Monday, June 15, 2020

प्रयोगशील शिक्षणव्रती : लीलाताई पाटील - प्रा. हरी नरके











कोल्हापूरला शिक्षणाच्या क्षेत्रातील सृजन आनंद हा मौलिक प्रयोग साकारणार्‍या लीलाताई पाटील यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. लिलाताई या महत्वाच्या आणि कृतीशील शिक्षणतज्ञ होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे भाचे बापूसाहेब पाटील आणि लिलाताई हे जोडपे म्हणजे धडपडणारे, प्रयोगशील आणि निष्ठावंत दाम्पत्य. सारे आयुष्य त्यांनी सामाजिक कार्याला आणि शिक्षणाला वाहिलेले होते. बापूसाहेब स्वभावाने मृदू तर लिलाताई कडक, करारी आणि स्पष्टवक्त्या. सृजन-आनंद ही महाराष्ट्रातली प्रयोगशील शाळांची सुरूवात होय. सुमारे ४० वर्षांपूर्वी लीलाताईंनी आनंददायी शिक्षणाचा हा प्रयोग सुरू केला, त्यापासून प्रेरणा घेऊन पुढं राज्यभरात असे काही प्रयोग झाले.


मी वयाच्या विशीत असताना त्यांची माझी ओळख झाली. कोरगावकर ट्रस्टच्या सहकार्याने विषमता निर्मुलन शिबीर कोल्हापूरला घेण्यात आलेले होते. एका सत्राच्या अध्यक्षा लिलाताई होत्या. त्या नामवंत महिला प्राचार्या म्हणुन त्यांचा फार दबदबा होता. मी तेव्हा अतिशय भाबडा आणि भावनाशील होतो. चळवळीबद्दल कमालीचा संवेदनशील. जात, वर्ग, लिंगभाव याबाबतची माझी मतं निव्वळ पुस्तकी, ऎकीव आणि बावळट अशी होती.


मी  एक नवखा वक्ता होतो. मी काय बडबडावं? " स्त्रिया जर सरकारी नोकरीत आल्या तर भ्रष्टाचार कमी होईल, त्या गोरगरिबांना मदत करतील, त्या पुरूषांपेक्षा जास्त तास काम करतील. त्या कामचुकारपणा करणार नाहीत, खोटं बोलणार  नाहीत. इ..इ." मला त्याकाळात मागासवर्गीय, स्त्रिया, वंचित समाजघटक, विशेषत: भटके विमुक्त यांच्याबद्दल अतिव कळवळा होता. माझी त्यांच्याबद्दलची मतं अनुभवावर आधारलेली नव्हती. पुस्तकी आणि अव्यावहारिक होती. हे अर्थात खूप नंतर कळत गेलं.


आजच एका मित्राने शेयर केलेली एक पोस्ट वाचली. लग्नाच्या मेळाव्यात मुली कशा खर्‍या आणि प्रामाणिक बोलणार्‍या होत्या तर मुले कशी लबाड, खोटी आणि बेगडी होती, वगैरे. एका तथाकथित स्त्रीमुक्तीवादी बाईंची ती पोस्ट होती. सरसकटीकरण, भाबडेपणा आणि भंपकपणा यांचा अस्सल नमुना.


तर तेव्हा माझी अशीच मतं असायची. अध्यक्ष म्हणुन बोलताना लिलाताईंनी माझी चांगलीच सालटी काढली. "तुम्हाला कुणी सांगितलं की बायका भ्रष्टाचार करणार नाहीत? बायका कामचुकार नसतात हे कशाच्या आधारे तुम्ही ठरवलं? मी एक स्त्री आहे आणि माझा अनुभव आणि अभ्यास सांगतो की कामचुकारपणा, लबाड्या, भ्रष्टाचार यात कशातच बायका पुरूषांना हार जाणार्‍या नाहीत. तुम्ही लहान आहात म्हणून ठीकाय. तुमची मतं मी खोडून काढते आणि ती निराधार व बालीश असल्याचे स्पष्ट करते."

बाप रे! जाहीरपणे मला त्यापुर्वी कुणी असं सटकावलेलं नव्हतं.


बापूसाहेब माझ्या शेजारीच बसलेले होते. त्यांचा चेहरा गोरामोरा झालेला. माझा हात हातात घेऊन ते मला म्हणाले, " आमची लिला अतिच फटकळ आहे. तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मनानं ती चांगली आहे. तिच्या स्वभावातला हा काटेरीपणा सदाशिवपेठी, फडकेमठाचा आहे."


तेव्हा मला कळले की लिलाताई ह्या सुप्रसिद्ध कादंबरीकार ना.सी.फडके यांच्या कन्या होत्या. ना.सी. फडके यांच्या पहिल्या पत्नीची लिलाताई ही मोठी मुलगी. ना.सी.फडके यांनी दुसरा विवाह केल्यानंतर लिलाताई आणि त्यांच्या आईची परवड झाली. मी ना. सी.फडक्यांचा त्या वयात चाहता होतो. माझ्या शाळेशेजारीच त्यांचा बंगला होता. मी त्यांच्याकडे जात येत असे. ते मला खूप मायेने वागवायचे. तेव्हा शाळकरी वयात माझे अतिशय आवडते कादंबरीकार असलेले ना. सी. फडके आज मला दुय्यम दर्जाचे कादंबरीकार वाटतात. कालबाह्य. कारागीर. तर असो.


बापूसाहेब व लिलाताईंचा  आंतरजातीय विवाह होता. कार्यक्रम संपल्यावर लिलाताई माझ्याजवळ आल्या नी मला म्हणाल्या, " आज संध्याकाळी आमच्या घरी चहाला या. तुमचा भाबडेपणा तुम्हाला एक दिवस गोत्यात आणेल." लिलाताईंनी वर्तवलेले हे भविष्य पुढे तंतोतंत खरे ठरले. बापूसाहेबांनीपण मला चहाला येण्याचा आग्रह केला.


संध्याकाळी मी घरी गेल्यावर लिलाताईंनी माझे बौद्धिक घेतले. त्यांचे म्हणणे मला तेव्हा फारसे पटले नसले तरी पुढे मंत्रालयात काम करताना लिलाताईच कशा बरोबर होत्या त्याचे प्रत्यंतर मिळत गेले.


पुढे सामाजिक जीवनात वावरताना मागासवर्गियांचे काही नेते किती धंदेवाईक व क्रूर असतात याचे धडे मिळत गेले. त्यांच्या गुन्हेगारी वर्तनाचे जबरदस्त चटके बसले. त्यांच्या आईतखाऊपणाने खूपच पोळलो. जवळच्या म्हणवणारांनी चळवळीच्या नावावर सरळ विश्वासघात केला. इतके सराईतपणे लुटले, केसाने गळा नी खिसा कापून वर कांगावा असा केला की तेच ऋषीमुनी! चळवळ आणि व्यक्तीगत जगणे यातला रसच संपावा अशी ती वेळ होती. सगळा जीवनरस करपवणारा तो अनुभव कधीही विसरणं शक्य नाही. वैचारिक सामाजिक भुमिका जरी फारशी बदलली नाही तरी तिच्यातला "सब घोडे बारा टक्केवाला सरसकटीकरणाचा" आंधळेपणा निघून गेला.


केस टू केस मेरिटवरच ठरवावं लागतं कोणतंही प्रकरण. त्यामुळे आधी शोध घेतल्याशिवाय मत बनवणं हा मुर्खपणा असतो हे कळत गेलं. स्त्रिया, मागासवर्गिय हे सगळेच मुळात माणूस असल्याने तेही माणसासारखेच बनेल, लबाड आणि क्रूर असू शकतात. काकणभर सरसच असतात हेही कळत गेले. शेवटी सगळी माणसंच आहेत हेच एकमेव अंतिम सत्य. त्याचा पहिला धडा चाळीस वर्षांपुर्वी लिलाताईंनी दिला.


 वीस वर्षांपुर्वी प्रा. रामकृष्ण मोरे यांनी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी लागू केले. मी ज्या परिवारात होतो, आहे तिकडचे बहुतेक सगळेच या निर्णयाच्या विरोधात होते. खूप आक्रमक टिका झाली. मी टेल्कोत असल्याने इंग्रजीअभावी कार्पोरेटमध्ये बहुजन मुलांचे कसे आणि किती हाल होतात ते बघत होतो.


मी मोरेसरांसोबत राहिलो. त्याकाळात मी पहिलीपासून इंग्रजीच्या बाजूने १४० सभा घेतल्या. सगळं राज्य पिंजून काढलं. कोल्हापूरची सभा कुडीत्रे येथे रात्री २.३० वाजता झाली होती. साधनाच्या अंकातली मोरेसरांची मुलाखत मी घेतलेली होती. खरं म्हणजे तिचं सगळं ड्राफ्टींगच माझं होतं.


त्या माझ्या भुमिकेवर लिलाताई संतापल्या. पुण्यातल्या एका कार्यक्रमात आमची भेट झाली. त्या माझ्यावर इतक्या चिडल्या होत्या की त्यांना बोलायला शब्दच सुचेनात. त्या रागाच्या भरात मला खूप टाकून बोलल्या. शिक्षणक्षेत्रातील त्या अधिकारी व्यक्ती होत्या. दुर्बलांचे शिक्षण हा त्यांचा ध्यास होता. "अंग्रेजी हटाव" हा लोहियांचा नारा समाजवाद्यांना प्रिय होता. त्यांचे बोलणे तळमळीचे होते. मला पटले नाही म्हणून काय झाले? त्यांना सरकारवर नी माझ्यावरही टिका करण्याचा अधिकार होता. त्यामुळे मी ते बोलणे मनाला लावून घेतले नाही. कारण २० वर्षापुर्वीचे त्यांचे सल्ले मला एव्हाना पटायला लागले होते. त्या आईच्या मायेनं संतप्त होऊन बोलत असाव्यात असेच मी मानले.


त्यांच्या मते " मंत्री मुर्ख असतात, मोरेसरांचा सगळा थिंकटॅंक तू आहेस. तू त्यांना चुकीचा सल्ला दिलायस." हे मात्र खरे नव्हते. मी सरांच्या जवळ असलो तरी तो निर्णय त्यांचाच होता.


मोरेसर अतिशय बुद्धीमान होते.पहिलीपासून इंग्रजीची कल्पना त्यांचीच होती. हे खरेय की मी आणि त्यावेळचे शिक्षण सचिव रमेशचंद्र कानडे आम्ही तासनतास मोरेसरांसोबत बसून त्या धोरणाचे तपशील ठरवलेले होते. आम्हाला त्यावेळी सहकार्य करणार्‍या शिक्षणतज्ञ मीनाताई चंदावरकर यांचा अपवाद वगळता तमाम समाजवादी, शिक्षणतज्ञ ही सगळीच जमात या निर्णयाच्या विरूद्ध होती.


आज २० वर्षांनंतर कोण चुकले, कोण बरोबर होते याचे मूल्यमापन व्हायला हरकत नसावी.

विनम्र आदरांजली!!

- प्रा.हरी नरके,
१५/६/२०२०



अधिक वाचनासाठी-

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांचे निधन

प्रयोगशील, नाविन्यपूर्ण शिक्षण चळवळीच्या प्रणेत्या आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक लीलाताई पाटील यांचे कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. स्वसनाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कन्या असलेल्या लीला ताईंचा २८ मे १९२७ ला जन्म झाला. त्या राष्ट्र सेवा दल आणि १९४२ च्या चले जाव या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब पाटील यांच्याशी त्यांनी त्या काळामध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला.
त्यांनी कला शाखेत शिक्षण घेऊन १९४९ साली शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. पुढे त्यांनी शिक्षण शास्त्रामध्ये शिक्षण घेऊन १९५६ साली कोल्हापूर येथेच शासकीय अध्यापक विद्यालयात नोकरी सुरू केली.
त्यांनी कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी, या ठिकाणी शासकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले. पुढे त्या शिक्षण सहसंचालक झाल्या. १९८५ साली त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी ‘बीएड' व ‘एमएड' अभ्यासक्रमासाठी पुस्तकांचे लेखन केले. लिलाताईंची 'शिक्षण देता- घेता' आणि 'ऐलमा पैलमा शिक्षण देवा' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

शिवाजी विद्यापीठातर्फे उत्कृष्ट ग्रंथासाठी त्यांच्या तीन पुस्तकांची निवड झाली. १९८८ साली त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. शिक्षण पध्दती सुधारणांसाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे आणि शोध निबंधांचे लिखाण केले. त्यांच्या दोन शोधनिबंधांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. निवृत्ती नंतर १९८५ साली त्यांनी कोल्हापूर येथे ‘सृजन आनंद विद्यालय’ व ‘सृजन आनंद शिक्षण केंद्र’ या शैक्षणिक उपक्रमाची सुरवात केली. याला राज्यभर प्रसिद्धी मिळाली. यामुळेच त्यांना आनंददायी, सुजनशील शिक्षणाच्या प्रणेत्या म्हंटले गेले. त्यांना महाराष्ट्र फौंडेशन, डॉ. गोवर्धनदास पारिख पुरस्कार, कोरगावकर ट्रस्ट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार, आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

No comments:

Post a Comment