Saturday, October 31, 2020

अनुसुचित जातीजमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्या अधिकारात येतच नाही. सबब हा मुद्दा या बैठकीत आणता येणार नाही." तरिही उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या पटेलांनी डॉ. आंबेडकरांचा हा मुद्दा फेटाळून लावला. जवाहरलाल नेहरूंनी मात्र या बैठकीत मौन धारण केले. 

पटेलांनी देशभर या मागणीसाठी सनातन्यांची आंदोलने घडवून आणली. पटेलांनी हीच शिफारस घटनासभेत मांडली असता डॉ. आंबेडकरांनी घटना सभेच्या बैठकीतून सभात्याग केला व पुढील ४ दिवस ते कामकाजाला अनुपस्थित राहिले. त्यांनी घटना समितीचा राजीनामा द्यायचे ठरवले. अनु. जातीजमातींना राज्यघटना संरक्षण देणार नसेल तर अशा घटना परिषदेत मी राहणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

त्यामुळे नाईलाजाने पटेलांनी माघार घेतली  व त्यामुळे अनु. जातीजमातींचे आरक्षण टिकले.


- प्रा. हरी नरके, 

३१/१०/२०२०


संदर्भासाठी पाहा-

१. डॉ. राजा शेखर वुंद्रू, (आय.ए.एस.) " आंबेडकर, गांधी आणि पटेल," ब्लूम्सबेरी प्रकाशन, नवी दिल्ली, २०२०, पृ. २३१ ते २३९


२. Constituent Assembly Debates, vol.5, pp. 259-70, vol. 8, pp. 269-72,   

३. कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, खंड ७७ वा, पृ.२५,

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड, १३, पृ.९२, पृ. १२७

५. बी. शिवा राव, द फ्रेमिंग ऑफ कॉन्स्टीट्यूशन, खंड ४ था, पृ. ५९९, पृ.७७२-७३, खंड २ रा, पृ. २४७,


Friday, October 30, 2020

पुरूषोत्तम बेर्डे यांचे "क्लोज एनकाउंटर्स"- कामाठीपुर्‍याचे भन्नाट आत्मचरित्र


टूरटूर, हमाल दे धमाल या गाजलेल्या नाटक-सिनेमांमुळे पुरूषोत्तम बेर्डे सर्वांना परिचित आहेत. मराठीत अनेक व्यक्तींची दर्जेदार आत्मकथनं आजवर आलेली आहेत. परंतु बेर्डे यांनी लिहिलेले "क्लोज एनकाउंटर्स" हे मुंबईतील बदनाम वस्ती म्हणुन ओळखल्या जाणार्‍या कामाठीपुर्‍याचे आत्मचरित्र आहे. विशेष म्हणजे ते अतिशय खिळवून ठेवणारे आहे. त्यांनी या परिसरातील गल्ल्या, चाळी, घरं, माणसं यांची इतकी रसरशीत, चटकदार पोर्ट्रेट्स चित्रित केलीयत की सामान्य वाचक ते जाणते समीक्षक असे सारेच या पुस्तकावर लट्टू होतील. बेर्डे कमर्शियल आर्टीस्ट आहेत. गाजलेले कॉपीरायटर आहेत. एकाच वेळी तुफान वाचनीयता, वेधकता, विषयाच्या थेट गाभ्याला भिडणं आणि त्या त्या माणसांचे रसायन मुळासकट उलगडून दाखवणं हे काम खुप आव्हानकारी असतं. ते बेर्डेंनी लिलया पेललेलं आहे. प्रसिद्ध कथाकार आणि नाटककार जयंत पवार यांची या पुस्तकाला लाभलेली "सांगोपांग कामाठीपुरा" ही प्रस्तावना म्हणजे एक श्रेष्ठ कलाकृतीच आहे.

वासुनाका, माहिमची खाडी, चक्र ते मुंबई दिनांक अशा अनेक पुस्तकांनी मुंबईचे उत्तम चित्रण आपल्यासमोर ठेवलेले आहेत. नामदेव ढसाळांच्या कवितांमधली मुंबई जोरदार आहे. पण बेर्डॆंची ही कहाणी केवळ भन्नाट म्हणावी अशी दर्जेदार आहे. 

अलेक्झांड्रा, श्यामू, कासीम बिल्डींग, अन्ना, तात्या अमोणकर आणि अपने बालाका डायरेक्शन, बबलू, येंचू, वच्छा, लोखंडेसर, मनजी, शेट्टी लोक, पेंटर अबूभाई, नूर महम्मद, अंजनीसुत व्यायामशाळा, याद्या, राजम्मा, गवजीबुवा, शूटींग गिटींग आणि ओमाचा मामा, बाळू मिरगी, खेळवाले,  पुंजाताई, रामकिशन तेली, सोनीबाई, षांत, अशा २४ व्यक्तीचित्रांमधून आपल्या काळजाला भिडणारी ही गोष्ट म्हणजे पुलंचे "व्यक्ती आणि वल्ली" ते जयवंत दळवींची "सारे प्रवाशी घडीचे" ही बिगरी ते मॅट्रीक इयत्तेतली पुस्तकं असतील तर "क्लोज एनकाउंटर्स" पोस्ट डॉक्टरल काम आहे. केवळ अफलातून.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. कोरोनातला गैबानेपणा घालवून माईंड एकदम फ्रेश करणारी तुफान कलाकृती. व्हॉट्सॅप या आजाराबद्दल मला तिरस्कारच वाटतो. पण हे पुस्तक व्हॉट्सॅपवर जन्माला आलेय हे कळल्यामुळे मी व्हॉट्सॅप या आजाराला सगळे गुन्हे माफ केलेले आहेत.

अपने राजहंस की बेश्ट निर्मिती. 

"क्लोज एनकाउंटर्स",  पुरूषोत्तम बेर्डे, राक्जहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती- डिसेंबर २०१९, पृष्ठे-२४०, किंमत रूपये ३००/- 

-प्रा. हरी नरके, ३०/१०/२०२०

Sunday, October 25, 2020

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी

संगिता नरके-

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी- लक्ष्मण गायकवाड

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि भटक्याविमुक्तांचे ख्यातनाम नेते लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या "




उचल्यानंतर" या आत्मकथनात रेणके आयोगाचे वाभाडे काढलेले आहेत. " या आयोगाचा अहवाल चेयरमन बाळकृष्ण रेणके यांनी मुद्दामहून उशीरा दिल्याने व तो घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने केंद्र सरकारने तो कचर्‍याच्या डब्यात टाकल्याचा " घणाघाती आरोप त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. या खळबळजनक पुस्तकात गायकवाड पुढे म्हणतात, " गुळाला मुंगळे चिकटावेत तसे रेणके अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिकटून राहिले आणि त्यांनी वेळोवेळी फक्त आपला कार्यकाल तेव्हढा वाढवून घेतला. त्यांच्याकडे शासनाने सोपवलेले काम न करता रेणके लाल दिव्याच्या गाडीतून सहली करीत फिरत राहिले. आपणच या आयोगाचे मालक आहोत अशा हटवादी भुमिकेतून रेणकेंनी समाजाची फसवणूक केली. रेणके प्रतिष्ठीत जातीचे असल्याने त्यांना विमुक्तभटक्यांचे प्रश्नच कळले नाहीत. दुराग्रही रेणके आपल्या व्हीआयपीच्या लाल दिव्याच्या गाडीत मजा करीत राहिले आणि त्यांनी मसणजोगी, नंदीबैलवाले अशा वंचितांची फसवणूक केली. आयोगाच्या अध्यक्षपदी रेणकेंऎवजी दुसरी कुणीही व्यक्ती असती तर विमुक्तभटक्यांची अशी फसवणूक झालीच नसती. पंतप्रधान मनमोहन सिंग विमुक्त भटक्यांचे कल्याण करू इच्छित होते, परंतू उशीरा आलेला रेणके अहवाल घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने तेही नाराज झाले. आधीच अनुसुचित जाती व अनु. जमातीचे आरक्षण असलेल्यांना तिथून बाहेर काढा ही रेणकेंची शिफारस देशभर फेटाळली गेली. यापुढे रेणकेंनी चळवळीतून निवृत्ती घ्यावी आणि विमुक्त भटक्यांच्या चळवळीपासून दूर राहावे" असा सल्लाही गायकवाड यांनी रेणकेंना दिलेला आहे. गायकवाड यांच्या या टिकेचे स्वागत केले जात असून या भुमिकेला विमुक्तभटक्यांचा फार मोठा पाठींबा मिळत आहे. या पुस्तकाद्वारे रेणकेंच्या आजवरच्या वाटचालीचा बुरखा फाडण्याचे धाडस गायकवाड यांनी केल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. या टिकेबद्द्ल आजवर मौन धारण केलेल्या रेणकेंच्या प्रत्युत्तराकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. 

-  संगिता नरके

पाहा - ( उचल्यानंतर, लक्ष्मण गायकवाड, ( पृष्ठे २७ ते ३० ) संधीकाल प्रकाशन, भाईंदर, ( पुर्व )  ४०१ ११५, प्रथमावृत्ती -आक्टोबर २०२०, पृष्ठे १९२, किंमत रूपये २५०/- )

..................................

पुस्तकासाठी संपर्क- फोन- ९८२०५ ९५२८२, 

लक्ष्मण गायकवाड यांच फोन-९८७०४ ५२४१०


Saturday, October 24, 2020

मनोरंजनाच्या आडपडद्यात संस्कृतीचं राजकारण - प्रा.हरी नरके

 

आज सुमारे ८० कोटी भारतीय लोक टेलिव्हीजन बघतात. त्यातला बहुसंख्य प्रेक्षक हा मनोरंजनाच्या वाहिन्या बघतो. एकट्या मराठीत दररोज विविध वाहिन्यांद्वारे ४० ते ५० मालिका दाखवल्या जातात. सर्वोत्तम टीआरपी मिळवणे हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेऊन या मालिका तयार केल्या जातात. या टीआरपीवरून वाहिनीला कमी किंवा जास्त जाहीराती मिळतात. या मिळणार्‍या जाहीरातींद्वारे वाहिनीला रेव्हुन्यू (महसूल- पैसा) मिळत असतो. कोणीही केवळ लोकहितार्थ वाहिनी चालवतो नसतो. या उद्योगातून दोन पैसे मिळवण्यासाठीच ही सारी धडपड केली जात असते. त्यात काहीच वावगे नाही. परंतु यामागे केवळ अर्थकारण, व्यापारी दृष्टीकोन एव्हढाच मर्यादित हेतू असतो का? तुम्हाला काय वाटते?

या उद्योगाद्वारे मनोरंजनाच्या आडपडद्यात संस्कृतीचं राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? हे फक्त अर्थकारण नसतं. तर मनोरंजन, माहिती, इतिहास, निखळ करमणुक, गोष्टी सांगणं यांच्याद्वारे जे संस्कार रुजवले जातात ते कोणते असतात? कोणती भाषा, कोणती मुल्यव्यवस्था सातत्याने तुमच्या माथ्यावर मारली जाते? कथा कुठलीही असो जी कटकारस्थानं खेळली जातात, जो चोरटा वा उघड व्याभिचार दाखवला जातो, जो लखलखाट आणि श्रीमंती थाट यांचा मारा केला जातो ते सारे अकारण, हेतूशुन्य असते असे तुम्हाला वाटते काय?

  

 प्रत्येक माणसाला हलक्याफुलक्या, प्रसन्न, बौद्धिक मनोरंजनाची गरज असते. ओढही असते. पण हे सोपे काम नसते. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. त्याने भाषा,संस्कृती, विचार,तत्वज्ञान,कलांची निर्मिती करून मानवी आयुष्याला सार्थकता दिलेली आहे. पण विविध मनोरंजन वाहिन्यांद्वारे दररोज जो काही रतीब घातला जातो त्याचा भर निर्बुद्ध करमणूकीवर असतो का? असल्यास तो तसा का असतो? प्रेक्षकांना फक्त बघे बनवणं, निष्क्रीय बनवणं, फारसा विचार करु नका, चंगळवादावर भर द्या, जगण्याकडे गम्भीरपणे बघु नका, फक्त मजा करा, मानवी दु:खं, सामाजिक समस्या, संवेदनशीलता, बौद्धिकता यांना फाट्यावर मारा अशी शिकवण या करमणुकीच्या माध्यमातून चलाखीने पेरली जाते का? माणसाच्या अबोध मनाचा कब्जा विशिष्ट्य राजकीय विचारसरणीच्या सुगीसाठी केला जातोय का?

 सुबुद्ध प्रेक्षकांना काय वाटते?

-प्रा. हरी नरके, २४/१०/२०२०

Thursday, October 22, 2020

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-



सुप्रसिद्ध लेखक, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आय.ए.एस. अधिकारी (निवृत्त) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-

हरी नरके जी, ही मालिका मी पूर्ण एकही भाग न चुकवता पाहिली.. कारण ती जवळपास परिपूर्ण- near perfect होती. बाबासाहेबांचे वैयक्तिक जीवन खूपच भावस्पर्शी पद्धतीने दाखवले, पण मला महत्वाचे वाटले ते या मालिकेने डॉ आंबेडकरांचे वैचारिक व्यक्तीमत्व, सामाजिक, राजकीय व संसदीय कार्य, त्यांचा संघर्ष आणि अखंड अभ्यास हे पैलू फारच सामर्थ्याने दाखवले आहेत. मुख्य म्हणजे या अलौकिक महापुरुषांची मालिका कुठेही प्रचारकी होत नाही,तरिही रंजक राहते .बाबाबासाहेबांचे व रमाई चे काम सागर देशमुख व शिवानी रांगोळे यांनी जणू परकाय प्रवेश करून काम केले व त्यांना पडद्यावर जिवंत केले. त्यांच्यापर्यंत माझे अभिनंदन कळवा. तुम्ही मालिकेचे संशोधक- सल्लागार असल्यामुळे कोणतीही ऐतिहासिक चूक हुडकली तरी सापडणार नाही, हे फार मोठे अवघड काम हरी जी तुम्ही समर्थपणे पार पाडले,त्याबद्दल तुमचे अभिनंदन!

आता मालिका संपली, काय नवीन एवढेच सुंदर पहायचे हा प्रश्न आहे. आणि या प्रशनातच मालिकेचे यश दडलेले आहे!

- Laxmikant Deshmukh लक्ष्मीकांत देशामुख

Wednesday, October 21, 2020

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले

 







स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दशमी क्रियेशनची आपली मालिका फार लवकर संपली, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली. काही कृतक मालिका इतक्या बोअर मारतात की प्रेक्षक आता यांना आवरा, यांच्यापासून आम्हाला वाचवा असा धावा बोलतात. अशा पार्श्वभुमीवर ही मालिका आणखी हवी असे वाटत असतानाच ती संपलीसुद्धा.

हजारो चाहत्यांनी मालिकेबद्दल समाधान व्यक्त केले. एकदोघांनी अ, ब, क यांना तुम्ही मालिकेत का दाखवले नाही? अशा विचारणाही केल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एव्हरेस्टच्या उंचीचे व्यक्तीमत्व. त्यांच्या अवतीभोवती उत्तम काम करणारे हजारो नेतेलोक होते. त्यातल्या सगळ्यांना मालिकेत आणणे केवळ अशक्य होते. मी पहिल्या एपिसोडपासून ३४३ व्या एपिसोडपर्यंत सहज मोजदाद केली तेव्हा लक्षात आले की ( मालिकेतल्या सभेत/गर्दीत उपस्थित असलेले एक्स्ट्रालोक सोडून ) ज्यांना मालिकेत कोणतेतरी छोटेमोठे व्यक्तीमत्व साकारायचे होते, किंवा संवाद बोलायचे होते, अशी एकुण १२०० पेक्षा अधिक कॅरेक्टर्स आम्ही दाखवली. तरीही काही नेते राहिले हे खरेय. आम्हाला त्यांनाही मालिकेत दाखवायचे होते. पण नाही जमले ही खंत आहेच... 

एका मित्रांने अशा भावना व्यक्त केल्या की "बाबासाहेबांच्या मालिकेला न्याय देण्यासाठी रिचर्ड अ‍ॅटनबरोच हवे होते." रिचर्ड अ‍ॅटनबरो महानच होते! पण त्यांनी " गांधी " चित्रपटात बाबासाहेबांना किती स्थान दिलेले होते याचा एकदा शोध घ्या. आम्हीही घेतो.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.    

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले. तुम्हाला ती आवडली याचा आम्हाला जरूर आनंद आहे. खरंतर आम्हाला अशा आणि एव्हढ्या कौतुकाची खरंच अपेक्षा नव्हती. टिकेला सामोरं जाण्याचीच आम्ही तयारी ठेवलेली होती. पण एकही वादंग न होता ही मालिका सुरळीतपणे पार पडली. आता हे सामाजिक दस्तावेजीकरण/चित्रीकरण पुढची किमान शंभर वर्षे नव्या पिढ्यांना बघायला हॉटस्टारवर उपलब्ध असेल. तुमच्या नानाविध अपेक्षा, तुम्ही केलेली सकारात्मक किंवा नकारात्मक टिका, तुमच्या अगदी प्रत्येक प्रतिक्रियेची आम्ही विधायक नोंद घेतलेली आहे. तुम्ही हजारोंनी मालिकेचे तोंड भरून कौतुक केलेत, एकदोघांनी मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, दोष दाखवलेत आणि मालिकेची दखल घेतलीत याचाच आम्हाला आनंद आहे. या प्रतिक्रियांचा उपयोग आम्हाला यापुढचे काम करताना नक्कीच होईल. या अनुभवाच्या प्रकाशात नव्या प्रकल्पांमध्ये आपण भेटतच राहणार आहोत. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो अशी गावाकडे म्हण आहे. एका मालिकेने थांबून आपल्याला कसे चालेल? ही बाबासाहेबांवरची पहिली मालिका आहे, शेवटची नाही.

असाच लोभ कायम असावा.

स्नेहांकित,

हरी नरके

Tuesday, October 20, 2020

आपली "सावित्री-जोती" मालिका आता नव्या वळणावर- प्रा. हरी नरके





"सावित्री-जोती, आभाळाएव्हढी माणसं होती", ही मालिका सोनी मराठीवर सोम. ते शनि. सायं. ७.३० वाजता दाखवली जाते. या आठवड्यात या मालिकेचे १५० एपिसोड पुर्ण होतील. सावित्री-जोतींचा शिक्षणक्रांतीचा संघर्ष आता वेगवान झालेला आहे. आधुनिक भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया घालणार्‍या या जोडप्याचा जीवनप्रवास अतिशय प्रभावी पद्धतीने या मालिकेत चित्रित करण्यात आलाय. जानेवारीत सुरू झालेली ही मालिका लॉकडाऊनचे काही महिने वगळता दमदार आणि जोरकस प्रवास करतेय. आम्हाला जाणत्या प्रेक्षकांची उत्तम साथ मिळतेय. सावित्रीबाई-जोतीरावांच्या जीवनातील आजवर कुठेही प्रकाशित न झालेले, लोकांना फारसे माहित नसलेले असंख्य नवे पैलू आम्ही या मालिकेद्वारे प्रथमच प्रकाशझोतात आणीत आहोत. या विषयावरचा ३५ वर्षांचा माझा सगळा रिसर्च आम्ही या मालिकेद्वारे तुमच्यापुढे प्रथमच उलगडत असल्याने ही मालिका चुकवू नका. 

दशमी क्रियेशनची दर्जेदार निर्मिती, सोबत दशमीची तगडी टिम, अभिजीत शेंडे, प्रसाद ठोसर यांच्यासारखे लेखनसहकारी, ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, पुजा नायक, मनोज कोल्हटकर  यांच्यासारखे नामवंत कलावंत, उमेश नामजोशींचे दिग्दर्शन आणि सोनी मराठीची सर्व ताकद या मालिकेमागे असल्याने सर्वच थरातील आणखी प्रेक्षकांनी ही मालिका बघायला हवी. अशा मालिका वारंवार तयार होत नसतात. एका जबरदस्त अनुभवाला मुकायचे नसेल तर ही मालिका नक्की बघा. आपले अभिप्राय आम्हाला कळवा. त्रुटी, उणीवा, दोष सांगा. आवडलेले एपिसोड लोकांना बघायला सांगा. आपल्या विधायक टिकेचे आम्ही स्वागतच करू.

लॉकडाऊननंतर सर्व भाषिक भारतीय टिव्ही इंडस्ट्री मोठ्या अडचणींमधून मार्ग काढीत पुढे जातेय. अशावेळी प्रेक्षकांचे भरिव पाठबळ लाभणार नसेल तर मग अशा ऎतिहासिक, समाजप्रबोधनपर, शिक्षण आणि मनोरंजन यांचा सुमेळ असलेल्या मालिकांचे भवितव्य टांगणीला लागेल. जोतीसावित्रीने तुमच्यासाठी आयुष्य पणाला लावले, समर्पित केले, तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबासहीतचा अर्धा तास त्यांना देऊ शकणार नाही का? 

आजच्या विपरीत सामाजिक-राजकीय परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आज क्षीण झालेल्या पुरोगामी चळवळी आणि फक्त व्हर्च्युअल बोलभांडगिरी करणारे, फ्रस्टॆटेड निष्क्रीय कार्यकर्ते यांनी अशा प्रयत्नांना साथ द्यायला हवी. तुमची सक्रीय साथ आम्हाला हवी आहे. आज सनातनी शक्ती शिरजोर झालेल्या आहेत, त्यांच्याशी लढण्याचे मनोबल हरवत चाललेय. अशा वळणावर आमचे तगडे, थेट स्टॆटमेंट आम्ही या मालिकेद्वारे समाजापुढे आणीत आहोत. तुमची सकारात्मक साथ या प्रयत्नांना मिळणार की नाही? की फक्त विक्षिप्त आणि निष्क्रिय जगण्यालाच तुमचे प्राधान्य आहे? जोती-सावित्रीसारखे जे लोक सगळ्यांचे असतात, सगळ्यांसाठीच लढलेले असतात, त्यांच्यामागे तुम्ही आहात की नाही हे तुमच्या कृतीतून दाखवून देण्याची वेळ आत्ता आलेली आहे....

जय जोती-जय सावित्री!

- प्रा. हरी नरके,

२०/१०/२० 


Sunday, October 18, 2020

मालिका संपते आणि इतिहास सुरू होतो....

 Shilpa Kamble- मालिका संपते आणि इतिहास सुरू होतो....

डाँ.भीमराव आंबेडकर --एक गौरवगाथा या मालिकेचा आज शेवटचा एपिसोड पाहिला.डोळ्यात अश्रू तराळले. श्वेत रंगाची उधळण होत धम्मक्रांतीची सुरूवात झाली.तो सोहळा या प्रत्यक्ष अनुभवला.धम्मरसात न्हावून निघाले.

या  प्रकारची मालिका इडियट बाँक्सवर आली ही एका क्रांतीची सुरूवात झालीय.. दशमी प्राँडक्शन व स्टार टीवी यांना आंबेडकरी जनतेचे लाखो करोडो धन्यवाद. आजपर्यंत कोणत्याही चँनलने जो विषय हातळला नव्हता, त्या विषयावर मालिका करण्याचे धाडस स्टार टीवीने दाखवले. दशमीच्या पदाधिकाऱ्यांना सलाम. त्यांचा इतक्या वर्षाचा टीवी इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव पणाला लावून त्यांनी ही सिरीयल बनवली. 

   सुरूवातीपासून या कामाचा भाग होते, अपार कष्ट केले. थकले,थांबले,... परत लिहीत राहिले. अपर्णा पाडगावकर यांनी या लेखनप्रवासात दिलेली साथ लक्षात राहीन. हरि नरके सर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.पण त्यांचा व्यासंग,त्यांची आंबेडकरी विचांरावरची निष्ठा आणि त्यांची कामाबद्दलची लवचिकता या सर्व गोष्टींचा जवळून परिचय झाला. अभिजीत खाडे हा स्टारचा क्रिएटीव ड्रायरेक्टर ,एरवी त्यांच्याशी कधी भेट झाली असती की नाही माहीत नाही.पण या निमित्ताने सख्य जुळले. अभिजीतने या प्रोजेक्टला यशस्वी करण्यासाठी जी जिद्द दाखवली आहे ,त्याला तोड नाही. अक्षय पाटील या गोड हसणाऱ्या मुलाला विसरणे शक्य नाही. त्याने माझ्या लेखनावर सुरूवातीपासून शेवटपर्यंत विश्वास दाखवला.

        या मालिकेतील संवाद लेखक चिन्मय ,हितेश यांनी ऐतिहासिक ,माहीतीपर भाषा योग्य प्रकारे योजली. अमित हा चुणचुणीत मुलगा ,पटकन ऐतिहासिक सामग्री पुरवायचा....अनेक लोकांची मोलाची मदत या मालिकेसाठी झालीय.

  मालिकेमधील सगळे कलाकार कसलेले होते, लेखक लिहतो पण कलाकार त्या निर्जीव मुर्तीत जीव ओततो. रामजी,मीरा, केळुस्कर गुरूजी, भीमराव, रमा,मीरा,शंकर मामा,यशंवत ,नामा,मुकुंदा,बाजी ,शिवतरकर,दामू,देवकर, बाळादादा, लक्ष्मी....किती नावे घ्यावीत सगळ्यांनी भूमिकेला न्याय दिला.

    बाबासाहेबांची भूमिका करणारे सागर देशमुख यांनी तर कमाल केली . तरूण भीमराव ते वयस्क बाबासाहेब या साऱ्या छटा त्यांनी लीलया पेलल्या आहेत. त्यांनी या भूमिकेत अक्षरश जीव ओतला आहे. छोटीशी आठवण सांगते. एका प्रसंगात बाबासाहेब लंडनला आहेत आणि चंद्राकडे पाहतात, असा सीन होता. सागर यांनी थंडी वाजण्याची जबरदस्त अदाकारी करून तो सीन केलाय. त्यांचे बोलणे,देहबोली, मुद्राभिनय...सगळेच बाबासाहेबांशी तंतोतत जुळणारे...तुफान एनर्जीचे. त्यांनी शेवटी शेवटी तर अक्षरशः एकट्याच्या खांद्यावर ही मालिका तोलली होती.त्यांचे शतशः आभार.

    पाच वर्षापूर्वी मी कम्युनिटी मिडीया असा कोर्स केला होता. अँडमिशन घ्यायला पैसे नव्हते. मैत्रीणीकडून उधारी करून ,अनेक अडचणी सोसून हा कोर्स केला होता. मी हा  कोर्स का करतेय ,असे प्रश्न  मला इंटरव्यूह घेतांना विचारले होते. मी उत्तर दिले होते.मला आमचा कंटेट घेवून मिडीयात जायचे आहे.... तेव्हां माझे स्वप्न पुर्ण होईन असे मला वाटले नव्हते.पण ते स्वप्न पुर्ण झाले.

     स्क्रीनवर बुद्ध शरमं गच्छामी ऐकतांना....डोळ्यात पाणी तराळले. माझ्या मुलाने संपूर्ण सिरीयल रात्री जागरणे करून पाहिलय.ही जगातील अशी एकमेव सिरीयल असेन की जी पाहण्यासाठी आई वडिल त्यांच्या लहानग्यांना झोपेतून उठवत असतील...

  ही मालिका...   भारतीय समाजाला जागे करण्यासाठी निर्माण झाली होती. मालिका संपली पण आपण आता जागे व्हायचे आहे. डाँ.भीमराव आंबेडकर यांनी दाखविलेल्या रस्त्यावरून  भारताला चालायचे आहे. इतिहासातून प्रेरणा घेवून इतिहास रचायचा आहे.

जयभीम..                                

                                                             शिल्पा कांबळे

महामानवाच्या कार्याला दशमी परिवाराकडून मानवंदना

 Ninad Vaidya - सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार,

महामानवाची गौरवगाथा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या मालिकेने आज सर्वांचा निरोप घेतला. १८ मे २०१९ रोजी स्टार प्रवाह वर सुरू झालेला आपला प्रवास १७ ऑक्टोबर २०२० रोजी येऊन थांबला आहे.

मालिका सुरू होण्याआधी मनात अनेक प्रकारच्या भावना होत्या. आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या महासूर्याची गोष्ट आपल्याला सांगायची आहे. त्यासाठी डोंगराएवढं धाडस असणे आवश्यक होते. ते धाडस एकट्याने पूर्ण कदापी शक्य नव्हते. त्यातही बाबासाहेबांचा जीवनप्रवास, त्यांचे क्रांतिकारक कार्य इतके रॅडिकल होते की आताच्या काळात कोणता टीव्ही समुह ते दाखवण्याचे धाडस करेल याबद्दल मनात प्रचंड काळजी होती. पण अशा वेळेतही कोणत्याही राजकीय, सामाजिक दबावाला बळी न पडता स्टार प्रवाह या धाडसासाठी तयार झाले. धार्मिक सुधारणांच्या कार्याला दाखवताना आपण कोणत्याही प्रकारे हात आखडता घ्यायचा नाही या म्यूच्युअल अंडरस्टँडिंगवर स्टार प्रवाह आणि दशमी क्रिएशन अगदी ठाम होते. 

मी लहानाचा मोठा झालो तो शिवाजी पार्क, दादर परिसरात. घरात लहानपणापासून आंबेडकरी चळवळीतील कार्य़कर्त्यांचा राबता असायचा. ६ डिसेंबर रोजी लागणाऱ्या पुस्तकांच्या स्टॉल साठी लागणारे साहित्य, पुस्तके आणि इतर गोष्टींचा रतीब २६ नोव्हेंबर पासूनच घरात असायचा. सर्वच मातब्बर कार्यकर्ते मंडळी यांचा सहवास लहानपणापासूनचा. त्यामुळे बाबासाहेबांचं व्यक्तीमत्त्वाचं कुतूहूल हे कायम मनात घर करून होतं. 

आमच्या कुटूंबाची वेल ही थेट सुरू होते कोकणातून. सुरबानाना टिपणीसांपासून. एक प्रकारे बाबासाहेबांशी असलेलं आमचं नातं आमच्या पणजोबांच्या पीढीपासून. त्यामुळे ही गोष्ट सांगण्याची जेवढी एक्साईटमेंट होती त्याहून मोठी जबाबदारी आपण खांद्यावर घेतोय याचेही भान होतेच.

स्टार प्रवाहच्या एका मिटिंग दरम्यान सतीश राजवाडे यांनी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर काही शक्य आहे का अशी विचारणा केली. आणि, नितीन वैद्य सरांनी पुढच्या क्षणाला आमचा याच विषयावर अभ्यास सुरू आहे, जर तुम्ही तयार असाल तर आम्ही नक्कीच उत्तम मालिका बनवू शकतो असं ठामपणे सांगितलं. 

प्रचंड मेहनतीनंतर मालिकेसाठी लागणारी टीम बनवली गेली. बेस्ट ऑफ द बेस्ट लोकं निवडण्यात आली. लेखक संशोधकांनी अपार मेहनतीने मालिकेचा क्राफ्ट तयार केला. प्रत्येक घटना, सणावळ्या यांच्या सत्यतेबद्दल प्रा. हरी नरके सरांनी अतिशय मेहनतीने काम केले. दशमीच्या क्रिएटिव प्रोड्युसर आणि मालिकेच्या स्टोरी रायटर अपर्णा पाडगावर यांच्यावर मात्र आता मोठी जबाबदारी येऊन पडली होती. अख्खं राजकीय, सामाजिक आयुष्य टिव्ही ऑडियंससाठी दाखवताना त्याचं फिक्शनमध्ये रुपांतरण कसं करावं यासाठी जीवतोड मेहनत घेतली. त्यात स्क्रीनप्लेसाठी शिल्पा कांबळे यांची साथ लाभली. 

संवादलेखनाची बाजू आधी चिन्मय केळकर नंतर हितेश पोरजे

यांनी उत्तम सांभाळली. प्रत्येक एक्झुक्यूशनसाठी क्रिएटिव टिम मध्ये अक्षय पाटील, किरण आणि प्रोडक्शन टीम मधून दादा गोडकर यांनी जीव ओतून ही मालिका उभी केली. 

नितीन वैद्य यांनी मालिकेचा प्रत्येक भाग आधी स्वतः पाहून छोटे छोटे बारकावे आणि कंटेट मध्ये सुचना करत फायनल केल्या. त्यातूनच साकारली महामानवाची गौरवगाथा. 

सुरूवातीला फक्त २०० च भाग करायचे असा मानस घेऊन उतरलेलो आम्ही आज साडे तीनशे भागांवर येऊन पोहोचलो. हे करताना प्रोडक्शन कॉस्टबद्दल कसलीच तमा बाळगायची नाही यावर आम्ही सर्वच सुरूवातीपासून ठाम होतो. मग बाबासाहेबांचा लंडन, अमेरिकेतील प्रवास असो किंवा त्यांची आंदोलने असोत. महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन, नाशिकच्या काळाराम मंदिराचे आंदोलन, मनूस्मृती दहन आंदोलन हे छोट्या पडद्यावर शेकडो कलाकारांसोबत दाखवणे प्रचंड खार्चिक काम. जितके कलाकार शक्य झाले त्या सर्वांसोबत चित्रित करून प्रत्येक ऐतिहासिक घटना लार्जर दॅन लाईफ करण्याचे प्रयत्न मनापासून केले. 

मग आला राजगृहचा टप्पा. मला खुप कौतुक वाटतं. लोकं राहण्यासाठी घर बांधतात. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. मग ते असं वर वर दाखवणं योग्य ठरलं नसतं. म्हणून राजगृहचा आलीशान सेट उभा केला गेला. बाबासाहेबांसारखंच राजगृह देखील देखणं आणि आलिशान दिसलंच पाहीजे हा आमचा हट्ट होताच शिवाय आमची कमिटमेंट देखील. आपणा सर्वांना तो भाग खुप आवडला...

आणि, मालिकेच्या शीर्षकगीताला विसरून कसं चालेल बरं. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. आज कुठेही शाळा, कॉलेजात, गॅदरिंगला हे गाणं वाजलं नाही, सादरीकरण झालं नाही असा प्रसंगच विरळा. ठिकठिकाणाहून निरोप येत होते. मुलं मालिका पाहतायेत. आम्हाला भिवा बनायचं म्हणतायेत. भिवा सारखाच अभ्यास करायचा आहे असा निश्चय करतायेत. काही पुस्तकांच्या दुकानातून तर नेपोलियनच्या पुस्तकाच्या प्रती अचानक संपून गेल्याचे निरोप आले. खैरमोडे लिखित ग्रंथांची आवृत्तीही संपली. त्यासाठी त्यांनी मालिकेला धन्यवाद दिले. खुप आनंदाचा क्षण होता.

चांगदेव खैरमोडे यांचे पुत्र अरविंद खैरमोडे यांनी मालिकेचे एकेक पात्र उभे करताना आम्हाला जे मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळेच कास्टिंग परफेक्ट होऊ शकलं. कास्टिंग बद्दल बोलायला आपण नवीन पोस्ट घेऊयात. कारण तो एक स्वतंत्र विषय आहे. 

आज हे सर्व लिहीताना मन भरून येतंय. बाबासाहेबांनंतर सावित्रीजोती मालिकेचा प्रवासही असाच घडत आला आहे. त्यावरही लिहीनच. पण गौरवगाथा मालिकेला ज्या हजारो लोकांचे हात, बुद्धी आणि श्रम लागले आहेत त्यांचे मोल करणं खुप कठिण आहे. 

आणि तुम्ही प्रेक्षकांनी जी साथ दिलीत, जे प्रेम दिलंत त्याचे मोल कशातही करता येणारे नाही. मी तुम्हा सर्वांचा कोटी कोटी ऋणी आहे. महामानवाची गौरवगाथा आमच्या तुमच्या हातून घडली हीच त्या महामानवाच्या कार्याला दशमी परिवाराकडून एक छोटीशी मानवंदना. Special Thanks to Vaibhav Chhaya Sameer Shinde

आपलाच

Ninad Vaidya


आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका


Arun B.khore - महामानवाची गौरव गाथा : आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका-

विसाव्या शतकातील मानवी हक्कांचे अग्रणी नेते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील 'महामानवाची गौरव गाथा ',ही स्टार प्रवाह वाहिनीवरील टीव्ही मालिका शनिवार १७ ऑक्टो. २०२०रोजी  ३४३व्या भागाबरोबर संपणार आहे. मे २०१९ मध्ये ही मालिका सुरू झाली. यावर्षी लॉकडाऊनचा काही काळ वगळता ती नियमितपणे सुरू होती.

बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणातील आणि विद्यार्थी दशेतील त्यांना बसलेल्या अस्पृश्यतेच्या जातीय चटक्यांची तपशीलवार कहाणी या मालिकेतून महाराष्ट्राला आणि मराठी भाषिक असलेल्या जगातील सर्वच लोकांना ज्ञात झाली असेल यात शंका नाही.

आंबेडकरांची शिक्षणातील ओढ,  ज्ञानार्जनाचे त्यांचे विलक्षण भान आणि त्यानंतर या देशातील अस्पृश्य समाजाला सामाजिक न्याय देण्याची  त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यांचा एक अतिशय सुंदर असा पट या मालिकेच्या निमित्ताने आपल्या समोर आला.

ही मालिका निर्माण करणारे दशमी क्रिएशनचे सर्व निर्माते-दिग्दर्शक, ही मालिका लिहिणारा लेखक वर्ग, यातील सर्व कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आपण केले पाहिजे.

टीव्ही वाहिन्यांच्या अलीकडच्या काळात एखाद्या महापुरुषाची इतकी तपशीलवार चित्रण करणारी मालिका ह्या निमित्ताने पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे, यासाठी देखील निर्माता-दिग्दर्शक लेखकांचे मी अभिनंदन करेन.

आपल्याकडे प्राचीन  इतिहासातील आणि मध्ययुगीन इतिहासातील अनेक महान व्यक्तींवर मालिका निर्माण झाल्या  आहेत. काही महिन्यांपूर्वी संपलेली  संभाजी महाराजांवरील मालिका ही  यातील एक अशीच विशेष महत्त्वाची होती, असे मला वाटते. त्यापूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांवर देखील अशीच एक  महान मालिका निर्माण केली होती.

या दरम्यानच्या काळात संत तुकाराम चरित्रावरही एक मालिका आपण पाहिली आहे. अर्वाचीन काळातील महान व्यक्तिमत्वावर चित्रपट किंवा अशा दीर्घ टीव्ही मालिका निर्माण करणे तसे सोपे नाही. तरीही आपल्याकडे काही चित्रपट निर्माण झाले आहेत.

महात्मा गांधी यांच्यावर निर्माण केलेला रिचर्ड अटनबरो यांचा 'गांधी',हा  साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

यानंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधीही असा एखादा पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण झाला पाहिजे, अशी मागणी केली  गेली. यातूनच डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी आणि इंग्रजीमध्ये असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट निर्माण झाला. यात बाबासाहेबांची भूमिका करणाऱ्या मामुटी या दाक्षिणात्य अभिनेत्याचे विशेष कौतुक झाले आणि ते यथायोग्य होते.

बाबासाहेबांच्या भूमिकेचे आव्हान स्वीकारणे आणि त्या भूमिकेत शिरून ही व्यक्तिरेखा साकारणे हे खरोखर अवघड काम आहे. मामुटी या अभिनेत्याने तो ठसा निश्चित उमटवला.

काही वर्षांपूर्वी राज्यसभा टीव्हीने  विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याकडून 'संविधान',ही मालिका तयार करून घेतली होती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची एकूण प्रक्रिया याचा लेखाजोखा मांडणारी ही एकूण दहा भागातील मालिका राज्यसभा टीव्हीवर  प्रसारित झाली  होती. या मालिकेत बेनेगल यांचे दिग्दर्शकीय कौशल्य अतिशय वेगळेपणाने आपल्यासमोर येते. ही मालिका हिंदी आणि इंग्रजीमध्ये होती. आंबेडकरांची भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती. माझ्या दृष्टीने एखाद्या सक्षम अभिनेत्याने बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला इतका सुंदर न्याय त्यापूर्वी कधी दिला, असे म्हणता येत नाही. या मालिकेतील सगळीच व्यक्तिमत्वे ही  भारताचा इतिहास घडवणारी होती. त्यात राजेंद्रप्रसाद होते, नेहरू होते, पटेल होते आणि  गांधीजी तर होतेच होते! शिवाय के एम मुनशी होते,राजकुमारी अमृत कौर होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या. अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाने  ही संविधान सभा भरलेली होती. या संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो ठसा ही मालिका पाहताना आपल्या मनावर उमटतो, तो केवळ अपूर्व आणि असाधारण असाच होता! सचिन खेडेकरने अप्रतिम अशी भूमिका साकार करून आंबेडकरांच्या बौद्धिक कौशल्याचे सगळे तेज या व्यक्तिरेखेत ओतले होते.

या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे  चरित्रकार असलेले चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या बारा खंडीय अशा आंबेडकर चरित्राच्या आधारे साकार होणारी ही मालिका पाहण्याची उत्सुकता होती. 

फुले-आंबेडकर चरित्राचे संशोधक अभ्यासक हरी नरके यांच्या संशोधनाच्या आधारे या मालिकेला आणखी एक परिमाण लाभले होते. आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांच्या विविध खंडातील अनेक संदर्भ त्यांच्यामुळे या मालिकेच्या तपशिलात जोडता आले.

अपर्णा पाडगावकर, शिल्पा कांबळे यांचे लेखन, आनंद शिंदे यांचा बाबासाहेबांचा गौरव करणारा पहाडी स्वर, अतिशय सुंदर अशी नेपथ्य रचना, वेशभूषा आणि या सर्वांना उत्कृष्ट न्याय देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारणारे सर्व कलावंत यामुळे  अतिशय सुंदर अशी ही मालिका निर्माण निर्माण होऊ शकली.

चांगदेव खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या चरित्राचे काही खंड बाबासाहेब आहे तसाच गेले होते हयात असतानाच केले होते लिहिले होते त्यासंबंधी ते बाबासाहेबांची बोलले होते या बारा खंडातून बाबासाहेबांच्या स्वभावांची वेगळे वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात त्याचे अनेक पैलू या मालिकेतील त्यामुळे आपल्याला दिसू शकतात खैरमोडे यांनी लिहून ठेवले आहे थंड लिहून ठेवले होते ते पण त्यांच्या हयातीत आरंभीचे दोन खंड प्रकाशित झाले त्यानंतरच्या काळात त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी उर्वरित खंड प्रकाशित केले बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी त्यांच्या ज्ञानू साधनेचा बैल समजण्यासाठी पहिले समजण्यासाठी खैरमोडे यांचे हे चरित्र खंड वाचायलाच पाहिजेत असे आहेत आंबेडकर महामालिका निर्माण करताना निर्माता-दिग्दर्शकांनी या खंडांचा आधार घेऊन, आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला अतिशय सुयोग्य असा न्याय दिला आहे असे मी म्हणेन.

या मालिकेच्या निमित्ताने काही ठळक गोष्टी सांगायला पाहिजेत. एक म्हणजे, बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचे बाबासाहेबांच्या जडण-घडण यातील योगदान. त्याबरोबरच रामजीच्या भगिनी मीराताई यांनी छोट्या भिवाला वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याच्या शिक्षणासाठी असलेली त्यांची ओढ या गोष्टी हे पैलू प्रकर्षाने अधोरेखित झाले आहेत. रामजी सुभेदाराची भूमिका करणारे मिलिंद अधिकारी आणि मीरा आत्याची भूमिका करणाऱ्या पूजा नायक या दोन्ही कलावंतांनी अनेक प्रसंगात आपले डोळे ओले  केले आहेत. अतिशय समर्थपणे या भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या अंतकरणातही घर केले.

बाबासाहेबांचे लग्न रमाबाईंशी झाले. या रमाबाईंची भूमिका शिवानी रांगोळ  या अभिनेत्रीने अतिशय सक्षमपणे साकार  केली. बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेच्या काळात, ते अमेरिकेला शिक्षणासाठी तीन वर्षे वास्तव्याला असताना रमाबाईंनी जे सोसले त्याची  किंचितही तमा न बाळगता आपल्या बाबासाहेबांसाठी त्या काम  करत राहिल्या, त्याचे मोल हे खूप मोठे आहे आणि आणि शब्दांच्या पलीकडचे! रमाबाईंच्या जीवनातील ताणतणाव आणि कुचंबणा याचे याचे अतिशय संयमित आणि बोलके असे भावदर्शन शिवानीने ही व्यक्तिरेखा साकारताना घडवले, त्याबाबतीत तिचे विशेष कौतुक केले पाहिजे.

या मालिकेला " माझा भीमराया", हे शीर्षक गीत देणारे आनंद शिंदे,उत्कर्ष शिंदे या दोन्ही प्रतिभावान बंधूंचे मुद्दाम अभिनंदन करायला हवे.आनंद  शिंद्यांचा पहाडी सुर बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाची उंची आपल्यासमोर जणू उभी करतो. या मालिकेतील संवाद लेखक हे अनेक जरी असले तरी एकूण लेखन आणि संवाद यांचे धागेदोरे जोडलेले राहतील, याची दक्षता घेतली गेली आहे. 

बाबासाहेबांचे जीवन हे  कोलंबिया विद्यापीठातून भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वरूपाचे झालेले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणातील विविध संदर्भ, विविध समित्यासमोर त्यांनी मांडलेले मुद्दे, गांधीजी आणि नेहरू यांच्याशी त्यांची होणारी चर्चा आणि वादविवाद या सर्व गोष्टी कंटाळवाण्या न होता त्याला संवादी सूर असला पाहिजे, ही  काळजी या मालिकेच्या लेखकांनी खूप चांगली घेतली आहे. भारताच्या विसाव्या शतकातील सामाजिक क्रांती घडवणारा एक महापुरुष म्हणजे डॉ.आंबेडकर आणि त्यामुळे या मालिकेलाही एका  सामाजिक संदर्भाचे मोल आपोआप प्राप्त झाले आहे. त्याचे खरे बळ या संवादलेखन आणि मालिकेच्या एकूण सादरीकरणातही आपल्याला जाणवते.

बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा साकारणारे तरुण अभिनेते सागर देशमुख यांनी मात्र या मालिकेतील भावपूर्ण अभिनयाचा उत्तुंग बिंदू गाठून साऱ्या प्रेक्षकांच्या मनात बाबासाहेबांची एक प्रतिमा निर्माण केली आहे. सर्वांना ठाऊकच आहे की, या सागर देशमुखने दोन वर्षापूर्वी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा भाई या  चरित्रपटात साकार केली होती. तोच का हा सागर देशमुख; इतके भूमिकेचे परकाया प्रवेशाचे रूप या मालिकेत सागरने  साकारलेल्या आंबेडकर यांच्या भूमिकेत दिसते. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात अखंड अभ्यास करणारे बाबासाहेब, त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर संस्थानात अपमान सोसून आपले जीवन जगणारे आंबेडकर आणि नंतर शोषित वंचितांच्या लढाईत मूकनायक ,माणगाव परिषद या माध्यमातून आपले जीवितकार्य शेवटपर्यंत पुढे नेणारे बाबासाहेब असेच सगळे टप्पे आपल्या भूमिकेतून आणि विशेषत: मुद्रभिनयाच्या समर्थ आविष्कारातून सागर देशमुख यांनी सादर केले. खरोखर काळजाला पीळ पडावा असेच त्यांचे या मालिकेतील अखेरच्या काही भागातील व्यक्तित्वदर्शन घडत होते.

अलीकडच्या काही वर्षात आपल्या अंत:करणात ठसा उमटेल अशी बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमिका सागर देशमुखने सादर करून मोठे योगदान दिले आहे. ही मालिका संपत असताना आपल्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या या  मालिकेतील विविध अभिनेत्यांच्या, विविध प्रसंगातील भूमिका आपल्याला आंबेडकरांच्या प्रेरणादायी गौरवगाथेची नेहमीच आठवण करून देत राहतील. 

या मालिकेची निर्मिती करणे हे खरोखर अवघड आणि आव्हानात्मक असेच काम होते. दशमी क्रिएशन्सचे  नितीन वैद्य आणि त्यांचे सहकारी, विविध भागांचे दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि अर्थातच कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सागर देशमुख याला आंबेडकरांच्या भूमिकेसाठी नजीकच्या काळात विविध पुरस्कारांनी गौरवले गेले तर आश्चर्य वाटणार नाही. आंबेडकरांचे या मालिकेतील संदर्भ आता डिजिटल स्वरूपात आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी कायम राहतील, हा याचा फार मोठा सामाजिक असा लाभ आहे हेही यानिमित्ताने नमूद करू इच्छितो.

अरुण खोरे (दलित चळवळींचे अभ्यासक आणि लेखक),पुणे. संपादक : लोकशाहीसाठी समंजस संवाद,पुणे.

(शनिवार, दि.१७ ऑक्टोबर २०२०)

मित्रांनो, डॉ. आंबेडकर यांच्यावरील महामालिका काल संपली,३४३ व्या भागाबरोबरच.या निमित्ताने एक लेख लिहिला होता, तो अक्षरनामा या पोर्टलवर  प्रसारित झाला. तो येथे पोस्ट करत आहे.

(रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२०)


Saturday, October 17, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचा आज शेवटचा भाग - प्रा. हरी नरके

स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री १०.३० वाजता दाखवण्यात येणारी ही मालिका आज संपणार आहे. लॉकडाऊनचे काही महिने वगळता ही मालिका बुद्धजयंती २०१९ (१७ मे २०१९ ते १७ ऑक्टोबर २०२०) ते आजपर्यंत सादर करण्यात आली. इ.स. १८९१ ते १९५६ चा इतिहासकाळ आणि त्याचा पडदा व्यापून असलेले महानायक बाबासाहेब यांचे जीवनकार्य मराठी मालिकेच्या माध्यमातून साकार करणे हे महाकाय आव्हान होते. ते या मालिकेच्या टिमला कितपत पेलवले? या टिमचा एक भाग असल्याने याबाबत मी लिहिण्याऎवजी तुम्ही प्रेक्षकांनीच सांगायला हवे.

स्टार प्रवाह वाहिनीचे सर्व अधिकारी, दशमी क्रिएशन या निर्मितीसंस्थेचे संचालक व कर्मचारी, मालिकेत विविध भुमिका साकार करणारे कलावंत, सर्व तंत्रज्ञ, पडद्यामागचे सर्व श्रमिक या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो.

ही मालिका सुरू झाली तेव्हा जी वाहिनी टि.आर.पी मध्ये अग्रभागी नव्हती ती आज रोजी मनोरंजन वाहिन्यांमध्ये मराठीत नंबर एकवर आलेली आहे याचा आनंद वाटतो. स्टार प्रवाह वाहिनीला एक नवा प्रेक्षकवर्ग या मालिकेने मिळवून दिला याचेही मला समाधान वाटते. टि.आर.पी मध्ये मालिकेची लोकप्रियता सलग काही महिने चढती होती. काही क्षण तर असेही होते की चारपाच कोटी लोक ही मालिका बघत होते. लॉकडाऊननंतर अनेक कारणांनी सर्वच मालिकांचे प्रेक्षक दुसरीकडे वळले. त्यात या मालिकेची रात्री ९ ची वेळही बदलण्यात आली. आज मालिका संपताना टि.आर.पी.मध्ये जिथून मालिकेने सुरूवात केली होती त्या टी.आर.पी.वर ती पुन्हा आलीय. 

आज मराठीत सर्व मनोरंजन वाहिन्यांवर प्रचंड स्पर्धा आहे. सगळ्या मिळून दररोज किमान ४० ते ५० मालिका दाखवल्या जातात. याचवेळी रा. १०.३० ते ११ वाजताही किमान पाच मराठी मालिका चालू असतात. त्यात आवर्जून हीच मालिका बघणारेही काही कोटी प्रेक्षक असणं ही कामगिरीही मला मोलाची वाटते. आमच्या सगळ्या टिमची अपार मेहनत आणि प्रामाणिकपणा याला तुम्ही किती मार्क द्याल ते जाणून घ्यायला मला आवडेल. 

मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, असलेच तर काही दोष वेळोवेळी निदर्शनाला आणून देणारांचेही मी आभार मानतो.

मालिकेकडून आपल्या अनेक अपेक्षा असू शकतात पण तुमची अपेक्षापुर्ती न करणे यालाच मालिकेतले ठळक दोष मानण्याची पद्धत योग्य नव्हे. प्रगल्भ आणि सुजाण प्रेक्षक माझ्याशी सहमत होतील अशी अपेक्षा आहे. शेवटी ही एक एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, तिचे एक अर्थकारण असते. निखळ समाजप्रबोधन, शिक्षण, समाजकार्य या वेगळ्या गोष्टी आहेत. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची सारी गणितं जुळवून आपल्यापरीने मनोरंजनाच्या माध्यमातून जमेल तेव्हढे समाजप्रबोधन, शिक्षण, समाजकार्य करण्याचा आमचा हा प्रयत्न कितपत सफल झाला की फसला यावर तुम्ही द्याल तो निकाल आम्हाला मान्य असेल. शेवटी कोणत्याही उद्योगात प्रेक्षक ( ग्राहक) हाच पहिला आणि शेवटचा सार्वभौम आधार असतो.

-प्रा. हरी नरके 

१७/१०/२०२०



Saturday, October 3, 2020

प्राकृत भाषांच्या इतिहासाचे प्रमाणकपरिवर्तन करणारा मौलिक ग्रंथ- प्रा. हरी नरके





माझे काळीजतळापासूनचे स्नेही श्री संजय सोनवणी हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहेत. ते मुलत: बंडखोर विचारवंत आहेत. लिहीत्या हाताचे महत्वाचे सर्जनशील लेखक, इतिहासकार  आणि भाषातज्ञ अशीही सशक्त ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांनी कवी, नाटककार, चित्रकार, संशोधक, प्रकाशक, उद्योगपती म्हणुनही दणकट योगदान दिलेले आहे.

नानाविध विषयांवरील गाजलेले ग्रंथ त्यांनी आजवर लिहिलेले आहेत. ते धडाडीचे ब्लॉगर असून त्यांचे शेकडो लेख बहुचर्चित ठरलेले आहेत.

" प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास" हा त्यांचा ग्रंथ प्राकृत भाषांच्या इतिहासाचे प्रमाणकपरिवर्तन (पॅराडाईम शिफ्ट ) करणारा मौलिक ग्रंथ आहे. मराठीत या विषयावर अशाप्रकारची मुलभूत, संशोधनपर मांडणी करणारे पुस्तक आजवर उपलब्धच नव्हते. 

सिंधू संस्कृतीचा शोध १९२० साली लागला. हे वर्ष त्या शोधाचे शताब्धीवर्ष आहे. ह्या शताब्धीवर्षातली ही सर्वाधिक मौलिक कृती होय.


या ग्रंथाची तीन ठळक वैशिष्ट्ये आहेत.

(१) या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीय भाषांच्या इतिहासावरची सर्वस्वी नवी वैचारिक मांडणी सादर केलेली आहे. या पुस्तकाची दखल प्रत्येक भाषाप्रेमी व भाषा अभ्यासकांना घ्यावीच लागेल. 

(२) एकाच वेळी भाषातज्ञ आणि सामान्य भाषाप्रेमी नागरिक यांच्या ज्ञानात मुलभूत स्वरूपाची भर घालणारा हा वादळी ग्रंथ आहे. तो संशोधनपर असूनही किचकट नाही. दुर्बोध तर नाहीच नाही. विद्वत्ताप्रदर्शनाची पंडीती हौस म्हणुन तो लिहिलेला नसून समकालीन भाषक चर्चाविश्वात प्रवाही, सुगम, सुबोध मांडणीद्वारे केलेला सप्रमाण हस्तक्षेप म्हणजे हा ग्रंथ होय.

(३) सोनवणी प्राकृत भाषांचे मूळ शोधणारे सखोल उत्खनन या ग्रंथात मांडतात. ते संदर्भयुक्त असूनही विलक्षण सोपे, प्रवाही आहे. या अनोख्या ग्रंथात त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक वर्चस्वाचे हत्त्यार म्हणुन भाषक इतिहासाची आजवार कशी अनैतिहासिक व अशास्त्रीय मांडणी करण्यात आली यावर विदारक प्रकाशझोत टाकलेला आहे. मराठीचे इतिहासकार म्हणून मिरवणारांनी केलेले आणि शेंदूर थापून इतरांनी प्रतिष्ठीत केलेले बहुतांश लेखन सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी झालेले असल्याचे सोदाहरण दाखवून सोनवणी त्याचे समग्र वस्त्रहरण करतात. इंडोइरोपियन भाषा गटाच्या समर्थकांचे मत अशास्त्रीय असल्याचे सोनवणी दाखवून देतात. त्याचप्रमाणे आधी संस्कृत आणि त्यातून प्राकृत ही भाकड मांडणी ते फेटाळून लावतात.


माझे असे आग्रही मत आहे की, किमान चारपाच पीएच.डी. प्रबंधांचा ऎवज या एका ग्रंथात सामावलेला असल्याने महाराष्ट्रातील विद्यापीठांनी सोनवणींना या ग्रंथलेखनाबद्दल मानद डॉक्टरेट द्यायला हवी.

सर्व विद्यापीठांच्या मराठी विभागांनी मराठी भाषा व साहित्यातील एम.एम.या पदव्युत्तर पदवीसाठी हा ग्रंथ अभ्यासक्रमाला लावायला हवा.

माझ्यामते सोनवणी हे महान पंडीत, संत ज्ञानेश्वर, एकनाथ आणि महाकवी संत तुकारामांचे थेट वंशज/वारस आहेत. एकनाथ म्हणाले होते, " संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली?" मराठी ही महाराष्ट्री प्राकृतच असून ती संस्कृतपासून जन्मलेली नाही. ती एक प्राचीन, समृद्ध आणि प्रतिष्ठीत भाषा आहे अशी मांडणी करणारे एकनाथ पहिले. बहिणाबाइ म्हणतात, "तुकारामांनी वेदांचा अर्थ प्राकृतातून सांगितला." वेद म्हणजे पवित्र, वेद म्हणजे ज्ञान. वेद म्हणजे शास्त्र अशी समजूत असताना हे सारे करायला मराठी सक्षम आहे असे त्यांनी सिद्ध केले. ज्ञानेश्वर ही भाषा अमृतातेही पैजा जिंकणारी आहे असे सांगतात.  यांचा वारसा विकसीत करताना सोनवणी म्हणतात, " वैदिक भाषा व संस्कृत भाषा आणि प्राकृतातील परस्परसंबध हा प्राकृत भाषा ही वैदिक भाषेसाठी मावशी तर संस्कृत भाषेसाठी आई असा आहे." ते पुढे म्हणतात, " जगातील सर्व आदीभाषा ह्या प्राकृतच आहेत." त्यांनी असेही म्हटले आहे की, " भाषेचा इतिहास म्हणजे संस्कृतीचा इतिहास असतो. प्राकृत/पालीची संस्कृती कधीही दुय्यम नव्हते. संस्कृतसारख्या प्रगल्भ भाषेची जन्मदात्री याच प्राकृत ठरल्या. हा इतिहास प्रेरक आहे. प्राकृताच्या वंशजांना काही शिकवणारा आहे. या पुस्तकात मी द्राविड भाषांचा समावेश केला नसला तरी त्याही तेवढ्याच प्राचीन आणि साहित्यसमृद्ध आहेत यात शंका नाही. मी अनेकदा म्हटलेले पुन्हा उद्घृत करतो. जी संस्कृती जीवंत असते त्या संस्कृतीची भाषा कधीही मरत नाही. भले ती कालौघात बदलत राहील कारण परिवर्तन हा प्रवाही संस्कृतीचा अटळ भाग असतो. आपली भाषासंस्कृती पुढेही प्रगल्भ होत जाईल, ज्ञानभाषा बनेल आणि सुक्ष्मातीसुक्ष्म तरल भावनांनाही अभिव्यक्त करु शकण्याची अधिकधिक शक्ती मिळवेल." 


एक अतिशय गुंतागुंतीचा, किचकट आणि तांत्रिक विषय ज्या जिव्हाळ्याने सोनवणी उलगडवून दाखवतात त्याला तोड नाही.

माणसं भाषेच्या माध्यमातून संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पोचवित असतात. त्यामुळे माणसाचा भौतिक विकास, संस्कृती आणि भाषाविकास यांचे घट्ट नाते असते.

उत्खननात प्राचीन मानवी सांगाडे जसजसे सापडत गेले तसतसा माणसांच्या स्थलांतराचा नकाशा बदलत, उलटापलटा होत गेला. इंडो इरोपियनांच्या मूळ भाषेचे वास्तव दाखवणारा एकही पुरावा उपलब्ध नाही. आहेत ते सर्व तर्क ह्या महत्वाच्या गोष्टीकडे सोनवणी भाषाअभ्यासकांचे लक्ष वेधतात.


या पुस्तकाचा समारोप करताना सोनवणी म्हणतात, " प्राकृत, पाली व द्राविड भाषांनी या देशाचा सांस्कृतीक इतिहास रचला. या भाषा पुरातन काळापासुन जसा माणुस या उपखंडात स्थिर झाला तशा विकसीत व्हायला सुरुवात झाली. भुवैशिष्ट्यांनुसार त्यांनी आपापली स्थानिक वैशिष्ट्येसुद्धा विकसीत करत नेली. अतिपुरा प्राकृत अत्यंत साधी कमी गुंतागुंतीची व तेंव्हाच्या संथ जीवनव्यवहारांना पुरेशी ठरेल अशीच असणार हे उघड आहे. भारतात चाळीस हजार वर्ष जुनी भीमबेटका व अन्य गुंफांतील चित्रे काढुन अभिव्यक्त होणारा टोळीमानव राहत होता. त्याची भाषा नसेल असे म्हणणे अवैज्ञानिक आहे. सिंधु संस्कृती तर व्यापारी/उत्पादक/सर्जक संस्कृती. तेंव्हापर्यंत प्राकृतांनी किती प्रगल्भ रुप धारण केले असेल याची आपण कल्पना करु शकतो. भारतात सर्वाधिक साहित्य याच भाषांत लिहिले गेलेले आहे. रामायण-महाभारतादि ग्रंथही मुळचे प्राकृतातीलच होते असे विद्वानांनी दाखवुन दिल्याचे आपण पाहिले आहे. ऋग्वेदाच्याही या आधारभाषा बनल्या. महावीर-बुद्ध काळापर्यंत या भाषा एवढ्या प्रगत झालेल्या होत्या की त्याच भाषा जगातील महत्वाच्या धर्मांच्याही भाषा बनल्या. तांत्रिकांचे असंख्य ग्रंथ पुरातन काळापासुनच प्राकृतात येऊ लागले. अनेक संस्कृतात अनुवादित झाले आणि बृहत्कथेप्रमाणे मुळ ग्रंथ गायब झाले. पण म्हणून भाषेचा प्रवाह थांबला नाही. प्रगल्भ ग्रंथांबरोबरच लोकगीते, लोककथा, लोकनाट्यांतुन प्राकृत भाषा कलासौंदर्याने विस्फोटत राहिल्या. धर्म साहित्यात धीरगंभीर राहिल्या. आणि आजही या भाषा जीवंत आहेत. या भाषांनी अन्य भाषांपासुन घेतले तसेच अनेक भाषांनाही अनेक शब्द/संज्ञांचे प्रदानही केले. या नेहमीच जीवंत भाषा होत्या. प्रवाही होत्या. विकसनशील होत्या. या भाषांची निर्मिती या देशातील मानसशास्त्रीय प्रकृतीची निर्मिती आहे. प्राकृत नामाभिमान अगदी यथार्थपणे ही भाषा मिरवत आली आहे. ही भाषा अन्य कोणत्या भाषेतुन प्रसवली गेली असे म्हणने या भाषांवर अन्याय करणारे आहे."

Institute for Research on World-Systems (IROWS) University of California चा संदर्भ देऊन सोनवणी सांगतात, की " इ.स.पुर्व १५००० मध्ये शेतीचा व भाषेचा जन्म सोबतच झाला असावा." शब्द आणि संज्ञांचा प्रवास स्थलांतरामुळे झाला नसून व्यापारामुळे झाल्याचेही ते दाखवून देतात.


इंडियुरोपियन भाषा गटाऎवजी समान भाषा प्रवृत्तीवर ते भर देतात.

त्यांचे महत्वाचे प्रतिपादन असे आहे की, "सिंधू संस्कृतीचा व प्राकृत भाषांचा विकास साथसाथ झालेला आहे." भाषा हाच संस्कृतीचा मुलप्राण असतो हे सोनवणी दाखवून देतात.

या पुस्तकात सिंधू संस्कृतीच्या अंतरंगाचा सखोल आलेख मांडत जात सोनवणी आपल्याला दाखवून देतात की मुख्य प्राकृत भाषा आठ होत्या.


१. मागधी 

२. अर्धमागधी 

३, पाली

४. माहाराष्ट्री

५. गांधारी

६. शौरसेनी 

७. पैशाची, चुलिका पैशाची

८ प्रागतिक प्राकृत अथवा अपभ्रंश 

या पुस्तकात त्यांचा साधार इतिहास अनेक संदर्भ ग्रंथांमधले पुरावे, युक्तीवाद करीत सोनवणी रेखांकित करतात.

( प्रा.हरी नरके यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून-)


पुष्पाताई - प्रा. हरी नरके




प्रा. पुष्पा सरकार- भावे यांचे निधन म्हणजे केवळ एका विचारवंताने जगाचा निरोप घेणे नाही, तर मुल्यभान जपणार्‍या, भुमिका घेणार्‍या, पडेल ती किंमत मोजून त्या पेलणार्‍या आणि संधीसाधूपणाला नकार देणार्‍या दुर्मिळ प्रजातीचं अनंतात विलीन होणं होय. त्या प्रकांड विदुषी, प्रखर वक्ता आणि सामाजिक चळवळीच्या प्रमुख मार्गदर्शक होत्या. त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झालेले आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्याशी मारलेल्या आत्मपर-मौलिक गप्पांचे मेधा कुलकर्णी यांनी केलेले शब्दांकन आहे. बाईंचा व्यासंग किती दणकट होता त्याचे प्रत्यंतर या पुस्तकात बघायला मिळते. 

शिकवणे, फिरणे, चळवळींना मदत करणे या व्यापात पुष्पाबाईंनी लिहिण्याचा कंटाळा केला. त्यादृष्टीने प्रा. राम बापट, विनायकराव कुलकर्णी आणि पुष्पाबाईंची जातकुळी एकच होती. त्यांच्या भावे आडनावामुळे त्यांना ओळखण्यात लोकांची फसगत होई. आजही होते. या पुस्तकात आपल्या एका ब्राह्मण मैत्रिणीच्या घरी आपण " पुष्पा सरकार" असल्याने आपल्याला कशी वेगळी वागणूक मिळे याबद्दलचा निशेध त्यांनी सुचक शब्दात नोंदवलेला आहे. अर्थात त्या कोणत्याही जातीय शिडीचा वापर करण्याच्या विरोधात असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहावर त्या फारसं बोललेल्या नसाव्यात.

शाळकरी वयात परकर घातलेल्या ह्या चिमुरड्या पोरीला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाला भाषण करायला उभे केले असताना तिनं अस्सखलित भाषण केलेलं होतं. घरातला वाडवडीलांचा प्रार्थना समाजाच्या विचारांचा वारसा असल्याने पुष्पाताई सामाजिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या समाजघटकांच्या बाजूने आयुष्यभर उभ्या राहिल्या. आंबेडकरी चळवळीत आपल्याला कायम हक्कानं भाषणांसाठी बोलावलं जायचं, मात्र पुढेपुढे माझ्या भावे आडनावाची त्यांना अडचण होत असल्याने आपल्याला बोलावणं कमी झाल्याची खंत त्यांनी या पुस्तकात नोंदवलेली आहे. आपल्या देशात सारे काही जन्मावर ठरते. जन्माने धड इकडे नाही आणि धड तिकडेही नाही अशांच्या वाट्याला विचाराने ते कितीही निष्ठावंत पुरोगामी असले तरी कशी उपेक्षा येते याबद्दलच्या आमच्या ३० वर्षांपुर्वीच्या गप्पा मला अलिकडे जास्त आठवतात.


३६ वर्षांपुर्वी त्यांच्या महाविद्यालयाने व त्यांनी आयोजित केलेल्या रूईया करंडक वादविवाद स्पर्धेत मी पहिला आलो होतो, तेव्हा त्यांची माझी ओळख झाली. सामाजिक चळवळीत भेटीगाठी होत राहिल्या. तसं तर १९८२ सालीच त्यांना मी नामांतर आंदोलनात बघितलेलं होतं. मात्र नोव्हेंबर १९९० मध्ये महात्मा फुले स्मृतिशताब्धी वर्षात नारायण आठवले व अनुराधा आठवले यांनी गोव्यात आम्हाला एका मंचावर आणलं. प्रा.पुष्पा भावे, प्रा. सीताराम रायकर व प्रा. द. ता. भोसले यांच्यासह माझी भाषणं गोव्यात आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी मी शिवाजी महाराजांच्या जबरदस्त प्रेमात होतो. मी त्यांच्यावर फारच गौरवपर, उदात्तीकरण करणारं बोलायचो. भाषणानंतर एकदा पुष्पाताईंनी माझे बौद्धिक घेतले. मला म्हणाल्या " हरी, तू चळवळीत नवखा आहेस. शिवाजी महाराज थोरच होते पण ते एक राजे होते आणि मध्ययुगीन राजे होते, हे कधीही विसरू नकोस. आजच्या आपल्या लोकशाही जीवनदृष्टीला त्यांच्याबद्दल आदर बाळगूनही तिथेच थांबता येणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास तिथूनच सुरू होतो आणि तिथेच संपतो हे खरे नाही. हिंदुत्ववाद्यांना त्यांचे असलेले प्रेम खरे नाही, ते पुतणामावशीचे प्रेम आहे. त्यांच्याआडून त्यांना ब्राह्मणी मुल्यव्यवस्था पुन्हा आणायचीय. हे लाभार्थी त्यांची चिकित्सा करायला घाबरतात. सोयिस्कररित्या विसरतात, पण आपण चिकित्सा करायला हवी. माझे हे बोल मी "सरकार" आहे, तुझी सिनियर आहे म्हणून कायम लक्षात ठेव."

पुष्पाताई, ज्या काळात तुमच्या या विचारांची महाराष्ट्रीय समाजाला विशेष गरज आहे, तेव्हाच तुम्ही निघून गेलात.

- प्रा. हरी नरके


Thursday, October 1, 2020

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. हरी नरके

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज, राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. अनुयायी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याची एकतर्फी मांडणी करीत असतात. आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते आणि जित्याजागत्या माणसाच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते समकालीन असल्याने एकमेकांचे राजकीय स्पर्धकही होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. आता आणखी किती वर्षे ही कटूता, हा विखार कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?

ही पोस्ट वाचून काही कडवे लोक वस्सकन अंगावर येणार याची मला खात्री असूनसुद्धा लिहित आहे.

१. गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? नाही.

२. ते एकमेकांचे शत्रू होते का? नाही.

३. त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का?  हो. 

अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "रानडे, गांधी आणि जीना" या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट काँग्रेस अ‍ॅंड गांधी हॅव डन टू दि अनटचेबल्स" या ग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. गांधीजींनीही बाबासाहेबांबद्दल कठोर  प्रसंगी अनुदार लेखन केलेय. दोघांचीही टिका त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होती. पण हीच कटूता त्यांच्यात कायम राहिलीय का? तर नाही.

४. "मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा अपार जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. [अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक,  महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ]

सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब अग्रलेखात म्हणतात. बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा महात्मा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]

दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]

५. महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का? हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे. देवत्व बहाल करण्यामागे अपहरणाचा डाव असतो, हे कधी कळणार?

यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेच आहे. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंदच केली गेलेली आहे.

२६ ऑक्टोबर १९३८ रोजी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा अविचार आता बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे. टिका करताना हेत्वारोप केलेच पाहिजेत का?

६. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य गुणसुत्र होते.

त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने " चले जाव चा" नारा दिलेला होता.

७. गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण समजत होते. अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी नामदार गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले. त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर यांचा समावेश होता. तसेच आंबेडकरही ब्राह्मण असावेत त्यांचा समज झाला.

पहि्ल्या भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, " गांधीजी, मला मातृभूमी नाही" तेव्हा गांधीजी चरकले. आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. तेव्हा गांधीजी दुटप्पीपणानं वागले होते. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, "मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा." ही मुत्सद्देगिरी गांधीजींना फार महाग पडली. बाबासाहेब त्यांच्यापासून आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]

८. डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत.

घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक, सेक्युलर संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा बंगालच्या ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो खुलना मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.

दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ. एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने बाबासाहेबांना घटना परिषदेवर स्वत:च्या कोट्यातून पुन्हा बिनविरोध निवडून दिले.

ही वस्तुस्थितीनिदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे. 


काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बॅ. बाबासाहेब आंबेडकरांना जुलै १९४७ मध्ये मुंबईतून घटना सभेवर बिनविरोध निवडून आणले. त्यांना ऑगष्ट १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे कायदे मंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.


९. बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर हे लोक नथूरामला पसंती देतील काय? 


१०. बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, "होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता" असे नमूद केलेले लेखी पुरावे उपलब्ध आहेत.

नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे झाले. राष्ट्रव्यापीच नाही तर विश्वभर विस्तारले.

विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे लोक विकृत आहेत.

११. दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले.

पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. दोघांनाही काही लाडक्या खोडी होत्या. तरिही मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी एकत्र काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]

गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी. दाखवायला संत आतून मात्र पक्के राजकारणी. बनियाच.

त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.

दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "

बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे."

आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.

या दोघा महामानवांना वंदन.

-प्रा. हरी नरके