहे.
इतर दलित आत्मकथनांच्या वाट्याला डझनांनी पुरस्कार आलेले असताना ह्याची मात्र उपेक्षा का व्हावी? या आत्मकथनात पानापानावर ना विद्रोह ना आक्रोश. विद्रोह आणि अस्मितेच्या नावानं आदर्श कोंडवाडे चालवणार्‍या मठाधिपतींना जाधव कसे चालतील?
आचार्य अत्रे यांनी 1950 च्या दशकात महात्मा फुल्यांवर दर्जेदार चरित्रपट बनवला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. अत्रे म्हणाले,"चित्रपट ब्राह्मणेतराच्या जीवनावरचा असल्यानं ब्राह्मण प्रेक्षक तिकडे फिरकले नाहीत आणि दिग्दर्शक ब्राह्मण असल्यानं ब्राह्मणेतर चित्रपट बघायला गेले नाहीत."
दलित आत्मकथन आणि त्यात होरपळ असं थेट शीर्षक असल्यानं मध्यमवर्गियांनी या पुस्तकाकडं दुर्लक्ष केलं असणार आणि दलित असूनही चढा सूर नाही, आक्रोश नाही, विद्रोह नाही, दलित अस्मितेचा झेंडाही नाही. लेखक मातंग. ठराविक मातब्बर दलित साहित्यिकांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं असावं.
उत्तम वाचणारांनी, दर्जेदार वाचणारांनी हे पुस्तक चुकवू नये.
ल. सि. जाधव ..9423858698
प्रकाशक- बाबुराव मैंदर्गीकर, सुविद्या प्रकाशन, 374 उत्तर कसबा, सोलापूर,413 007
ISBN 978-81-92/757-2-5

होरपळ टिपणारं महत्वाचं आत्मकथन -1

ल. सि. जाधव - होरपळ टिपणारं महत्वाचं आत्मकथन -1
दलित आत्मकथनांनी मराठी साहित्याची उंची जागतिक पातळीवर नेली. सामाजिक दस्तावेजीकरण यातून होत राहिलं.
80 च्या दशकातील अनेक आत्मकथनं गाजली.
यातली बहुसंख्य बौद्ध समाजातली होती. इतर समाजातल्या मंडळींचीही काही पुस्तकं आली असली तरी त्यांचा फारसा गाजावाजा झाला नाही.
श्री.ल.सि.जाधव हे सोलापूरचे. मातंग या उपेक्षित समाजातले उच्चशिक्षित, बॅंक अधिकारी. त्याचं होरपळ हे आत्मचरित्र 2011 साली प्रकाशित झालं. त्याची दुसरी आवृत्तीही 2014 साली आली. बहुतेक दलित आत्मकथनं ही वयाच्या तिशी पंचविशीत लिहिलेली आहेत. अनेक आत्मकथनांमध्ये चढा सूर लावल्याचा आक्षेप घेतला गेलाय.
जाधवांनी मात्र वयाच्या साठीनंतर हे पुस्तक लिहिलं. अत्यंत संयत सूर, समंजसपणे जगण्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि कसलाही कडवटपण नसलेलं नितळ आत्मकथन.
जाधवांच्या लग्नांच्या चित्तरकथा मुळातूनच वाचायला हव्यात.
वय वर्षे 21 असलेल्या उच्चशिक्षित मुलाचं लग्न वडील ठरवतात. मुलाला लग्नाआधी मुलगी निदान दाखवा तरी असं कोणीतरी म्हटलं तर वडील उसळले, "आमच्या बापानं कुठं आम्हाला आमच्या लग्नाआधी मुलगी दाखवली होती?"
मुलगी न बघताच साखरपुडा आणि पुढं लग्न होतं.
लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी लग्नातल्या धावपळीमुळं बहुधा नवर्‍या मुलाचे वडील हृदयविकाराच्या झटक्यानं निधन पावतात. त्यामुळं नवरीला मात्र पांढर्‍या पायाची म्हणून सासू हिनवू लागते. तिचा इतका दु:स्वास केला जातो की मुलीला माहेर पळून जावं लागतं आणि शेवटी घट:स्फोट होतो.
पुढं जाधवांचं दुसरं लग्न ठरतं.
लग्नाची जोरदार तयारी करताना नवरीचे वडील ब्रेन हॅमरेज होऊन जातात.
आता पाळी नवर्‍या मुलाची असते. नवरीकडचे नवर्‍या मुलाला शिव्या घालू लागतात. त्याच्यामुळेच नवरीचा बाप वारला अशी हाकाटी पिटली जाते आणि चक्क लग्न मोडतं.
आजवर बाईला जबाबदार ठरवल्याची अनेक उदाहरणं ऎकली /वाचली होती, पण आपल्या समाज व्य्वस्थेत मुलग्यालाही जबाबदार धरले जाते हे सांगणारे हे पहिलेच पुस्तक.
क्रमश:---

मोठेपणा

लोक ग्लासभर पाणी घेतात आणि घोटभर पिऊन उरलेलं टाकून देतात. काहीजण नको एव्हढं अन्न ताटात वाढून घेतात, चव घेऊन उरलेलं फेकून देतात.
तुम्ही हवं तेव्हढं जरूर खा, प्या. मात्र अन्न किंवा पाणी वाया घालवणं हा मला तरी अपराध वाटतो.
माझा एक मित्र मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठीत अशा पंचतारांकीत हाटेलात अधिकारी आहे.
तो सांगत होता, त्यांच्याकडे एका उद्योगपतींची व्हेज बिर्यानीची 100 किलोंची मागणी होती.
मी म्हटलं, "घरी एखादी मोठी पार्टी आयोजित केलेली असेल त्यांनी."
तो म्हणाला, " नाही. ते नेहमीचे 100 किलो बिर्यानी मागवतात."
मी म्हटलं, "हो, त्यांच्या 25 की 27 मजली बंगल्यातील नोकरचाकरांना देत असतील. मी वाचलंय की त्यांच्या या बंगल्यात 500 की 600 नोकर आहेत."
तो म्हणाला," नाही. देशातल्या सर्वाधिक मोठ्या उद्योगपतींच्या प्रतिष्ठेला साजेशी आर्डर असावी म्हणून ते 100 किलो मागवतात. कुटुंबातले 4/5 जण जेव्हढी ह्वी तेव्हढी खातात आणि उरलेली नोकरांना किंवा इतर कोणालाही न देता ते बंदोबस्तात नेऊन कचराकुंडीत टाकतात. प्रतिष्ठा म्हणतात याला भाऊ, आहात कुठे तुम्ही? त्यांचं म्हणे असं म्हणणं आहे की आम्ही वाया घालवतो, तुम्ही का जळताय? पैसे तर आम्ही भरतोय ना?"