Monday, June 1, 2020

मागे वळून बघताना- प्रा. हरी नरके

















लहान वयातला माझा सगळ्यात आवडता वाड्मय प्रकार "चरित्र - आत्मचरित्र" हा होता. वेगवेगळ्या भन्नाट लोकांचे अनुभव, आत्मकथन वाचताना आपणच जणु ते आयुष्य जगतोय असा फिल यायचा. आजही माझा सगळ्यात आवडता विभाग "चरित्र - आत्मचरित्र" हाच आहे. माझ्या व्यक्तीगत ग्रंथसंग्रहात किमान ५००० तरी चरित्रं आत्मचरित्रांची पुस्तकं आहेत. शाळकरी वयात मला अल्पायुषी ठरलेल्या प्रतिभावंत साहित्यिक, योद्धे, विविध क्षेत्रातील कर्तबगार लोक आदींचं भारी आकर्षण होतं. त्यावेळी मला असं वाटायचं की माणसाला चांगलं, समृद्ध जगण्यासाठी लांबलचक आयुष्याची गरज नसते. शारिरिक, बौद्धिक परिश्रमाचं रसरशीत जगलेलं ३० ते ३५ वर्षांचं आयुष्य भरपूर झालं. तेव्हा आपल्या हातात तेव्हढाच वेळ आहे असं मानून मी चालत असे. पुढे जगण्यातली रंगत, गंमत, गुंतागुंत आणि विविधता आकळत गेली तेव्हा असं वाटायला लागलं की नाही ३५ फार कमी होतात ५० वर्षे ही लिमिट हवी.


पन्नाशी जवळ आली तेव्हा मी ठरवलं आणखी थोडी वाढ वाजवी ठरावी. मात्र साठी पुरे म्हणजे पुरेच.

आज कागदोपत्री वयाची ५७ वर्षे पुर्ण झाली. म्हणजे अजून उणीपुरी तीन वर्षे हातात आहेत. ३ वर्षे हा बक्कळ वेळ आहे!


( १ जून ही शिक्षकांनी नोंदवलेली कागदोपत्री जन्मतारीख आहे. पुढे आईने सांगितलेल्या आठवणींच्या आधारे मी खर्‍या जन्मतारखेचा शोध घेतला. ती सापडलीही. ती दोन महिने पुढची सापडली. मात्र कागदोपत्री बदल करायची मला आवश्यकता वाटली नाही. )


वाचनाच्या जबरी व्यसनाचा एक तोटा म्हणजे माणूस फार रोमॅंटिक बनतो. एक कविता आवडली होती, "मला दु:ख हवे." अर्थात तोवर दु:ख म्हणजे काय हे फारसं माहितही नव्हतं. तेव्हा वाटायचं आपल्यालाही दु:ख हवं. किती भारी ना! नंतर जसजसे दु:खाचे जबरी आघात होत गेले तेव्हा लक्षात आलं, दु:ख असतंच. ते मागायची काहीच गरज नसते. तुकोबा म्हणूनच गेलेत ना, " सुख जवापाडे, दु:ख पर्वताएव्हढे!" तथागतांनी सांगितलेला दु:ख निवारणाचा मार्ग आणि फुले-आंबेडकरांनी सांगितलेली जगण्याची रित हीच आपली वाट! या वाटॆवर चालत राहिलो. खूप मानसन्मान, आपुलकी, लोकप्रेम मिळत गेलं.


जात, वर्ग, लिंगभाव यांनी नाडलेल्या दुबळ्यांसाठी काम करायचं असं मनोमन ठरवलं होतं. त्यादिशेने धडपडत राहिलो. झटत राहिलो. अनेक चळवळींमध्ये विशेषत: भटक्याविमुक्तांच्या चळवळीत झोकून देऊन, जीव ओतून राबत राहिलो. स्वातंत्र्याच्या एव्हढ्या वर्षांनंतरही अपार दैन्य, अभाव आणि वंचितता यांचं जितंजागतं साम्राज्य म्हणजे हे पालावरचे समुह. या चळवळीतल्या सर्व गटातटांशी स्नेहबंध जुळले. सगळ्या नेत्यांना फार जवळून बघता आलं. अनुभवता आलं. काम एव्हढं मोठं होतं की नोकरी सोडून पुर्णवेळ कार्यकर्ता व्हावं असं वाटलं. प्रा. भा. ल. भोळेसर माझे सुहृद. त्यांच्याशी बोललो. ते नागपूरहून मुद्दाम पुण्याला धावत घरी आले. म्हणाले, " हरी, उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेली नोकरी सोडू नकोस.


पुर्णवेळ कार्यकर्त्यांचे हाल कुत्रंही खात नाहीत. विशेषत: आर्थिक परावलंबन फार वाईट. लाचारीचं आणि मानहानीचं जिणं पदोपदी वाट्याला येतं."  त्यांचं म्हणणं पटलं. नोकरी करीत काम करीत राहिलो. गरजा अतिशय मर्यादित ठेवल्या. बिडी-काडी-दारू-सिगारेट यांना गेल्या ५७ वर्षात कधीही हात लावला नाही. साधनशुचिता, वखवखमुक्त जगणं आणि लोकशाही जीवनमार्ग यांनी खूप समाधान दिलं. आंतरजातीय विवाह आणि एकच मुल पुरे हा बाबासाहेबांचा आदेश मानला आणि कडवा विरोध झाला तरी जातीबाहेर लग्न केलं, पहिलं अपत्य झाल्यानंतर स्वत:चं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलं.


पुढे वसंत मून यांच्या निधनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचं काम बंद पडणार होतं. सरकारच्या अवघ्या दोन हजार रूपये दरमहा मानधनावर हे काम करायला एकही फुले-आंबेडकरी विद्वान, प्राध्यापक तयार नव्हता. तेव्हा टेल्कोची नोकरी सोडली. आमच्या विभागाच्या प्रधान सचिव चंद्रा अय्यंगार म्हणाल्या, " हरी, टेल्कोची असली नोकरी सोडणारा माणूस मुर्ख असला पाहिजे. अरे ही नोकरी मला मिळणार असेल तर मी माझा आय.ए.एस.चा जॉब सोडायला तयार आहे." तरिही मी त्यांचं ऎकलं नाही.


त्या काळात उत्तमोत्तम खंड प्रकाशित करता आले याचं समाधान आहे. फुले-आंबेडकरांची ही पुस्तकं पुढील शेकडो वर्षे टिकणार आहेत. सरकारने संपादक पदाचं मानधन स्वत:हून वाढवलं आणि जादूची कांडी फिरली. अनेक विद्वान, प्राध्यापक हे काम मिळवण्यासाठी मंत्र्यांचे उंबरे झिजवू लागले. जातीचे दाखले सादर करू लागले. मी तयार केलेल्या पुस्तकांवर खोटेनाटे लेख लिहिले जायला लागले. कुभांडं रचली जायला लागली. बदनामीचं अभियान गतिमान झालं. दुसरीही एक छळछावणी कामाला लागली.


वामन मेश्राम यांच्या बामसेफची. मी या संघटनेचा कधीही सदस्य नव्हतो. पदाधिकारी असण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यांच्या संघटनात्मक कामात मी कधीही रस दाखवला नाही. ते मला कार्यक्रमाला वक्ता म्हणून बोलवायचे. मी जमत असेल तर जायचो. फार पुर्वी वामन मेश्राम जेव्हा पोस्टमनची नोकरी करीत होते, तेव्हाच माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. ते चळवळीत फार उशीरा आले. चळवळीतले कितीतरी टक्केटोणपे खाण्यात मी त्यांना सिनियर आहे. त्यांनी मला फुले-आंबेडकर शिकवलेले नाहीत. मी बामसेफकडे गेलो नव्हतो. ते बोलवायचे म्हणून त्यांच्या स्टेजवर जायचो. मी मला बोलवा असं सांगायला कधीही गेलो नव्हतो.


जेव्हा मेश्राम चळवळीत एकटे पडले होते तेव्हा त्यांना पुन्हा उभे राहायला माझ्या भाषणांचा फायदा झाला. त्यांनी मला मोठं केलं हा त्यांच्या गटाचा प्रचार संपुर्ण निराधार आणि बिनबुडाचा आहे. मेश्रामांची कार्यपद्धती न पटल्याने मी त्यांच्या कार्यक्रमांना जायचे बंद केले. तर त्यांनी माझ्याविरूद्ध अतिशय गलिच्छ अभियान छेडलं. भयंकर!

हो, तरिही सामान्य कार्यकर्त्यांनी मात्र मला अपार प्रेम दिलं. विश्वास दिला.


प्रस्थापित व्यवस्था तुम्हाला खतम करायला टपलेलीच असते. एकदा इस्लामपूरला माझे भाषण होते. खूप मोठी उपस्थिती होती. ना. जयंत पाटील अध्यक्ष होते. भारतीय संविधानावर व्याख्यान होतं. कार्यक्रम जंक्षान झाला.


एक युवक येऊन भेटला. भाषण आवडल्याचे सांगत होता. निघताना त्यानं खिश्यातून एक पुडी काढली. म्हणाला, " सर, आवाजासाठी तुम्ही गुंजेचा पाला खात जा. माझं पानाचं दुकान आहे. तुमच्यासाठी मी पान आणलंय. नक्की खा. आवडेल तुम्हाला. मी ते खिश्यात ठेवलं. रात्रीचं जेवन संयोजकांच्या घरीच होतं. ते डॉक्टर होते. त्यांचा दवाखाना घराशेजारीच होता. जेवन झालं नी मला त्या पानाची आठवण झाली. डॉक्टर म्हणाले, " सर, नका खाऊ, अनोळखी माणसाने दिलेलं पान आहे. त्यात काहीही असू शकतं." तोवर मी कट्यार काळजात घुसली बघितलेलं नव्हतं. पानात शेंदूर किंवा इतर विषारी केमिकल्स घालून लोक कायकाय उद्योग करतात हे मला माहित नव्हतं.


त्याकाळात माझा सार्‍या जगावर अफाट विश्वास होता. मी पान तोंडात टाकलं आणि तोंडाची आग व्हायला लागली. डॉक्टर बाजूलाच उभे होते, त्यांनी तातडीने पान थुंकायला लावलं. ताबडतोब आवश्यक ती मेडीकल ट्रीटमेंट दिली. म्हणूनच घसा वाचला. नाही तर तेव्हाच माझी भाषणं बंद पडली असती! संयोजक मुलांनी त्या पान देणाराला हुडकून काढला. बोलता केला. त्याला काही रक्कम देऊन सुपारीवर पाठवलेलं होतं एका प्रतिगामी संघटनेनं. "संस्कृतीच्या गप्पा मारणारे सनातनी" अशा पद्धतीनं माझा आवाज बंद करू पाहत होते तर!


ख्यातनाम संशोधक डॉ. रा.चिं. ढेरेअण्णा मला सांगायचे, " हरी, जसजसे आपले काम वाढत जाते, त्याला समाजमान्यता मिळू लागते, तसतसे आपल्या जवळचे लोक त्या मान्यतेचे वाटेकरी व्हायचा प्रयत्न करतात. श्रेय नाही मिळाले की दूर जायला लागतात. स्पर्धकभावनेने पेटू लागतात. आपण एकटे पडतो. त्यासाठी मनाची तयारी हवी!" ते अगदी खरे निघाले.


ज्या भटक्यांच्या चळवळीसाठी कोणतीही अपेक्षा न करता मी आयुष्यातील अनेक वर्षे दिली, तिथल्या काही नेत्यांची असलीयत भयंकर होती. आहे. क्रिमीनल. गुन्हेगारी स्वरूपाची. सराईत दरोडेखोरीची. ही चळवळ म्हणजे त्यांची रोजगार हमी योजना होती. आहे. कोणताही कामधंदा न करता ऎशोआरामात जगण्याचा किफायतशीर धंदा. वरून अगदी ऋषीमुनी वाटणारे हे नेते आतून इतके सडके, विकृत आणि पॉकेटमार आहेत की सटपटायला होते. झाले. चळवळीतली सर्वात जवळची माणसंच जेव्हा आपला विश्वासघात करतात, आयुष्यातून उठवायला निघतात तेव्हा फार खचायला होतं.


जगण्यातला रसच आटतो. त्या संकटकाळात प्रा. रंगनाथ पठारे, सन्मित्र संजय सोनवणी, संजय आवटे, डॉ. धनंजय चव्हाण, डॉ. हिरेन निरगुडकर, शुद्धोधन आहेर, आनंद उबाळे  आणि अ‍ॅड. बी.एल. सगर- किल्लारीकर हे मान्यवर माझ्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यांचे आणि माझ्यावर अपार प्रेम करणार्‍या सामान्य माणसांचे हे ॠण कधी आणि कसे फेडणार? सगळ्याच जातीधर्मातील सामान्य माणसांनी माझ्यावर एव्हढी वर्षे केलेलं अपार प्रेम हा तर माझा फार मोठा ठेवा! ही आपुलकी, ही विश्वासार्हता, ही सोयरिक हीच माझी आयुष्यातली सर्वात मोठी जमापुंजी. खरा बॅंक बॅलन्स! माझ्यावर संस्कार करणारी माझी आई, मोठे बंधू, माझे शिक्षक, ज्यांचं वाचून आजवरची वाट सुकर झाले ते सारे आणि मला घडवणारे सगळे मान्यवर यांच्याविषयीची कृतज्ञता काळीजतळापासून व्यक्त करतो. जयभीम! जय भारत!

- प्रा. हरी नरके, १/६/२०२०

No comments:

Post a Comment