२०१८ मध्ये महत्वाच्या ५ ग्रंथांच्या सुधारित आवृत्त्या मला प्रकाशित करता आल्या.
१. महात्मा फुले : समग्र वाड्मय,
२. सावित्रीबाई फुले : समग्र वाड्मय,
३. आम्ही पाहिलेले महात्मा फुले,
४. महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ,
५. महात्मा फुले: गौरव ग्रंथ,
या पुस्तकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महात्मा फुले : समग्र वाड्मयच्या आठ महिन्यात तीन आवृत्त्या संपल्या
या मालिकेतला ६वा ग्रंथ, "महात्मा फुले:शोधाच्या नव्या वाटा" हा प्रकाशनासाठी तयार आहे.
इतरही डझनभर पुस्तकांची कामं पुर्णतेच्या जवळ पोचलेली आहेत.
आणखी काही पुस्तकं छपाईच्या प्रक्रियेत पाईपलाईनमध्ये आहेत.
सध्या प्रकाशनाच्या प्रक्रियेत असलेली ही पुस्तके प्रकाशित होतील की नाही हे मला माहित नाही.
सध्या या ग्रंथ प्रकाशन समितीची सुत्रे सनातनी, सरंजामी, जात्यंधाच्या हातात आहेत.
मुलत: फुले आंबेडकरद्वेशावरच ते पोसले गेलेले आहेत. प्रबोधनाशी हाडवैर असलेल्यांना समाजक्रांतीच्या विचारांबद्दल जन्मजात आकस आहे.नफरत आहे. या समतावादी विचारांचे विकृतीकरण करण्यासाठी तसेच हे विचार नष्ट करण्यासाठी आजवर ते कार्यरत होते. आजही आहेत.
सगळेच राजकारणी फुले-शाहू-आंबेडकरांचा जप करीत असतात. मात्र या सरकारी ग्रंथ प्रकाशन समितीकडे एकही मुद्रीतशोधक, संशोधन सहाय्यक किंवा संपादन सहाय्यक नाही. कधीही नव्हते. सगळे काम एकहाती संपादक/सदस्य सचिवाला करावे लागते. त्याचा प्रवासखर्चही मिळाला तर पाच दहा वर्षांनी कधीतरी मिळतो.
सदस्य सचिवाला या पुर्णवेळ कामासाठी शिपाई, हमाल, झाडूवाले आदींच्या मासिक पगाराच्या २५% पेक्षाही कमी मानधन मिळते. अर्थातच तेही आठदहा वर्षांनी कधीतरी मिळते.
खरंतर हा सगळा थॅंकलेस जॉब आहे.भरपूर शिव्या, दूषणे आणि मन:स्तापाचा खुराक मात्र मुबलक मिळतो. टेल्कोतली माझी नोकरी सोडून मी हे काम करण्यासाठी गेलो. अनेक हिन्दी, मराठी, इंग्रजी पुस्तकं प्रकाशित केली. शंभर वर्षात महात्मा फुले साहित्याचे हिन्ही, इंग्रजीत भाषांतर झालेले नव्हते. ते केले. त्यातून बंगाली, तेलगू, गुजराती, उर्दू, मल्याळम, कन्नड, सिंधी, उर्दूत अनुवाद होऊन फुले साहित्य देशभर पोचले. लोकव्यवहार आणि शासनव्यवहार यात फक्त ’स्व’हित पाहिले जाते. सामाजिक कृतज्ञतेचा बहुधा दुष्काळ असतो. फुले-आंबेडकरी चळवळीबद्दलची माझी समज खूपच भाबडी होती असे आज मला वाटते. प्रबोधन चळवळीच्या ह्या कामासाठी टेल्को सोडण्याचा, पुर्णवेळ वाहून घेण्याचा, स्वत:चे प्रचंड आर्थिक नुकसान करून घेण्याचा निर्णय चुकला की काय अशी मला आज शंका येते.
महात्मा फुले यांच्या जीवनावर संशोधनाच्या नव्या प्रकाशात अद्ययावत चित्रपट करावा असा प्रस्ताव मी १९९९ साली राज्य शासनाला दिला होता. तो स्विकारला गेला होता. त्याच्या निर्मितीचे काम एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल यांच्याकडे सोपवले गेले होते. विजय तेंडूलकर, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, भा.ल.भोळे अशा दिग्गजांसोबत मला संशोधन व स्क्रिप्टवर काम करायला मिळेल हा आनंद होता.
तथापि ही चित्रपटनिर्मिती १८ वर्षे रखडली. त्याची कारणे सरकार, एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल हेच सांगू शकतील. या काळात संशोधन व स्क्रिप्ट टीममधल्या काही मान्यवरांचे निधन झाले. आता एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेलांकडचे हे काम नविन संस्थेकडे सोपवण्यात आलेले आहे.
नवी टिम ह्या कामाला गती देणार आहे.
२०१९ मध्ये ही संस्था महात्मा फुले यांच्या जीवनावरील भव्य अशा हिंदी, मराठी, इंग्रजीतील चित्रपटाची निर्मिती करील अशी आशा आहे.
प्रा.हरी नरके, ३१ डिसेंबर, २०१८